शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

मराठा सेवा संघ

 मराठा सेवा संघ : एक विचार


 १ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट  अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत .  मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते.  स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा  दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू  संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो , 

प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।


आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

      देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच  महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा  सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .

"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत  जपत  आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा

सेवा संघ करत आहे .

हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.

       आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ 

एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक  अन मनगट मजबूतीचं .........!!!!

नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!

वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!

बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!

🌿🌿🌿🌿🌿

॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥

🌿🌿🌿🌿🌿

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌿🌿🌿🌿

संजय खांडवे

 बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष

9011971122


बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

महाभूमि

 *मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*


शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे  अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली  अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .

      आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते  आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .

      संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .

      दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .




संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

स्वांतत्र्य एक जबाबदारी

 स्वांतत्र्य एक जबाबदारी*


इसवी सन पूर्व 300 च्या काळात चक्रवर्ती सम्राट अशोक एक प्रियदर्शी राजा होऊन गेला . त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात संपूर्ण भारतासह आजूबाजूचा बहुतांश प्रांत काबीज केला होता .भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा तो हाच काळ होता . आज आपली भारतीय राजमुद्रा आपण पाहतो की प्रत्यक्षात चार सिंहमुख असलेल्या अशोक चक्राच्या खाली "सत्यमेव जयते " हे ब्रीद आहे .यावरून सदैव सत्याचा विजय असणारे , सत्याच्या बाजूने असलेले अत्यंत प्रगत असे लोककल्याणकारी साम्राज्याचे मौर्य सम्राट अशोक हे लोकशासक होते हे सिद्ध होते .सातवाहन, वाकाटक हे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत भारतामध्ये प्रगत शासकापैकी एक .पुढील काळात तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये अत्यंत समृद्ध असा गुप्त काळ आला या काळात साहित्य ,कला ,संस्कृती तथा व्यापार याला सम्राट अशोकाच्या काळा प्रमाणेच अधिक वाव मिळाला.इतिहासाच्या संदर्भावरून सम्राट अशोकांच्या काळात लोककल्याणार्थ अनेक कामे झाली असे दिसून येते .परंतु यानंतर मात्र साधारणपणे 9 व्या 10 व्या शतकापासून भारत खंडास परदेशी आक्रमणाची संकटे सतत भेडसावू लागली .या काळात अनेक आक्रमणे उत्तरेकडून भारतावर होऊ लागली पुढील काळात मोघलांनी शेकडो वर्ष आपल्या या भारतभूमीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले .17 व्या शतकात मात्र राजे लखुजी जाधव , शहाजीराजे भोसले , राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी राजे यांच्या रयतवत्सल भावनेने त्यांच्या संघर्ष व त्यागातून एतद्देशियांचे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उभे राहिले .  स्वराज्य हे या मातीत जन्मलेल्या तथा मातीसाठी स्वाभिमान आपल्या उरात बाळगणाऱ्या मावळ्यांचे राज्य होते .त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना स्वातंत्र्याची ओढ लावून दिली .अठरापगड जाती-धर्माचे वज्रमूठ बांधून स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष याची जाणीव त्यांना झाली . परस्परांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभे होत गेले .रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य ही निरपेक्ष भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण झाली. स्वराज्यासाठी लढणारा मावळा ही ओळख मिळाली हीच स्वातंत्र्य , समता व बंधूतेची  नांदी होती .यातूनच स्वराज्य न्याय देणारे ठरले पुढे शिवरायांच्या आणि छत्रपती शंभुराजांच्या निर्वाणानंतर दिडशे वर्षापर्यंत मावळे स्वराज्यासाठी मोठ्या स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले ते कधीही झुकले नाही हीच प्रेरणा इंग्रजांशी लढताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महावीरांना मिळाली .

     एका चर्चेमध्ये तथागत गौतम बुद्ध अंम्ब ट्ठाला म्हणतात "अंम्बट्ठा छोटीशी चिमणी देखील स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करीत असते . " यामधून स्वातंत्र्याचा अर्थ प्रतीत होतो . स्वातंत्र्याची व्याप्ती कळते .डॉ . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड मानव जातीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली . "आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण करू असा आपण निश्चय केला पाहिजे " असे त्यांनी आपल्या 25 नोव्हेंबर 1949 च्या संविधान सभेतील भाषणात सांगितले होते . स्वातंत्र्य ही खूप मोठी आनंददायी बाब आहे त्यासाठी सामाजिक लोकशाही आपण जपली पाहिजे . आपल्या हक्क  , अधिकारासाठी तथा आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाने गेले पाहिजे हा संदेश त्यांनी संविधानातून दिला . शिवरायांनी जसे "रयतेचे राज्य " म्हटले तसेच भारतीय संविधानाने "आम्ही भारताचे लोक " या वाक्याने संविधानाची सुरुवात केली . शिवरायांच्या स्वराज्यातील लढणाऱ्या विरास "मावळा " म्हटले गेले संविधानाने आपली ओळख आपल्याला "आम्ही भारताचे लोक " अशी करून दिली ही ओळख कुठलाही जात - धर्म -पंथ दर्शवणारी नव्हती सार्वभौम , समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय ,स्वातंत्र्य , समता व बंधुता याची रुजवन करणारे आहे त्यामुळे स्वाभिमान जागृत होतो व समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचे मन - मस्तक आणि मनगट मजबूत होते .


    स्वातंत्र्य म्हणजे मी कुणाचाही अंकित नाही . मी पूर्णपणे सर्वांगाने मुक्त आहे . स्वैर आहे कोणाचाही देणेदार नाही . मानवतेची मूल्य जोपासत मी मानवधर्मास जपणारा स्वतंत्र मानवतावादी आहे . स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच स्वातंत्र्यात मानवीमूल्य जोपासत जगणे ही आपली जबाबदारी ठरते .स्वातंत्र्याचा खरा अर्थ तर मानव कल्याणार्थ झटणे , दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे तथा त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे असाच होतो . दया , क्षमा , शांती ,समता , बंधुता याचे भान ठेवत कृतघ्न न होता कृतज्ञ राहणे असाच आहे . आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत आपल्याला काहीही करावे लागत नाही असा समज आपला सुखी जीवन जगत असताना आहे , पण येणाऱ्या काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचाही वेध घेण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील .शहीद भगतसिंह यांची " जेल डायरी "

  मधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .


*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*


 *मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*


 *परंतु ,खरंच आहे का,*


 *तुमच्यात धमक आणि  तुम्हाला स्वातंत्र्य ?*


*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*


 *तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*


 *तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*


 *मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*


*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*


 *जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*


 *अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*


 *जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*


 *त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*


 *उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*


 *त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*


 *केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*


 *त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*  



संजय खांडवे

इतिहास अभ्यासक

बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...