शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

*दुर्ग निकष पूर्ण करणारा: वेताळवाडी किल्ला*

।* *दुर्ग निकष पूर्ण करणारा: वेताळवाडी किल्ला*
➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सोयगाव , जि . छत्रपती संभाजी नगर उंची : ६२५ मी.बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - उंडणगाव -  हळदा घाटात हा किल्ला दिसतो पुढे हा रस्ता सोयगावला जातो . सिल्लोड - अजिंठा रोड वरील गोळेगाव या गावावरून वरील मार्गाला जाता येते .➖➖➖➖➖➖➖➖➖ 
विदर्भ - मराठवाडा - खान्देश या सिमेलगत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी समूह आहे . या लेणी पाहण्यासाठी अन अभ्यासण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात . याच लेणी समूहाच्या पाठीमागे छत्रपती संभाजी नगर जिल्हात असलेला वेताळवाडी किल्ला आहे . याला स्थानिक लोक हळदी घाटामुळे  हळदया किल्ला  म्हणतात . तसेच वाडीचा किंवा वसईचा किल्ला असेही याला म्हटले जाते . वरील दिलेल्या मार्गापैकी गोळेगाव वरून उंडणगाव व तेथून उजव्या बाजूला वळून सोयगाव रोडने आपण हळदा या गावात पोहचतो . याच रोडने दोन - तीन कि .मी . अंतरावर हळदा घाट लागतो एक दोन वळण घेतले की आपल्याला हा किल्ला दिसतो . पाहताच क्षणी कुणीही असो त्या वास्तुला पाहून हर्ष झाल्या शिवाय राहत नाही कारण या भागात दूर - दूर पर्यन्त किल्ला नावाची वास्तु दृष्टीस पडतच नाही त्यातल्या त्यात हा गिरिदुर्ग असल्याने त्याचे बुरुज व तटबंदी पाहून अधिकच आकर्षक वाटतो  . हळदा घाटात बाजूला गाडी पार्कीग साठी काही जागा आहे . हया परिसर जाणारे येणारे तुरळक वाहणे सोडता जवळपास कुणीही आढळत नाही . सार्वत्रिक सुटी असली तर काही तुरळक पर्यटक येतात कारण हा सुंदर किल्ला अजूनही लोकांपर्यन पोहचलेला दिसत नाही .           एक पूर्ण दुर्ग म्हणजे अर्थात गिरिदुर्गा साठीचे जे निकष असतात ते सर्व निकष हा दुर्ग पुर्ण करतो . महाद्वार , इतर द्वार , चोर दरवाजा , एकेरी व दुहेरी मजबूत तटबंदी , तोफ ,नगारखाना ,बालेकिल्ला , महल आदि अवशेष , धान्य कोठार , पाणी तलाव ही सर्व आपल्याला या किल्ल्या वर आपल्याला बघायला मिळतात . दोन किंवा तीन तासात हा किल्ला बऱ्यापैकी पाहता येतो काही पाऊल वाटा सोडल्या तर हा चढाई करण्यास फारसा अवघड किल्ला नाही . गाडी पार्क करून पाऊल वाटेने पाच दहा मिनिटात दरवाज्या पर्यन्त पोहचतो . प्रथम दर्शनी दुरून हा दरवाजा नाही तर बुरुज वाटतात . दोन बुरुजाच्या मधून वळण घेतले की आपल्याला दरवाजा दिसतो . या दरवाज्याच्या दोन्ही  वरच्या बाजूस जंजाळा किल्ल्यावर जसे क्षरभ चिन्ह आहे तसेच या ठिकाणी सुद्धा आहे . पाठीमागच्या बाजूला दरवाज्यापेक्षा ही मोठा व उंच बुरुज आहे . यावर ( मॅची कोलेशन ) म्हणजे जंग्या आहेत अश्याच पूर्ण तटबंदीला व दराज्याच्या वरही आहेत . बाहेर आलेले सज्जे नक्षीकाम केलेले असून ते बुरुजाची शोभा अधिक वाढवतात , या शत्रूचा हल्ला झाल्यावर यातून गरम पाणी , तेल , शिसे किंवा रेती ओतून शत्रूवर हल्ला करता येत असे दरवाज्या वरील जंग्या मधून किल्ल्याचा दरवाजा जर बाहेरून शत्रूने पेटवून दिला तर पाणी सुद्धा ओतता येत असे व लक्षही ठेवता येत असे अशी ही रचना आहे व महत्वाचे म्हणजे आजही ते मजबूतीने जसेच्या तसे शेकडो वर्षापासून उभे आहे . दगड , चुना ,शिसे आदि मजबूत बांधकाम केलेला हा दरवाजा म्हणजे जंजाळा दरवाजा  आहे . साधारणपणे किल्ल्याच्या दरवाजांना स्थानिक दिशा दर्शकानुसार व वैशिष्टयानुसार नावे दिली जात असत ह्या बाजूला जंजाळा किल्ला असल्याने याचे नाव त्यावरून पडलेले दिसते आत आल्याबरोबर उजव्या बाजूला सैनिकांच्या विश्राम तथा किल्ल्या वरील कामकाजासाठी ही असावी . पायरी चढून पुढे आपल्याला किल्ल्याची पहिली तटबंदी दिसते . संपूर्ण किल्ल्याला ही तटबंदी गोल फिरून पाठीमागील वरील उंच बुरूजाला मिळते . जागोजागी या तटबंदीला बुरुज आहेत या जंग्या आहेत या तटबंदीवरून सैनिकास शस्त्र - दारूगोळा व इतर रसद पोहचविता येत असे . उजव्या बाजूला कपारात एक पाण्याचे टाके आहे . तटबंदी व बुरुजावरील सैनिकांसाठी येथूनच पाणी पुरविल्या जात असे आता मात्र त्या गुहेत मोठ्या प्रमाणात वटवाघूळींचे वास्तव्य आहे . पाठीमागे बुरुजावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे . बुरूजा वरून खाली बुरुजावर बांधलेल्या खोलीत जाण्यासाठी L आकाराचा एकमार्गी जीना आहे हा रस्ता दरवाज्या वरील बुरुजाच्या खोलीत पोहचतो आत कमानी आकाराची मोठी खोली असून यात दारुगोळा व राहण्याची व्यवस्था केली जायची . बुरुजावरील जंग्या खाली दरवाज्यापर्यन्त येणाऱ्या शत्रूवर व हळदा घाटावर लक्ष ठेवणे व मारा करण्यासाठी आहे हे पाहताच क्षणी लक्षात येते . पुढच्या तटबंदीवर गडावरील एक तोफ आहे आता साग वाणी तोफ गाड्यावर ती डौलात उभी आहे .         या किल्ल्याच्या बुरुजांचा अभ्यास केला तर या बाजूने चढत्या क्रमाने हे बुरुज एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसतात . यावरून या किल्ल्याची अभेदयता सिध्द होते .सर्वोच्च शिखरावर असतेल्या दुसऱ्या तटबंदीमधील बुरुजा वरुन पहिल्या तटबंदी व बुरुजावर लक्ष ठेवता येते . शत्रूने पहिली तटबंदी जरी भेदली तरी त्याला दुसरी त्यापेक्षाही अवघड आहे . या तटबंदीवरही बालेकिल्ला शाबूत ठेवून गड लढत ठेवता येतो . पूर्व बाजूस वळण घेत बालेकिल्ल्यावर पोहचता येते . पूर्वेकडील पहिली तटबंदी व बुरुज झाडा झुडूपात दिसतात . वर आल्यावर सिताफळींच्या झुडूपात अनेक इमारतीचे अवशेष आहेत .जमीनीत असलेला दगडी तेल तुपाचा रांजण व त्याच्या बाजूला पडका बुरुज व धान्यकोठार आहे . पाश्चिम-पूर्व बाजूस भव्य तटबंदी व बुरुज आहे . वेताळवाडी धरण व जंजाळा किल्ला येथून दिसतो . उत्तरेकडे जातांना या गडाचा भाग निमुळता होत जातो वाटेत एक भव्य कोरीव व बांधिव तलाव आहे त्याच्या समोरच छत नसलेली पडकी इमारत आहे .       उत्तरेकडे आपल्याला अनेक कमानीची छत नसलेली इमारत दिसते . याला बारादरी किंवा हवा महल स्थानिक लोक म्हणतात . जेव्हा ही इमारत परिपूर्ण होती तेव्हा येथील सौदर्य व वातावरण कसे असेल याची कल्पना येथे आल्यावर कळते . समोर खाली वेताळवाडी गाव व पुढे सोयगाव शहर दिसते . या बाजूने अत्यंत चांगल्या स्थितीत असलेला वाडी दरवाजा आहे . या ठिकाणी सुध्दा प्राचीन इमारतीचे चांगल्या स्थितीतील अवशेष आहे . कपारीत या ठिकाणी छोटे पाण्याचे स्त्रोत आहे . पूर्वी याचा वापर होत असे . पूर्व बाजूस गडाच्या बाहेर जाणारा एक छोटा चोर दरवाजा आहे .             प्राचीन काळापासून या भागाला विशेष महत्व होते हे पूर्वेकडील बाजूस असलेल्या रुद्रेश्वर लेणी वरून समजते पण ती अर्धवटच आहे .बहामणी, मोगल , निजाम या मध्ययुगीन राजवटीत या किल्ल्यावर विशेष वावर होता व्यापारी व प्रशासकीय शहर बऱ्हाणपूर मुळे या मार्गास पहारेकरी म्हणून वसलेला हा किल्ला होता . प्राचीन  काळापासून या परिसरातील असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास समोर येणे आवश्यक आहे

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

वेताळगड/वसईचा किल्ला। एक भ्रंमंती

वेताळगडावरील उत्तरेकडील भाग

गडावरील घसरंडीची वाट

बारादरीची कमान


 गडावरील तलाव

हळदाघाटातून दिसणारा वेताळगड



हेमाडपंथी मंदीर


आन्वा येथील हेमाडपंथी मंदीर


वेताळगडावरील गुहा

बांगडीतोंफ

बालेकिल्लावरील भाग

जमीनीमधील राजणं

गडावरून पश्मिम भागात दिसणारा जंजाळा किल्ला व वेताळवाडी धरण



गडावरील इमारती

गडावरील तलाव

वेताळवाडी गाव


गडावरील घुमट असलेली छोटी इमारत

निमुळती पाऊलवाट

गडावरील दरवाजावरील शिल्प
आमची इतिहासप्रेमी टिम



वेताळवाडी गड /वसईचा किल्ला /हळदा


सुटीचा दिवस आला म्हणून जमेल तशी सवड काढून दुर्ग अथवा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळाना भेट देत भ्रमंती करणारी आमची टीम सदैंव तत्पर असते .आजच्या काळात व्यस्त जीवनशैलीत वेळ काढणे ही फार मोठी गोष्ट आहे त्यातल्या त्यात आम्ही  राऊत सर,किशोर पंवार सर ,सुशिल पनाड सर,आणि इतिहासाचे अभ्यासक राजेश साळवे सर  सोडले तर  कामाचा मोठा व्याप असूनही भ्रमतीचे नियोजनाची आखणी सुरेश देवकर सरांचीच असते .आमचे काही मित्र ,मार्गदर्शक वेळेअभावी आमच्या सोबत वेळेअभावी येऊ शकले नसले तरी ते पूर्णवेळ आमच्या भ्रंमंतीचा आढावा घेत असतात बरींच आल्यांनंतर चर्चेसाठी तत्पर असतात येवढी ही माणसे आपल्या वासश्या विषयी आपुलकी जपतात हे पाहतांना असे मार्गदर्शक व सहकारी असल्याचा अभिमान वाटतो .
    खर तर आम्ही निघालो होतो अंतुर या किल्ल्यासाठी भराडी ,करजखेड या मार्गे पण भोकरदन तालुक्यातील हेमाडपंथी मंदीराला भेट दिली .प्राचीन नक्षीकाम ,असलेले  असे सुंदर मंदीर आजही  आहे आता त्याला लोखंडी खांबाने आधार देत त्याचे काम सुरू आहे .काहीस्वरूपात दुरूस्तीचे कामही सुरु आहे मंदिराच्या आतील कोरीव काम शेकडो वर्षानंतरही जसेच्या तसे आहे त्या दगडावर मारलेती पॉलीशही स्पष्ट जाणवते ,पुढील गड फिरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तेथून आम्ही निघालो व स्थानिकांच्या सूचनेनुसार ह्ळदा घाटातील किल्ला जवळ व पाहण्यासारखा आहे असे कळाले म्हणून किल्ला महत्वाचा या आशेने हळदा गावाकडे निघालो ,गोळेगाव -उंडणगावमार्गे -हळदा या गावात पाउण तासात पोहचलो व हळदा घाटात उतरतांना वेताळगडाचे /वसईचा किल्ला दर्शन् झाले बुलढाणा शहरापासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेला वेताळगड आजपर्यन्त पाहीला नव्हता .आपण जवळ येवढा सुंदर किल्ला आहे हे पाहूण खूप आनंद झाला .घाटातून जात असतांना गडाची मजबुत तटबंदी व बुरुज लगेच दिसतात पण किल्ल्याचे प्रवेशद्वारमात्र समजत नाही .
         गडाच्या बाजूला घाटातूनच वर जाण्यास निमुळती पाऊलवाट आहे ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते .घाटात बाजूला गाडी लावून आम्ही त्या वाटेने मुख्य प्रवेश द्वारा पर्यन्त पोहचलो .आजही मुख्यप्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे या हे द्वार निमुळते असून जवळ येईपर्यन्तं दरवाजा दिसत नाही दरवाज्याच्या वर दोन प्रचंड सुस्थितीमधील बुरुज आहे शत्रू आत येणे शक्यच नाही तोफा,दगड,तेल,अंगार ओतण्यासाठी चाऱ्या आहेत .मुख्य द्वाराच्या बाजूला प्राण्याचे चित्र असलेले शिल्प आहे याच पद्धतीचे शिल्प पुढे जंजाळा /वैशागडावर सुद्धा आहे त्याची चर्चा पुढच्या लेखात स्वतंत्र करू .
        दरवाज्यातून येताना भव्य खोली दिसते दगडी बांधकामात कमानीमधून केलेले बांधकाम आहे वर आल्यावर एका निमूळत्या वाटेतून बुरूजावरील एका खोलीत उतरणारा रस्ता आहे त्या छोटयाश्या खोलीमधून गडात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर मुख्य द्वारापासून हळदाघाटात व जंजाळा गडापर्यन्तच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते .पुढे गड चढावा लागणार म्हणून त्या थंडगार खोलीत आम्ही जेवन केले व पुढे निघालो ,वर जातांना एक मोठी गुहा आहे  त्यात निघालेले दगड या गडासाठी वापरले असावेत त्यात पाणी आहे व प्रचंड बटवाघुळीचा आवाज आत जाणे योग्य नाही म्हणून पुरेसे पाणी घेऊन निघालो. येवढया मोठया गडावर वरून येतांना दोनच औरंगाबाद येथून आलेले दुर्गवेडे भेटले व वर गड सुंदर व खूप मोठा आहे असे सांगीतले व पाणी सोबत ठेवा सांगून गडउतार झाले
       गडाचे दुरूस्तीचे काम बऱ्यापैकी चालू असल्याचे दिसले ढासाळलेली तटबंदी व बुरुज बांधणी(दुरूस्ती) काम सुरु आहे  .मुख्य दरवाज्याच्या वर एक तोफ आहे बांगडी प्रकारातील ही लोखंडी तोफ बुरुजावर् आता व्यवस्थितपणे उभी केली आहे  .थोडा वळसा घेत काही अंतर चढाई केल्यावर आपण गडावर पोहचतो' ,गडाचे क्षेत्र मोठे आहे आता वर सिताफळांची दाट झाडी आहे. थोडे चालत गेल्यावर त्या झाडीमध्ये जिर्ण अवस्थेमधील इमारती आहे ,जमीनीमध्ये दगडापासून तयार केलेला भला मोठा राजंण आहे तेलतुपाचा राजंण त्याला म्हटलं जाते ,त्याच्या बाजूला कमाणीचे  छत असलेली इमारत आहे वर प्रकाश येण्यासाठीचे झरोके आहेत ही धान्यकोठी असावा असे वाटते
त्याच इमारतीसमोर काहीवर्षापूर्वीच छत कोसळलली इमारत दाट झाडीत आहे हा बालेकिल्ला असावा .त्या दाट झाडीत खूप मो०या इमारतीचा पाया आहे दगड पडलेल आहे,प्राचीन विटा,कौलारु /भांडी तुकडे यांचे अवशेष दिसतात. थोड पुढ गेले की प्राचीन तलाव आहे मार्च मध्ये सुद्धा तलाव ६०% भरलेला दिसला गडाला याच तलावाचे पाणी वर्षभर पुरत असावे .त्या तलावासमोरच एक प्राचीन इमारत आहे छत नसलेली पण आजही मजबूत स्थितीमध्ये आहे कोरिव काम केलेले पायाचे दगड दिसतात .
        गडाच्या उत्तरेकडे थोड चालत गेले की एक जिर्ण कमानीची बारादरी इमारत आहे त्या कमानीमधून खाली वेताळवाडी गाव दिसते या ठीकाणाहून संपूर्ण खान्देश भागात लक्ष ठेवता येते .त्या इमारतीच्या खाली वेताळवाडीकडे निघणारा गडाचा जंजाळा किल्याकडे जाणारा दरवाजा आहे. संपूर्ण गडाला मजबूत तटबंदी व बुरूज आहेत या तटबंदीवरून संपूर्ण गडाला वेढा मारता येतो ,गडाला म्हणजे बालेकिल्यालाही तटबंदी असावी असे अवशेषावरुन वाटते. गडाच्या दक्षिण बाजूस एक दुहेरी तटबंदीमधील बुरुज दिसतो त्याच्याच बाजूला घुमट असलेती एक छोटी समाधीसारखी नक्षीकाम केलेली इमारत आहे यात दोन्ही बाजूला एक माणूस उभा राहील येवढयाच झरोका असलेल्या खोल्या आहेत अतिक्षय दाट झाडी व पडझड ह्यामुळे बऱ्याच गोष्टी गडावर दबून पडलेल्या आहेत.
सैन्याची मोठी रसद व दारुगोळा मुबलक असल्यावर हा किल्ला कुणीही जिंकू शकणार नाही  अशी रचना आहे उत्तरेकडील हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधला असावा,किल्याच्या पश्चिमेस जंजाळा /वैशागड दिसतो त्याच वाटेत असलेले वेताळवाडीचे धरण दिसते . या दोन्ही किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या भागातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात  अंतूर, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत ह्यांना भेट दिल्यानंतर सविस्तरपणे मांडू या
             तेथून आम्ही परत फिरलो एक परिपूर्ण असा किल्ला पाहण्याचे आम्हा सर्वांना समाधान झाले दुपारचे दिड वाजले होते व पुढे आम्ही रूद्रेश्वर लेणीकडे वेताळवाडी मार्गे निघालो  ..........


( हा किल्ला बुलढाणा,जालना,औरंगाबाद,सिल्लोड,जळगाव या शहरापासून एका दिवसात होईल असा आहे या पारिसरात रूद्रेश्वर लेणी ,घटत्कोच लेणी व जंजाळा किल्ला पर्यटनासाठी आहे )

क्रमशः.....................

संजय खांडवे
बुलढाणा 9011971122
       

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सिल्लोड , जि . छत्रपती संभाजी नगर
उंची : ६२५ मी.
बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सात महत्वाचे किल्ले आहेत . यामधील देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सोडला तर इतर किल्ले हे दुर्लक्षितच वाटतात .त्यापैकीच एक म्हणजे वैशागड होय .याला जंजाळा किल्ला किंवा तालतम किल्ला असेही म्हणतात . छत्रपती संभाजीनगर - अजिंठा रोड वरील गोळेगाव पासून उंडणगाव अंभई मार्गाने जंजाळा गावात पोहचता येते व पुढे कच्च्या वाटेने दोन तीन किलोमीटर शेतातून पाऊल वाटेने जावे लागते . दुसरा मार्ग सोयगाव वरून जरांडी गावातून पुढे पाऊल वाटेने पश्चिमेतील जरांडी दराज्यातून गडावर पोहचता येते . जंजाळा गावातून जाणारा मार्ग सोपा वाटतो . दुर्गाचे गिरिदुर्ग , जलदुर्ग, भूदुर्ग, वनदुर्ग असे प्रकार पडतात पण जंजाळा म्हणजे गिरिदुर्ग व भूदुर्ग प्रकाराचा संगम आहे . दक्षिण बाजूस भूदुर्ग व इतर बाजूस गिरिदुर्ग प्रकारात येतो . अजिंठा डोंगर रांगेत असलेला हा दुर्ग विस्ताराने खुप मोठा आहे . यावर भ्रमंती करायची म्हणजे दोन अडीच तास लागतात .  गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने जंजाळा गावातून पाणी सोबत घ्यावे . पाऊल वाटेने तासाभरात गडाच्या बुरुजा पर्यन्त पोहचतो ही बाजू भुदुर्गाची असल्याने पूर्व - पश्चिम मोठा खंदक त्या काळी खोदून मजबूत तटबंदी दुहेरी बुरुजासह उभी केलेली आहे . सपाट भूप्रदेशावरून येणारे दोन तीन किलो मीटर अंतरावरील शत्रू टेहाळता येतो व माऱ्याच्या कक्षेत येतो . आता या बुरुजाची तटबंदी फोडून किल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी  मार्ग केलेला दिसतो  . पूर्व बाजूची तटबंदी आजही अस्तीत्वात आहे . या तटबंदीत एक छोटा कमानीचा दरवाजा आजही अस्तीत्वात आहे .पश्चिमेस खोल दरी असल्याने काही गरज असलेल्या ठिकाणी तटबंदी दिसते . या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी बुरुज बांधलेले आहेत . पूर्वेकडील तटबंदी वरून खोल दरीत वाकाटकांच्या काळात पाचव्या शतकात कोरली गेलेली घटत्कोच लेणी समूह दिसतो व समोरच वेताळवाडी धरण व त्या पलिकडे वेताळ वाडी किल्ला नजरेस पडतो . आता या किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरु आहे . या तटबंदी खाली उतरून पाऊल वाटेने चालत गेलो की दरवाजा दिसतो . हा महादरवाजा  घटकोत्कोच लेणीच्या दरीत जातो . आता मात्र हा रस्ता वापरात नाही .प्रथम दर्शनी दूर वरून पाहिले की हे दोन बुरुज वाटतात पण दोन बुरुजाच्या मध्ये हा आजही कमानीच्या वर नगारखाना व दुमजली इमारतीच्या पडक्या भिंतीसह संवर्धनाच्या प्रतिक्षेत दिसतो  .या दरवाज्यातून येणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या हालचाली वर  चौफेर नजर ठेवता येते .सैनिकांच्या राहण्या साठी व चौकी साठी सुंदर कमानीच्या देवड्या चांगल्या स्थितीत आहेत . खाली कोरीव नक्षीकाम केलेले अनेक दगड पडलेले आहेत .दरवाज्यातून वर आल्यावर उजव्या बाजूला दारुगोळा कोठारा सारखी आजही भक्कम मजबूत असलेली मोठी दगडी इमारत आहे . संपूर्ण किल्ल्यावर जागो जागी सिताफळे व इतर तत्सम झाडे मोठ्या प्रमाणात आहेत व या मधेच किल्ल्यातील अनेक महत्वाच्या इतर इमारती झाकल्या गेल्या आहेत . पठारावर चार पाच तलाव आहेत त्यापैकीच हा दक्षिण बाजूच्या पठारावरील मातीचा गोल तलाव आहे . पूर्वी या किल्ल्यावर मोठी मानवी वस्ती असावी हे त्या ठिकाणा वरील अवशेषावरून कळते . या तलावाच्या पश्चीम दिशेला थोडे चालत गेले की जरांडी दरवाजा आहे .किल्ल्याच्या पायथ्यापासून हा बुरुज भासतो कारण याचे द्वार उत्तर दिशेला आहे . या ठिकाणी एक पारशी शिलालेख आहे . या दरवाज्यात पोहचणेही अडचणीचे आहे . पश्चीम बाजूस एक समोर आलेल्या डोंगर कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे . या बुरुजावरून उत्तर - पश्चीम भागातील बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवता येते . किल्ल्याच्या मध्यभागी झुडपात एक कमान दिसते व आतमधे अनेक पडक्या भिंती आहेत  . हा शाहीमहल असावा असे दिसते बाजूला दोन मोठे बुरज आहेत बुरुजावर इमारत असावी असे अवशेष आहेत . हा बालेकिल्ला आहे . या बुरुजावर दगडात कोरलेले सिंहच्या पंजात  हत्ती असल्याचे क्षरभ चिन्ह आहे .पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत दिसतो . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसते थोडी वाट शोधतच तेथे पोहचावे लागते .थोड चालत गेल्यावर उंच टेकडीवर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम केलेले ते प्रार्थनास्थळ आहे . ही इमारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे .समोरच गडावरील आणखी एक तलाव दिसतो . पूर्वकडील पठारही खूप मोठे आहे त्या बाजूला देखीत काही बुरुज व तटबंदी नजरेस पडते . सोयगाव - वेताळ वाडी  या दिशेने दोन बुरुजाच्या मध्ये पडझड झालेल्या इमारती सह दरवाजा आहे . कामकाज व चौकशी साठी दोन्ही बाजूनी दोन कमानीच्या  इमारती आहे पूर्वी त्यावर छत होते आता दगडांचा ढाचा शिल्लक दिसतो .
          टेकडीरून उजव्या बाजूला पाऊल वाटेने सय्यदपीर बाबाच्या दर्ग्या पर्यन्त येतो बाजूलाच मोठा खोदलेला तलाव आहे या तलावाला बालेकिल्ल्या च्या बाजूने पायऱ्या दिसतात .दर्गा परिसरात दोन दगडी शिलालेख आहेत . असा हा विस्तीर्ण किल्ला पावसाळयात अगदी हिरवळीने नटलेला असतो .
          उत्तरेचे प्रवेशद्वार  असलेले ऐतिहासिक बऱ्हाणपूर शहर हे जवळ असल्याने या डोंगर रांगेतीत अंतुर , जंजाळा , वेताळवाडी हे किल्ले मध्ययुगीन इतिहासात महत्वाचे होते .१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते . या किल्ल्या वरून उत्तरेतीत मोठ्या भूभागावर टेहाळणी करत पहारा ठेवता  येत असे हे आजही कळते . या परिसरात रुद्रेश्वर लेणी , वेताळवाडी किल्ला ,घटत्कोच लेणी , अंभई व अन्वा येथील प्राचीन मंदिर या ठिकाणांना भेटी देता येतात .


संजय खांडवे

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*

*त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*


➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः१०८६ मी.
नाशिक पासून त्र्यंबकेश्वर मार्गे ४७ किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक जिल्हयात ५० पेक्षा अधिक लहान मोठे किल्ले आहेत . यामधील बरीच ही गिरीदुर्ग प्रकारात असून बहुतेक किल्ले अत्यंत दुर्गम आहेत . चढाई करण्यासही अवघड आहेत . सहयाद्रीची विस्तिर्ण पर्वत रांग जिल्हयाच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली आहे .  सेलबारी , हिंदबारी, घोलबारी , सातमाळ , अजिंठा , त्र्यंबक आदि डोंगर रांगा आहेत . नाशिक जिल्हात प्राचीन लेणी समूह देखील या डोंगर रांगेत आढळतात . आकाशा सोबत स्पर्धा करणारी उंच आणि महाकाय डोंगर निर्सगाचे सौदर्य अधिकच वाढवतात . याशिवाय त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तीलिंगा पैकी एक हे नाशिक मधेच आहे . दर १२ वर्षानी या ठिकाणी सिहस्थ कुंभमेळा भरतो . रामायण , महाभारत या पौराणिक ग्रंथात नाशिक व त्या परिसरातील उल्लेख येतो मध्ययुगीन कालखंडात हा प्रदेश म्हणजे अत्यंत धामधुमीचा होता . या परिसरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या हे या परिसरातील गडकोटावरून दिसून येते , पण या ऐतिहासिक घटना अजूनही पडदया आड गेलेल्या दिसतात . याचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच त्र्यंबक रांगेतून उगम पावते .
        याच त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हा एक महत्वाचा किल्ला आहे . उंच डोंगरावर खालून टोपीच्या आकाराचा दिसणारा हा किल्ला पाहताच क्षणी मन वेधून घेतो . गोंडे घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्लयाची निर्मिती झाली . त्रिंबक वरून गोंडे घाटातून उतरून प्राचीन काळी कोकणातून दाभोसा - खानवेल - वापी - गणदेवी - सूरत असा व्यापारी मार्ग असावा . म्हणूनच त्यावेळी या परिसरातील किल्ल्याना विशेष महत्व होते .भास्कर गडावर पोहचण्यासाठी त्र्यंबकेश्वर वरून निर्गुडपाडा येथे पोहचता येते तसेच मुंबई - नाशिक महामार्गावरून सुदधा या पाडया पर्यन्त पोहचता येते .निर्गुडपाड्या वरून हरिहरगडावर सुद्धा जाता येते . या पाड्यात जेवणाची चांगली व्यवस्था होते . निर्गुडपाड्या वरून जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चारचाकी वाहनाने नागफणी टेकडी व भास्करगडच्या खिंडीत वाहने उभी करून डाव्या बाजूला जंगलातून जाणारी पायवाट आपल्याला भास्करगडावर घेवून जाते .या गडावर भ्रमंती करतांना अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण समुहाने भ्रमंती करावी . पाऊल वाट दाट झाडी मधून जाते करवंदीच्या दाट किर्र करणारी जाळी मधून वाट काढत पुढे जावे लागते . फणसादि सारखी काही मोठी वृक्ष असल्याने गडाची निश्चीत दिशा न समजल्याने भूलभुलैय्या सारख्या पाऊल वाटा आपला मार्ग भटकवू शकतात . दुर्ग प्रेमीनी वाटेवर केलेल्या खुणा समजून घेत जावे लागते त्यामुळे शक्यतो स्थानिकांची मदत जरूर घ्यावी . दिड ते दोन तास गडाच्या पठारावर पोहचण्यासाठी लागतात . वाटेत व गडावरही पिण्याच्या पाण्याची सोय नाही . त्यामुळे सोबत पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे . तासाभराची पायपीट केल्यावर दाट झाडी मधून आपण छोटया मोकळ्या पठारावर येतो तेव्हा समोर गडाचे कातळ टोक दिसते . पाठीमागे डाव्या बाजूला आपल्याला नागफणी डोंगर व हरिहर गड दिसतो व त्या पाठीमागे त्र्यंबक गड ही दिसतो . पुन्हा थोडी चढाई केली की गडाच्या कातळाच्या जवळ पोहचतो .हा जहानासारखा समोर आलेला त्रिकोणी भाग आहे . याच्या डाव्या बाजूला कातळ पाय वाटेने गेले की एक भली मोठी गुफा आहे व या गुफेत ग्रामदेवता आहे . गडावर जायचे असल्याने आपल्याला डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूने पुढे कातर कड्याला लागून पाऊलवाटेने चालत जावे लागते वर उंच सरळ कडा व खाली खोल दरी आहे . बहुतेक ठिकाणी दरड कोसळल्याने दगड पडलेली आहे काही ठिकाणी काळजी घ्यावी लागते . हरिशचंद्र गडावर जातांना सुद्धा अशीच वाट लागते . कपारात नैसगीक गुहा तयार झालेल्या दिसतात . हिवाळ्यात गेल्यावर हा ट्रेक करताना जाणवणाऱ्या थंडीची म जाचं वेगळी वाटते चालून घामही येतो अन थंडीही जाणवते . पक्षांचा किलबिलाट अन मंजूळ वाहणारा वारा सुखावून टाकतो . पुढे आपल्याला दिसतात काताळात कोरलेल्या पायऱ्या अगदी हडसर किल्लयावर जश्या आहेत त्या पद्धतीच्याच ह्या पायऱ्या आहेत . प्रचंड मोठी दगड या मधे पडलेली आहे . थोडे वर गेल्यावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो . पूर्वी अर्धा हा दरवाजा माती दगडांनी भरलेला होता पण गडवाट तथा शिवछत्रपती परिवार व इतर दुर्गप्रेमींनी या ठिकाणी हा रस्ता व गडावरील पाण्यांची टाकी गाळातून मुक्त करण्याचे काम केले आहे व अजूनही करत आहेत . वळण घेवून जावे लागते त्यामुळे अगदी जवळ जाईपर्यन्त दरवाजा दिसत नाही . पायरीसह  सर्व ढाचा एकाच दगडात कोरलेला आहे . दरवाज्यावर दोन्ही बाजूने चक्राकार दोन फुले कोरलेली आहेत दरवाज्याची उंची मध्यम आहे आत मध्ये देवळ्या कोरलेल्या आहेत .
                     दरवाज्या पासून थोडे वर चालत आले की दोन मार्ग आहे . किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर दोन्ही वाटेने जाता येते . या ठिकाणी अनेक उध्वस्त इमारतीचे केवळ अवशेष दाट गवतामधे दिसतात . संपूर्ण पठारावर फेर फटका मारतांना किल्ल्याची जागोजागी उध्वस्त झालेली तटबंदी नजरेस पडते . ७ ते ८ पाण्याची टाकी आढळतात . एका दगडी समाधी ची शिळा देखील या किल्ल्यावर आहे . एका तलावाच्या बाजूला वीर हनुमानाची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे मंदिराला पडलेल्या दगडांची चार पाच फुटांची भिंत रचलेली आहे आत काही कोरीव दगडवरून त्या ठिकाणी छोटे मंदिर असावे असे दिसते . समोरच कातरकड्याची खोल दरी आहे अश्या ठिकाणी निश्चितच काळजी घ्यावी लागते .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे . यादव ,बहामणी , मुघल , मराठे, इंग्रज आदि शासकांचे या किल्ल्यावर राज्य होते . शहाजी राजें यांनी देखील हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता . १८१८ नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला . दिड दोन तास जंगलातून पायपीट करत जाऊन गडावरील पायऱ्यामधील गाळ व मोठमोठी दगड हटविण्याचे काम करणाऱ्या तथा पठारावरील गाळाने  गच्च भरलेल्या दगडी कोरीव पाण्याच्या टाक्या गाळातून मुक्त करणाऱ्या सर्व गड किल्ले संवर्धन करणारे विविध सेवाभावी संस्थाचे मावळे हे खऱ्या अर्थाने शिवरायांचे सच्चे मावळे म्हणून काम करतांना दिसतात हे या भागाचे विशेष .

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...