*नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*
प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे संत गाडगेबाबांचे चरित्र 1952 ला त्यांनी लिहिले. अतिशय प्रभावी मांडणी प्रबोधनकारांनी केली संत गाडगेबाबांच्या असामान्य कार्याचे विवेचन अतिशय मार्मिकपणे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना जिवंत करून मांडलेल्या आहेत. लोकश्रद्धेला वळण लावणाऱ्या महापुरुषांचे जीवन चरित्र पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरते याची जाणीव प्रबोधनकारांना होती. आपल्या प्रबोधनात्मक व परखड शैलीत संत गाडगेबाबा पुढील हजारो वर्षासाठी चरित्र रूपाने व शब्द रूपाने जिवंत केले . त्यांच्या आवाजातील मुंबई येथील त्यांचे शेवटचे कीर्तन तर नवीन आचार विचार धर्म शिकवते. परखड आवाजातील कीर्तन मेंदूत प्रचंड वैचारिक मंथन निर्माण करणारे ठरते.
"नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा, महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढेही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवेल असेही वाटत नाही "असे प्रबोधनकार बाबांचे चरित्र लेखन करताना आपल्या मनोगतात लिहितात .अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव या गावी सखुबाई आणि झिंगराजी यांच्या पोटी डेबूजींचा जन्म झाला. झिंगराजी हे शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचे नातू होते.
सुख वस्तुने अगदी सर्वकाही संपन्न होते. गुरे- ढोरे ,शेती आदि सर्व काही चांगलं सुरू होतं, पण अनेक अडाणी ,रुढी परंपरेने नेहमीच्या द्याव्या लागणाऱ्या कोंबडे- बकरे, दारूच्या नवसाने त्या काळात कहर केला होता .वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झाली पाहिजे अशी रीतच होती .यातच झिंगराजींना दारूचे व्यसन लागलं यामुळे सखुबाई आणि छोट्या डेबुजी शिवाय झिंगराजी कडे शेवटी काहीच उरलं नव्हतं. "आता माझ्या डेबुजीचा सांभाळ कर, तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडेल, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवांच्या नादी लावू देऊ नकोस." इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला होता. डेबुजी लहान असले तरी पुढील काळात त्यांच्या मनावर याचा प्रचंड परिणाम झाला असावा. चंद्रभान मामाने बहीण सखुबाई सह डेबुजी चा सांभाळ केला. मामाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. याच व्यवस्थेत वावरत असताना सावकाराच्या कर्जापोटी चंद्रभान मामाचा ही बळी गेला. घर खर्चाला आळा घालत कष्ट करून सर्वकाही सुरू असताना शेतावर ताबा घेण्यासाठी आलेल्या तिडके सावकाराला डेबुजींनी मोठ्या हिमतीने पळून लावले होते. मातीत कष्ट करून घाम गाळून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ही डेबुजी जाणून होते. स्वाभिमानानं अन मेहनतीने काम करून सुखाचा घास खावा. ताठ मानेने जगावे, पण सावकारी पाशं, त्यातच अनिष्ट रूढी- परंपरेत, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला हा समाज मुक्तपणे श्वास आणि घासही घेऊ शकत नव्हता. डेबुजी हे जवळून पाहत होते पण करणार काय लहान असल्याने कोणी ऐकतही नव्हतं .त्यापुढे त्यांनी स्वीकारलेला मार्ग हा लोकोत्तर महापुरुषाकडे नेणारा ठरतो .गोवारी -भजन पार्टी पासून दगडांच्या चिपळांची टाळ करून भजन कीर्तनातून अभंगातून प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली.
तुका म्हणे सुख घेतले गोपाळी।
नाचती कांबळी करुनि ध्वजा.।।
करूनिया टिरी आपुलिया मांदळ।
वाजविती टाळ दगडाचे।।
खरे अन्नदान काय असते हे गोवारी -भजन पार्टीतून डेबुजीने दाखवून दिले." गड्याहो आपण तर सारेच जेवतो" पण ज्यांना कधी खायला सुद्धा भेटत नाही अशा उपेक्षितांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने कृतीतून अन्नदानास सुरुवात केली. असे अन्नदानाचे उत्सव दापुला डेबुजींनी अनेक केले. डेबुजींच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. "बुडती हे जन न देखावे डोळा" हा तुकोबारायांचा विचार डेबुजींच्याही मनात होताच. त्यांना मुलगा आणि मुलीही झाल्या परंतु त्यांनी कधीही कोंबडे -बकरे कापून प्रसंग साजरा केला नाही. मुलगा मुदगल याच्यात डेबुजींचा मोठा जीव होता. सहा महिन्याचा असताना तो अचानक गेला त्यावेळी त्यांच्या भाऊबंदांनी कोंबडे- बकरे न कापल्याने असे अरिष्ट ओढावले असे ते म्हणू लागले ,पण स्थिर चित्त आणि असामान्य ध्येयाकडे धावणारे हे लोकोत्तर महापुरुष होते. 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे तीन वाजता मातोश्री सखुबाईचे हळुवारपणे दर्शन घेऊन कुंताबाई ह्या मुलगी आलोका व कलावतीला कुशीत घेऊन झोपलेले असताना भल्या पहाटे या क्रांतिकारी प्रयाणाचा प्रसंग घडला.
तहानलेल्यांना पाणी पाजणारा, भुकेलेल्यांना अन्न देणारा, नग्न असणाऱ्यांना वस्त्र देणारा परमेश्वर त्यांनी सांगितला. संत विचारांचा व वारकरी परंपरांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. संत कबीर ,संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे दाखले ते आपल्या कीर्तनातून सतत देत असत . या संतांसमोर मी कोणत्या झाडाची पत्ती! असे ते म्हणत असत. प्रेम ,सहानुभूती ,करुणा, भूतदया हा त्यांच्या विचारांचा पाया होता. अविद्येचे अनर्थ त्यांनी त्यांच्या जीवन संघर्षातून जाणले होते, म्हणून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा दिवा तुमच्या घरात प्रकाशमान ठेवा असे ते कीर्तनातून आवर्जून लोकांना सांगत असत. प्रसंगी घरातील ताट विका अंगावरील कपडयावर कमी खर्च करा पण लेकराले शिकवा. हा त्यांचा कळवळा असे.
माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा! देव शोधता- शोधता देव होणाऱ्या तुकोबारायाच्या अभंगाचे दाखले त्यांच्या कीर्तनातून ते सतत देत.
देह असूनिया देव।
वृथा फिरतो निर्दैव।।
देव आहे अंतर्यामी ।व्यर्थ हिंडे तिर्थग्रामी।।
बाबा दरवर्षी पंढरपूरला जात असत नाशिक आळंदी देहू अशा अनेक तीर्थस्थळावर त्यांनी भेटी दिल्या पण ते मंदिरात कधी दर्शनासाठी क्वचितच गेले असतील. तीर्थस्थळावरील परिसर स्वच्छ करून ते जनसेवा करत असत. त्या ठिकाणी घाट, धर्मशाळा, आश्रमशाळा, छात्रालय ,सदावर्त आदि लोकसेवा जोपासणारी लोककल्याणकारी स्थळे निष्काम कर्मयोगाने राष्ट्रकल्याणार्थ उभी केली. तीर्थक्षेत्री आलेल्या श्रद्धाळूंचा बुद्धिभेद त्यांनी कधी केला नाही. बाबांना पंढरपुरी आल्यानंतर कुणी विचारले "बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे नि घाटाकडे बोट दाखवत बाबा म्हणत," हा समोर जागता ,बोलता, नाचता विठ्ठल असताना देवळात जायचे कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं ?जिकडे नजर टाकावी तिकडे तो अपरापार भरलेला आहेच!."
बाबा कीर्तना अगोदर त्या गावची स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करायचे. सोप्या प्रचलित ओघवत्या भाषेत, जनमानसात रुजलेल्या शब्दात, त्यांच्याच बोलीभाषेत बाबांचे किर्तन असायचे. शाब्दिक चर्चेत ते कधीच अडकायचे नाही. तुकोबारायांनी जशी लोकभाषेतून अभंग रचना केली ,रसाळ दृष्टांत दिले तशीच वाणी बाबांचे असायची .जीवनात नेहमी घडणाऱ्या घटनांचे ते दाखले देत. कीर्तनस्थळी असलेल्या जेवणावळीत ते कधीच दिसले नाही ,उलट बाजूला जाऊन आपल्याजवळ असलेली अर्धी कोरी भाकर खाऊन ते लगेच कीर्तनाला हजर होत असत. कीर्तनाचा विकरा त्यांना तुकोबारायाप्रमाणेच मान्य नव्हता.
जेथ किर्तन करावे।
तेथ अन्न न सेवावे।।
बुक्का लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।
हा त्यांचा नियम ते आवर्जून पाळायचे.
तुका म्हणे द्रव्य देती।
घेती दोन्ही नरका जाती।।
हा शोषणाचा बाजार त्यांनी कधीच तोडला होता. या शृंखला तोडणे गरजेचे होते. कोणत्याही शाळेत न गेलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते. नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू आजच्या काळात अधिक समजून घेणे फार आवश्यक आहे. माणुसकीची पूजा करून देव शोधा ......!!!!आता असे लोकोत्तर कर्मयोगी युगपुरुष होणे नाही......!!!
संजय खांडवे बुलढाणा 90 11 97 11 22