*शिवनेरी*
*स्थान*- शिवनेरी ता. जुन्नर जि. पुणे , उंची 3500 फूट
*मार्ग*- पुणे पासून १०० कि.मी., पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव पासून 18 कि.मी., छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगर- बेल्हे- आळेफाटा मार्गे 208 कि.मी.
'"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग "असे रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले आहे. अनेक प्राचीन ग्रंथातही किल्ल्याचे महत्व विषद केले गेले आहे. एक किल्ला हजारो सैन्याचे काम करत असे, एक बुरुज म्हणजे एक मोठी फलटणच असे, त्याचा अभेद्यपणा हा त्या राज्याच्या शक्तीचा भाग असे. सातवाहन काळापासून किल्ले-दुर्ग यांची निर्मिती सुरू झाली. त्यापैकीच एक शिवनेरी हा गिरीदुर्ग सातवाहन काळात महत्त्वाचे केंद्र होता. समुद्रमार्गे ग्रीक ,रोमन, इजिप्त यांचा व्यापार भारताशी होत असताना जुन्नर -पैठण- भोकरदन- तेर आदी शहरांना जोडणाऱ्या मार्गातील महत्त्वाचे केंद्र जुन्नर होते. कोकणातून कल्याण ,सोपारा अशा पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून देशावर येण्यासाठी नाणेघाट या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. नाणेघाटातून वर आल्यानंतर जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी या पहारेकरी किल्ल्यासोबतच आकाराने मोठा व तेवढाच अभेद्य ,चढाईस कठीण तथा सर्व सुख सोयीने युक्त असा शिवनेरी किल्ला होता. हा किल्ला शिवनेर या खोऱ्यात येतो. महाकाय प्रचंड असा जमिनीवरून जहाजासारखा दिसणारा व आकाशातून महादेवाच्या पिंडीसारखा आकार असलेला या शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिणेला मीना नदीवर वडज धरण आहे. किल्ल्याच्या उत्तरेला अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री दिसतो. पूर्व बाजूस मानमोडी लेणी समूह आहे व पश्चिमेस तुळजा लेणी समूह आहे. शिवनेरीच्या कातळात सुद्धा अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर झाला म्हणून शिवप्रेमींच्या हृदयात या किल्ल्याचे विशेष स्थान आहे .
यत: शिवगिरेर्मून्र्धि जात:स पुरुषोत्तम:।
तत: प्रसिद्धा लोकsस्य शिव इत्याभिधाsभवत।।
समकालीन शिवभारत या ग्रंथामध्ये वरील श्लोक आला आहे. यामध्ये शिवनेरी गिरीदुर्गावर शिव या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला या किल्ल्याच्या नावावरून जनमानसात शिव हे नाव प्रसिद्धीस पावले. रोज हजारो शिवप्रेमी या शिवजन्म स्थळावर नतमस्तक होतात.
जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून (चौकातून) किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बरेच वरपर्यंत मोठ्या वाहनाने वाहनतळापर्यंत पोहोचता येते. इथूनच आपण पहिल्या क्रमांकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो याच वाटेने आपल्याला सात दरवाजे लागतात. थोड्या दगडी पायऱ्या चढून झाल्यावर महादरवाजा लागतो. असाच परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा ,पीर दरवाजा, शिवाबाई दरवाजा, फाटक दरवाजा, कुलापकर दरवाजा पार करत पुढे जात असताना किल्ल्याला असलेल्या भक्कम ततबंदीचे दर्शन होत जाते. यादव, शिलाहार ,बहामनी, मोगल काळात या किल्ल्यावर बांधकामे होत गेली .जवळ येईपर्यंत दरवाजे दिसत नाहीत पण प्रत्येक दरवाजे हे परस्परांच्या टापूत आहेत असे दिसतात. प्रवेशद्वारावर गणेशपट्टीचे दर्शन होते. समोरच कातळ कपारीतील शिवाई देवीचे मंदिर आहे .मूळ गाभारा प्राचीन आहे. मंदिराचे इतर बांधकाम बांधकाम पेशवेकालीन दिसते. कुलापकर दरवाजा ओलांडल्यानंतर उजव्या बाजूस खोल दरी आहे व त्या कपारीत पानपुढे आहेत त्यांना गंगा -यमुना असे म्हणतात. गडावर पाण्याची व्यवस्था मुबलक आहे असंख्य पाण्याची टाकी व तलावही आहेत. विशेष म्हणजे दुष्काळातही या टाक्यात पाणी राहते. याच पानवठयाच्या टाक्यातून व तलावातून काढलेला दगड बहुदा गडावरील इमारती बांधकामासाठी वापरला जात असे. विविध सत्ताधीशांच्या काळात परिस्थितीनुसार बुरुज, तटबंदी व इमारतीचे बांधकाम केले गेले तिथेच आपल्याला अंबरखाण्याची मोठी इमारत दिसते .यात धान्य ठेवले जात असे .मलिक अहमदच्या काळात अंबरखाण्याचे काम झाले. थोडे चालत गेल्यावर उजव्या बाजूस वर टेकड्यावर शिवकुंज इमारत दिसते ती आधुनिक काळातील आहे. येथे जिजाऊ व बाल शिवबा यांची धातूची मूर्ती आहे. समोरच कमानीची मशिद आहे. या मशिदीवर वरच्या बाजूस फारशी भाषेत दोन शिलालेख कोरलेले दिसतात .त्याखालीच पानपोढी आहे. ही अर्धी उघडी व अर्धी बंदिस्त आहे . ही प्राचीन काळातील आहे. याच पानपुढीच्या बाजूने खाली जुन्नर शहरात उतरणारा साखळीचा मार्ग आहे. ही वाट कातळ कडेतून जाते व अवघड आहे या वाटेतूनच बौद्ध लेण्यांमध्ये पोहोचता येते. मशीदच्या पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. या ठिकाणी हमाम खाना आहे .भूमिगत पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था यात दिसते. इस्लामी राजवटीत हे बांधकाम झाल्याची प्रचिती येते. असा हमामखाना म्हणजे स्नानगृह बऱ्हाणपूरच्या ताप्ती नदीच्या बाजूला असलेल्या महालात आजही चांगल्या अवस्थेत आहे. शिवनेरीवर अवशेषच दिसतात .समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेली दुमजली इमारत आहे. खालच्या खोलीत पाळणा ठेवलेला आहे. याच खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वर जाण्यास पायऱ्या आहेत. येथून पुढे समोरच्या टोकावर बदामी तलाव आहे. बदामी तलावाच्या मध्ये दगडी खांब आहे. खापरी पाईपचे अवशेषही या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी त्या काळामध्ये कारंजाची व्यवस्था केलेली असावी असे दिसते .समोरच्या टोकावर इमारतीच्या अवशेषही आहेत तेथे कारागृह होते व त्या कारागृहाच्या समोरचा भाग हा कडेलोट म्हणून ओळखला जातो. तेथून गुन्हेगारांचा कडेलोट केल्या जायचा.
किल्ल्याचा एकंदरीत इतिहास पाहता हा किल्ला स्वराज्यात कधीच नव्हता. बहामणी, निजामशाही, मुघलशाही या मध्ये हा किल्ला झुलत राहिला. शहाजीराजांच्या जहागिरीत हा किल्ला होता. 1630 ते 1636 हा कालावधी शहाजीराजांच्या जीवनातील एक अत्यंत धामधुमीचा कालावधी होता. स्वातंत्र्याची आस या मातीला लावून देणारे शहाजीराजे यानी त्याकाळात या शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते. या किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराज याची कन्या जयंती हिचा विवाह शहाजीपुत्र संभाजींशी झाला होता .तो याच शिवनेरी किल्ल्यावर झाला अशी नोंद आहे. यामुळेच जिजाऊ देखील शिवजन्माच्या वेळी सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावरच शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था केली होती. 1636 नंतर निजामशाहीवर वचक बसवण्यासाठी शहाजहानने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. १६५७ व १६७८ अशी दोन वेळा या किल्ल्याला स्वराज्यात घेण्याची मोहीम आखली गेली परंतु ती अयशस्वी राहिली .पुढे पेशव्यांच्या वीरेश्वर चितळे या सरदाराने शिवनेरी किल्ला घेण्यात मोठी कामगिरी बजावली होती. परंतु २० मे १८१८ रोजी पुन्हा इंग्रजांनी तो आपल्या ताब्यात घेतला .हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत रमणीय आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक लेणी समूह आहेत . रमणीय असा माळशेज घाटही येथून जवळच आहे. एकट्या शिवनेरीच्या डोंगरातच 78 लेणी आहेत शिवाय अनेक पाण्याची टाकी देखील आहेत या लेण्यांमध्ये शिलालेख सुद्धा आढळतात आत मध्ये चैत्यगृह सुद्धा आहेत त्या ठिकाणी पोहोचणे मात्र अत्यंत अवघड आहे. दोन अष्टविनायक याच परिसरात येतात. ओझर, लेण्यांद्री व जुन्नर या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आहे. निसर्ग सौंदर्य मनमोहक आहे त्यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी व इतिहास प्रेमींना सतत खुणवत असतो.
संजय खांडवे बुलढाणा
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा