सोमवार, २३ जून, २०२५

वर्षा पर्यटन करताय ! काळजी घ्या !

 



*वर्षा पर्यटन करताय ! काळजी घ्या !*



आता पावसाळा सुरू झालाय  नदी , नाले, छोटे मोठे धबधबे  त्यातच धरतीमाईने डोंगर - दऱ्या अन पठारावर पांघारलेला हिरवा शालू हा पर्यटकाला निश्चितच आकर्षक बनवितो . महाभूमित वर्षा पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक आप आपल्या सोईने बाहेर पडतात . सोशल मिडियावरही रिल्स , सेल्फीच्या महापूराने सर्वत्र भूरळ घालतात . लोणावळा , भीमाशंकर , जुन्नर परिसर , नाणेघाट , माळशेज घाट , कळसूबाई , भंडारदरा , नाशिक परिसर , हरिशचंद्रगड ,महाबळेश्वर , मावळ , आंबेगाव , खेड , मुळशी, भोर, इंदापूर अशी कितीतरी  पर्यटनक्षेत्र पर्यटकांनी फुलुन जातात .आपण राहतो त्या परिसरात देखील अशी अनेक लहान मोठी पर्यटन स्थळे असतात व त्या ठीकाणी परिसरातील पर्यटक पोहचत असतात . सुटी अन शनिवार - रविवार या काळात तर जत्राच भरते. निर्सग जेवढा आल्हाददायी अन आनंद देणारा आहे तेवढाचं  आपण काळजी घेतली नाही तर वेळ प्रसंगी  रौद्र ठरू शकतो . गेल्या वर्षी भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याचा प्रचंड प्रवाह एकदाच आला त्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही व ही पाचही व्यक्ती दगावली . मागच्या आठवड्यात मावळ मधील कुंडमळा या इंद्रायणी मधील साकवं पूल पर्यटकांच्या गर्दीत तुटला व त्यातही मोठी जीवितहानी झाली . आपल्या परिसरातही पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानी झाल्याचा अनेक बातम्या आपण ऐकतच असतो . हौशी पर्यटक काळ आणि वेळ न बघता बेत आखतात एक - दोन कुंटुब कोणतीही पूर्वतयारी न करता पावसाळी ट्रेक वा पर्यटनास निघतात व अश्या घटना घडतात . प्रशासन याची खबरदारी घेते धोकादायक ठिकाणी तशी फलक योजना देखील असते . अवघड ठिकाणी लोखंडी कठडेही असतात पण अति उत्साही पर्यटक या नियमावली बाहेर जातांना दिसतात . यावर्षी जून च्या पहिल्या आठवडयात हरिशचंद्र गडावर  जातांना पाचनई गावाच्या वर घळई मधील धबधब्या वरील पठारावरील कुंडाजवळ प्रशासनाने सावधानतेचा इशारा फलक लावलेला असतांनाही त्या कुंडात अगदी लहान मुले घेऊन पर्यटक जल विहार करत होते . कोकणकडयावरही मुक्तपणे हजारो फुट खोल दरीत पाय लांबवत सेल्फी अन रिल्स काढत होते .आपल्याकडे सार्वजनिक जीवनात आपत्ती व्यवस्थापनाची जागृती फार कमी असंल्याने असे प्रकार दिसून येतात . रितसर प्रशिक्षण अन साहित्यासह शास्त्रशुद्ध पद्धतीने पर्यटन केल्यास धोका शून्य होतो . पण आजकाल ट्रेकरने एखाद-दुसरा ट्रेक केला की तो आपला हौशी गृप करून ट्रेकिंगला सुरुवात करतो . अज्ञान व अतिसाहसामधे असे स्वताःहून गेलेले हौशी पर्यटक वन्यजीव , रस्ता भटकणे व इतर अपघात  आदिचे बळी ठरतात . मागे पुण्याचे काही मित्र असेच हरिशचंद्र गडावर भटकले अन थंडी, पाऊस अन उपासमारीचे बळी ठरले होते . शेवटी नाईलाजाने प्रशासन अश्या भागात वर्षाऋतु मध्ये बंदी घालावी लागते .१६३ सारखी कलम लागू करावी लागतात तशी परिस्थिती आता मावळ , लोणावळा ,भूशी डॅम , मुळशी या परिसरात  झाल्याची दिसून येते . त्यामुळे पर्यटनात एक आदर्श पर्यटक म्हणून निर्सगाचा मनमुरादआनंद लुटता आला पाहिजे तरच पर्यटनास अर्थ आहे .



*वर्षा पर्यटनात हे करा*


♦️ साहसी ठीकाणी शासनमान्यता प्राप्त संस्था , गृप सोबत पर्यटन करा .

♦️ चांगले ग्रीफ असलेले बुट वापरा . एकदम नवीन बुट घालू नका त्या बुटांचा आठ दहा दिवस सराव असावा .

♦️सर्व अंग झाकले जाईल असे कपडे घाला .

♦️ सेल्फी , रिल्स साठी अतिसाहस टाळा .

♦️ वाहत्या पाण्यात उतरणे टाळा .

♦️ हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा .

♦️ डोंगरावर काळे ढग आल्यावर धबधबे व दरीत थांबू नका .

♦️ स्थानिक किंवा वाटाड्याची मदत घ्या . एकटयाने माहीत नसलेल्या वाटेने जाऊ नका .

♦️ स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा जाण्या अगोदर प्राथमिक अभ्यास ठेवा .

♦️ धबधब्याच्या धारेखाली थांबू नका घरंगळत येणारे दगड  अपघात करु शकतात .

♦️ उंचावर हवेचा जोर व धुक्याचा अंदाज घ्या .

♦️ प्रथमोचार व आवश्यक औषधे सोबत ठेवा .

♦️ सुखा मेवा व इतर फास्ट फुड सोबत असू द्या .

♦️ तोंडाने श्वास टाळा . तहान लागल्यास गटा गटा पाणी पिणे टाळा .

♦️  उंच ठिकाणावर , दरीत शेवाळलेल्या ठिकाणी काळजी घ्या .

♦️ चढ - उतारात काठीचा वापर करा .

♦️ गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका .

♦️ निर्सगात कुठलेही व्यसन करू नका .

♦️ सुगंधी तेल व परफ्युम लावणे टाळा .

मंगळवार, १७ जून, २०२५

निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी ➖➖➖➖➖➖

 



निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी

➖➖➖➖➖➖

स्थान : ता अकोले जि . अहिल्यादेवी नगर 

➖➖➖➖➖➖➖

     आपल्या महाभूमितील उत्तर दक्षिण पसरलेली सह्याद्री पर्वत  रांग ही महाराष्ट्राचा भूगोल आहे पण या महाभूमिच्या भूगोलावरच ज्ञात असलेला हजारो वर्षा पासूनचा अत्यंत समृद्ध व प्रेरणादायी असा इतिहास उभा राहिला आहे. हाच सहयाद्री इतिहासातील अनेक क्रांतीचा क्रांतिकेंद्र ठरलाय .  याच सहयाद्रिच्या कुशीत  जीवनदायी ठरलेल्या अनेक नदयांचा उगम होतो . नानाविध दुर्मिळ व उपयोगी वनस्पतीच्या अभयारण्यात विविध जीव- सजीवांचा अधिवास आहे . पशु -पक्षांचा  संचारही तेवढाच मुक्तपणे आढळून येतो . माणसापासून कोटयावधी जैवविध सजीवांची श्रृखंलाच सहयाद्री च्या कुशीत आपले जीवनचक्र पूर्ण करतांना दिसतात . कोट्यावधी वर्षापूर्वी ज्वाला मुखीच्या उद्रेकातून तप्त लाव्हारसातून दख्खनच्या पठारासह मजबूत बेसॉल्ट खडकापासून सहयाद्री पर्वत रांग निर्माण झाली . बेसॉल्ट हा जणू काही मजबूत कणाच बनला . आपण ज्याला उडदया खडक म्हणतो की ज्यात पांढरे , हिरवे खनिजे दिसतात काही ठिकाणी याच उड़दया खडकात छोटे - छोटे रिकामे बुडबुडेही दिसतात व त्या पेक्षाही पूर्ण बेसॉल्ट म्हणजे अगदी काळा पाषाण अशी मजबूत खडकांचा  कणा सहयाद्रिस अधिक ताठर बनवितो . शेकडो जागतिक वारसा ठरलेली लेणी समूह व मंदिरे निर्माण कार्यात याच सहयाद्रीने आपले योगदान दिले .सातवाहनापासून निर्मित होत असलेल्या गड कोटास आपल्या शिरावर घेतले . शिव काळात यात अधिकच भर पडत गेली व शिखरा - शिखरावर त्याग व प्रेरणेचा प्रतिक ठरलेला भगवा डौलात फडकविण्यास प्रेरणा दिली . 

          या मातीतल्या माणसास सहयाद्रिचे सौदर्य केवळ डोळ्यात साठवण्यापुरते नसून ते मनाशी जोडलेले ठरले आहे . निर्सगानेही सह्याद्रिस अनेक चमत्कारीक अविष्कार निर्मितीतून त्याच्या सौदर्यात अधिक भर घातलेली दिसून येते . हरिशचंद्र गडावरील असलेला अर्धचंद्राकृती कोकणकडा हा हवा व पाण्याचा अविष्कारच आहे . माळशेज घाट तर वर्षाऋतुत वर -वधू सारखा सजून बसलेला असतो . जीवधन किल्ल्याचा वानरलिंगी सुळका खालून अरे व्वा ! अन वर गेल्यावर अरे बापरे ! नक्कीच वदवून घेतो . अलंग , मदन , कुलंग सारखे बहुतेकांनी न पाहिलेले अन साहस नसेल तर कधीच बघायला न मिळणारे प्राचीन किल्ले नुसते चित्रातूनही धडकी भरवतात . रतनगडाचं नेढं पाहून हे कुणी अन कशासाठी केल असेल म्हणून प्रश्न विचारायला भाग पाडते .त्याच्या शेजारचा अंगठया सारखा डोंगरही अचंबीत करतो . पन्हाळ्या जवळील  शिव पद स्पर्शाने पावन झालेले विस्तिर्ण मसाई पठारही अचंबीत करते . नाना विध दुर्मिळ फुलांनी सजनारे कास पठारही वेगळ्याच वनस्पती शास्त्राच्या दुनियेत घेवून जाते . महाभूमित सर्वोच्च शिखर कळंसूबाई जसा गगणास भेदतो तसाच त्याच परिसरात जमीनीत खोलात असलेली आशिया खंडांतील दुसऱ्या क्रमांकाची असलेली सांधण दरी हा निर्सगाचा एक अदभूत अविष्कारच आहे . सादन किंवा सांधण असेही या दरीस म्हणतात . घळ किंवा घळईसारखी असलेली २०० ते 300 फुट खोल आणि दोन कि .मी लांब अशी ही दरी आहे . सततच्या खडकाच्या क्षरणाळे किंवा भूगर्भिय हालचाली मुळे अश्या घळई निर्माण होतात . पाण्याच्या प्रवाहाने सतत झीज होत राहून दरी तयार होते होते . हिमालयातून उगम पावणाऱ्या सिंधू , सतलज , ब्रम्हपुत्रा यांच्या प्रवाहाने अनेक खोल दऱ्यातून  त्या उसळत जातात . भारतातील नर्मदा नदीने भेडाघाटात संगमरवरी खडकातून तयार केलेली घळई प्रसिध्द आहे . सांधण दरी याला अपवाद नाही . त्यात रतनगड , भंडारदरा धरण , कळसूबाई ही सौदर्यात अधिक भर घालतात . क्रतिवीर राघोजी भांगेरे जलाशय म्हणजे भंडारदरा धरणाला संपूर्ण वेढा घालून हा थरार अनुभवता येतो . शेंडी या गावातून मुरशेत - पांजरे - उडदावने- साम्रद या अगदी छोटया गावात पोहचून वाहने त्या ठिकाणी उभी करून एक दिड कि .मी चालत जाऊन या दरीत महाकाय दगडाच्या मधून मार्ग काढत जावे लागते . दोन कि. मी . पर्यत ह्या दरीचे दोन्ही कडे जनू एकमेकांशी संधान बांधत अगदी निमुळती होत जातात . वर पाहताच  लांबट खिंडीतून केवळ आकाश दिसते . सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हाच त्याचे दर्शन येथून होते . वर्षभर या घळीत काही ठिकाणी पाणी असतेच बहुतेक ठिकाणी पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागते . साहसी प्रवासातून दरीच्या शेवटच्या टोकावर पोहचून आजोबा डोंगराचे दर्शन होते . सांधण दरीत पर्यटन करायचे असल्यास पावसाळ्यात येणे टाळावेच. पावसाळयात ही दरी अत्यंत धोकादायक आहे . साम्रद गावात घरघुती जेवणाची व्यवस्था होते .  पुणे -मुंबई - नाशिक व आता समृद्धीमुळे संभाजीनगर काही तास अंतरावर असल्याने सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी या परिसरात असते .पर्यटकांनी हा परिसर अगदी फुलुन जातो.  मुंबईकर कल्याण -कसारा घाट - इगतपुरी - घोटी - शेंडी व पुणे व छ .संभाजी नगरकरांना संगमनेर अकोले -राजूर - शेंडी असे या ठिकाणी पोहचता येते . पुढे ह्याच वाटेने धरणाला वळसा घालत गोदावरीत विलिन होणाऱ्या प्रवरेचा उगम असलेल्या रतनवाडीचे प्राचीन अमृतेश्वर मंदिर की ज्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर पुष्करणी आहे पुढे - नेकलेस फॉल - कोलटेंभे - मुतखेल या मार्गाने पुन्हा भंडारदरा धरणावरुन गोल फेरा मारून शेंडीला पोहचता येते .



संजय खांडवे

सोमवार, ९ जून, २०२५

महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

 



महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - जि . अहिल्यादेवी नगर ता. अकोले ,समृद्धी महामार्गाच्या भारवीर पॉईन्ट पासून ४८ कि.मी

➖➖➖➖➖➖➖➖➖

        निऋत्तीने सर्व प्रथम शेतीचा शोध लावला . नवनिर्मिती व सृजनशीलतेचे प्रतीक ही स्त्रीच आहे . माणुस भटक्या अवस्थेत असतांना स्त्रीवरच सर्व जबाबदारी असायची व ती सक्षमपणे पार पाडत असतांना अनेक शोध लागत गेले . निसर्गातील निरिक्षणातून शेती व संगोपणातून वनस्पती औषधी सारखे शोध स्रीनेच लावले . भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

        जगातील अनेक प्राचीन संस्कृतीत नदीला मातेचे रूप मानत पूजन केले जाते. नदिचे स्री रुपातील शिल्पे देखील प्राचीन लेणी मंदिरात दिसून येतात .मातृपरंपरेत जलदेवता , सप्तमातृका म्हणजे साती आसरा , गावाबाहेर , चौरस्त्यावर , नदिकाठी असलेल्या मातृ देवता आदि भूमातांचे पूजन आपल्या कृषी परंपरेत होत आलेले दिसते . माय किंवा आई या नामस्मरणातून सुरक्षितता व जगण्याची प्रेरणा मिळत गेली . सटवाई, इंगलाई , कडजामाई, कमळाजाई, कानुबाई,कृष्णाई, खेडजाई , गडीआई ,चौंडाई, शिवाई ,हरणाई ,  शितलाई , शिरकाई , रेणुकाई, रंभाई, येडाई, मसाई, मुंबादेवी अशी अनेक मातृदैवते मोठ्या भक्ती भावे पूजली जातात . माय धुरपता या ग्रंथात संजीव भागवत यांनी तळेगावची राजमाय( नांदेड ) रामपुरीतील भागामाय(परभणी )शेलगावची यमुनामाय( नांदेड) इरळद - नळरदची देवयमाय ( परभणी ) दैठाण्याची विठामाय( परभणी ) अशी अलीकडच्या काळातील मातृ देवतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या लोकसंस्कृतीचा परंपरेने चालत आलेल्या गाणी यावरून अभ्यासपूर्ण अशी माहीती या ग्रंथातून दिली आहे .

      महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर कळसूबाईचे मंदिर आहे .कळसू नावाच्या मुलीची दंतकथा या शिखराशी जोडली जाते . सर्वांना मदत करणारी दुःख निवारण करणारी आईचे म्हणजेच मातृदैवताचे नाव ह्या सर्वोच्च शिखरास आहे . या ठिकाणी कळसू आईचा तांदळा मंदिरात स्थापित केलेला दिसतो . याची उंची १६४६ मी. आहे महाराष्ट्रात त्या खालोखाल असलेले साल्हेर (१५६७ मी), गळदेव(१५२२ मी), हरिशचंद्रगड तारामती (१४२४मी) ही शिखरे येतात . पुणे ,मुंबई , नाशिक ही महानगरे येथून जवळच आहेत आणि आता समृद्धी महामार्गामुळे कळसूबाई महाभूमिशी कमी वेळात जोडली गेली आहे . साहसी ट्रेक म्हणून नेहमीच पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे दिसून येते . साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यन्तचा काळ हा ट्रेक साठी अनुकुल मानला जातो . पर्यटक अगदी मध्यरात्री नंतर पर्यटक येथून ट्रेकला सुरवात करून कुठेही दिसणार नाही असा सुर्योदय अनुभवतात . कळसूबाई  सर करण्यासाठी सर्वात सोर्ईस्कर वाट ही बारी गावातून जाते बारी हे गाव भंडारदरा - घोटी महामार्गावर आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनही येथून जवळ आहे. बारी गावात सायं पर्यन्त पोहचले तर गावात मुककामाची सोय होते शिवाय ट्रेक वरील मार्गावर छोट्या हॉटेल असून स्थानिकांचा टेन्ट सह जेवण - चहा-नास्ता मिळतो यातून त्यांना रोजगार मिळतो . भात शेतीतून मार्ग काढत दाट जंगलातून चढाई करत पाऊल वाटेने जावे लागते आम्ही सकाळीच पाच वाजता ट्रेक चालू केल्याने  करवंदींच्या गर्द जाळीतून अंधारात काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा आनंद घेत जाता आले . स्थानिकाची मदत घेऊनच अंधारातून बॅटरीच्या मदतीने चालावे कारण जंगलातून अनेक वाटा आहेत व त्या रात्रीच्या अंधारात लवकर लक्षात येत नाही .पायथ्याशी डोंगर उतारावर भात शेती करतात . पायथ्याशी कळसू आईचे छोटे मंदिर आहे . समोर कमान लागते पायऱ्या - पायऱ्याची भात शेती, दाट जांभुळ ,करवंदी , आंबा आदि दाट झाडीतून प्रचंड चढाईचा मार्ग लागतो . लोंखडी सरक्षक कठडे केले असल्याने सुरक्षित पणे चालता येते काही ठिकाणी दगडी पायऱ्या व कोरलेल्या पायऱ्या आहेत . सर्वात अवघड लोखंडी पायरीचा मार्ग लागतो या ठिकाणी काळजी पूर्वक चालावे लागते . येथून निर्सगाचं अप्रतिम सौदर्य न्याहळता येते . कळसूबाईचे मुख्य शिखरही येथून नजरेस पडते . मोठ मोठ्या शिळा मधून प्रवास करत पहिल्या घाट माथ्यावर पोहचतो या ठिकाणी पाण्याची एक विहिर आहे व स्थानिकांची छोटी हॉटेल आहेत . समोरच उंच शिखर दिसते . लोखंडी रिलिंग व मुख्य शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत येथून लक्ष पूर्वकच चढाई करावी लागते . मग आपण पोहचतो मुख्य शिखरावर येथून समग्र अंशातून  निसर्ग फुललेला दिसतो अगदी विमानात बसल्याचा अनुभव येतो प्रचंड वारा आणि  ढगात गेल्याचा अनुभव मिळतो .शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिर आपलं  लक्ष्य वेधून घेते, मंदिरा शेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हढीच जागा  आहे. या ठिकाणी एक साखरदंड असून तो खाली सोडून पुन्हा वर ओढला की कळूसआई आपली मनोकामना पूर्ण करते अशी भावना आहे .कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये मोठे घनदाट अभयारण्य आहे. येथे बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू मांजर, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. शिवाय मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरुड, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, खंड्या, याशिवाय स्थानिक तसेच परदेशी पक्षांचा मुक्त विहार येथे असतो . येथून साणंददरी , अमृतेश्वर मंदिर ,रतनगड,  भंडारदरा धरण , हरिशचंद्रगड, रंधा फॉल ही पर्यटन स्थळे जवळच आहेत .



संजय खांडवे

सोमवार, २ जून, २०२५

राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*

 




*राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*


➖➖➖➖➖➖➖➖➖

*२१ व्या शतकातील आव्हाने स्वीकारणारा सक्षम नागरीक घडविण्याचे उद्दीष्ट आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक मोठी आव्हाने आपण संधी रुपाने स्वीकारण्यासाठी विदयार्थ्यांचा बोधात्मक , भावात्मक व कौशल्याधिष्ठीत विकास साधून त्यांची बलस्थाने ,आवडी - निवडी व छंद याचा विचार करून AI तंत्रज्ञानाच्या साहयाने समग्र मूल्यांकन पद्धतीतून  शिक्षणक्रांती घडविणार आहोत .*

➖➖➖➖➖➖➖➖

 व्यक्ती पासून कुटुंब बनते व अनेक कुटुंबापासून समाज व या विविध समाजापासून राष्ट्र बनते . राष्ट्राचा विकास हा शिक्षणाचा दर्जा कसा आहे यावरून ठरतो. स्वामी विवेकानंदाच्या मते माणुस घडविणे म्हणजे शिक्षण. शिक्षण हे केवळ ज्ञान किंवा पदव्या मिळविण्या येवढे मर्यादित नसून यातून घडलेला माणुस हा स्वतः च्या बौध्दीक , शारीरिक , भावनात्मक व व्यावसायिक कौशल्या बरोबरच राष्ट्राच्या निर्मिती साठी हातभार लावण्याची क्षमता प्राप्त करून राष्ट्राचा दर्जा उंचावतो .

       भारतातीत शैक्षणिक क्रांतीचा मागोवा घेतल्यास १९६४ - ६६ या काळात शिक्षणाच्या विकासासाठी कोठारी आयोगाची स्थापना झाली . त्यानंतर १९६८ च्या शैक्षणिक धोरणात शैक्षणिक समानतेचा विचार करत राष्ट्रीय धोरण आखले गेले .१९८६ च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर भर दिला गेला . १९९२ मधे या धोरणाचे अधिक अभ्यास करून महिला शिक्षणासह अधिकच्या सुधारणा केल्या गेल्या .१९९७ मध्ये स्मार्ट पी .टी . शिक्षक क्षमता समृद्धी सारखे कार्यक्रम राबवत दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रीकरणावर भर दिला गेला .१ ली पासून इंग्रजी विषयावर भर दिला गेला . प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून २००९ शिक्षणाचा अधिकार अधिनियम पारित केला गेला .ऑगष्ट २०१० च्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची योजना सुरु झाली इय्यत्तावार अध्ययन निष्पतीवर भर दिला गेला व आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पोहचत आहोत .

         राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला गेला आहे . यानुसार भारतीय परंपरेचा पाया असलेला'पंचकोश विकास ' ही संकल्पना समोर ठेवून काम केले आहे . अगदी पायाभूत स्तरावरून विद्यार्थ्याचा विचार करून समग्र शिक्षणाची योजना याद्वारे आखली गेली आहे . ही पंचकोश म्हणजे पाच आवरणे आहेत .

१ ) अन्नमय कोश

२) प्राणमय कोश

३ ) मनोमय कोश

४ ) विज्ञानमय कोश

५) आनंदमय कोश

   या पंचकोशाचे भाष्य तैतरिय उपनिषदात केले आहे . पिता वरून समोर भृगुऋषीने याचे निरुपण केले आहे .७व्या भागात शिक्षावल्ली मधे या कोशा विषयीचा उल्लेख येतो . अन्न कोश हे शारीरिक आवरण आहे यामधे शारीरिक व इंद्रिय विकास येतो प्राणमय कोश हा पुढचा टप्पा जीवन शक्ती देणारा व उर्जा वाढविणारा आहे . मनोमय कोश हे मनाशी संमधीत भाव -भावना विकसित करण्या संदर्भात आहे . विज्ञानमय कोश हा बौध्दीक विकासाशी सलग्न आहे .आनंदमय कोश हा आंतरीक स्व ची जाणिव करुण देणारा आनंद , प्रेम , करुणा ,उस्फुर्तता , स्वातंत्र्य, सौदर्य विषयक जाणिव निर्माण करून देणारा आहे . शरीर व मन यांच्या समन्वयातून मानवाचे आकलन व अनुभव या पंचकोशातून परिपूर्ण होतात . 'घोका आणि ओका ' ह्या अध्ययन -अध्यापन व्यवस्थेत आमुलाग्र बदल या भारतीय ज्ञान प्रणालीच्या पंचकोशातून होतांना दिसतो .

      शारीरीक ,मानसिक, बौद्धीक व अध्यात्मिक विकासातून एक सक्षम भारतीय नागरीक ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून होणार आहे . भारतीय ज्ञान परंपरेचा इतिहास आपण पाहिला तर संत परंपरेतून आलेला विचार आपण आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून बौद्धीक ,मानसिक व अध्यात्मिक विकास साधू शकतो. तुकोबारायांचे " मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण " ज्ञानेश्वर माऊलींचे " भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे " या पसायदान व इतर वारकरी संत साहित्यात अगाध आनंदमय कोश व विज्ञान मय कोश दडलेला आहे . स्वराज्याची स्थापणा करणारे छत्रपती शिवरायांची शहाजी राजे यांनी कर्नाटकात केलेली शिक्षण व्यवस्था ,छत्रपती शिवरायांचे गड स्थापत्य , शिवकालिन पाणी साठवण व्यवस्था , स्वराज्यातील आर्थिक , सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्था, शेतकरी विषयक धोरण , पर्यावरण विषयक महाराजांचे धोरण , कुशल प्रशासन व्यवस्था आदि विषयावर महाराजांचे अनेक शिवकालिन पत्रे देखील उपलब्ध आहेत .ही भारतीय ज्ञान प्रणालीची उत्तम विषय ठरू शकतात . भारतीय संविधानाची संविधानिक मूल्ये , या शिवाय अगदी सातवाहन , वाकाटक , चालुक्य , गुप्त , यादव आदि राजवंशीयांचे  जागतिक दर्जाचे स्थापत्य लेणी व मंदिर समुहातून आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत या अलौकिक वारश्यांचा समावेश अभ्यासक्रमात निश्चितच भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होऊ शकतो .



संजय खांडवे

शिक्षक

दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा

 



दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

स्थान :-  दुर्ग रायगड , संपूर्ण रायगडास घनदाट जंगलातून १६ कि.मी. पदभ्रमंती

➖➖➖➖➖➖➖➖➖

परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो . हिंदू ,बौद्ध , शीख , मुस्लीम , जैन या धर्माच्या प्राचीन परंपरा आपण अभ्यासल्या तर परिक्रमेस एक पवित्र असे महत्व आहे . गणेश पुराणा मध्ये गणेशाची एक कथा येते, सर्व देवता मध्ये प्रथम पूजन कोणत्या देवतेचे व्हावे म्हणून भगवान शिव देवतांना एक परिक्षा सांगतात की जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून अगोदर येईल त्या देवतेचा पूजनाचा मान पहिला असेल मग बंधू भगवान कार्तिकेय सह सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणे साठी निघतात पण बुद्धीची देवता गणेश आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घालून केवळ शिव पार्वतीच हे विश्व आहे हे सिद्ध करून मान मिळवितात . हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मंदिर प्रदक्षिणा , नदी प्रदक्षिणा ,वटवृक्ष प्रदक्षिणा तसेच विवाह संस्कारातील सात फेरे ही पवित्र मानली जातात . चार्तुमासाच्या शेवटी हजारो वर्षा पासून नर्मदा माता परिक्रमेस एक वेगळे महत्व आहे . बहुधा ही ओंकारेश्वर वरून कठिण तपश्चर्यने सुरुवात करून हजारो कि मी चे अंतर पायी भाविक पूर्ण करत असतात . नाशिक मधील ब्रम्हगिरी परिक्रमेला देखील एक धर्मिक महत्व आहे . पवित्र श्रावण मासामध्ये हजारे भक्त ही परिक्रमा पूर्ण करतात . बौद्ध हिनयान लेणी मधील प्राचीन चैत्यस्तुपाला सुद्धा गोल असा परिक्रमा मार्ग प्राचीन लेणी समूहात दिसून येतो .इस्लाम धर्मा मध्ये आयुष्यातून एकदा तरी  हजयात्रे साठी मक्का -मदिना या पवित्र धार्मिक स्थळी जावे अशी परंपरा आहे . मक्का या ठिकाणी इस्लाम मान्यतेनुसार जगाचा मध्य समजला जातो या ठिकाणी असलेलेल्या काबा  या पवित्र स्थळास सात वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे . अश्या विविध जाती धर्मात परंपरा आढळतात या परिक्रमे वेळी प्रत्येक भाविक आपल्या धर्म परंपरेच्या मान्यतेनुसार आपली देवतेसमोर नतमस्तक होत असतात .

            आताच्या काळात रायगडास परिक्रमेचे शिवकार्य अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहात करतात .भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात असे फार कमी  शासक असतील की ज्यांना रायगड माहीत नव्हता . इंग्रज , डच , पोर्तुगीज सारख्या परकियांनी देखीत रायगडाची धास्ती घेतली होती . युरोपीय लोक तर रायगडास पूर्वेकडील जिब्राल्टर म्हूणून संबोधतात . अठरा - परगड जाती धर्माची एक वज्रमूठ बांधून एतद्देशिंयांचे हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतीस याच रायगडी राज्यभिषेक होऊन समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा पालन हार म्हणून लोकमान्यता मिळाली होती . हिंदवी परिवाराच्या मदतीने रायगड चरणी घनदाट जंगलातून गडाच्या अगदी पायथ्याशी चहूदिशांनी नतमस्तक होणाची संधी रायगड परिक्रमेच्या मोहिमेच्या रुपाने मिळाली . हदयात छत्रपती घेऊन त्यांच्या अन मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून चालण्याची संधी ही आयुष्यातील एक अवस्मरनिय प्रसंग होता . १६ ते १८ कि. मी ची ही परिक्रमा स्थानिक अन मान्यता प्राप्तसंस्थेसहच करावी . एकट्यानं वा कुटुंबाने किंवा मित्र समूहाने हे धाडस करु नये .

           पाचाड या राजमाता  जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नमन करून वाहनाने चित दरवाज्याच्या पायरी मार्गा पर्यन्त पोहचता येते  . वर दिसणारा बुरूज हा खुबलढा बुरूज असून त्या बाजूस आता तुटलेला चित दरवाजा आहे. परिक्रमा मार्ग मात्र टकमक टोक दिसते त्या बाजूने थोडे पुढे जाऊन जंगलातून पाऊल वाटेने सुरु होतो . येथून रायगड वाडी  पासून येणारा रस्ता पुढे वर नानात (नाणे) दरवाजा कडे जातो हा पुढे महादरवाज्या कडे जातो .याच मार्गाने मुंबई इंग्रज कर हेन्री ऑक्झेंडन राज्याभिषेक प्रसंगी या मार्गाने रायगडावर जाण्याची नोंद करतो . परिक्रमेचा मार्ग मात्र पायथ्याला लागून दाट जंगलातून सुरु होतो सकाळचे साडे आठ वाजले तरी प्रचंड महाकाय रायगडाच्या सावलीतूनच चालावे लागत होते सूर्य दर्शन होण्यास तास दिड तास तरी लागणार होता . रायगड हा सह्याद्री पर्वत रांगेत असून मध्यभागी स्वतंत्र महाकाय असा दिसतो त्यामुळे संपूर्ण परिक्रमा पूर्वेकडील खिंड सोडली तर उंच सखल भागातून अत्यंत घनदाट जंगलातून होते .  टकमक टोक व हिरकणी बुरुजावरून रायगड अगदी दूर वरून सहज ओळखता येतो . हिरकणी बुरुज - महादरवाजा - टकमक टोक याच्या अगदी पायथ्यापासूनचा हा परिक्रमा मार्ग हा रायनाकच्या समाधी पर्यन्त घेऊन जातो .अत्यंत किर्र असे जंगल आंबा ,फणस , वड करवंदी व इतर अश्या घनदाट जाळीतून सुर्य प्रकाशही जमीनी पर्यन्त पोहचत नाही .तास - दिड तास चालून झाल्यावर टकमक टोकाच्या पायथ्याशी येतो .या ठिकाणा हून कडेलोट झालेला आरोपी दाट झाडीत वरच जाळीतच अडकत असावा येवढी ही दाट झाडी आहे .थोड़े पुढं चालत गेल्यावर दोन चार घरे असलेली टकमक वाडी लागते या वाडीला गाव म्हणून कोणत्याच सुविधा नाही .  शिवकाळापासून आमचे पूर्वज स्वराज्यासाठी काम करत असत असे हे आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने सांगतात . येथून पुढचा रस्ता अजून अवघड होत जातो मोठ मोठी वृक्ष कोसुळून त्यावर जाळी -झुडपे वाढलेली आहेत बहुतेक ठिकाणाहून खाली बसत , सरपटतही जावे लागते . रायगडाच्या कडा वरून कोसळलेले महाकाय दगडही वाटेत दिसतात . डाव्या हाताला दोन कोसावर लिंगाना किल्ला दिसतो . भवानी बुरुजाच्या बाजूची असलेली खिंडीच्या वाटेची चढाई सुरु होते . ही चढाई खूप अवघड आहे एकेरी व दाट झाडीतून दुपार एक वाजे पर्यन्त आम्ही त्या खिंडीत पोहचलो . अर्धी परिक्रमा येथे पूर्ण होते . खिंडीतून खाली उतरणीची वाट पुन्हा अवघड आहे काही ठिकाणी अगदी बसूनही खरकत -खरकत ही जावे लागते हाती काठी असल्यावर पायावर जास्त तान पड़त नाही . अत्यंत घनदाट जंगलातून  दोन -अडीच तासाचा प्रवास बाकी राहतो . निर्सगाच अप्रतिम कधीही न पाहिलेले सौदर्य अनुभवत झाडाझुडपातून खिंड मिळेल तेथून रायगडास चौफेर न्याहळता येते . होळीच्या माळाच्या खाली असलेल्या कुशावर्त तलावातून उगम पावत वाघ दरवाज्या जवळून खाली कोसळणारी जलधारेचे नदीचे स्वरूप या दाट जंगलात अक्राळ -विक्राळ दगडी शिळाचा नदीपात्रातील रुप पाहून वेगळाच अनुभव येतो . "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. येथून दिसणारा रायगडाचा दक्षिणेकडीत वाघ दरवाजा याची साक्ष देतो . शौर्य , साहस , बुद्धी या बरोबर पूर्वानुमानाचे अलौकिक कौशल्य शिवरायांमधे होते . स्वराज्यासाठी असलेली अखंड सावधानता त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती . वाघ दरवाजा त्याचीच साक्ष देतो . शंभू महाराजांच्या बलिदानानंतर झुल्फिकार खानाचा वेढा रायगडास बसला . त्याला केवळ एकच दरवाजा माहित होता बाकी अजस्र रायगडा पुढे तो वेढा दिल्या शिवाय काहीच करु शकत नव्हता . त्यावेळी घनदाट जंगलात कातळा अवतरण करूनच या दरवाज्याचा मार्ग होता . खरच वाघाचं काळीज असणाराच हजारो फुट कातळ कडा उतरु शकतो . त्यावेळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी साहेब व त्यांचे सहकारी याच मार्गाने वेढयातून बाहेर पडले होते. दाट अंधारलेल्या झाडीमधून चढाईची वाट तासाभरात पूर्ण करतांच डांबरी रस्ता पाहताच हायसे वाटते . डाव्या बाजुस श्रीगोंदे टोक दिसते येथून पश्चिमेकडे डाबरी रस्ता रोप - वे पर्यन्त पोहचतो याचे अंतर दोन किं मी . पर्यान्तचे आहे . दक्षिणे कडील रायगडाचे महाकाय रूप अगदी जवळून स्पष्टपणे न्याहळता येते . परिक्रमा पूर्ण झाल्याचे समाधान रोप वे पाहताच जाणवते .  साधणतः सतत आठ तासाचा पायी प्रवासातून ही परिक्रमा पूर्ण होते .



संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...