माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा
➖➖➖➖➖➖➖➖➖
परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे धार्मिक ग्रंथ तथा प्रथा परंपरेतून हिंदू ,बौद्ध , शीख , मुस्लीम , जैन या धर्माच्या प्राचीन परंपरेत परिक्रमेस एक पवित्र असे महत्व आहे ह्याची जाणिव मला होतीच ! गणेश पुराणा मध्ये गणेशाची एक कथा माझ्या आजीने बालपणीच माझ्या स्मृतीपटलावर चांगलीच बिंबवली होती आजी सांगायची, " सर्व देवता मध्ये प्रथम पूजन कोणत्या देवतेचे व्हावे म्हणून भगवान शिव देवतांना एक परिक्षा सांगितली होती . त्यात जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून अगोदर येईल त्या देवतेचा पूजनाचा मान पहिला असेल " मग काय ! बंधू भगवान कार्तिकेय सह सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणे साठी निघतात ! " पण बुद्धीची देवता गणेश आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घालून केवळ शिव पार्वतीच हे विश्व आहे हे सिद्ध करून मान मिळवितात . " मिथकातून खूप काही शिकण्यासारखे असते .निर्माण झालेले प्रत्येक मिथक हे काही तरी संदेश देत असतात . मंदिर प्रदक्षिणा , नदी प्रदक्षिणा ,वटवृक्ष प्रदक्षिणा तसेच विवाह संस्कारातील सात फेरे ही पवित्र मानली जातात . हे आपल्या जीवनात चांगलेच रुळलेले आहे. माझ्या परिचयातील एक नातेवाईक चार्तुमासाच्या शेवटी नर्मदामातेची परिक्रमा नुकतीच करून आले होते ठीक ठिकाणी त्यांचे स्वागत सोहळेही बघायला मिळाले . ओंकारेश्वर वरून कठिण तपश्चर्याने सुरुवात करून हजारो किमी. चे अंतर पायी पूर्ण करत असतात ही मोठी आव्हानात्मक परिक्रमा आहे . मित्रासोबत मला नाशिक मधील ब्रम्हगिरी परिक्रमेचा मार्ग थोड़ा का होईना अनुभवता आला होता . हत्ती मोटेच्या बाजूने चढाई करत मोठ्या कसरतीने महाकाय ब्रम्हगिरीवर चढून गोदावरीमातेच्या उगमस्थळाच्या पवित्र तीर्थाचा प्रसाद घेण्याचे भाग्य लाभले होते . बौद्ध हिनयान लेणी मधील प्राचीन चैत्यस्तुपाला सुद्धा गोल असा परिक्रमा मार्ग प्राचीन लेणी समूहात दिसून येतो त्याचाही अनुभव अंजिठा , पितळखोरा अन तुकोबारायांच्या भंडाराडोंगरावर घेता आला होता .
हिंदवी परिवाराच्या काटेकोर नियोजनातून वर्षातून दोनदा आम्ही गड भ्रमंती करतो .या वर्षीचे हिवाळी मोहिमेचे नियोजन अगदी आगळे वेगळे होते . रायगडाला घनदाट जंगलातून परिक्रमा करायची होती . अगदी महिना भर अगोदर पासूनच आम्ही या मोहिमेस जाणार म्हणून रायगडाचा इतिहास सर्व अंगाने ऐतिहासिक संदर्भासह वाचणे सुरू होते . सामानाची ही जुळवाजुळव तशीच ! सोबत काय लागणार ? निघायचे कधी ? वाटेत एखादा किल्ला अजून करता येईल का ? गाडी कोणती करायची ? अशा अनेक गोष्टींवर मित्रमंडळींमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही चर्चा सुरू होत्या .आम्ही ज्यांना दैवत मानतो ते दैवत गिरिदुर्ग रायगडावर सिहासनाधिश्वर झाले . मध्ययुगीन इतिहासाच्या कालखंडातील ती एक असामान्य घटना ! शिवराय छञपती झाले ! म्हणूनच महाकाय अश्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाची अगदी टकमक टोकाच्या पायथ्यापासून किर्रर्र ऽ करणाऱ्या अन भर दिवसाही अंधारलेल्या जंगलातून संपूर्ण दुर्गेश्वरास परिक्रमा करावी ही मनातील इच्छा पूर्ण होण्याचा तो दिवस अखेर उगवला! थंडीची हुडहुडी थोडी कमी झाली होती . तो जानेवारी महिना, ऊन म्हटलं तर चटकावणारे आणि साऊली म्हटली तर थंडगार हवेने झोंबणारी ! विदर्भातून अगोदरच्या दिवशी भल्या पहाटेच निघालो . सायंकाळ पर्यन्त जंजीरा किल्ला पाहून महाडला हिंदवी परिवाराच्या बेस कॅम्पला पोहचलो .
दुर्गे दुर्गेश्वराची परिक्रमा ही एकट्या दुकट्याने करण्याची गोष्ट नाही ती हिम्मतही कुणी करू नये! म्हणूनच हिंदवी परिवाराचा सदस्य म्हणून ही संधी मला आणि माझ्या काही इतिहास प्रेमी मित्रांना मिळाली होती . आमच्या परिक्रमेत असलेले प्रमोद टाले हे वेगळच रसायन ! पुस्तकाच्या दुनियेतील अवलिया माणूस ! त्यांचं घर जणू काही भव्य ग्रंथालयच ! स्वकमाईतून घरात तीस-पस्तीस लाखाची इतिहासाच्या संदर्भातील अत्यंत दुर्मिळ ग्रंथांचा साठा या अवलियाने आपल्या घरात आमच्यासारख्या वाचकांसाठी करून ठेवलाय ! आमच्या परिसरातील दहा जिल्हयातही मिळणार नाहीत अशी ग्रंथ संपदा अगदी आपल्या लेकरा सारखी सांभाळतोय हा माणुस !सदैव चिकित्सक विचार ठेवणारे आमचे मित्र ज्यांना आम्ही आमचे ओबीसी नेते म्हणतो ते किशोर अन गजानन अर्थात आमचे गजुबाबा की जे अशा ऐतिहासिक ठिकाणी पोहचताच त्यांच्यात एक नवचैतन्य संचारते .लगेच माती साठी लढणाऱ्या मावळ्याच्या पात्रात जाऊन पोहचतात . आमच्या जिल्ह्याचे हिंदवी परिवाराचे समन्वयक विठ्ठलराव , त्यांचाही उत्साह तेवढाचं !
प्रमोदरावांच्या संग्रहीत ग्रंथ संपदेतून रायगड समजून घेत अगदी रायगडाची जीवनकथा वाचूनच या मोहिमेत आम्ही पोहोचलो होतो . त्यामुळे प्रत्येकाचा उत्साह पदोपदी अधिकच वाढत चाललेला दिसत होता . संपूर्ण दुर्गेश्वराचा नकाशाही आमच्या सोबत घेऊन निघालो होतो .
मोहिमेत रायगडास परिक्रमेचे शिवकार्य अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहात करतांना दिसून येत होते .पाचाड या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ . शिवरत्न शेटे यांच्यासह माजी आमदार बच्चू कडू व शेकडो मोहिमेतील मावळे जिजाऊ माऊलीस नमन करून " जय जिजाऊ जय शिवराय ! " या जयघोषात चीत दरवाज्याकडे निघाले . प्रत्येकाच्या मनात आपण जणू शिवरायांचे त्याकाळचे मावळेच आहोत की काय असा उत्साह संचारलेला दिसत होता . ज्याची त्याची या १८ किलोमीटरच्या होणाऱ्या घनदाट जंगलातून हेळसांड होऊ नये म्हणून पुरेसे पाणी खादय सामुग्री घेतली की नाही याची लगबग सुरू होती. चीत दरवाज्याच्या पायऱ्यावर बसून हिंदवी परिवाराच्या सदस्यासह भव्य फोटो सेशन झाले . या भ्रमंती मध्ये रायगडचे पोलिस अधिक्षकासह या जिल्हयातील अनेक अधिकारीसुद्धा सोबत होते .
मोहिमेचे सरनौबत संभाजी भोसले मोहिमेच्या सूचना देत म्हणाले ," शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि कार्याने पावन झालेले या भूमीमध्ये आपण भ्रमंती करतांना साधा चॉकलेटचा कचरा देखील वाटेत टाकू नका, तो आपल्या सोबतच घ्या ". अशा वारंवार सूचना सरनौबतकडून आम्हास मिळत होत्या . हिंदवी परिवारात डॉक्टर साहेबांनी आम्हाला दिलेली ही शिकवणच! ते नेहमी आम्हाला मोहिमेत जाणिव करून देतात, " साक्षात छत्रपती आपल्याला वरून बघत आहेत त्यामुळे आपले आचरण शिव विचारांना धरून असले पाहिजे . " चीत दरवाज्याच्या वर दिसणारा बुरूज हा खुबलढा बुरूज अन त्या बाजूस आता तुटलेला चीत दरवाजा व पुढे दिसणारे परिक्रमा मार्गावरील टकमक टोक हे हातात असलेल्या कॅमेऱ्यातून टिपल्या वाचून कुणीही सोडत नव्हत . पण कुठलाही वैय्यक्तीक छायाचित्रांचा मोह नसलेला आमचा हा पाच-सात जणांचा समूह असल्याने प्रमोदराव म्हणाले , " चला पुढे मार्गस्त होऊ या आपल्याला आपल्या महाराजांच्या स्मृतींच्या सानिध्यात दिवस घालवायचा आहे . फोटो पुढे दुसऱ्या वेळी निवांत काढूया ! "
असे म्हणून आम्ही पुढे निघालो प्रत्येकाच्या हातात डोंगर वाटेतून जाणाऱ्या या पाऊलवाटेत अनेक खाच - खळगी असल्याने काठ्या होत्याच ! पाठीवर पाण्याचं आणि दुपारच्या जेवणाचं भलं मोठं ओझं होतच कारण वाटेत कुठेही पाणी मिळणार नव्हत याची सक्त ताकिद आम्हाला सरनौबतांनी दिलेली होती . टकमक टोकाच्या दिशेने दाट जंगलातून अगदी मुंग्या चालाव्या तसेच शिस्तीत रांगेत आम्ही मावळे निघालो . थोडं पुढं गेल्यावर
उजव्या बाजूला बोट दाखवत प्रमोदराव म्हणाले , "मित्रांनो! ,येथून रायगड वाडी पासून येणारा रस्ता पुढे वर नाणे दरवाजा कडे जातो व पुढे महादरवाज्या वर निघतो .याच मार्गाने मुंबई इंग्रज कर हेन्री ऑक्झेंडन राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर जाण्याची नोंद करून ठेवली आहे ." प्रमोदरावांचं वाचन दांडगं अन त्यातल्या त्यात त्यांना इतिहासाची फार आवडं! सोबत असलेल्या गजू बाबांच्या चेहऱ्यावरून या परिसरास याची देही याची डोळा भेट दिल्याचे समाधान जाणवत होतं . परिक्रमेचा मार्ग मात्र पायथ्याला लागून दाट जंगलातून सुरु होतो .सकाळचे साडे आठ वाजले तरी प्रचंड महाकाय रायगडाच्या सावलीतूनच चालावे लागत होते सूर्य दर्शन होण्यास तास दिड तास तरी लागणार होता . रायगड हा सह्याद्री पर्वत रांगेत मध्यभागी स्वतंत्र महाकाय असा दिसतो. त्यामुळे संपूर्ण परिक्रमा पूर्वेकडील खिंड सोडली तर उंच- सखल भागातून अत्यंत घनदाट जंगलातून चालावे लागणार आहे हे आम्ही अभ्यासाअंती जाणून होतो .दाट जाळवनातून पडलेल्या पाऊल वाटेने जंगलात टकमक टोक ओलांडण्या अगोदर एक समाधी वाटेत लागली . पंधरा -वीस मोहिमेतीत सदस्य तेथे अगोदरच पोहोचलेले होते . दगडी शीळेतून शूरवीराची मूर्ती त्या ठिकाणी साकारलेली दिसून येत होती .तेथे पोहचताच किशोर म्हणाला , " आपण रात्री या विषयावर चर्चा केली होती की वाटेत एक समाधी लागेल ! " गजूबाबा लगेच म्हणाले , " ही रायनाकांची समाधी आहे , याविषयी एक कथा देखील सांगितली जाते ." भ्रमंतीचा बराच रस्ता पुढे बाकी होता व जसजसे जंगलातून जात होतो तसतसा क्षीण तर औषधालाही सापडत नव्हता अन उत्साह वाढतच चालला होता . म्हणून आमच्या सोबत नेहमी दुर्ग भ्रमंतीला असणारे प्रभात सर म्हणाले , " चला निघुया या समाधी विषयी प्रमोदराव अन संजयराव आपल्याला वाटेत सांगतीलच! " प्रभात सर म्हणजे वय ५९ पण उत्साह मात्र तारुण्याचा ! मधुमेह असूनही सह्याद्रीस नतमस्तक होण्यास दरवर्षी येणारच ! सुधागड, सरसगड , रायगड , तळागड , जंजीरा अशी कितीतरी गडकोट पायाखालून मोठ्या हिम्मतीनं काढली . शैक्षणिक क्षेत्रातील ते आमचे गुरु !
अत्यंत किऽर्रर्र असे जंगल आंबा ,फणस , वड करवंदी व इतर अशा घनदाट जाळीतून सुर्य प्रकाशही जमीनी पर्यन्त पोहचत नाही .तास - दिड तास चालून झाल्यावर टकमक टोकाच्या पायथ्याशी पोहचलो . थंडीतही घामाघूम झालो होतो .चालता चालता गजूबाबा त्यांच्या नेहमीच्या शैलीत चकित होऊन म्हणाले , " बापाऽ रे! कडेलोट झालेला आरोपीला जमीनही नशीब होत नसेल ! वरच्या झाडीत अडकुनच मरत असेल ! साध्या हवेला या दाट झाडीतून मार्ग काढता येत नाही तिथे माणुस काय ? " मी म्हणालो , " कडेलोट करतांना अगोदर हात - पाय बांधून गोणीमध्ये टाकून वरचे तोंड घट्ट बांधून कडे लोट केला जायचा ! स्वराज्यद्रोहींना ही शिक्षा दिली जायची ". मोहिमेतील मावळे सरनौबतांच्या आदेश पाळत शिस्तीनं चढ- उतारातून घनदाट झाडीतून चालत होतो तोच ढोल वाजण्याचा आवाज कानावर आला . या ध्वनीला साद म्हणून की काय त्या दिशेने पायाचा वेग वाढला . दोन -चार कौलारू घरांची टकमकटोक वाडीत आम्ही येऊन पोहचलो . स्वागतासाठीच जणू मोठया कुतुहलाने दोन लहान मुले ढोल वाजवित होते . अगदी छोटयाश्या कौलारू - मातीच्या घरासमोर दोन -चार बकऱ्या आजू बाजूला उपजीविकेसाठी पाळलेल्या कोंबड्या अन सात आठ बाया माणसांची ही टकमक टोक वाडी ! गाव म्हणून असलेली अशी कुठलीही सुविधा नाही .आमच्या अगोदरच आम्हाला गड भ्रमंतीचे वेड लावणारे पांडूरंगदादा म्हणजे प्राध्यापक सवडतकर त्या वाडीवासीयांशी संवाद साधत होते . पांडूरंगदादा त्यांची या घनदाट जंगलातील वाडी पाहून विचारतात , "तुम्ही इथे किती वर्षापासून राहत आहात ?" त्यावर मोठ्या अभिमानाने वाडीवासी सांगतो, " आमची सातवी -आठवी पिढी शिवाजी राजाच्या काळापासून या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी सेवा देत आहे ." आपल्याकडे एवढ्या लांबून ही माणसं आली आता त्यांची सेवा कशी करू या अवस्थेत त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती दिसून येत होती . जणू काही आमच्या स्वागतासाठी दोन्ही लहान मुलांचं ढोल वाजवण्याचा सोहळा एकसारखा सुरूच होता . त्यांची परिस्थिती बघून मला एक गोष्ट त्यांना सुचवाविशी वाटत होती , " मी त्यांना विचारले तुमचं नाव काय ?" ते म्हणाले , " अनंता दौलत काटकर ! आम्हाला या जागेविषयी खूप प्रेम अन अभिमान आहे ही जागा आम्हाला सोडावीशी वाटत नाही . पूर्वाजापासूनच आमची मन इथेच रुळले आहे", असे ते पुन्हा छाती फुगवून सांगत होते . मी त्यांना म्हणालो, " आता रायगड परिक्रमेचे वेड लोकांच्या मनात सुरू झाले आहे त्यामुळे या रायगड परिक्रमेच्या वाटेवर तुमची वाडी येथे . मग तुम्ही येथे छोटासा व्यवसाय का करत नाही ?येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी असेल किंवा इतर काही खाद्य साहित्य असेल ते तुम्ही विकू शकता ! " यावर अनंता भाऊच्या उत्तरापुढे आम्ही सगळे भिकारीच ठरलो , " तुम्ही लोक काय आज याल, आम्ही पुन्हा महिनाभर कुठे वाट बघणार तुमच्या सारख्या लोकांची ? राहिली गोष्ट पाणी पाजायची !हे तर आमचं भाग्यच आहे ना ! तुम्ही आमच्या कडं आलात ! पाण्यातून पैसा कमवणे हे आमच्या राजांना आम्हाला कधी शिकवलं नाही तो एक माणुसकीचा धर्म आहे तोच आम्ही इथे शिकलो . या मातीत राहून आम्ही आमचे इमान कधी विकणार नाही " हे शब्द ऐकून प्रमोदराव , किशोर, गजूबाबा पांडुरंगदादा आणि मी आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो . बऱ्याच लांबपर्यंत आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. अनंतरावांचे शब्द सतत मनात घोळत होते आणि कुठेतरी आम्ही पुस्तकीज्ञान घेतलेले त्यांच्या विचारापुढे खुजं पडलो असंच वाटत होतं .
येथून पुढचा रस्ता अजून अवघड होत चालला होता . मोठ मोठी वृक्ष कोसुळून त्यावर जाळी -झुडपे वाढलेली होती . बहुतेक ठिकाणाहून खाली बसत , पाल सरड्या - सारखे सरपटतही जावे लागत होते . रायगडाच्या कडया वरून कोसळलेले महाकाय दगडही वाटेत अडथळा ठरत होते . तोच प्रमोदराव डाव्या हाताने इशारा करत म्हणाले, "तो बघा लिंगाणा! डाव्या हाताला दोन कोसावर लिंगाणा आहे . " जाळवनातून लिंगाण्याचं शिखर दिसत होतं . पुढ्ची वाट तर प्रचंड चढाईची होती .माझ्या डोळ्यासमोर रायगडाचा नकाशा उभा राहिला आणि भवानी बुरुजाच्या खालच्या बाजूस असलेल्या खिंडीत आता आपण चढाई करून पोहोचणार आहोत याची जाणीव मला झाली . प्रचंड छातीवर येणारी दाट झाडी मधील चढाईतून त्या खिंडीत पोहचलो .
दुपारचा एक वाजला होता. त्या खिंडीत असलेल्या अगदी छोट्याशा जागेवर आम्ही सात-आठ जण थकल्यामुळे आडवी होऊन पडलो . प्रमोदराव म्हणाले, " आत्ता कुठे आपली अर्धी परिक्रमा झाली ! " प्रचंड उत्साह असलेल्या गजू बाबांचा चेहरा पाहण्यासारखा होता कारण अजून तेवढेच अंतर चालून जायचं होतं . मग तडकाफडकी हाती असलेली काठी घेऊन गजू बाबा खाली उतरू लागले तोच त्यांचा पाय एका गुळगुळीत दगडावरून घसरला आणि तो दगड खाली गेला तोच खालून लगेच आवाज आला, " मावळ्यांनो दगड अगदी मोकळे झाले आहेत हळू या ! ती खाली घरंगळात येत आहेत ." खिंडीतून खाली उतरणीची वाट पुन्हा अवघड होत चालली होती. काही ठिकाणी अगदी बसूनही खरकत -खरकत ही जावे लागत होते . गुडघ्यावर पडणारा तान कमी करण्यास हातातली काठी उपयोगी पडत होती . बहुतेक ठिकाणाहून तर बुड घासत खरकत जाणेच सोयिस्कर वाटत होते .
दोनच्या सुमारास घनदाट दरीत पोचल्यावर निर्सगाच अप्रतिम कधीही न पाहिलेले सौदर्य अनुभवत हिरव्यागार गालिचा वर त्या घनदाट जंगलात आम्ही सोबत आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो . कडाडून भूक लागलेली ! परिक्रमेच्या पुढील वाटेवर जागोजागी मोहिमेतील मावळ्यांचा घोळका दुपारच्या जेवणास बसलेला होता . घनदाट जंगलातून त्यांचा बोलण्याचा आवाज कानी पडत होता . जेवण झाल्यावर आता येवढं चालल्यानंतर बसून चालणार नाही म्हणून लगेच गजू बाबांनी , " जय जिजाऊ जय शिवराय " असा नारा दिला अन पुन्हा नव्या जोशाने आम्ही पुढच्या परिक्रम मार्गावर निघालो .तासाभरात एका खोलगट नदीच्या भागात पोहोचलो . रायगडाच्या प्रतिकृती वरून आणि नकाशाचा अंदाज घेत मी म्हणालो , " होळीच्या माळाच्या खाली असलेल्या कुशावर्त तलावातून उगम पावत वाघ दरवाज्या जवळून खाली कोसळणारी जलधारेचे नदीचे हे पात्र असावं ". तेवढयात प्रमोदरावांची वरील असलेल्या तटबंदी कडे नजर गेली आणि ते म्हणाले , " तो बघा वाघ दरवाजा ! " सर्वजण मोठ्या कुतूहलाने एक टक नजरेने तटबंदी न्याहाळत वाघ दरवाज्याकडे बघू लागले . तेवढ्यात माझ्या तोंडून रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील ते वाक्य आपसूक बाहेर पडले , "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" इतिहासाचे गाढे वाचन असल्याने प्रमोद राव सांगू लागले ,"याच वाघ दरवाजांने स्वराज्याचे तिसरे छत्रपती सुखरूप उतरविले होते . " मग माझ्याही आठवणीतील इतिहास जागा झाला आणि मोठ्या आवाजात आसमंत दुमदुमेल असे मी एक एक वाक्य बोलू लागलो , "दुर्गदुर्गेश्वराचा दक्षिणेकडीत वाघ दरवाजा याचीच साक्ष देतो . शौर्य , साहस , बुद्धी या बरोबर पूर्वानुमानाचे अलौकिक कौशल्य आपल्या शिवरायांमधे होते . स्वराज्यासाठी असलेली अखंड सावधानता त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती . होय ! मित्रांनो !वाघ दरवाजा त्याचीच साक्ष देतो . शंभू महाराजांच्या बलिदानानंतर झुल्फिकार खानाचा वेढा रायगडास बसला . त्याला केवळ एकच दरवाजा माहित होता बाकी अजस्र रायगडा पुढे तो वेढा दिल्या शिवाय काहीच करु शकत नव्हता . त्यावेळी घनदाट जंगलात कातळा अवतरण करूनच या दरवाज्याचा मार्ग होता . खरच वाघाचं काळीज असणारेच हजारो फुट कातळ कडा उतरु शकतात . त्यावेळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी साहेब व त्यांचे सहकारी याच मार्गाने वेढयातून बाहेर पडले होते. " सर्व जन एकाग्रपणे ऐकत होते . मी थांबलो तेव्हा किशोर म्हणाला , " बोला ! बोला ! आम्हाला अजून ऐकावसे वाटत आहे! " आपल्या पूर्वजांचा इतिहास जिथे घडला त्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन तो अनुभवण्यात आनंद वेगळाच! ती जागा , ते ठिकाण पाहताना अंगावर शहरी उभे राहतात . आपसूकपणे आपल्या मनात असलेल्या भावना मुखावाटे बाहेर पडतात .
आम्ही लगेच पुढच्या मार्गाला लागलो मावळणारी रायगडाची सावली पूर्णपणे दरीवर पडलेली होती. सूर्यनारायण बराच वेळापासून आम्ही बघितला नव्हता पुन्हा एकदा चढाईची वाट सुरू झाली . ती देखील तेवढीच अवघड होती आणि तितक्यात पुढे असलेल्या विठ्ठलरावांचा आवाज आला, " अरे !कारचा आवाज येतोय! " सर्वांचे लक्षात आले आता पुढे डांबरी सडक असावी . चारच्या सुमारास आम्ही त्या सडकेवर येऊन पोहोचलो समोर आलेल्या मोहिमेतील मावळ्यांची संख्या बरीच होती काही झाडाखाली बसली होती तर काही त्या ठिकाणीच आडवी झाली होती येथून हिरकणी वाडी अगदी एक दीड किलोमीटरच्या अंतरावर होती . तेथून आम्ही हिरकणी वाडीकडे निघालो . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून येत होतं . या मोहिमेत माझा मुलगा ओम , तो सुद्धा सोबत होता . त्याचा हा गडभ्रमंतीचा पहिलाच किल्ला ! एवढं दिवसभर चालू नाही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच थकवा नव्हता तो म्हणाला , " आज रात्री बेस कॅम्प वर मी सर्वांच्या समोर माझे अनुभव मांडणार ! एकेक क्षण मला छत्रपतींची आठवण करून देत होता . प्रत्यक्ष चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते ". हेच समाधान आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होते आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर आज आम्हाला नतमस्तक होण्याची संधी मिळाली .हा क्षण आमच्या जीवनातील एक सुवर्ण क्षणच होता ! समोरच रोप-वे दिसत होता आणि आमच्या परिक्रमेच्या सांगतेकडे आम्ही वळत आहोत याची जाणीव आम्हा सर्वांना झाली होती . सूर्य मावळत होता परंतु रायगडाच्या प्रदक्षिणेमध्ये आमच्या मनातील अनेक भावनांचा उदय राहून राहून अधिक वेगाने होत होता .
संजय भिका खांडवे ( सह शिक्षक )
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना













