*साकेगावचा साकेश्वर खुणवतोय!*
वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .
भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते . अगदी गुप्त काळापासून शिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर, बुलढाणा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात लोणार, धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे या प्रकारची मंदिरे आहेत . मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे . दगडी शिळा पासून तयार केलेलं सुंदर असं गोपूर आपल्याला दिसते. या गोपुराच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कीर्ती मुखे कोरलेली दिसतात. या कीर्तीमुखां बाबत पुराण कथेमध्ये असे सांगितले जाते की, येणाऱ्या भाविकांचे पाप खाण्यासाठी याची रचना शिवाने मंदिरावर केली आहे .हे कीर्तीमुख म्हणजे राक्षस आणि त्या राक्षसाची भूक एवढी होती की त्याने त्याचं संपूर्ण शरीर खाऊन घेतल्यावरही ती भागली नाही म्हणून शिवाने त्याला वरदान दिले आपल्या मंदिरावर त्याला जागा देऊन त्या ठिकाणी भक्तीसाठी येणाऱ्या भाविकांचे पापे खाण्याचे काम त्याच्याकडे दिलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मंदिरावर याचे निर्माण केल्या जाऊ लागलं. मंदिराला नंदीमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .
नंदीमंडपात तीन नंदीशिल्प आहेत . मंदिरात आत प्रवेश करताना दगडी द्वाराच्या वर गणेश शिल्प कोरलेले आहे संपूर्ण द्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश करताच आपल्याला मंदिरातील कला शिल्पांचा अप्रतिम भाग नजरेच्या समोर येतो. आजही तो शाबूत आहे. सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत . सभा मंडपाचे खांब भार वाहक यक्षाने तोलून धरलेले आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अन्वा येथील शिव मंदिरात ज्याप्रमाणे गणपती हा भार वाहकाचे काम करतो तसेच या मंदिरातही भारवाहक गणेशाचे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते. याशिवाय खांबाच्या अगदी तळाशी देखील गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले असून दगडी गोल झुंबर वर कोरलेले आहे सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे. गाभाऱ्यात उतरण्या अगोदर डाव्या आणि उजव्या बाजूला देव कोष्टकामध्ये गणेश व कुबेराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत . गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर अगदी मधोमध गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते. पाप खाणारी कीर्तीमुखे सुद्धा याद्वारावर आहेत. याचा अर्थ गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना ही कीर्तीमुखे माणसाला त्याची पापे खाऊन पुण्यवान बनवून शिवलिंगापर्यंत पोहोचविण्याची रचना प्राचीन मान्यतेनुसार असावी. गाभाऱ्यात पूर्ण चंद्राकार शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे. मंदिराचा अंतर्भाग जेवढा मनमोहक आहे तेवढाच तो बाह्य भागही आपल्याला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही. मंदिराची मुख्य गाभार्यावरील कळसाची रचना ही हुबेहूब अमृतेश्वराच्या मंदिरासारखीच भासते. नागरशैलीतील ही रचना असलेलं शिखरी शिखर प्रकारातील आहे .त्यावर विविध लता आमल काच्या खालील भागात कोरलेल्या आहेत. शिखरावर आधारभूत अशी छोटी छोटी शिखरे आपल्याला भासतात. कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे . मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत . देव कोष्टात तयार केलेल्या मूर्ती शिल्पाचा दगड हा मंदिरात वापरलेल्या दगडापेक्षा थोडा वेगळा वाटतो. आपण प्राचीन मंदिरांना भेट देतो .त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतो मंदिर निर्माण हे केवळ एवढ्या गोष्टीसाठी नसून यामागे एक गुढ असा अर्थ दडलेला असतो. थोडक्यात मंदिरावर निर्माण केल्या गेलेल्या प्रत्येक शिल्पाचा अर्थ असतो. मंदिरावर घडविण्यात आलेल्या छोट्याशा कलाकृतीतही फार मोठा अर्थ दडलेला असतो यासाठी त्याचा अर्थ बोधन होणं आवश्यक आहे आणि हे अर्थबोधन अभ्यासातूनच साध्य करता येते. प्राचीन मंदिरे व मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बा. देगलूरकर यांच्या अभ्यासातून त्यांनी हे सिद्ध केलंय . ते म्हणतात
आपण वेरूळच्या कैलास लेणीत गेल्यास एक शिल्प अवश्य बघावं. आपण कोणत्याही प्राचीन मंदिरात मूर्ती पाहिल्यावर ती आपल्याला अर्धीच कळत असते मूर्तीच्या संपूर्ण अंतरंगात गेलो तर मूर्तीचा उलगडा होत असतो. यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक बाबी असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला मूर्तीचे स्वरूप कळते. पार्वती साधना करतांनाचे शिल्प आहे मग ती ही साधना किंवा तपश्चर्या कशासाठी करत आहे यासाठी आपल्याला पुराणाच्या गोष्टीकडे वळावे लागते. मग लक्षात येते की शिवासाठी ती या ठिकाणी तप करत आहे. हे या मूर्तीवरून या ठिकाणी कळते इथपर्यंत ठीक आहे पण ही पार्वती कोण आहे? पती, पशु,पाश या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी यामध्ये दिसतात .पती हा शिव आहे. पाश म्हणजे हे सर्व प्राणी आहेत पार्वती हा जीव आहे आणि तो पती करता या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे. म्हणजे जीव हा शिवा करिता तपश्चर्या करत आहे. हे या मूर्तीतून कळते हे या मूर्तीचा अर्थ बोधन आहे. "कल्याण सुंदर मूर्ती "शिवपार्वतीचा विवाह दाखवणारी मूर्ती ही पुढची मूर्ती या लेण्यांमध्ये आपल्याला दिसते. पार्वती शिवाचा हात हातात घेतलेला आहे, वास्तविक पाहता शिवाने पार्वतीचा हात हातात घेणे अपेक्षित आहे पार्वती शिवाकरिता तप करते मग तिला शिवाची प्राप्ती झाली. याच्यापुढे बघितल्यास आपल्याला अर्धनारी श्वराची मूर्ती दिसते. तप, प्राप्ती ,विवाह या तीन अवस्था या शिल्पामधून आपल्याला दिसल्या. म्हणजे "जीवाला शिवाची" प्राप्ती झाली आणि त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली आणि त्याचे पुढचे शिल्प जे आहे ते अर्धनारीश्वराचं म्हणजे
"जीव ब्रह्मा एवं ना पर: "
या तीनही मूर्तीचा बोध अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो या मूर्ती स्वतंत्रपणे घेतल्या तर त्याचा वेगळा अर्थ निघतो फक्त अर्धनारीश्वराची मूर्ती म्हणजे " प्रकृती आणि पुरुष" यांचे एकत्रीकरण हे सांख्यदर्शन यामध्ये आपल्याला दिसते.
इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे पार्वती ही पर्वत कन्या ती निश्चयी तसेच कठोर हृदय असते. तिचा निश्चय हा तिच्या श्रद्धेचा मापदंड आहे. तिला शिव हवा आहे. तिला त्याने आपले डोळे उघडायला हवे आहेत त्यांनी तिला प्रेमालिंगन द्यावे आणि विश्वाची मैत्री करावी असे तिला वाटते. इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे अनेक असुर, देव व मार्कंडे यासारखे ऋषी तपचर्या करतात आणि ईश्वराला प्रसन्न करतात ते त्यांच्या स्वतःसाठी लाभदायक ठरतील असे वर मागतात परंतु पार्वती इतरांचे कल्याण होईल असा वर शिवाकडे मागते. तिला शिव हवा आहे तो केवळ तिच्या वैयक्तिक सुखासाठी नसून साऱ्या विश्वाला लाभदायक ठरावा म्हणून हवा आहे तिच्या साधने पासून शिवची दर्याद्र बुद्धी आणि त्याच्या मनातील कणव जागृत व्हावी म्हणून ती निकराचे प्रयत्न करते. शिव नसेल तर सारे जिवंत प्राणिमात्र निसर्गाशीच जखडले जातात ,पण तो त्यांना त्यातून मुक्त करू शकेल गुरुत्वाकर्षणामुळे ते अडकलेले आहेत तो त्यांना त्यांच्या कृपादृष्टीने त्यातून सोडवू शकेल.
याशिवाय त्यांनी शिवाच्या चतुष्पाद सदाशिव या शिवाच्या चार पाय असलेल्या मूर्ती बाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ही मूर्ती गडचिरोली येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरात आढळते बहुदा चार पाय असलेली शिव शंकराची मूर्ती नसते .मूर्ती आपण बघितल्यास दोन पाय खाली सोडलेले असून दोन पायांनी मांडी घातलेली आहे. डॉ. देगलूरकरांनी हे चार पाय आपल्याला शैव सिद्धांताकडे नेतात असे म्हटले आहे कारण शैव सिद्धांत चार प्रमेयावर उभा आहे. ही चार प्रमेय म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद, व योगपाद होय. या सिद्धांतानुसार त्याचा अर्थ लावावा लागतों. सदाशिव स्वरूपातील या मुर्त्या खजुराहो येथे दोन आहेत आणि मार्कंडेश्वर येथे एक आहे असे सांगितले जाते. इतर अभ्यासकांनीही या मूर्तीचा अर्थ लावलेला दिसतो या स्वरूपातील शिव चतुष्पाद असणे म्हणजे शिवाचे अस्तित्व आणि प्रभाव सत्य, द्वापर, त्रेता आणि कली या चारही युगात आहे. त्यांचा प्रत्येक पाय एकेका युगाशी संबंधित आहे. अभ्यासकांच्या नजरेतून अशा पद्धतीने या दोन शिल्पांचा अर्थ आपण पाहिला अशी अनेक शिल्पे मंदिरावर असतात या प्रत्येकाचा काही ना काही अर्थ असतो आज साकेश्वराच्या मंदिरावर अशी अनेक शिल्पे आहेत की, जी अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहेत.बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सिता नान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत अडथळा ठरत आहेत .
एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया ! साकेश्वर आपल्याला खुणवतोय!
संजय खांडवे
बुलढाणा
९०११९७११२२
➖➖➖
















