नाणेघाटाचा पहारेकरी '"किल्ले चावंड "
हिंदवी परीवाराची कोरोना काळात योग्य ती काळजी घेत या वर्षीची हिवाळी मोहींम पार पडली .आमचे मार्गर्शक इतिहासकार डॉ शिवरत्न शेटे सरांच्या प्रेरणेतून ,दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट सर परीवाराची धुरा आपल्या खांदयावर घेणारे संभाजी भोसले,अमोल मोहीते यांच्या नियोंजन पूर्वक कृती कार्यक्रमातून अतिक्षय उत्साहवर्धक वातावरणात जुन्नर परिसर दोन दिवसात अभ्यासपूर्णरित्या जाणून घेतला .
मोहीमेंचा पहिला दिवस ओझर येथील बेस कैम्प वरील आदरनिय शिवरत्न शेटे सरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रगीताचे गायन करुन मोहीमेंला सुरूवात झाली .
ओझर वरुन जुन्नरकडे आम्ही मार्गस्त झालो तेथून आपटाळे -नाणेघाट मार्गावर भव्य काताळरूपी डोंगरावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलो .औझर वरुन हा रस्ता एक ते दिड तासाचा आहे .नाणेघाट कडे जाणाऱ्या या मार्गावरून जातांना उजव्या बाजूला लोखंडी कमान दिसते .कमानीतून आत गेल्यावर १ की मी पुढे गेलो की आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.पुढे हा रस्ता चावंडवाडीला जातो .भव्यदिव्य अश्या चावंड दुर्गाचे रूप समोर उभे राहते .याची उंची १०६५ मीटर येते. आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा सूर्यही या गडाच्या पाठीमागे झाकलेला होता.
या गडाला महाराजांनी स्वराज्यात घेतल्यावर प्रसन्नगड असे नाव दिले .या गडाला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली .
या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली .कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .
१४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .
आता वनविभागाने काही अंतरापर्यन्त पायऱ्या बांधलेल्या आहेत .या नळीच्या वाटेने पुढे गेल्यावर प्रवेश द्वार दिसते .या पाषाणाच्या दरवाजावर मध्यभागी गणेशमूर्ति आहे .दरवाजातून वर गेल्यावर पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आहेत वर जाताच एक छोटी तोफ आता बऱ्यापैकी तयार केलेल्या लाकडी चाकावर ठेवलेली आहे .डोंगरमाथ्यावर प्रचंड दगडाचे अवशेष नजरेस पडतात .जुने वाडे इमारती याचे जोते व त्याचे पडलेले भाग दिसतात .दाट झुडपातून डोंगर माथ्याकडे एक पाऊल वाट जाते या वाटेत झुडपात इमारतीचे अवशेष दिसतात .ही वाट या गडावरील चावंडा देवीच्या मंदीराकडे घेऊन जाते .चर्तुभूज देवीची मूर्ती या मंदीरात आहे .दोन माणसा एवढी जागा असलेलं हे मंदीर आहे.मंदीराबाहेर दिपमालेचे अवशेष दिसतात .मंदीरापासून पूर्वेकडे गडाच्या पठारावर उतरत गेले की बरीच पाण्याची टाकी आहेत .पिण्यायोग्य पाणी एवढया उंचीवर उन्हाळ्यातही असते .गडाच्या उत्तर दिशेकडे ही पाऊलवाट चालत जात असता पुष्कर्णो बारव आहे या बारवेला कोरीव काम केलेले दिसते .बरीच शिल्पे ,खांब तुटलेली आहेत बाहेर नंदी आहे व शिव मंदीर आहे बारवेत जिवंत पाणी आहे .गडावर पाऊलवाटेवर कुठे काय आहे याचे छोटे फलक असल्याने बरीच अडचण दूर होते .याच परिसरात सप्तमातृका पाण्याचे टाके आहे .सात प्रचंड मोठी टाके या काळ्या दगडात कोरलेले आहे .त्यात गडाव२ वर्षभर पुरेल येवढे पाणी आहे .या टाक्यात उतरण्यासाठी एका बाजूने दगडात कोरलेला पायऱ्यासह दरवाजा आहे त्यावर गणेशमूर्ति आहे एखादया वाडयात प्रवेश करावा असा हा दरवाजा आहे तो पाण्यापर्यन्त जातो .सातही टाके एकमेंकांशी जोडलेली आहे पण प्रत्येक टाकयाच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे हे विशेष .साती आसरा या पाण्याच्या ठिकाणी असतात त्या सप्तमातृका याच्याशी संमधीत असाव्यात .कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत .ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .
गडाच्या उत्तरेकडील कातर कडेवर यादवकालिन गुफा आहेत .या गुफा सैनिक आधिवासासाठी वापरल्या जात असाव्यात .या ठिकाणाहून हजार मीटर उंचीवरुन कुकडी नदीवरील मणिकडोह जलाशय म्हणजेच शहाजीसागर जलाशयाचे निळेशार पाणी मन प्रसन्न करुन टाकते .येथून निमगिरी,हडसर ,शिवनेरी दृष्टीक्षेपात येतो .हरीशचंद्र डोंगररांगासुद्धा येथून दिसतात .पुन्हा वर सप्तमातृकाकडे चालत येऊन गडाचा नळीच्या वाटेकडे परत जातांना गडावर दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात .प्राचीन काळातील स्वच्छता गृह आजही त्या ठिकाणी बघायला मिळते .दगडात कोरलेले हे स्वच्छतागृहाचे भांडे आहे .पाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची रचनाही स्पष्ट दिसते .गडाला खालून वर येणाऱ्या शञूला रोखण्यासाठी तटबंदीची गरज नाहीच एवढी ही प्रचड कातरकडा आहेत पण वरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही धोकादायक ठिकाणी तटबंदी आहे . गडावर राहण्या खाण्यासाठी व्यवस्था नाही पण गडाखालील चावंड वाडीत व्यवस्था होते असा हा प्रसन्नदूर्ग मनाला प्रसन्न करून जातो .
संजय खांडवे
9011971122


























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा