*शक्ती रुपे*
भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .
देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .
रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .
१)महालक्ष्मी
सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .
२)नंदा
ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.
३)क्षेमकरी
चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.
४) शिवदुती
ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .
५)महाचंडी
ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .
६)भ्रामरी
ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.
७)सर्वमंगला
चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .
८)रेवती
दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .
९) हरिरिध्द
ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.
अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .
सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे एका श्लोकामधे सांगितली आहे .
प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।
तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥
पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।
साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥
नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।
उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥
वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'
माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'
व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'
व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'
सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'
सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'
गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '
नंदी वाहन असलेली 'महागौरी '
कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'
ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा
ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.
भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.
संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून
संजय खांडवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा