*प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*
〰️〰️〰️〰️〰️✒️
न लगे चंदना सांगावा परीमळ।
वनस्पतिमेळ हाकारुनी।।
अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी।
धरिता ही परी आवरे ना।।
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की चंदनाला आपल्याकडे सुगंध आहे हे सांगण्यासाठी त्याला वनस्पतींचा मेळावा भरून जाहीर करावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. त्याचा असलेला सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत राहत असतो ते अंतर्यामी असतं ते स्वभावतःच बाहेर धावत अविष्कृत होण्यासाठी ते उतावीळ होत असतं चंदनाने ते आपल्या आत कितीही आवरून धरायचं म्हटलं तरीही त्याला ते आवरता येत नाही असा तो सुगंध असतो. नेमकं असंच चंदनासारखे झिजणारं आणि सुगंध देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू धंदर सर!
जे मुळात आत मध्ये दडलेल असतं त्या सुगंधाला अन झिजण्याला वारसा देखील असतो. अगदी चंदना प्रमाणेच तो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपणारा असतो. आपल्या महाराष्ट्र भूमीच्या पवित्र मातीचा वारसा देखील चंदनाप्रमाणे झिजणारी आणि सुगंध देणारी माणसं तयार करण्याचाच आहे.
मराठवाडा -विदर्भ सीमेवर असलेल्या बुलढाणा तालुक्यातील डोमरूळ या गावांमध्ये बळीवंशीय कुटुंबात विष्णू धंदर सरांचा जन्म झाला. शिक्षणाचा वसा आणि वारसा या कुटुंबाला आपल्या वडिलांपासूनच मिळाला. वडील स्व हिरामण धंदर हे निवृत्त मुख्याध्यापक होते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढल्याने त्यांना सर्व सामाजिक समस्येची जाण होती. धाड परिसरातच जि प शाळतूनच आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य आपल्या वडिलांप्रमाणेच हाती घेतले. 1985 ला लोणार तालुक्यातील गुंजखेड या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी शिक्षणाचे हे महान कार्य सुरू केले. प्राथमिक शिक्षणापासून दूर गेलेली खेड्यापाड्यातील मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे त्यांना दर्जेदार व गुणवत्तार पूर्ण शिक्षण आपण दिलं पाहिजे हा ध्यास मनात घेऊन गणित,विज्ञान व क्रिडा या आवडीच्या विषयाने त्यांनी या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आपल्या सेवेतील पहिली तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी धामणगाव धाड या ठिकाणी दिलेल्या आपल्या दहा वर्षाच्या सेवेत एक्स्ट्रा क्लास,रात्रीचे वर्ग,ग्रामिण क्रिडा स्पर्धेत धामणगावच्या क्रिडापटूनी खो-खो,कबड्डी,कुस्ती स्पर्धेत अनेकवेळा राज्य स्तरावर यश मिळवले असे अनेक उल्लेखनीय कामे केली. आजही या परिसरात सरांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतल्या जाते. त्यानंतर गिरडा बिरसिंगपूर,ऊबाळखेड,दाभा, व दहिद या अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या ग्रामीण भागात सरांनी आपली सेवा पूर्णत्वास नेली . यामध्ये जिल्हा परिषद शाळा गिरडा तीन वर्ष व जिल्हा परिषद शाळा बिरसिंगपूर येथे आठ वर्ष आणि सेवानिवृत्त होताना ते "आय एस ओ" मान्यांकन मिळवून दिलेल्या दहिद बुद्रुक या गावातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवा मुक्त होत आहेत.
"विज्ञानाचा विष्णू" म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ख्याती मिळवली. यामागे त्यांच्या परिश्रमाचा, मेहनतीचा,जिद्दीचा आणि एक विज्ञाननिष्ठ शिक्षक असल्याचा भाग आहे. 2002 मध्ये त्यांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य पुरस्काराने मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत किनवट या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. बळीवंशीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या विज्ञानाच्या प्रकल्पावरही कृषी ची छाप होती. गिरडा या ठिकाणी असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मातीचे विविध प्रकार सर्वांच्या समोर आणले व त्यांच्या या विज्ञानाच्या प्रकल्पाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. म्हैसूर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये अंड्याची टरफलं व वापरलेली चहा पावडर पासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या बालवैज्ञानिकांनी प्रयोगातून मांडला. राष्ट्रिय बालविज्ञान परिषदेत जिल्हा परिषदेची बिरसिंगपूर एकमेव शाळा सहभागी झाल्याने त्या वेळचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले होते."चहा पावडर" चे सेंद्रिय खत या विज्ञानाच्या प्रयोगाला राज्यस्तरावर नागपूर या ठिकाणी सादर करण्याचा बहुमान त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला मिळाला. म्हैसूर या ठिकाणीही त्यांची निवड झाली. 2003 साली त्यांनी तालुका शिक्षण सल्लागार समितीवर काम केले. मा.नंकुमार जंत्रे साहेब व संभाजीराव सरकुंडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्याने जिल्हास्तरावर महत्त्वाचा सहभाग नोंदविला. 2004 मध्ये "पाणी फक्त मुळांना" हा गोहाती (आसाम) येथे राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनातील त्यांचा प्रयोग खूप गाजला. हा भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मणिंद्र शुक्ल यांच्या "धम्माल सुट्टी" या सदरामध्ये त्याची नोंद घेण्यात आली. 2006 मध्ये लातूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये "सुगरण चूल" ही मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावणारी ठरली. यावेळी मा. विलासराव देशमुख व आताचे आपले पालकमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या या प्रकल्पाला भेट दिली होती. भविष्यात विजेचा तुटवडा निर्माण होणार याची भान ठेवत त्यांनी चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आधुनिक वॉटर हीटर हा प्रकल्प मांडला होता. या प्रकल्पाचे दखल सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री मा. वसंत पुरके यांनी घेतली शेगाव या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुद्धा "जैविक कीटकनाशक" या प्रकल्पातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे सहकारी शिक्षक यांचेही नाव घ्यायला ते विसरत नाहीत. बिरसिंगपूर या शाळेत असताना मा. उमेश जैन सरांची व मा सुभाष देवकर सरांची त्यांना फार मोठी साथ मिळाली होती. जि प उच्च प्राथमिक शाळा दहिद बुद्रुक या शाळेला आदर्श शाळा व आयएसओ मान्यांकन मिळून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्याचबरोबर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी जी साथ दिली त्यांचेही आभार ते मानायला विसरत नाहीत. आपण करत असलेलं काम हे एक टीम वर्क असते अशी त्यांची सतत भावना काम करताना असायची . या सामूहिक प्रयत्नातूनच मला हे साध्य करता आले असेही ते म्हणतात.
विज्ञानाच्या विष्णूची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची, ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो त्या समाजाप्रती सदैव कृतज्ञ असणं हे त्यांना आवडते. म्हणून त्यांनी त्यांच्या या कार्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी की जे एमबीबीएस, इंजीनियरिंग यासारख्या उच्च शिक्षणासाठी मोठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचं ध्यास त्यांनी अंगी घेतला आहे व त्या दिशेने त्यांचे कामही सुरू आहे आतापर्यंत त्यांनी तीन विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी फी उपलब्ध करून देण्याचे मोठं काम केलं आहे. हे काम सुद्धा एका सामूहिक जबाबदारीने ते करत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना अधिकचा वेळ मिळेल आणि त्या वेळेत ते या पद्धतीने समाजाची सेवा करून समाजासाठी या देशासाठी आदर्श नागरिक घडवत राहतील असा त्यांचा मानस आहे. विज्ञानाच्या विष्णूने त्यांना शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं केलं .आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले ते विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत बरेचसे सातासमुद्रा पारही आहेत. निश्चितच त्यांनी केलेल्या या कामाचं त्यांना या सेवानिवृत्तीच्या वेळी समाधानच आहे. येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडत राहो या सदिच्छासह त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच कामना.
संजय खांडवे
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा