*जिजाईस वंदितांना....*
मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते. स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही.
मराठ्यांनी इतिहास घडविला, लिहिला मात्र नाही! मराठा आपल्या आणि आपल्या मातीचा इतिहास कधी विसरले नाही म्हणून पराक्रमांचा इतिहास घडविणे शक्य झाले. भोसले -जाधव वंशियांमध्ये प्रखरतेने जाणवते .महाराष्ट्रात इतरही घराणे होते, पण प्रश्न तोच येतो इतिहास लिहिण्याचा !अनेक पराक्रम घडले पण लेखणी आपली नव्हती, मुघलांच्या दरबारी ही व्यवस्था पूर्वापार चालत आलेली होती. तीच आदिलशाहीत होती, तीच निजामशाहीत होती. त्यांनी केलेला पराक्रम ते लिहून ठेवत परंतु मराठ्यांच्या बाबतीमध्ये हे शक्य नव्हतं. मराठ्यांचं खाणं, पिणं अन झोपणंही घोड्यावरचच! सर्व काळ धामधुमीचाच! इतिहासाच्या पानापानात हे आपल्याला जाणवते. शहाजीराजे कुठे! तर कर्नाटकात!! राजमाता जिजाऊ शिवबासह लोककल्याणकारी राज्याची घडी बसवण्यासाठी कुठं, तर पुण्यात! सुखाचे जीवन जगू शकत होते, पण रयतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या महामानवांना कुठलं सुख! त्यांचं सुख म्हणजे रयतेचे पालन हेच होते. वडील लखुजीराजे जाधवांची हीच परिस्थिती, दौलताबादी असतांना निजामशाहीच्या कपट-कारस्थानात बेसावध असतांना 40 आप्त-स्वकीय व अमात्यासह रक्ताच्या थारोळ्यात पडले, कारण एकच राजकीय स्वातंत्र्याची मशाल पेटवत स्वाभिमानाच्या लख्खप्रकाशाकडे घेऊन जाणारा या महापुरुषांचा प्रवास होता. शाह्या, पातशाहयांच्या दरबारी असलेल्या लेखनिकांनी जशी दखल मराठ्यांच्या पराक्रमाची घ्यायला हवी होती ती घेतलेली दिसत नाही. आपल्या बादशहाच्या हातचं राखून पराक्रमाची नोंद करणे हे पदरी असलेल्यांच काम! हे अनेक समकालीन नोंदी व पत्रव्यवहारावरून लक्षात येते, तेव्हाही वाघांच्या पराक्रमांच्या इतिहासाचे लेखन शिकारी करत होता.
बखरकार आणि कथाकारांनीही बहुतेक कथानकातून तोच अन्याय केलेला दिसतो . इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास केल्यावर समकालीन असो वा उत्तरकालीन असो त्यामधील निरर्थक कल्पनेला कवडीचाही आधार सापडत नाही. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सेतू माधव पगडी यांचे "शिवचरित्र- एक अभ्यास" हे पुस्तक प्रकाशित केले यामध्ये संपादित पहिल्या भाषणामध्ये ते म्हणतात म्हणतात "केवळ इतिहास वाचल्यानंतर तो इतिहास खरा आहे असे समजण्याची वृत्ती राहू नये, ते म्हणतात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा इतिहास लेखक कोण आहे. हा कोणत्या वातावरणात वाढला आहे .याच्यावर कोणते संस्कार झाले आहेत. कोणत्या गोष्टीचा यांना आनंद वाटतो आणि कोणत्या गोष्टीचे याला दुःख होते. कोणत्या गोष्टी अनुल्लेखनाने तो टाळतो आणि कोणत्या आवर्जून लिहितो या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत". समकालीन शिवभारत, सभासद बखर पासून उत्तरकालीन मराठ्यांच्या इतिहासातील साधनांचा काही घटनांचा तर्कशुद्ध मांडणी करून उहापोह केलेला आहे .ते आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगतात की "ना मूलं लिख्यते किंचित" आधार असल्याशिवाय लेखणी उचलणार नाही हे भारतीय परंपरेचे ब्रीद आहे. वाचताना कोणतीही गोष्ट प्रमाण मानू नका तुम्ही मुळाकडे जा Rational Thinking म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी तुम्ही शिका. इतिहासकार कृष्णराव केळुसकर, इतिहासाचार्य वा सी बेंद्रे, डॉ जयसिंगराव पवार, डॉ संतोष बाहेकर ,डॉ आ ह साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील या महान व्यक्तींच्या साहित्यातून इतिहासाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी निर्माण होते.
राजमाता जिजाऊंच्या दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले. समकालीन शिवभारत या परमानंद कृत संस्कृत काव्यग्रंथाचा अभ्यास करता त्या ग्रंथात मात्र या कथा, दंतकथा येत नाहीत. भोसले -जाधव घराण्यातील बरेच लिखाण हे ऐकिव माहितीवर झाले असेच दिसते या दोन्ही घराण्यात विवाह संबंधातून वितुष्ठतेला सुरुवात झाली असे बखरकार सांगतात ,पण इतिहासकार डॉ संतोष बाहेकर यांनी लिहिलेल्या जिजाऊंच्या चरित्र ग्रंथात केलेले चिकित्सकपणे विवेचन बखरकारांच्या लेखणीस पुराव्यासह उत्तर देतात. रंगपंचमीची कथा देखील कल्पित असल्याचा अभिप्राय इतिहासाचार्य वा सी बेंद्रे देतात. शिवभारत कार शहाजींना उत्तम लक्षणांनी युक्त, दानशिल, दयाशील ,युद्ध कुशल व महातेजस्वी असल्याचे वर्णितो . जिजाऊंना विजय लक्षणा, कमलनेत्रा गुणवान, गुणगंभीर आणि कुलवान असलेली कुबेर पुत्री संबोधितो.
जिजाऊ विवाहनंतर भोसले कुळात आल्यावर मोठे वैभव प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जणू काही पृथ्वीची शोभा असलेली विनयशील जिजाईने या कुळात प्रवेश केला .सेवेत तत्पर असलेली कुलवान सून म्हणून त्यांनी जागा मिळवली .आपल्या पतीशी अत्यंत प्रिय बोलणारी , शीलाचे रक्षण करण्यास अत्यंत दक्ष असलेली ,विनयाची मूर्तीमंत देवता जिजाई होत्या. पतीव्रता स्त्रियांना आदर्श वर्तनाचा आदर्श पत्नी धर्माचा मार्ग दाखविणारी मार्गदर्शिका होत्या .दोन्ही कुलांना मान्य असलेली व आपल्या नातेवाईकांना आपला आदर्श आचरणातून वागण्या- बोलण्यातून आनंद देणारी ती एक आदर्श शाक्ती होती. पतीप्रमाणेच सदगुण, सतशील असलेल्या जिजाऊंचे परमानंद पहिल्या अध्यायात वर्णन करतो हे वर्णन फार महत्त्वाचे आहे. जिजाऊंच्या इतिहासातील अनेक पैलू शिवभारतातून स्पष्ट होतात.
मराठा सेवा संघाने जिजाऊंचा सत्य इतिहास जगासमोर मांडण्याचे फार मोठे काम केले आहे .आज सिंदखेडराजा या जिजाऊ जन्मस्थळी लाखो लोक 12 जानेवारीला एकत्रित येतात आणि हा जागतिक स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. अनेक वर्षापासून अपेक्षित असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवास जागतिक मान्यता मिळाली. "जय जिजाऊ" या जय घोषाची भारतासह साता समुद्रा पार ख्याती गेली. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रयत्नांनी शेकडो एकरवर हजारो कोटीची जिजाऊ सृष्टी आता साकारत आहे. दरवर्षी या महोत्सवात लाखो रुपयांची पुस्तकांची विक्री होते. विचारांची देवाण-घेवाण होते. इतिहासाचं चिकित्सक, विश्वासअर्ह साधनांचा वापर करून तर्कशुद्ध मांडणीतून आम्ही इतिहास लेखन व वाचन करायला शिकलो ते याच तालमीतून आज हा लेख त्यामुळेच लिहू शकलो.
" जय जिजाऊ जय शिवराय" .
♾️♾️♾️♾️♾️
संजय खांडवे
बुलढाणा
9011971222