बुधवार, ६ एप्रिल, २०२२

पितळखोरा लेणी

 *पितळखोरे लेणी- महाराष्ट्रातील प्राचीन अविष्कार*


लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली .हा कालखंड इस पूर्व ४९१ ते ४५९ हा आहे म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षा अगोदर ह्या शैलगृहाच्या निर्मितीस सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो. नागार्जुन , सीतामढी येथे सुद्धा इस. पूर्व 252 ते 200 या कालखंडात लेण्या खोदल्या गेल्या. सुदामा, विश्वमित्र, कर्णकौपर, लोमेश ऋषी या लेण्या आहेत यापैकी सुदामा ही प्राचीन आहे त्याला न्युग्रोध गुंफा म्हणतात.

           यानंतर इ स पूर्व दुसऱ्या शतकात नर्मदा पार करून   महाराष्ट्रात पितळखोरा या ठिकाणी पहीला प्रयोग झाला .अनेक दिवसापासून या लेणीबद्दल प्रचंड आतुरता होती की ही लेणी करावी .लेणी बघणे व समजून घेणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत .त्यामुळे या आपल्या प्राचीन वारश्याला समजून घेण्यासाठी कुणीतरी जाणकारच लागेल यात शंकाच नाही .नवी मुंबई येथील सूरज रतन जगताप या लेणी अभ्यासकांशी माझा संपर्क झाला .विशेष म्हणजे "पितळखोरा "हा त्यांचा मुख्य अभ्यासाचा विषय होता .गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे या लेणीवर सवर्धनासह काम सुरु आहे .त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभरातून या आपल्या प्राचीन वारश्यावर प्रेम करणारे अभ्यासकासह एकत्र आलो व गौताळा अभयराण्यातील पितळखोरा या ठिकाणी एकत्र येऊन दिवसभर जगताप सराच्या सोबत राहून लेणी समजून घेतली .महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पण आजही दुर्लक्षितच असलेली दिसते .पुरातत्व खात्याचे काम आता बऱ्यापैकी दिसते पण पर्यटनाच्या बाबतीत आजही ही महत्वाची लेणी मागेंच आहे .आमची टिम त्या लेणी परिसरात पोहचताच आगे मोहळ उठल्याची आवई आम्हाला कळाली पण अभ्यासकांच्या अनुभवावर आम्ही पुढे निघालो परत येणारे दोन हौशी पर्यटक भेटले आणि ती आवईच ठरली .या लेणीचा उल्लेख टॉलमीच्या मेट्रीला या ग्रंथात आढळतो.महामयुर या बौद्ध ग्रंथातही 'पितलांग्य' असा उल्लेख आढळतो .सोपारा,कल्याण ,भरूकच्छ यासारख्या देशार्तगत बंदराला जोडणाऱ्या पैठण व तेर या व्यापारी मार्गावर आहे .उज्जैन वरून पूर्वी याच मार्गाने प्रतिष्ठाणशी संपर्क होता व पुढच्या काळात तो अजिठा ,घटत्कोच या मार्गाने वाढला व दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा घटली व पितळखोऱ्याचा विकास कमी होऊन अजिंठा अधिक विकसित होत गेले याचे दुसरे कारण पितळखोऱ्याचा दगड असावा असेही दिसते .याच भागात सातवाहन कालिन भोकरदन (भोगवर्धन)हे शहरही व्यापारी दृष्टया फार प्रगत होते .नुकतेच सम्राटअशोक कालिन भोन येथील प्रगत अश्या शहराचे संशोधन सुरू आहे ते सुध्दा या स्थानापासून जास्त दूर नाही .

    पितळखोरा लेणी ही हीनयान लेणी आहे.या लेणीच्या समकालिन अंजिंठयातील ९ व १० क्रमाकाची लेणी आहे .ही लेणी सुद्धा अजिंठयासारखीच नालाकृती आहे .अरुणा नदीच्या उगम प्रवाहावर याचे निर्माण झाले .सध्या पुरातत्व विभागाने कन्नडच्या बाजूने घाटमाथ्यावरून पायरी मार्ग तयार केला आहे जुना मार्ग आजही चाळीसगाव कडून पाटणदेवी मार्गाने अभयरण्यातून वाट आहे पण येण्यासाठी दोन तीन तास पायी यावे लागते .

    पायरी मार्गाने खाली उतरताच अरुणा नदीची खोल दरी दिसते व उजव्या बाजूला नऊ लेण्याचा समूह दिसतो व समोरच्या बाजूस चार लेण्या खाली उतरल्यावर पूर्ण नजरेस पडतात .

      जेम्स विलसन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५३ मधे इथे पहीले पाऊल ठेवले .या ठिकाणी कुणीही जात येत नव्हते.याठिकाणच्या चैत्यगृहा समोरील सपूर्ण भाग कोसळून हे चैत्य गृह संपूर्ण झाकलेले होते.हेन्री कझेन्स हा इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला त्याने सुद्धा हा ढिगारा पाहीला .जेम्स बर्जर्स यांनी येथील शिलालेखाचा अर्थ शोधला . झ्ग्रंजांनी या लेणीचे मोजमाप सुध्दा केले आहे .सूरज जगताप सरांनी त्या काळचे सर्व फोटोग्राफ मिळवून ते सोबत आणले होते .म गो दिक्षित हे इतिहास संशोधक १९४१ साली येथे आले होते.त्यांनी येथील चार लेण्याचा शोध लावला.त्यांनी सुध्दा या लेणीवर संशोधन केले आहे .१९५३ साली पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून सरक्षित केले .१९५७ -५८ मधे या ठिकाणचा मोठा ढिग काढण्यात आला .या ढिगाऱ्याखाली प्राचीन परंपरेचा उलगडा करणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तु ,शिल्पे सापडली याचा सचीत्र उलगडा अभ्यासकांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जे शिल्प होते त्या ठिकाणी आम्हाला घेऊन  केला .

      आता पर्यन्त आम्ही जेवढया लेण्या पाहील्या तेवढया लेण्यात पाण्याची व्यवस्था ही पानपोढी च्या माध्यमातून केलेली दिसते म्हणजे दगडात कोरुन मोठ मोठे हौद तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवणे .पण या ठिकाणी तशी रचना दिसली नाही याचे कारण तेथील प्रस्तराचा पोत होय हा प्रस्तर एकसंघ असणे आवश्यक असतो .त्यातून पाणी न झिरपणे ,ठिसूळ नसणे गरजेंचे असते पण या ठिकाणी मात्र येथील प्रस्तर एकसंघ नसल्याने व खडक बेसॉल्ट असल्याने मात्र या लेणीचे पुढील काळात खूप नुकसान झाले .

     पाण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन म्हणता येईल असा पाण्याचा बंधारा या ठिकाणी २२०० वर्षापूर्वी  ठिकाणी बांधण्यात आला आजही त्याचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अरुणा नदीचा मुख्य प्रवाह लेणीच्या वरच्या बाजूस अडविण्यात आला व त्या ठिकाणी 22 लाख लिटर पाणी थांबवता येईल अशी बांधणी करण्यात आली आजही नदीतील पात्रात दगडांमध्ये एका सरळ रेषेत लाकडी थांब उभे करण्यासाठी दगड गोल ओंडक्याच्या आकाराचा कोरलेला आहे त्याला सहाय्यक म्हणून दोन्ही बाजूला छोटे छोटे  खाची केलेली आहेत. या मुख्य लाकडांच्या आधाराने दगड व मातीचे लेपन करून हा बंधारा बांधला गेला असावा असे दिसते. पानपोढी ऐवजी या बंधाऱ्याचे पाणी या लेणी समूहात राहणारे बौद्ध भिक्खू वापरत असत.

खाली उतरतात उजव्या बाजूला आपल्याला विहार नजरेस पडते. विहार म्हणजे त्याकाळी बौद्ध भिक्खू साठी ही निवासाची व ध्यानधारणेसाठी ची जागा होती. आजही आपल्याला त्या ठिकाणी लाकडी रिप बसवण्यासाठी ची दगडात कोरलेली खोबणी दिसतात या माध्यमातून त्याकाळी लाकडी कंपार्टमेंट करून ही निवासस्थाने तयार केलेली दिसतात. खोल दरीच्या बाजूने ही आजच्या काळात ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला पॅरापिट करतो अगदी तशीच रचना दरीच्या बाजूने केली असल्याचे जाणवते. त्याकाळी ही लाकडी रचना आपल्याला आता दिसत असलेल्या दगडातील कोरीव कामावरून सहज लक्षात येते.

      हिनयान पंथीय बौद्ध भिक्खू उपासक चैत्यगृह मध्ये आपली प्रार्थना ध्यानधारणा करण्याचे काम करत असत पुढच्या भागात विहाराच्या समोरच एक सुंदर भव्य असे   गजपृष्ठाकार आकाराचे चैत्यगृह नजरेस पडते. आत गेल्यानंतर या चैत्यगृहात स्तुप आहे . प्रस्तर एकसंघ नसल्याने हा स्तूप सध्या अर्धवट दिसतो .छत्रावली,यष्टी,हर्मिका हा भाग दिसत नाही .यापूर्वी यावर दगडी बांधकाम करून पूर्ण केल्याचे जाणवते ज्यावेळी चैत्यगृहात पडझड झाली त्यावेळेस या बौद्ध स्तूपाचे नुकसान झाले असावे. भाचे येथील चैत्यगृहात  असलेला स्तुप हा जवळपास समकालिन असावा असे अभ्यासकाचे मत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिव अवशेषांवर गया, सारनाथ ,नालंदा, या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्यात आले होती . त्यांनी वापरलेल्या वस्तूवर ही स्तूप बांधले जाऊ लागले त्यांना परिभाषिक स्तुप असे म्हणतात. पितळखोरा येथील चैत्यगृहात त्याचे पावित्र्य जपत सर्वांनी बुद्ध वंदना पार पडली . एकूण 37 खांबावर उभा असलेला हा चैत्यगृह आहे सध्या बरीच खांब पडलेली आहे. कृत्रिम रित्या दगडाचा वापर करून खांबाची ची निर्मिती निजामाच्या त्यांनी दिलेल्या मदतीतून त्या काळात केली गेली असे संशोधकांनी सांगितले या विषयावर संशोधनही सुरू आहे. मिथिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दगडी भिंती व खांब अत्यंत गुळगुळीत केलेले दिसतात. या चैत्यगृहाचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की हिनयान चैत्यगृहात नंतरच्या काळात बुद्ध चित्रांची निर्मिती केली गेली अजिंठा मध्ये ज्या पद्धतीची चित्रशैली आहे अगदी तशीच परंतु त्यापूर्वीची अशी ही चित्रशैली दिसते अजिंठ्यातील चित्रशैलीत जातक कथांचा चित्रांचा समूह दिसतो परंतु या ठिकाणी मात्र केवळ बुद्धांच्या चित्रांचा समूह आहे यामध्ये कमल पुष्पात उभे असलेले तथागत बुद्ध त्याच पद्धतीने ध्यानस्थ असलेले बुद्ध तसेच डोळे उघडे असलेले बुद्ध या चित्र समूहात दिसतात.प्रत्येक बुद्धचित्राच्या मागे प्रभामंडळ काढलेले आहे . काजळी वापरून लिहिलेला लेख आजही येथे बघायला मिळतो. चैत्यगृहात गजपृष्टा कार आकाराच्या स्तूपाच्या वरील भागात लाकडी कमानीचा वापर केलेला दिसतो या लेणीत दगडावर विशिष्ठ प्रकारच्या चुना - मातीचा-इतर घटकाचा लेप लावून त्यावर चित्रकाम केलेले दिसते. आज तेथील लाकडी काम गळून पडलेली आहे ज्या ठिकाणी हे काम होते तो भाग आता बिना लेप लावलेला व चित्र काम न केलेला आहे. याच चैत्या तील दहाव्या व अकराव्या खांबावर दोन ब्राम्ही लिपि मधील शिलालेख आहेत . षटकोनी आकारात तासलेल्या या खांबावर अत्तर बनविणाऱ्या  मितदेवाचे दान आहे दुसऱ्या खांबावर संघकाचे दान आहे हे दोघेही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथील आहेत. या दोन्ही खांबावरील चित्र कामाचा लेप गळून पडल्यामुळे हा शिलालेख उघडा पडला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करता आले. लेणीच्या अभ्यासकांच्या मते या चैत्यगृहातील चित्राखाली अजूनही असे शिलालेख असू शकतात. ज्याच्या दानातून ज्या लेणीच्या ज्या भागाची निर्मिती व्हायची त्या भागावर बहुतेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला  शिलालेख आढळतो. असे शिलालेख इतिहास समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडतात.दोन्ही बाजूने दोन ,दोन ढेरपोटया यक्षाने पायरी तोलून धरण्याचे शिल्प आहे .आजही त्या यक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव जीवंत वाटतात .'यक्ष ' हा बौध्द-हिंदू-जैन या सर्व धर्माच्या विवेचनात आढळतो .त्याला या तीनही धर्मात महत्वाचे स्थान आहे . याच ठिकाणी डोक्यावर भार घेत दोन्ही हाताने तो भार पकडलेला फेटाधारी यक्षाचे पूर्ण शिल्प उत्खलनात सापडले आहे .''संकरीन यक्ष " असे त्याचे नाव असून त्याचा उल्लेख महामयुरी या ग्रथात येतो .आज हे अप्रतीम शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय सरक्षण केद्रात ठेवण्यात आले आहे .

     चैत्यगृहातून बाहेर पडताच.सोंड  तुटलेला नऊ हत्ती दिसतात.हा एका विहाराचा भाग आहे वरील प्रस्तर या हत्तीशिल्पावर कोसळले व ही शिल्पे तुटली .नऊ हत्तीच्या समोर पूर्णाकृती नऊ माहुतांची शिल्पे होती त्यांच्या पायाचे अवशेष आजही दिसतात .हत्ती सुद्धा पूर्णणे अलंकृत आहेत .तुटलेल्या माहुतांचे शीर,धड व हत्तीचे सोंडीचे अवाढव्य अवशेष दरीच्या काठावर आजही पडून आहेत .पाठीमागे असलेले विहार या हत्तीच्या रथावर आरूढ आहे अश्या प्रकारचे हे भव्यदिव्य विहाराची ही वास्तु होती. या विहारात वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक दरवाजा पायऱ्यासह कोरलेला आहे .या ठिकाणी पूर्वी लाकडी द्वार होते हे तेथील कोरीव कामावरून दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे या द्वारावर सहा फुट उंच असे हातात भाला घेतलेले द्वारपाल आहेत .यापैकी एका द्वारपालाचे शिल्प अलीकडच्या काळात  तोडल्याचे दिसते .बर्जेस,फग्र्युसन,पर्सी बाऊन या पाश्चात्य जाणकाराच्या मते ग्रीक,इजिप्त ,इराण आदी शिल्प शैलीचा प्रभाव काही अंशी प्राचीन लेणी समूहात जाणवतो याची प्रचीती या द्वारपालाच्या पोषाखावरुन येते .याशिवाय विहारातील बहुतेक द्वारावर पंख असतेले घोडे,हत्ती आदि प्राण्याचे शिल्पे आहेत .उतुंग भरारी घेणारे आवेशपूर्ण शिल्पे ही ग्रीक,रोम,इराणी वास्तुकलेची छाप जाणवते .या भागातून ग्रीक व रोमशी सातवाहन काळात नाणेघाट _कल्याण या मार्गाने सागरी व्यापार चालतच होता .

     या द्वाराच्या डाव्या बाजूला पंचफणी नागाचे शिल्प आहे.या शिल्पाचा उठावदार पणा आता दिसत नाही या नागाच्या पाचही मुखातून आजही पाणी येते .खडकाच्या प्रस्तरात मुरलेले पाणी एकत्रीत करून भूमीगत पध्दतीने या नागफणी पर्यन्त आणले गेले आहे .कोरीव काम करून पाण्याची नहर भूमीगत आहे .जागोजागी छोटे मॅन होल ठेवून त्यात घडीव दगड बसविला गेला आहे जेणे करुन त्यामधे साचलेला गाळ काढता येईल .पूर्वी पूर्णतः दबावाने हे पाणी येत असावे .कारंज्याच्या रूपाने ते नागफणीतून बाहेर पडत होते .मुख्यद्वारावर असल्याने विहारात जाण्या अगोदर स्वच्छतेसाठी असावे .इस पूर्व दुसऱ्या शतकातील जलव्यवस्थापण आजही लाकडी बंधारा व या भूमीगत पाणी रचनेतून दिसून येते .याच द्वाराच्या वर एक आयताकृती रिक्त चौकट दिसते म्हणजे त्यामधील घडीव दगडी  पैनल हा खाली  ढिगाराखाली सापडला होता आज या पैनल वरील शिल्प छत्रपती शिवाजी महाराज म्युझीअम मुंबई येथे बघायला मिळते .या शिल्पात दोन्ही बाजूने ह्त्ती व मधे स्त्रीचे शिल्प आहे.अभ्यासक या शिल्पास महामायादेवी संबोधतात काही या शिल्पास गजलक्ष्मी म्हणतात .अशी शिल्पे जुन्नर परिसरात अनेक भागात आढळतात .डाव्या बाजूला असलेल्या चार लेण्यामधे विहार कोरलेली आहे .वर्षानुवर्ष हा एकसंघ नसलेला प्रस्तर सतत ढासळत राहील्याने अरुणा नदीच्या दरीत मोठमोठया दगडांचा खच पडलाय ,नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने सततच्या माऱ्याने त्यावरील कोरीव काम नाहीसे झालय .एके काळी सुवर्णकाळ ठरलेला हा आपला वारसा आजही आपली वाट पाहतोय .सूरज जगताप सरांसारखी माणसे शेकडो किलोमिटर अंतरावरून येवून येथील अजूनही न उलगडलेल्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेत या प्राचीन ठेव्याची माहीती लोकांना करुन देत आहेत .असे हजारो वर्षापूर्वीचे आपल्।या पूर्वजांचे असंख्य ठेवे आपल्या परिसरात आहेत त्याचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे .हा वारसा आपल्याला सदैव प्रेरणाच देत राहील.



संदर्भ

-लेणी महाराष्ट्राची _डॉ दाऊद दळवी

-लेणी अभ्यासक सूरज जगताप (मुंबई)यांच्या सोबत प्रत्यक्ष अभ्यास दौरा



संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

शंभूराजे

 🚩🚩🚩🚩 *शंभूराजे*


एके काळी सुवर्णकाळ अनुभवलेल्या या मातीसाठी इ .सनाचे १२ वे १७ शतकातील  मधला ५०० वर्षाचा कालखंड म्हणजे महाराष्ट्रातील राजकिय संघर्षाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक संघर्षासाठी तेवढाच महत्वाचा आहे .याच काळात संत परंपरेने एक चळवळ उभी केली .आपल्या कुटुंबाचे रक्षण करत खऱ्या अर्थाने अध्यात्मिक समतावादी लोकशाहीचा पाया याच काळात रचला जात होता.वर्ण, जात श्रेष्ठत्व नाकारत समतेची भगवी पताका याच वारकरी चळवळीतून उभी राहीली . शोषणाविरूद्ध लढण्याचे बळ व स्वाभिमान यातून मिळत गेला . *राजमाता शिवमाता जिजाऊंची प्रेरणा,अर्कज्ञ  ,स्वराज्य संकंल्पक शहाजी राजे* यांचे त्याग ,निती ,बुद्धीमत्ता यातून शिवरायांनी प्रेरणा घेत रयतेचे लोककल्याण कारी स्वराज्य उभं केले .

    *इतिहाचार्य वा सी बेद्रे यांचे सत्य शंभूचरित्रासाठी आपले आयुष्य खर्चि घातले .त्यांचे अनंत उपकार आहेत . *नाटक,कथा,कांदंबरीना खरा इतिहास समजणाऱ्यांनी वा सी बेद्रे यांनी लिहलेलं शंभूचरित्र जरूर वाचावे* . ते या चरित्रात सुरुवातीलाच अभ्यासपूर्ण पणे लिहतात " *शहाजी महाराजांच्या महत्वकांक्षेतून सूचित झालेल्या व शिवाजी महाराजांनी साकार केलेल्या हिंदवी स्वराज्याचा संभाजी राजे यांनी हिरेरीने सांभाळ केला*''

   शंभूराजेनंतर कोणतेही कारण नसतांना झिझलेल्या विकृत लेखणी साठी वा सी बेद्रे  सरांचे हे संशोधन म्हणजे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शंभूचरित्राला न्याय देणारे होते .पण आजही या मातीसाठी लढणाऱ्या या छाव्याचे सत्य चरित्र या मातीत राहणाऱ्यांनी तरी अजून समजून घेतलय !

     वयाच्या आठव्याच वर्षी ज्या तत्खाला हादरुन सोडायचे आहे  त्या दिल्लीच्या बादशहा समोरची स्वाभिमान,स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी डरकाळी याच पिता -पुत्रांची होती.

अजूनही भल्या-भल्या इतिहासकारांनाही चक्राऊन सोडणारा आग्रा सुटकेचा मार्ग व घटनाक्रम त्यांच्या लेखणी थांबवून जातो .

ही निती,चातुर्य,गोपनियता ,अखंड  सावधानता,अचुक नियोजन कौशल्य।शंभूराजे बालपनातच अनुभवत होते. जीवंतणीच आपल्या मुलाचे श्राद्ध घालण्याची  घटना म्हणजे शिवतंत्राचाच भाग होता .पुढच्या काळात या पिता -पुत्रांनी स्वराज्यासाठीचे शिवतंत्र तर शञूला हतबल करुन सोडणारेच होते .इतिहासालाही त्याची निटशी उकल करता आलेली दिसत नाही .

      शंभूराजांना लाभलेल्या अवघ्या ३२ वर्षामधे पुढचे लाखो वर्ष ही विसरले जाणार नाही येवढे महान कार्य त्यांनी या संघर्षमय अल्प आयुष्यात केले . सकल शस्त्र,युद्धनिती मधे पारंगत असलेल्या शंभू राजांनी स्वतः हातात तलवार घेवून शेकडो लढाया केल्या .यात एकही लढाई न हरणारा रणधुंरंदर योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी राजे होय .शब्दातही मांडणी न करता येणारे पराक्रम शंभूराजांनी गाजविले.प्रचंड विश्वास स्वराज्याच्या रयतेत निर्माण करत जीवाला जीव देणारी माणसं उभी केली .पुढे रांजांच्या बलिदानानंतर फक्त छत्रपतींच्या नावावर,प्रेरणेवर दिडशे वर्ष बेभान होत शत्रूशी लढत राहीली .

       एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन त्या काळात साहित्य क्षेत्रातही मोठी क्रांती संभाजीराजे यांनी केलेली दिसते .हा वारसा त्यांना आपले आजोबा महाबली शहाजीराजे की जे सुद्धा संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते .त्यांचे काकासाहेब संभाजीराजे यांनासुद्धा विविध भाषेचे ज्ञान होते .राजमाता जिजाऊ यांचे संस्कार,छत्रपती शिवरायांचा सहवास त्यांना बरेच काही देऊन गेला . 

    शिवभारत या शिवरायांच्या समकालिन ग्रंथात तर परमानंद म्हणतो 


*आख्याति लिखितुं यावदाचार्यो।*

*तावद द्वितियपेश्ये विलिख्य तमदर्शयेत ॥*


लहानपणी शिवरायांचे आचार्य दुसऱ्यादिवशी जो पाठ शिकवायचे त्याची तयारी ते आदल्या दिवशीच करून यायचे .हे संस्कार भोसले वंशीयामधे अगोदरच होते .

       बालवयातच नऊ भाषेचे नुसते ज्ञानच नाही तर त्यावर प्रभूत्व सुद्धा होते .शिवराज्याभिषेक प्रसंगी शंभूराजे इंग्रज आधिकाऱ्यासोबत इंग्रजी मधूनच संवाद साधत होते .या प्रसंगी राज्याभिषेकासाठी आलेले गागाभट्ट यांनी संभाजी राजे यांचे संस्कृत भाषेवरील ज्ञान व प्रभूत्व पाहून आश्यर्य चकित झाले .त्यांनी संभाजी राजे यांच्यावर संस्कृत मधून 'समयनय 'हा ग्रंथ लिहून त्यांना आदरपूर्वक अर्पण केला.

     वयाच्या अवध्या १४ व्या वर्षी " *बुधभूषण* " हा संस्कृत ग्रंथ लिहून काढला .या ग्रंथातील दुर्गाभ्यास,पशु,पक्षी,प्राणी,फळे,फुले,वनस्पती याबद्दलचे सखोल ज्ञान खूप काही सांगून जाते .राजाची कर्त्यव्य काय ?राजपुत्राची कर्त्यव्य काय ? युद्ध तंत्र,प्रकिर्ण निती या बाबत आजही लागू होतील असे विश्लेषण शंभू राजे या ग्रंथात करतांना दिसतात .

     *सातसतक,नखशिख,नाईकाभेद या कला ,तत्वज्ञान आदि विषयावर विवेचन करणारे लिखानही या ग्रंथातून शंभूराजेंनी केलेले दिसते . *केशव पुरोंहीत याने*  " *राजाराम चरितम" या ग्रंथात संभाजी राजे यांची स्तुती करतांना त्यांना *सकलशास्त्र,विचारशिल आणि धर्मज्ञ शास्त्रकोविद* म्हटले आहे .

   बुधभूषण मधील *तृतीय अध्यायात प्रकिर्ण नीति* मधील  श्लोकात शंभूराजे म्हणतात


*को लाभो गुणिसंगमः किमपरं प्राज्ञैतरै: संगति:।*

*का हानिः समयच्युतिर्निपुणता का धर्मतत्वे रतिः ॥*

*कः शुरो विजितोद्रिय: प्रियतमा कामुव्रता किं धनम।*

*विदया कि* *सुखमप्रवासगमनं राज्ञः किमाज्ञा फलम्॥*

    या श्लोकातुन ते सांगत आहेत की,लाभ *कुठला चांगला आहे ?*

तर गुणी माणसांची भेट होणे हा लाभ चांगला आहे.आज आपण धन लाभ,पुत्र लाभ ,सत्तेचा लाभ आदि लाभाची अपेक्षा करतो .त्या वेळी मात्र राजांना मात्र गुणी माणसं  हवी होती .

   *काय श्रेष्ठ नाही ?* तर

मूर्ख माणसांची संगत श्रेष्ठ नाही .आताच्या काळात नवतरुनांना फार महत्वाचे आहे.

       *हानी कोणती ?*

तर आयत्या वेळी हातून चुक घडणे ही मोठी हानी  म्हणजे नुकसान आहे हे शंभूराजे सांगतात .म्हणजे आबासाहेबांची अखंड सावधानतेची शिकवण येथे दिसते .

   *निपुणता कोणती ?*

तर चांगल्या आचरणासाठीची आवड असणे .की जे भोसले वंशीयांनी सदैव जपलेल दिसते .

 *खरा शूर कोण ?*

ज्याने स्वतः च्या इंद्रियावर विजय मिळविला आहे तोच खरा शुर आहे .प्राचीन भारतीय तत्वज्ञानही यामधून जाणवते .

   *खरी प्रियतमा कोण ?*

तर जी व्रतधारी म्हणजें सदैव पाठीशी राहते अशी सहचरिणी होय.

     *खरी संपत्ती कुठली ?*

तर शंभूराजे म्हणतात ती "विदया" आहे .कालरूपी अज्ञानाच्या सर्पाने ही पृथ्वी डसली गेली आहे तिच्या कल्याणार्थ गुरूचा जन्म झाला आहे .त्या गुरुला वंदन असो अश्या आशयाचा श्लोक बुधभूषण मधे शंभूराजांनी मांडलेला आहे. या विदयेचे अनर्थ पुढे महात्मा फुले यांनी जाणले होते .

*खरे सुख कोणते ?*

फार न हिंडणे हे खरे सुख शंभू राजे मानतात .

   *खरा राजा कोण ?*

 जेव्हा प्रजा राजाची आज्ञा निष्ठेने पाळते व त्याचे फलित मिळते तो राजा खरा आहे असे शंभू राजे म्हणतात.

    प्रयत्नप्रधान वृत्तीला प्राधान्य देणारा हा श्लोक आहे .यामधील नऊ प्रश्नाची उकल संपूर्ण सफल आयुष्यासाठीचे सार सांगून जातात .

      येवढा विदवान ,चारित्र्यवान छत्रपती आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगीतलाच गेला पाहिजे .केवळ तलवार घेऊनच नाही तर लेखणी घेऊन छत्रपती साहित्यवीर कसे झाले हे सांगणे महत्वाचे !


*जय जिजाऊ*

*जय शिवराय*



*संजय खांडवे*🚩

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

साकेगावचा साकेश्वर

 

*साकेगावचा साकेश्वर*

🚩🚩🚩🚩🚩🚩

वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित  यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .

 भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते .११ व्या १२ शतकापासून यादवशिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपध्दतीने उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर डाव्या बाजूला एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे  या प्रकारची मंदिरे आहेत .संपूर्ण मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे .मुखमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .

मुखमंडपात तीन नंदीशिल्प आहेत .सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत .सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे.गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत .अंतराळात देवकोष्टात गणेश व कुबेर आहे.गाभाऱ्यात शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे . कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे .मंदिराची कळस शिखर रचना जवळच असलेल्या सातगावच्या विष्णूमंदिरासारखीच आहे. मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत .बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सितानान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत  अडथळा ठरत आहेत .

एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया !

 ॥नमः शिवाय ॥


संजय खांडवे

रविवार, २५ जुलै, २०२१

एक महापर्व : लखुजीराजे जाधवराव

 *एक महापर्व : लखुजीराजे जाधवराव*🚩

➖➖➖➖➖➖


राजा भिल्लम देवाने देवगिरीच्या अभेद्य किल्ल्याचे निर्माण केले सिंघनदेव ,कृष्णदेवराय, रामदेव राय,शंकर देव हरपाल देव ,यांच्या काळात यादवांचे साम्राज्य नर्मदा नदी पासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते यामध्ये आताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार उत्तर कर्नाटक मध्य प्रदेश चा काही भाग गुजरातचा काही भाग व महाराष्ट्राचा समावेश होतो यादव  साम्राज्याची राजधानी अत्यंत  अजिंक्य अशी होती. यादवांच्या साम्राज्यात कला ,साहित्य, संस्कृती भाषा व स्थापत्य आदी बाबींचा विकास झालेला दिसतो. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तसेच माहीम भटांनी चक्रधर स्वामींचे चरित्र सुद्धा याच कालखंडात लिहिले. वास्तु शिल्पांची उत्कृष्ट उदाहरण असलेले बरेच मंदिरे सुद्धा याच काळातील आहेत. असे सुख समृद्धीने नटलेले स्वकियांचेच वैभवशाली  राज्य या या भूमीवर होते.

  1294 मध्ये देवगिरीवर पहिली स्वारी उत्तरेकडून झाली अल्लाउद्दीन खिलजी याने तत्कालीन यादव राजे रामदेवराय यांचा पराभव केला त्याने संपन्न अशा यादव राज्यातून अमाप संपत्ती खंडणीच्या रूपाने घेऊन तो दिल्लीच्या दिशेने परतला .त्याने यादव राजांना आपले मांडलिक बनवले . शेकडो वर्षाची स्वतंत्रता एक प्रकारे बंदिस्त झाली .पुढील काळात रामदेवरायांनी परिस्थिती पाहून खंडणी देणे खंडित केले पण लगेच अल्लाउद्दीन ने 1307 ला त्याचा सेनापती मलिक काफुर याला देवगिरीवर पाठवले त्याने रामदेवरा यांना कैद करून दिल्लीस घेऊन गेला . पुढे दिल्लीच्या बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारून रामदेवराय पुन्हा आपल्या राज्यात परतले त्यानंतर त्यांचा मुलगा शंकर देव हा राजा झाला. त्यांनी अत्यंत स्वतंत्र वृत्तीने आपला राज्यकारभार चालविला सुलतानाला हे लक्षात येतात त्याने 1312 मध्ये पुन्हा हा मलिक काफुर पाठविले. या लढाईत शंकर देवाला अत्यंत अमानुषपणे ठार मारले गेले व देवगिरी दिल्लीला जोडली गेली. पुढे काफुर हा दोन वर्ष देवगिरी तच वास्तव्य करून होता. उत्तरेत अंतर्गत बंडाळ्या सुरू झाल्याने खिलजीने त्याला परत बोलावले या परिस्थितीचा चा फायदा घेत दक्षिणेतील हिंदू राजांनी सुलताना विरुद्ध एकत्र येण्यास सुरुवात केली त्याचे नेतृत्व शंकर देवाचा मेहुणा हरपालदेव यांनी केले.अत्यंत स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या  हरपाल देवाने देवगिरी ताब्यात घेऊन सुलतानाच्या लोकांना हाकलून लावले .या धक्क्याने अल्लाउद्दीन खिलजी मरण पावला. दिल्लीची गादी मिळविण्याच्या सत्तासंघर्षात मलिक काफुर सुद्धा मारला गेला. 1313 मध्ये मुबारक खिलजी गादीवर आला त्याने 1318 मध्ये देवगिरीवर स्वारी करून हरपाल देवाला अत्यंत क्रूरपणे ठार मारले यामध्ये देवगिरीचे बलशाली असे यादव साम्राज्य लयास गेले या साम्राज्याचा अस्त होणे ही इतिहासाला कलांटी देणारी घटना होती देवगिरीच्या अजिक्य यादवांचा पराभव होणे ही सोपी गोष्ट नव्हती तो एक चिकित्सेचा स्वतंत्र भाग आहे.

 शंकर देवाचा मुलगा गोविंद देव याचे पालन पोषण हरपाल देवाने केले होते या गोविंद देवाने सुद्धा पुढे संघर्ष चालूच ठेवला त्यानेही स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरु ठेवल्या होत्या. त्यानंतर ठाकूरजी जाधवराव हे गादीवर आले हे ठाकुर जी 1440 च्या सुमारास मृत्यू पावले त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भुकन देव हे वतनावर आले. वंशपरंपरेने अचलकर्ण उर्फ अचलोजी त्यानंतर विठ्ठल उर्फ विठुजी हे मनसबदारीवर आले. हा कालखंड विजयनगरच्या साम्राज्याच्या लयास जाण्याच्या समकालीन आहे. सर्व शाह्या आपसातील सत्तासंघर्षात लढत होत्या. यात सामान्याचे हाल होत होते .विठ्ठल देवाचे पुत्र लक्ष्मण देव उर्फ लखुजी जाधव राव हे देशमुखी वतन व मनसबदारीवर आले. त्यावेळी ते निजामशाहीच्या चाकरीत होते या सत्तासंघर्षात मराठा सरदार आपल्या पराक्रमाने वंशपरंपरेने शौर्य गाजवत अस्तित्व टिकून होते तत्कालीन राजकीय परिस्थिती सुद्धा त्याच प्रकारची होती शाह्यामध्ये होणारे संघर्ष, उत्तरेकडून मोगलांच्या स्वाऱ्या यामध्ये प्रत्येक शाही आपले बळ वाढवण्यासाठी पराक्रमी मराठे सरदारांना आपल्या बाजूने करून घेत. जाधव वंशा मध्ये  पराक्रमाची परंपरा तर होतीच पण ते अत्यंत स्वाभिमान व प्रजावत्सल  होते. यादव अर्थात जाधवरावांचा इतिहास या देवगिरीशी निगडित आहे यादवांच्या काळातील स्वतंत्र व सार्वभौम असे राज्य नष्ट झाले तरी त्यांच्या वंशीयामध्ये ही प्रेरणा जागृत होतीच हे समकालीन घटनांवरून समजते. तात्कालीन परिस्थितीनुसार आपले महत्व ,अस्तित्व टिकून ठेवत व मनात स्वातंत्र्याची प्रेरणा ठेवूनच ते वागताना दिसतात. त्यांनी पराक्रम, साहस,शौर्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामधून एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अजिंक्य असणारा देवगिरीचा किल्ला राजे लखुजी जाधवराव यांनी प्रत्यक्ष स्वारी करून जिंकला होता मोठ्या युक्तीने अगदी मोजक्या सरदारांसह वैरण वाहून नेणाऱ्या वेडबिगारांच्या वेशात गवतात शस्त्रे लपवून  किल्ल्यात प्रवेश मिळवला. इतिहासात प्रथमच हा अभेद्य किल्ला आपल्या युद्ध कौशल्यावर जाधव रावांनी मुर्तजा निजामशहा यांना जिंकुन दिला . ही नोंद जाधवरावांच्या मूळ बखरीत आढळते या पराक्रमाने लखुजी राजे जाधवराव यांना पंच हजारी मनसबदार बनविले 24000 सैन्या 15000 घोडदळ व 52 चावडयांच्या वतना सह त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. सिंदखेड परगाना  त्यांना जहागिर म्हणून देण्यात आला. सोळाव्या शतकात सिंदखेड ची देशमुखी मुळे घराण्याकडे होती त्या ठिकाणी रविराज ढोणे हा हळूहळू पुंडाई करू लागला होता. त्याने मुळे घराण्याची कत्तल घडवून जबरदस्तीने सिंदखेडची देशमुखीचा उपभोग घेऊ लागला होता या कत्तली मधून यमुनाबाई ही मुळे घराण्यातील एक स्त्री आपला जीव वाचवून लखूजीराजे जाधवरावाकडे मदतीसाठी पोहचली .त्यावेळी ते पैठण परगण्यातील लासनेर येथे छावणी करुन राहत होते .यमुनाबाईच्या तक्रारीवरून आपल्या सैन्यासह ते सिंदखेडला आले व सर्व चौकशीअंती त्यांनी रात्री रवीराव ढोणे यांच्यावर हल्ला केला यात रविराव ढोणे ठार झाला. यमुनाबाई ने 1573 मध्ये सिंदखेडचे देशमुखी वतन लखुजी राजे यांच्या नावे करून दिले. यापूर्वी सिंदखेड ,परतुर , खेंडले (साखरखेर्डा), मेहकर ही जहागिरी त्यांच्याकडे होती त्या खर्चासाठी निजामाने गाडगापूर ,वैजापूर, फुलब्बी, कन्नड ,दाऊरवाडी , पैठण, सेंदुरा बाद मेहकर, लोणार,रिसवड, बामणी ,पिंपळगाव, कुरहे, मंगळूर हे महाल खर्चाकरिता लावून दिले होते.

लखुजी राजे जाधवराव यांचा 1550 ते 1600 हा निजामशाहीतील कालखंड खूप महत्त्वाचा आहे निजामांच्या अंतर्गत संघर्षात जाधव रावांचे एक स्वतंत्र अस्तित्व होते द्क्षिणी फळीतील एक मातब्बर सरदार म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. पुढच्या काळात या अंतर्गत संघर्षात लखुजीराजे, उदाराम देशमुख हे निजामशाही विरुद्ध मोगलांकडून घडले होते.जेव्हा जहांगीर बादशहाने दक्षिण जिंकण्यासाठी कार्य हाती घेतले तेव्हा त्याच्याविरुद्ध मलिक अंबर  व निजामाच्या बाजूने राहून मालोजीराजे, लखुजीराजे ,शहाजीराजे व इतर मराठा सरदार यांनी पराक्रम गाजवून मोगलांना रोखलेले दिसते. जेव्हा जेव्हा मलिक अंबरला साहाय्य करायचे सोडले तेव्हा तेव्हा मलिक अंबरला माघार घ्यावी लागल्याचे दिसते मराठा सरदारांच्या वरचढपणा मलिक अंबर सारख्याना खपत नव्हता. मराठा सरदार मधील एक्य त्याच्या डोळ्यात खुपत असे.त्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र मोहीमा सुद्धा त्यांना देत नसत .या सरदारांचे पराक्रम ही लेखन कर्ता दुजा भाव ठेऊनच करत असेल असे वाटते .

      1623 या काळात देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरण घडले. मोगलांविरुद्ध एकत्र येऊन लढण्यासाठी लखुजीराजे जाधवराव,उदाराम देशमुख ,मलिक अंबर शहजादा खुर्रमच्या बापाविरुध्दच्या बंडाला सहकार्य करण्यासदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दरबार भरला होता .या बैठकीनंतर एकच गोधळ उडाला .या बाबत सविस्तर वर्णन शिवभारतकार आठव्या  अध्यायात करताना दिसतो.


*ततः खंण्डार्गलाख्यस्य नृपस्याग्रेसरः करी ।*

*मर्दयन्नन्यसैन्यानि प्रचचाल बलाद्बली।।*


खंडागळे राजांचा बलवंत हत्ती सैन्य तुडवत निघाला होता. एखाद्या हत्तीने गर्जना केल्या कळपातील हत्तीला ती गर्जना सहन होत नाही त्याप्रमाणे त्या हत्तीची गर्जना जाधव रावांच्या दत्ताजीस सहन झाली नाही. या धामधुमीत विठुजी- संभाजी -खेळोजी खंडागळेच्या मदतीला धावले या  संघर्षात दत्ताजी मारले गेले. देवगिरी वरून निघालेले राजे लखुजी जाधव राव ते पुन्हा परत फिरले. क्रोधाने लालबुंद झालेल्या जाधवलारावांना पाहून पृथ्वी,अरण्ये, द्विपे व त्यावरील पर्वते कापू लागली. असे शिवभारत कार वर्णन करतो. या युद्धात विठुजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले मारले गेले यात उभयतांना पश्चाताप झाला त्यानंतर जाधव भोसले हाड-वैराच्या कथा रचल्या गेल्या, पण त्या निराधार वाटतात दोन प्रतिभावंत वंशामध्ये उद्भवलेले वितुष्ट प्रासंगिक स्वरूपाचे होते. याची प्रचिती 1624 च्या भातवडीच्या लढाईत लखुजीराजे जाधवराव यांच्या भूमिकेवरून लक्षात येते.

        1626 मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला .निजामशाही वर अवकळा आली . मलिक अंबर नेहमी त्यांचा द्वेष करत असे .त्याचा या सुडाच्या धोरणाने लखुजी राजे जाधव रावांनी निजामशाही सोडली होती. यानंतर दिल्लीच्या बादशहास सोडून ते पुन्हा निजामशाही आले त्यावेळी शिवभारतकार त्यांना निजामाचा कैवारी कर्तुत्ववान बलाढ्य राजा जाधवराव असे संबोधतो. निजामाच्या पदरी असलेल्या दृष्ट सरदारांनी त्याचे कान भरले. जाधवरावांच्या दक्षिणेतील चढत्या आलेखाची भिती व द्वेष बाळगत एक प्रकारे विषचं कालवले. निजामाला सज्जनही ही दुर्जन वाटू लागले आणि हाजी हाजी करणारे दुर्जन सज्जन वाटू लागले.

    देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले अत्यंत तेजस्वी लखुजी राजे जाधव राव त्यांचे पुत्र व आमात्य यांच्यासह या दरबारात त्यांचा अपमान झाला. याचा संताप स्वाभिमानी जाधवरावांना आला आला. ते परत जात असताना निजामाचा सेनापती हमीद व इतरांनी जाधवराव मंडळींना दारापाशी घेरले. बेसावध अवस्थेत निशस्त्र व संख्येने कमी असलेल्या जाधव रावांचा संघर्ष कमी पडला .त्यांच्यावर चारही बाजूने वार झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा लखुजी राजे जाधवराव मोठ्या शर्थीने लढले. त्यांचा पुत्र अचलोजी व नातू यशवंतरावसह जाधवराव मंडळी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. याचा साक्षीदार देवगिरी होता भारतकार आठव्या अध्यायात म्हणतो


*यथा मेरोर्विपर्यासःपातो भानुमतो यथा।*

*यथा हयन्त:कृतान्तस्य दाह:पत्युरपां यथा॥*

*तथा यादवराजस्य तदा तत्र बदात्यय:।*

*सप्तनामपिलोकानामभूदल्पहितावह:।।*


जसे मेरुपर्वताचे उलथून पडणे, किंवा सूर्याचे खाली पडणे ,किंवा यमा चा अंत होणे,किंवा वरुनाचा  दाह होणे. तसा जाधवरावांचा येथील झालेला अंत सातही लोकांस अत्यंत अहितकारक झाला. 25 जुलै 1629 च्या या घटनेने महाबली शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई यांना खूप मोठा हादरा बसला. लगेच शहाजीराजांनी सुद्धा निजामशाही सोडली. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रान्तिकारी घटना होय मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत प्राणपणाने लढणारे ती माणसे होती पुढे स्वराज्य कार्यात या जाधवरावांचे मोलाचे योगदान दिसते. या मातीच्या रक्षणार्थ या  जाधवराव मंडळीची पराक्रम,स्वामिनिष्ठता व बलिदानाची श्रृखलाच  दिसते .

   लखुजीराजे जाधवरावांच्या नंतर त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई,अचलोजींच् च्या पत्नी आणि त्यांचा मुलगा संताजी उर्फ सुजन सिंह ही पुण्यात येऊन  जिजाऊंकडे वास्तव्यास होती. संताजी जाधवराव यांची कन्या काशीबाई यांचा विवाह जिजाऊंनीच शिवरायांसोबत लावून दिला होता. दक्षिणेत कनकगिरीच्या लढाई संभाजी राजे व संताजी यांना  विश्वासघात करून अफजलखानाने मारले होते .पुढे संताजी पुत्र शंभू सिंह जाधव राव हे सुद्धा अगदी सावलीसारखे शिवरायांच्या सोबत असत स्वराज्य कार्यात एकमेकांना जपण्यासाठी जाधव -भोसले वंशीयांची जोड शहाजीराजे व जिजाऊ यांनी पुढील काळात विचारपूर्वक लावून दिलेली दिसते .शंभुसिंग जाधवराव पावन खिंडीत पहिल्या प्रहरात सिद्दी मसूदशी  लढताना धारातीर्थी पडले. ही त्यांची  स्वराज्यनिष्ठताच होय . शिवपुत्र संभाजी राजे यांच्या बलिदानानंतर मोगलांना सळो कि पळो करून सोडणारे धनाजीराव जाधवराव हे शंभू सिंह जाधव राव यांचेच पुत्र होते. शिवकन्या रानुबाई या सुद्धा जाधव घराण्यातच होत्या . एवढे मोठे योगदान या मंडळीचे स्वराज्य कार्यात होते. या प्रजा वत्सल  वंशीयांचा मध्ययुगीन कालखंडातील वटवृक्ष म्हणजे लखुजीराजे जाधवराव हेच होय .


*संदर्भ*

*_राजे लखुजी जाधवराव चिकित्सक ग्रंथ प्राचार्य डॉ एस ए बाहेकर*

*_कवीद्र परमानंदकृत श्रीशिवभारत*



*संजय खांडवे*

9011971122

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

मराठयांची शौर्यभूमी :गजापूरची पावनखिंड

 *शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*

(भाग -१ )

स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग


१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप  भूमीमध्ये अफजली  संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या  संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या  दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे  कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.

या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला.  हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या  सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे  सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .

२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो  वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला  वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून  शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता. याप्रसंगी राजगडावर असलेल्या राजमाता या संपूर्ण प्रसंगाला तोंड देण्यास दक्ष झाल्या होत्या. शिवभारतात  कवी परमानंद म्हणतो_


जननी शिवराजस्य सा राजगिरीवर्तिनी।

निजनां गिरीदुर्गाणामवने ऽ वहिताभवत ॥


राजगडावर राहणारी ती शिवाजी ची माता आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली. आईसाहेब स्वराज्याचे प्रेरणास्थान आहे प्रसंगी त्यादेखील हातात तलवार घेऊन स्वराज्याच्या रक्षणार्थ दक्ष झालेल्या दिसतात .

     त्याच वेळी विजापूरकरांच्या तोफा ह्या पन्हाळ्यावर सरळ मारा करण्यास अक्षम ठरत होत्या तेव्हा इंग्रज हेन्री रिव्हिग्टनने दारु गोळा पुरविला फिलिफ गिफाड हा इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत होतां. या तोफांनी गडाचे मोठे नुकसान केले म्हणजे लढाई केवळ विजापूरकरांच्या विरोधात नव्हती तर इंग्रजही त्यांच्यासोबत होते एकाच वेळी दोन शत्रूशी महाराजांना लढावं लागत होतं. पुढे इंग्रजांचा हिशोबही महाराजांनी बाकी ठेवलेला दिसत नाही १६६१ मध्ये  इग्रजांच्या राजापूरच्या वखारीला वर हल्ला करून सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करुन त्यांना रायगडावर आणले होते .

   पावसाने आपले रौद्र रूप धारण केले . गडावरून पाण्याचे लोट वाहू लागले नदी नाले तुडूंब झाली पण वेढा अजून मजबूत झाला. महाराजांनी विचार केला की शत्रूवर सरळ हल्ला करून काहीच साध्य होणार नाही उलट यात आपली माणसे कामी येतील. या वेढयातून निसटायचंच हा बेत महाराजांनी पक्का केला.१२ जुलै १६६०च्या सकाळी गडाच्या पूर्वेकडील दरवाजा पहिल्यांदा उघडला गेला या दरवाज्यातून चार माणसे बाहेर आली ती म्हणजे गंगाधर पंत, त्र्यंबकपंत व त्यात सैनिकाच्या वेषात दोन गुप्तहेर . पांढरं निशाण घेऊन ती खाली येत होती ते पाहून सिद्धीला आनंद झाला शिवाजी राजे शरण येत आहेत हा या पांढऱ्या निशाणाचा याचा अर्थ होता." आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास राजी आहोत आमच्या जीवास काहीएक धोका नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरिता येतो"

असा निरोप पंताच्या हस्ते पाठविला तेवढ्याच वेळात सोबत आलेल्या दोन गुप्तहेर सिद्दीच्या सैन्यात मिसळून त्यांनी अशी अफवा पसरवली की शिवाजी राजे व सिद्दी जोहर यांच्यात आदिलशहा विरुद्ध संगनमत झाले आहे. सिद्धी स्वामिनिष्ठ नव्हता हे त्याच्या सैन्याला चांगलेच माहित होते या कारणाने का होईना सतत चार महिने बायको पोरांपासून दूर असलेले ते सैनिक आता लवकरच घरी जायला मिळणार या कल्पनेने गाफिल झाले.

     १२ जुलै १६६० हा दिवस गडावर खूप महत्त्वाचा होता आता वेढ्यातून कसे बाहेर पडायचे याची खलबतं सुरू झाली. छत्रपतींचं एक तत्व व होतं की ते कोणतीही मोहीम आखतांना आपल्या विश्वासू लोकांना सोबत घेऊन चर्चा करत , त्यांची मतं जाणून घेत यात ।लहान-मोठा असा भेद कदापिही नसे. त्याच दिवशी सायंकाळी गडावरील तीन मजली इमारत म्हणजे सज्जा कुटी या ठिकाणी मसलते सुरू झाली यात खुद्द छत्रपती समवेत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभू सिंह जाधव रायाजी बांदल, विठोजी काटे, शिवाजी काशीद व बांदल सरदार उपस्थित होती. कुणी सांगितलं महाराजांनी पुसाटी  बुरुजाकडून जावे. कुणी म्हणत होतं दुतोंडी बुरुजाकड्रून जावे. मग एक सूर समोर आला की महाराजांनी पालखीत बसून बाहेर पडावं व या दोन पालख्या असाव्यात एका पालखीत खरे शिवाजी व दुसऱ्या पालखीत सोंगातले शिवाजी! सोंगातले शिवाजी म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा वळाल्या त्या शिवाजी काशीदांकडे! अगदी हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शिवाजी काशिद या बैठकीस उपस्थित होते. महाराजांची आणि त्यांची ओळख अवघ्या दोन चार महिन्यापूर्वीची ! पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या  नेबापुर गावातील सामान्य न्हावी कुटुंबातील हे शिवाजी काशीद . शिवरायांच्या स्वराज्याचं वेड लागलेले शरीरयष्टीने अगदी महाराजांसारखे केशभूषा ही अगदी तशीच ! हा वीर लाखाच्या पोशिंदयासाठी एका क्षणात सर्वस्व ओवाळायला तयार झाला आपले काय होणार याची स्पष्ट जाणीव शिवाजी काशीद यांना होती शिवरायांनी प्रजे मध्ये निर्माण केलेला विश्वास एक- एक नरवीर जन्माला घालत होता त्यापैकीच एक शिवाजी काशीद. मग ठरले दोन पालख्या सजल्या व राजदिंडी मार्गे गडा बाहेर पडण्याचे ठरले. महाराजांचा अंगरखा, शेला, शिरस्त्राण व रत्नजडित तलवार सर्वात महत्त्वाचं महाराजांची आई भवानीचा प्रसाद असलेली कवड्याची माळ घालून शिंवाजी काशिद अगदी आरश्यात प्रतिबिब दिसावे असे एकमेंकांना भासू लागले .रात्री दहाच्या सुमारास पालख्या निघाल्या . वाहून नेणाऱ्या भोयांनाही माहीत नव्हत की खरे शिवाजी कोणत्या पालखीत बसलेत ! आषाढ शुद्ध पौर्णिमा, काळेकुट्ट ढग दाटून आलेले धो -धो कोसळणारा पाऊस या अंधारातून मार्ग काढत जायचे होते गुप्तहेर व वाटाडयांनी समोर अगोदर मार्ग शोधून ठेवले होते या किर्र अंधारात शत्रूला भनक न लागता निघायचे होते. वीज चमकल्यावर आपण दिसतो की काय या विचारांने त्यांच्या मनात धडकी भरायची.

      आज ज्या ठिकाणी तुरुकवाडी गाव आहे त्या गावाच्या सुमारास या दोन्ही पालखी आल्या.किर्र अंधारात झुडूपात हालचाल झाली ,शत्रूच्या हेराना सुगावा लागल्याची खात्री झाली .ती वेळ मार्गस्थ होण्याची होती पाठलाग करण्याची नव्हती.  या ठिकाणाहून पुढे मलकापूर मार्गे विशालगडावर जाणारा राजमार्ग होता.  शिवाजीराजेंनी शिवाजी काशिदांची गळाभेट घेतली व ३०० मावळे सोबत देऊन शिवाजी काशिदांची पालखी मलकापूर या नेहमीच्या सोप्या मार्गे पाठविली.त्याच ठिकाणाहून माळुंगे मार्गे मसाई पठारावरून अवघड वाटेने महाराजांची पालखी निघाली .जंगलातून जाणारा तो मार्ग होता .

   सिद्दीच्या छावणीत खबर पोहोचली शिवाजी राजे वेढ्यातून सुटले सिद्धी चौताळला त्याने आपला जावई सिद्धी मसूद याला पालखीच्या रोखाने पाठवले महाराज विशालगडावर जातील या हेतूने त्याने मलकापूर मार्गे पाठलाग सुरू केला. महाराजांचे युद्धनीती तील कौशल्य या ठिकाणी दिसून येते. नव्या दमाने तीन हजाराचा घोडदळासह ताफा घेऊन मसूद घोड्यावर निघाला त्याने शिवाजी काशिदांच्या पायी जाणाऱ्या पालखीला गाठले. हात घाईची लढाई झाली पण लढाईत स्वारस्य नव्हते, त्याला शिवाजी हवे होते. शिवाजी हाती आले म्हणून मसूद जाम खुश झाला व ही पालखी घेऊन तो छावणीत आला. आल्याबरोबर जोहरने शिवाजीराजास पहिले त्याने जसे ऐकले होते तसेच अगदी तसेच शिवाजी राजे त्याच्यासमोर होते तोच रुबाब ,तोच बाणेदारपणा, तोच थाट, मृत्यूचे यत्किंचित सुद्धा भय चेहऱ्यावर नव्हते. शिवरायांची शिनात्ख करेल अशी एकच व्यक्ती त्या ठिकाणी होती ती म्हणजे फाजल खान . आपल्या बापाच्या वधाच्या वेळी प्रत्यक्ष त्याने राजेंना बघितले होते . ओळख परेड सुरू झाली . महाराजांना तो न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या  पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्‍यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी मी शिवाजी काशीद !"

" सोंगातल शिवाजी झालं म्हणून काय झालं तो काय पडणार आहे,  तो काय पाठ दाखवणार आहे, अरे खोट्या शिवाजीची पाठ पाहू शकत नाही तर खऱ्या शिवाजीची पाठ बघण्याचा विचार तू सोड " असं म्हणताच त्याने शिवाजी काशिदांच्या छातीत तलवार खुपसली रक्ताची चिरकांडी उडाली, जखम दाबत तो ढेऱ्या खांब पकडत खाली पडला, भयानक वेदना सहन करत म्हणाला " राजे काही क्षणासाठी का होईना तुमची वस्त्र घातलेला सोंगातला शिवाजी सुद्धा पाठ दाखवणार नाही राजे "मुजरा राजे! मुजरा! वीराच्या थाटात हे बलिदान झालं .

   वेळेचा अपव्यय झालेला होता . आता सिद्धीच्या हेराच्या खबरे नुसार महाराज मसाई पठारामार्गे म्हणजे आताच्या कुंभारवाडी- खोतवाडी- आंबेवाडी- लिंगेवाडी यामार्गे गेल्याच्या बातम्या आल्या. मसूद पुन्हा त्याच वेगाने २००० घोडदळ व १००० पायदळ घेऊन निघाला. महाराजांच्या पालखीचे भोई फक्त आपली खांदेपालट करतायेत.एक थकला की दुसरा सर्व काही मॅरेथॉन पद्धतीने सुरु होत . क्षणभरही पालखी कोठे टेकली नाही स्वराज्याच्या छत्रपतीचं ओझआपल्या खांद्यावर पेलत, गुडघाभर चिखलातून, नदी नाल्यातून ,किर्रऽर्रऽर्र अंधारातून जात आहे या मार्गात दिवसासुध्दा अंधारलेले असे जंगल आजही आहे . पाऊस वाऱ्याने चौताळलेले वाघ ,जंगली श्वापदे,साप ,विंचू याचे तर भयही त्यांना नव्हते. सकाळी तांबडं फुटण्याच्या वेळेला महाराज आपल्या मावळ्यासह पांढरपाणी या गावात पोहोचले तोच पाठीमागून हेरांनी खबर आणली की सिद्दी मसूद जवळच पोहचला नव्या दमाचे सैन्य त्याच्यासोबत आहेत.

      पांढरपाणी गावापासून जवळच गजापूरची खिंड आहे त्यापुढे सहा कोसावर विशाल गड ! महाराजांच्या सोबत हिरडस मावळ प्रांतातील बांदल मंडळी आहेत त्यांना या भागाची पूरेपूर माहीती होती. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ,रायाजी बांदल , शंभुसिंग जाधव ,विठोजी काटे हे शूर सरदार आहेत.आता महाराज विशालगडी सुखरूप पोहचणे हे सर्वाच्या मनात होते .गजापूरच्या खिंडीत आल्यावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे,हिरडस मावळ प्रांतातील सिंद हे त्यांचे गाव ,चांद्रसेनिय कायस्थ प्रभू  अत्यंत शू२ व स्वामिनिष्ठ ! महाराजांना म्हणाले " आम्ही  गनिमास येथे दोन प्रहरात पर्यंत रोखून ठेवतो, प्राण असेपर्यंत गनिमास खिंड चढू देणार नाही आपण विशालगडी जावे व  तोफांच्या इशारती देऊन  कळवावे.महाराजांचे पाऊल पण पुढे सरसावत नव्हते . मसूदचे सैन्य जवळ येताना दिसले .महाराज निवडक ३०० मावळ्यासह विशालगडाकडे निघाले .बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधवासह ३०० बांदल मावळे गजापुरच्या खिंडीत थांबले दोन्ही बाजूंनी उंच डोंगर रांगा मध्ये 500 फूट खोल खिंड की जी सरळ विशाल गडाकडे जाते. गोफणी, भाले, तलवारी बाण,डोगरउतारावर दगड गोटे घेऊन बांदल मावळे झाडा झुडपात लपून बसले. नव्या दमानं सिद्दी मसूद व फाजलखान आपल्या तीन हजाराच्या फौजेसह खिंड उतरू लागला. गनीमावर सपासप मारा होऊ लागला . पहिल्या प्रहरात शत्रूचे हजारो सैन्य आपले शूर मावळ्यांनी पावन खिंडीत पाडले. लढत असताना शंभू सिंह जाधव स्वराज्यासाठी कामी आले. शंभू सिंह जाधव म्हणजे राजे लखुजी जाधव यांचे पुत्र अचलोजीं व त्यांचे  पुत्र संताजी की जे कनकगिरीच्या लढाईत संभाजीराजेसोबत अफजलखानाच्या दगाफटक्याने धारातिर्थी पडले होते .त्यांचेच पुत्र हे वीर शंभू सिंह जाधव होय ही जाधव मंडळी सुद्धा स्वराज्याच्या कार्यात अगदी सावलीसारखी महाराजांच्या सोबत आपल्या इतिहासाच्या पानापानात दिसतात.

      अक्षरशः रक्तामासाच्या सडा पडला दुसरा प्रहर लागला बाजीप्रभू मोठ्या पराक्रमाने लढत होते प्रचंड स्वामीनिष्ठता, स्वराज्यावरील प्रेम त्यांच्या पराक्रमातून दिसत होते .सहा तास झाले लढाई सुरू आहे सतत १७ -१८ तासाचा या बांदल मावळ्यांचा संघर्ष नव्या दमाच्या सिद्धीच्या सैन्यासोबत होता विशालगडा कडून येणाऱ्या आवाजाकडे सर्वांचे कान होते कारण हाआवाज आपल्या धन्याची खुशाली सांगणारा होता. क्षणाक्षणाला एक एक मावळा कामी येत होता. अंग रक्तबंबाळ झाले होते .कुणाचे हात निकामी ,कोणाचे पाय निकामी तरीसुद्धा रयतेच्या राजा साठी ही माणसं शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. बाजीप्रभूंचा आवेश तर शत्रूंना पाहूनच भयभीत करणारा होता प्रत्यक्ष यमराजालाही या नरविराने  थांबवून ठेवले . जनू यमालाही ते म्हणत आहेत ,"अरे थांब! आधी माझ्या राजाला सुखरूप पोहोचू दे  ! मग माझा प्राण घे !" विशाल गडाकडे जाणारा महाराजांचा प्रवास चार-पाच कोसाचा पण त्या ठिकाणी विशाल गडालाही वेढा घालून बसलेले आदिलशाही चाकरीतील  सूर्यराव सुर्वे व जसवंत दळवी यांनी महाराजांचा मार्ग अडवला. महाराजांसह सैन्य चालून चालून थकलेल असतांना पुन्हा नव्या दमाच्या सैन्यासोबत लढावं लागतंय. हा वेढा महाराजांना फोडावा लागला. यात पुन्हा हा वेळेचा अपव्यय झाला होता . मोठ्या शर्तीने हा वेढा फोडून महाराज धावत धावत गडावर गेले आणि त्या ठिकाणाहून पूर्वेकडे तोफांच्या इशाराती दिल्या. बाजीप्रभूंच्या कानी हे तोफांचे आवाज पडताच आपला धनी सुखरूप पोहोचला हे समजून नरवीर बाजीप्रभूंनी या पावनखिंडीत आपला देह ठेवला. त्याच्या समवेत त्यांचे बंधु फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व ३०० बांदल मावळे या ठिकाणी धारातिर्थी पडले . काय ही  स्वामीनिष्ठता म्हणावी काय हे स्वराज्यप्रेम ! 

   इतिहासात महाराजांचे युद्धतंत्र हे जगालाही वेड लावणारे आहे .जगात ही अशी एकमेव लढाई आहे की जी आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी एका खिंडीत लढली गेली व त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन ठरली .ही शेकडो वीरांची बलिदाने मराठा साम्राज्याची प्रेरणास्थानेच आहेत . या पावन शौर्यभूमीवर  नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव  व  अनामिक बांदल मावळ्यांचे  भव्य पराक्रमाचे भव्य असेच स्मारक असावे या अपेक्षेसह त्यांना कोटी कोटी प्रणाम .



(वरिल संघर्षमय इतिहास ज्या भूमीत घडला त्या भूमीत प्रत्यक्ष पदभ्रमंती करून लक्षात येते की आज तरी रस्ते पाऊल वाटा आहेत त्यावेळी काय होतं ? हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य म्हणून इतिहासकार श्री शिवरत्न शेटे सर (सोलापूर) यांच्या प्रेरणेने ही संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष शौर्य भूमीवर जाऊन सत्य इतिहास संदर्भाच्या आधारे समजून घेता येतो आपणही प्रत्येक वर्षी ११,१२ व १३जुलै या तीन दिवसात महाराज ज्या मार्गाने पन्हाळ्यावरुन विशाळगडावर गेले त्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन अनुभव घ्यावा)



संजय खांडवे

9011971122

मंगळवार, ८ जून, २०२१

शिवराज्यभिषेक

 

।🚩🚩🚩🚩🚩🚩

*मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा..........शिवराज्यभिषेक*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



आठव्या शतकाच्या अखेरीस समृद्ध,संपन्न अश्या भारतभूमीवर परकीय आक्रमणे सुरु झाली होती .समृध्द अश्या परंपरेत सामंतशाही तोंड वर काढत चालली होती .महम्मदबीन कासिम हया अरब सेनापतीने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला.सुरूवातीच्या काळात या आक्रमणामागे लुटीचे प्रलोभन असे .पुढे ही परकीय आक्रमणे सतत होत राहिली .महसूलावर यांचे सैन्य पोसवू लागले ,महसूल हा शेतीवर आला व या रूपाने सुद्धा शोषणास सुरूवात झाली .दहाव्या शतकाच्या अखेरीस महमद गझनी आला .पुढे १२ व्या शतकात महम्मद घोरी आला त्याच्याशी पृथ्वीराज चौहाण यांनी या भारतभूमीसाठी मोठा संघर्ष केला .या पहिल्या आक्रमणापासून पुढे ८०० वर्ष ही परकिय आक्रमणांची श्रृखलाच होती .दिल्ली काबीज करून हे लोण नर्मदापार दाक्षिणपथापर्यन्त पोहचले.१४ व्या शतकात या भागात आक्रमणे झाली .दक्षिण भारतात बहामणी साम्राज्य उदययास आली.पुढच्या काळात ही बहामनी सत्ता दुबळी होऊन अदिलशाही,कुतुबशाही,बरीदशाही,इमादतशाही,निजामशाही उदयास आल्या.यांच्या संघर्षात रयत त्रस्त झाली .काही लोकांच्या नेमणूका करुन कर वसूली होऊ लागली .यातून प्रचंड शोषण होऊ लागली .समाजाचा स्तर खालवत चालला होता .उत्तर -दक्षिण या दोन्ही सत्तापिपासू लोकांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती .असा हा मध्ययुगीन इतिहासाचा उत्तरार्ध तर अंधारमय झालेला होता.लेकी-बाळी सुध्दा सुरक्षित नव्हत्या .जगणेही जड होऊन बसले होतें .

       याच काळात भोसले-जाधव कुलवंशीय आपल्या मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवत तत्कालिन परिस्थितीनुरूप आपले कार्य करत होते.हे समकालिन ऐतिहासिक संदर्भावरून दिसून येते .याची प्रचिती स्वराज्याच्या रुपाने दिसून येते .या काळात स्वराज्य अगदी सहजासहजी उभे राहिले  असे नाही .यामागे खूप मोठा त्याग, संघर्ष व बलिदानाचा भाग आहे .स्वराज्यसंकल्पणा व प्रेरणा ही शहाजीराजे व जिजाऊ माँसाहेब यांच्या रूपाने मिळाली .छत्रपती शिवरांयांनी आपली बुध्दी,साहस,धैर्य,अखंड सावधानता या जोरावर अगणित सर्व जाती धर्माच्या विश्वासु मावळ्यांच्या बलिदानावर अखंड परिश्रमातून स्वराज्य उभं राहिलं होतं.याचीच फलश्रृती म्हणजे ६ जून १६७४ चा तो स्वांतत्र्य दिवस !

    मध्ययुगीन काळातील रयतेचा रयतोत्सव ! त्या काळातील रंजल्या गाजंल्या प्रजेचा सुवर्णक्षण !,

नव्हे तर ! पहिला स्वांतत्र्यदिवसच !


' *प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।*


(अर्थ - शहाजींचा पुत्र जो शिवाजी, त्यांची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

   सहस्त्रकरविक्रम म्हणून ज्यांची संपूर्ण भारतात ख्याती होती असे महाबली शहाजीराजे यांनी ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजासाठी त्यांच्या बालपणीच तयार करुन घेतली होती .मातब्बर विश्वासु सरदार तथा अमात्यासह  जिजाऊ -शिवबांना पुण्याच्या जहागिरीवर ठेवून त्याच वेळेस ही राजमुद्रा व भगवा ध्वज त्यांना दिला होता .या राजमुद्रेच्या अर्थावरुनच कळते की महाबली शहाजी राजे व जिजाऊ मॉसाहेब यांचा आत्मविश्वास किती दृढ होता .सोबत दिलेला स्वतंत्र राज्यासाठीचा भगवा ध्वजही तेवढाच महत्वाचा होता .अटकेपार मराठा साम्राज्याचा ध्वज फडकविण्याची ही पायाभरणीच होती .पुढे ती राज्यभिषेकाच्या रूपाने अधिक मजबूत झाली .

    बहुतेक लक्षणांनी युक्त असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या साक्षीने हा रयतेचा स्वांतत्र्यत्सोवासाठी संपूर्ण स्वराज्य सज्ज झालं होत .घरा-घरात आनंदी व समाधानाचे वातावरण तयार झाले .रयतेच्या डोळ्यात आनंद्राश्रु डबडबून वाहत होते असा हा अत्याधिक आनंदाचा सुवर्णक्षण रयतेसाठी होता .मापातही बसणार नाही येवढा ,तेवढा ही म्हणता येणार नाही येवढा आनंदी क्षण तो होता . विविध इतिहासकारांनी आपआपल्या शैलीत या सुवर्णक्षणाचे वर्णन केलेले आहे.

      रायगडावर अठरा कारखाण्याची स्थळे ,प्रधान ,मंत्री यासाठी बांधलेली घरे,हजारो माणसे बसतील येवढे सिहासनासाठी बांधलेले सभागृह ही रचना या दुर्गेश्वरावर गादी स्थापण्याचा इरादा महाराजांचा मुळापासूनचा होता . *विवेकसभा,न्यायस्सभा,प्रगट सभा (जेथे गोरगरीबांच्या फिर्यादी ऐकल्या जातात )प्रबोधसभा रत्नगारसभा ,नितीसभा (परकीय आदरसत्कार व भेटी स्थळ)*  अंर्तगृहे,देवागारे,भोजनगृहे इत्यादी जागा निश्चित करने रयतेच्या कल्याणाची नांदीच होती .संपूर्ण रायगड हा पताका, तोरणे,दिवाबत्तीने सजला होता.स्वराज्यातील प्रत्येक किल्यास अशी सूचना केली होती की,एका किल्यावरचा तोफेच्या सलामीचा आवाज जाताच दुसऱ्या किल्यावर तोफेची सरबत्ती केली जावी म्हणजे एका क्षणात संपूर्ण स्वराज्य हा अपूर्व सोहळा घराघरात अनुभवनार होते .

    मागील दशकात आग्रा येथील औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांनी जो स्वाभिमान व बाणेदारपणा दाखवून संपूर्ण जगाला एकप्रकारे तेथून संदेशच दिला होता . लाखाच्या सैन्यातून बुद्धी व साहसाने सुखरूपपणे  स्वराज्यात येऊन राज्याभिषेक ही गोष्ट काही सामान्य नव्हती .

हे छत्रपतींनी औरंगजेबास दिलेले उत्तरच होते .त्या काळातील मान्यतेनुसार शांस्त्रविधिप्रमाणे राज्यभिषेकने छत्रसिहासनादि राजचिन्हे धारण करुन शिवराय सिहासनाधिश्वर छत्रपती होऊन रयतेला लोककल्याणकारी असा आपला राजा  शेकडो वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मिळणार होतां.असा हा सोहळा होता .

     अष्टप्रधानमंडळाची रचना,कालगणनेसाठी " *राज्यभिषेक शक* " राज्यव्यवहार कोष निर्मिती,सोन्याची व तांब्याची *शिवराई* ही रयतेच्या स्वराज्यांची एका सार्वभौम राज्यांची नांदी होती .शिवराय शककर्ते झाले .या मातीला स्वतःची ओळख निर्माण करुन दिले .मातृभूमिच्या रक्षणार्थ या सोहळ्यातून स्वाभिमान निर्माण झाला .अन्याय ,अत्याचाराविरूध्द लढण्याची प्रेरणा निर्माण झाली .अठरापरगड जातीची धर्माची स्वराज्य  डौलाने उभे राहीले .सहयाद्रीच्या शिखरा -शिखरावर भगवा फडकू लागला .शेतकरी ,कष्टकऱ्यांचे राज्य आले या समाधानाने रयत नांदू लागली.

      याची प्रचीती पुढे *५ सप्टेबर १६७४ च्या अनंत सुबेदारास मामले प्रभावळीस लिहलेल्या पत्रावरून* कळते .हे पत्र राज्यभिषेकानंतरच्या दुसऱ्याच महिण्यानंतरचे आहे .या पत्राचा भावार्थ आपण लक्षात घेतला तर असे दिसते की , *वतनदाराच्या* भ्रष्टाचाराला शिवरायांनी पायबंध घातला ." *प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये* ." बळीराजाचा खऱ्या अर्थाने सन्मान झालेला या पत्रातून कळते .ज्याला *कसायला शेत नसेल त्याला शेत द्यावे* .बैल व इतर साधने पुरवावी .माणुसबळ असेल त्याला शेतीसाठी -बैल - नागर आणि पोटासाठी धान्यासाठी *रोख पैसेही द्यावे* व शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे .पुढे दोन वर्षानी पीक आल्यावर त्याच्याकडून बैल ,धान्यादिचे पैसे वाढी -दिढी न करता हळूहळू वसूल करावे ." *फक्त मुद्दलच वसूल करावे ,त्यांना सन्मानाने वागवावे*.'' हे महत्वाचे .शेतकऱ्यांच्या *व्याज व दिढी* वर प्रतिबंध घालणारे पहिले छत्रपती म्हणजे शिवराय . 

   " *शेतकऱ्यासाठी दोन लाख होन खर्च करावा* "

त्या काळात *५४* सुभे होते .एका सुभ्यासाठी दोन लाख होन खर्च करावा म्हणजे ही रककम *१०८ लक्ष होन* होते .एक होन म्हणजे *३ ग्रैम सोने* होय .आजच्या भावात एक होन म्हणजे *१५०००* पर्यन्त होतो .म्हणजे शेतकऱ्यासाठी केवढी मोठी रक्कम छत्रपतीच्या काळात केली जायची हे दिसून येते. *कुणब्या -कुणब्याची खबर घेऊन त्याला सामर्थ्य द्या* .पडीत जमीन लागवडी खाली आणली तर राज्याच्या खजीन्यात तुम्ही भर टाकली असे आम्ही समजू. पत्राच्या शेवटी '' *कुणबी जगला तरच देश जगेल*" असे शिवराय म्हणतात. *शिवरायांचा शेतकरी हा अठरापरगड जाती ,धर्मात विभागलेला होता* .सर्वासाठी एकच न्याय देणारे छत्रपती होते .

    असे रयतेसाठी कल्याणकारी ठरणारे अनेक निर्णय शिवचरित्रात दिसून येतात .राज्यभिषेकाच्या रुपाने लाभणारे स्थैर्य,सार्वभौमत्व त्याकाळानुसार अलौकिकच होते .समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा हा सुवर्ण काळ ठरला .म्हणूनच *शककर्ते* शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळातील *स्वातंत्र्यदिवसच* होय .

उत्सव स्वातंत्र्याचा......

उत्सव सार्वभौमत्वाचा.....

उत्सव पराक्रमांचा.......

उत्सव नीतीमत्तेचा.....

उत्सव मावळ्यांच्या पराक्रमांचा........

उत्सव रयतेचा.....

उत्सव शिव -शंभू गौरवाचा......

उत्सव मॉसाहेबांच्या विचारांचा.....

उत्सव शहाजीराजांच्या संकल्पनेचा.....

आज संपूर्ण महाराष्ट्र या शिवराज्यभिषेक दिनी उत्साहाने अभिव्यव्यक्त होतांना दिसत आहे.

या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या महावीरांना शतःश: नमन करतो .त्याच्यामुळेच या सुवर्णक्षणाचा साक्षीदार सह्याद्री झाला .


शिवराज्यभिषेकदिनाच्या हार्दिक शिवशुभेच्छा !


*जय शिवराय*


*संजय खांडवे*

9011971122

सोमवार, १ मार्च, २०२१

पाषाणात कोरले प्राचीन धान्य कोठार असलेला किल्ले हडसर

सहयाद्रीच्या पर्वत रांगेत हरिशचंद्रगड,चावंडगड ,महिषगड या नाणेघाट परिसरात प्राचीन मार्गावरील सरक्षणार्थ बांधलेला हा हडसर /पर्वतगड येतो .सातवाहन,शिलाहार,यादव,या काळाचाही हा किल्ला साक्ष देतो .

    जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रणाग्रहणाख्याम या संस्कृत ग्रंथात हडसरचा उल्लेख येतो .


तथैव चामुंडगिरी हरिशचंद्रस्तथैन च।

महिषोप्यड्सरस्तांवद गृहीतावतिसंगरात ॥


चावंड,हरिशचंद्र,महिषगड,हडसर,हे किल्ले शिवाजी राजांनी जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे .

सहस्त्रकरविक्रम शहाजीराजे यांनी १६३६ -३७ मध्ये मोगलांशी केलेल्या माहुलीच्या तहात या किल्याचा उल्लेख येतो.१७०२ मध्ये  मराठयाकडून औंरगजेबाने जिंकून घेतला पुढे १७४८ मध्ये मराठयानी हा गड पुन्हा जिंकून घेतला .१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला .गडावर पोहचण्यासाठी दक्षिणेकुडून म्हणजे हडसर गावाच्या बाजूने खुंटीची वाट व खिंडीची वाट आहे .गडाला वळसाघालून आल्यावर पेठेची वाडी कडून पायरीचा राजमार्ग आहै .आम्ही पेठेची वाडी या गावकुसात आमची वाहणे उभी करुन सोबत पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेऊन चढाई सुरू केली .

सरळ चढाईच्या पायऱ्या या गडाच्या मुख्य द्वाराकडे घेऊन जातात .एकाच दगडात कोरलेल्या नळीच्या पायऱ्या मन वेधून घेतात व दक्षिण बाजूस खिंडीची वाट दृष्टीस पडते.मुख्य दरवाज्यातून वर जातांना एकाच पाषाण काताळात कोरलेल्या नक्षीकामासह सदरी दिसतात .ही वाट पायऱ्या सह वळणघेत गडावरील पहील्या पाण्याच्या टाक्या पर्यन्त घेऊन जातात .त्या टाक्याच्या काठावर एक सुंदर छोटे शिवलिंग कोरलेले दिसते .आम्ही दक्षिण बाजूच्या कातर कडेने जाताना एक मोठा मातीचा तलाव दिसतो त्यात पाणी आहे व त्या तलावार्तगत छोटे छोटे टाके दिसतात .गाळ साचल्याने ते अदृष्य झाल्यासारखे दिसतात .त्या खालोखाल असलेल्या टाक्याचे गाळ उपसण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी एक समाधीही दिसते .पुढे गेल्यावर जमीनीत कोरलेले धान्याचे कोठार आहे एकाच अंखड दगडात शैलगृहाची निर्मिती आहे.नागमोडी वळने घेत वाट तयार करण्यात आली आहे ही वाट चौकात पोहचते व तीनही बाजूने धान्याची कोठारे आहे .बाहेर ओसरी सारखा भाग असून छोटे द्वार झरोके निर्माण करुन आत खाली सात ते आठ फुट खोल व १५X१५ फुट मापाच्या खोल्या धान्य साठविण्यासाठी आहेत .आत गर्द अंधार आहे .आतून काळवंडलेले या धान्य कोठारात राख दिसते .ही आग शेकडो वर्षापूर्वी धान्याला लागली होती त्याची ही राख असल्याचे सांगीतल जाते . पावसाचे व पाझरणारे पाणी कोठारात येऊ नये म्हणून दगडात पन्हाळ कोरलेले दिसते .धान्याच्या अगदी वरच्या भागात पाण्याने भरलेला तलाव आहे हे विशेष .

    गडाला फेरफटका मारत पूर्व दिशेला पोहचताच पूर्वेकडील खोल कातरकडा दिसते. शत्रूला चढाई करण्यास अशक्यच आहे .या भागात अनेक पाण्याचे टाके आहे .जीवंत पाण्याची झरे सुद्धा दिसतात . गडावर काही पाळीव गाय व दिसतात .पूर्वी  खाजगी जनावरे चरायला यायची पण वनविभागाने ही जनावरे गडउतार करण्यात आली पण काही जनावरे ही सापडली नाही त्यांची ही वंशावळ गडावर मुक्तसंचार करतांना दिसतात .खुंटीच्या वाटेच्या बाजूने प्रचड बुरुज आहे .प्रचंड मोठया दगडाच्या अवशेषात शैलगृहात देवीचे मंदीर आहे .त्यासमोर पाण्याने भरलेले दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत .सपूर्ण गडाला गोल भ्रमंती करुन आल्यावर तलावाजवळ पोहचतो त्या ठिकाणी बाहेर नंदी असलेले। शिवमंदीर आहे .दक्षिणेला राजवाड्याचे दगडी अवशेष आहेत .

   हिंदवी परीवाराच्या माध्यमातून आदरनिय शिवरत्न शेटे यांच्या प्रेरणेने संपूर्ण परिवारासोबत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली .



संजय खांडवे

बुलढाणा


हडसर गडाची उत्तरेकडील कातरकडा ,पाठीमागे पेठेची वाडी आहे

गडावर जाण्याचा मुख्य राज मार्ग

राजमार्गावरील पायऱ्या


एकाच पाषाणात कोरलेला दरवाजा

मुख्य दरवाज्यात असलेली सैनिकासाठी दगडात कोरलेली नक्षीकाम असलेली खोली

गडाच्या उत्तरे कडील बाजूस जुन्नर वरून येताना हडसर या गावाकडून ही खिंडीची वाट
नळीच्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या


पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेले शिवलिंग
सेवाभावी संस्थेकडून टाक्यातील साचलेला गाळ काढने सुरू आहे

गडावरील तलाव
धान्यकोठाराकडे जाण्यासाठी कोरलेला मार्ग
धाान्य कोठार 



जीवंंत् झरा










खुंटी ची वाट

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...