विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर
नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास
भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !
विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे. विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.
नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी. समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.
समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते. मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .
महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .
एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !
आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .
➖➖➖➖➖➖➖
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122
➖➖➖➖➖
















































