गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रकांड पंडीत कृष्णराव अर्जुनराव केळूसकर गुरुजी

 


धर्मशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र,तत्वज्ञान,इतिहास हया विषयावर आपल्या साहित्यातून विस्तृत स्वरूपात लिखान करनारे प्रकांड पंडीत ,बहुजनसमाजाचे वाड़मयमहर्षोंच ज्यांना म्हणता येईल असे कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा साहित्य विश्वातील कार्य पाहता नतमस्तक व्हावे असेच आहे .
        आज त्यांचा जन्मदिवस एक आठवण म्हणून का होईना वाचून जे काही लिहावसं वाटलं ते मांडतोय !
    गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य सामान्य लोकांना उत्तम रितीने अवगत व्हावे ,गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय व त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ वाचकास कळावा या उद्देशाने त्यांनी सान्वय,सार्थ,सटीक गीतेवरील भाष्य केले आहे .८९० पानाचा हा श्लोकासह विधिध अंगानी टिपनी सह हा महाग्रंथ मांडला आहे .विदवानापासून विदयार्थापर्यन्त आवडेल अश्या ग्रंथाची रचना केली .
        संत तुकाराम,गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे चरित्र सर्वप्रथम मराठीतून लोकासमोर मांडले .
पुढे हेच गुरुजींचे बुद्धचरीत्र बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रेरणादायी भाग ठरुन ऐतिहासिक क्रांती घडवून गेले .
१८९६ साली  पद्य स्वरुपातील तुकोबांचे र्चारत्र जगासमोर मांडले.
        तात्कालिन उपलब्ध इतिहास साधनांचा अभ्यास करून १९०६ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे  विस्तृत स्वरूपात ,क्रमवांर घटनासह अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहून काढले .
     या ग्रंथासाठी श्री छत्रपती शाहू महाराज सरकार ,श्रीमत महाराज बापूसाहेब कागलकर,श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथासाठी उदार आश्रय दिला .इंदूरचे श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी या शिवचरित्राच्या ४००० प्रति खरेदी करुन जगभरातील ग्रंथालयाला वाटप केल्या .शिवराय जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचविले .१९२० साली या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित झाली .
         या महान कार्याला मानाचा मुजरा !
   आपण नककीच हया दुर्मिळ,अभ्यासपूर्ण साहित्याचा लाभ घेऊन महान युगपुरूषांची चरित्र जाणून घ्यावी ही अपेक्षा .

जय जिजाऊ

संजय खांडवे

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे

जागतिक आदिवासी दिवस










आज जागतीक आदिवासी दिवस
विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पपणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी !
 मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !
महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .
    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .
रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .
    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !
       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 
पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .
    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

राघोजीने केला बंड
बागडीच्या पाण्यापाशी !

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .
     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .
     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .
   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.
     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .
        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .

आज ऑगष्ट् क्रांती दिवस ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे रनशींग फुकले गेले या लढयात कामी आलेल्या हुतात्माना नतमस्तक होण्याचा दिवस !
   तसाच जागतिक आदिवासी दिवसह आजचं !
आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे सारखे त्यांच्यासोबत लढणारे असंख्य आदिवासी बांधव या मातीच्या प्रेमापोटी आपला स्वाभिमान जपत अमर झाले ,त्यांच्या कार्यासही सलाम !

संजय खांडवे
बुलढाणा



शनिवार, ११ जुलै, २०२०

300 बादल मावळे,वीर बाजी प्रभू देशपांडे,शंभूसिंह जाधव,विठोजी काटे या शूर मावळयांनी साक्षात यमालाही रोखून धरले ते याच गजापूरच्या पावनखिंडीत

  हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य या परिवाराचा सदस्य म्हणून आदरनिय श्री शिवरत्न शेटये सर यांच्या मार्गदर्शनात

वर्षातून दोन मोहीम आम्हाला करायला मिळतात त्यापैकि पन्हाळगड ते पावनखिंड ही एक मोहीम होय .





शिवप्रतापभूमी मध्ये अफजली संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की आमची माती अन माणसं याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो .या विजयानंतर महाराज दुसऱ्याच दिवशी मोहिमेंवर निघाले पुन्हा विजयी घोडदौड सुरु झाली एकाच महिन्यात महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात घेऊन कोल्हापूर प्रांतावर आपला वचक बसवला .या भागात बरेच किल्ले बिनहरक़त मिळाले.मात्र रांगणा खेळणा छापे घालून घ्यावे लागले .खेळणा किल्ला घेण्यास बरेच प्रयास झाले म्हणून याचे नाव विशालगड पडले
.

             गडाचे बांधकाम अत्यंत प्राचीन आहे ११/१२ व्या शतकात हा रांगडा किल्ला बांधला गेला असावा .शिलहार राजा भोज याची ही राजधानी होती .पुढे यादव ,बहामनी,विजापूरकर,मराठे,मोगल यांचे अधिपत्य या गडावर होते .
         



याच सज्जाकुटीमध्ये शिवराय व शंभूराजाची भेट झाली होती.दोघा पिता पुत्राचे मायेचे नाते याच वास्तुने अनुभवले .इतिहासालाही ज्ञात नसेल अशी गुप्त खलबते रयतेच्या कल्याणार्थ झाली असतील तीच ही इमारत .याच ठिकाणी हिरडस मावळ प्रांतातील बांदल सरदार,बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधव,गंगाधर पंत,विठोजी काटे ,शिवा काशिद या नरवीरासोबत मसलते ठरली ,तीच ही वास्तु .




महाराज राजदिंडी दरवाजामधून गडउतार झाले.याच वाटेतून त्या रात्री पावसात निवडक बांदल मावळे व सरदारासह आशाड शुद्ध पौर्णिमेंला दोन पालख्या निघाल्या.तरबेज भोयासह स्वराज्याचे छत्रपती व विर शिवा काशिंदांना आपल्या मजबूत खांद्यावर पेलून पुढे गुढगाभर चिखल ,नदया ,नाले पार करत ही स्वराज्यनिष्ठ मावळे निघाले होते .







               या बंदिस्त विहिरीचा वापर सैनिकांना पाणी पिण्यासाठी असे .शञूने यात विष कालवू      
                                        
नये  म्हणूण  बंदिस्त आहे तीच ही अंधा२ बावडी




अवघ्या दोन चार महिण्याअगोदरची भेट पण शिवरायांवर जिवापाड प्रेम करणारी मावळे याच मातीत जन्मले .स्वराज्यावरील अगाध विश्वास ,या मातीतील प्रत्येक मावळ्याचा स्वाभिमान जागृत करत प्रसंगी अन्यायाविरूध्द लढतांना प्राणही देण्यास धजंत नसे .
   "लाख शिवा काशिद गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे "
ह्या प्रेरनेने वीर शिवा काशिदांनी आपला मृत्यु समोर दिसत असतांनाही स्मामीनिष्ठता जपत स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले .
     सोंगातल्या शिवाजीचीही पाठ जिंवंतपणे सिध्दी पाहू शकला नाही तर खऱ्या शिवाजी महाराजांची तर दूरच ....

शिवाजी महाराज होऊन मरायलाही भाग्यच लांगतं .....

आज वीर शिवा काशिंदांचे बलिदान म्हणजे स्वराज्याचा एक खांबच आहे 

मातीसाठी कामी आलेल्या वीरांच्या चरणी हा देह सदैव नतमस्तक राहील



गडांवर कामासाठी  येणारे लोकासाठी हत्ती ,घोडे  बांधण्यासाठी  ही जागा असायाची


गडांवरील वीर शिवाजी काशीद यांचे  पुर्णाकृती स्मारक

 




 






  







कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेत खंड.

    दरवर्षी हिंदवी परिवार ,महाराष्ट्राच्या वतीने जुलै महिन्यात पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेचे  आयोजन करण्यात येत असते.या मोहीमेत संपुर्ण महाराष्ट्रातून ८०० स्री पुरूष मावळे सामील होत असतात. मी गेल्या ५ वर्षापुर्वी बुलडाणा जिल्ह्यातून एकटाच या मोहीमेला जाण्यास सुरूवात केली आहे.मागच्या वर्षी संजय खांडवे सर आणि किशोर पवार सर हे माझ्यासोबत सामील झाले आहेत.कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम स्थगित केली आहे.
   मित्रांनो शिवरायांचा संपुर्ण इतिहास हा आव्हाने ,संकटे ,शत्रूशी लढाई,धावपळ अशा रोमांचकारी प्रसंगानी ओथंबून भरलेला आहे.यापैकी एखादा प्रसंग आपण अनुभवावा या हेतूने आम्ही या मोहीमेत सामील होत असतो.शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड या मार्गाने पायदळ जावून आपणही त्या मार्गावर जीवनाचे काही क्षण खर्च करावे हा हेतू यामागे असतो.
   या वर्षी शरीराने जरी या मोहीमेला जाता आले नाही तरी घरबसल्या मनाने आणि विचाराने या मोहीमेचे स्मरण करून आम्ही ही मोहीम पुर्ण करणार आहोत.
   दरवर्षी ११,१२,१३ जुलै असे तीन दिवस ही मोहीम राबली जाते.१० जुलैला पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावजवळील शिवसृष्टीत आम्ही सगळे मावळे मुक्कामी जमा होतो.तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन नेबापूर येथील वीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ सकाळी ८.३० वा.हजर होतो.तेथे हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डाँ.शिवरत्न शेटे सरांचे वीर शिवा काशीद यांच्या बलीदानावर अंगावर शहारे आणणारे व्याख्यान होते.उपस्थित सर्व मावळे वीर शिवा काशिदच्या बलिदानाच्या इतिहाने प्रेरीत होऊन वीर शिवा काशिदच्या नावाचा जयजयकार करून समाधीवर नतमस्तक होतात.वीर शिवा काशिदच्या समाधिला अभिवादन करून पन्हाळा किल्याच्या पुर्व दिशेने आम्ही गड चढून वीर शिवा काशिदच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करतो व पुढे निघतो.
   गडाच्या मध्य भागावर आल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे  यांचा पुतळा लागतो त्या पुतळ्याजवळ आल्यावर पुतळ्याला सर्वजन अभिवादन करतात आणि तेथून पुढे गडाच्या पश्चिम दिशेकडे निघतो.
    गडाच्या पश्चिमेकडे आल्यावर गड उतरण्याच्या अगोदर पुसाटी बुरूजाजवळ सर्व मावळ्यांच्या हाताला ओळखपट्टी बांधली जाते जी पुर्ण मोहीम संपेपर्यंत हाताला बाधून ठेवावी लागते. तेथेच पुढील मोहीमेच्या सूचना दिल्या जातात.मोहीमेदरम्यान या सूचनांचे तंतोतंत पालन करावे  लागते.जो नियम मोडतो त्याला कायमस्वरूपी मोहीमेतून काढून टाकण्यात येते.यानंतर महाराज ज्या मार्गाने गड उतार झाले होते त्या पायदळ वाटेने आम्ही गड उतार होतो.
    गड उतार झाल्यावर तुरकवाडी हे गाव लागते तेथून थोडे पुढे गेल्यावर चढाई लागते.चढाई चढून गेल्यावर म्हाळुंगे हे गाव लागते.म्हाळुंगे गावातून थोडे पुढे चढून गेल्यावर मसाई पठार सुरू होते .हे पठार जवळपास १२ कि.मी.सलग आहे.पठाराच्या सुरूवातीला माथ्यावर आम्ही सर्व मावळे सोबत आणलेला जेवनाचा डब्बा खातो आणि पुढे निघतो.नंतर सतत चालल्यावर पठाराच्या मध्यभागी मसाई देवीचे  मंदिर आहे .तेथे थोडावेळ बसून परत पुढे चालायला लागतो.पठार संपल्यावर पठार उतरून खाली आल्यावर कुंभारवाडी हे गाव लागते.कुंभारवाडीतून पुढे गेल्यावर खोतवाडी हे आमच्या मुक्कामाचे ठिकाण असते.
    खोतवाडी हे छोट गाव आहे.त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक घरी आमच्या ८०० मावळ्यांची राहण्याची सोय केलेली असते.भोजन व्यवस्था प्राथमिक शाळेत असते व सध्याकाळचे प्रबोधन पण तेथेच होते.अशा प्रकारे नेबापूर ते खोतवाडी असा २० कि.मी.पायदळ प्रवास करून खोतवाडीत मुक्काम करतो.
     दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व तयार होऊन शाळेत चहा व नास्त्यासाठी जमा होतो.चहा व नास्ता झाल्यावर तेथेच दुपारचा जेवनाचा डब्बा प्रत्येकाच्या सोबत दिला जातो.दुसऱ्या दिवशीचा प्रवास हा खडतर आणि रोमांचकारी आहे.सुर्यप्रकाश जमीनीवर पोहचत नाही अशी दाट झाडी ,स्वच्छ पाण्याचे खळखळणारे ओढे ,भातशेती फणसाची झाडे अशा निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या मार्गावरून आमचा पायदळ प्रवास सुरू होतो.मार्गात मंडईवाडी ,धनगरवाडी,कळवेवाडी,रिंगेवाडी ,माळेवाडी,पाटेवाडी ,सुकामळा,म्हाळसवडे,मान धनगरवाडी आणि शेवटी पांढरेपाणी येथे मुक्कामाला पोहचतो.
  पांढरेपाणी येथे मुक्काम करून सकाळी ८.०० वा.नास्तापाणी करून ५ कि.मी .अंतरावर असलेल्या पावनखिंडीकडे प्रवास सुरू होतो.साधारपणे सकाळी १०.०० वा.सर्व मावळे पावनखिंडीत जमा होऊन पावनखिंडीत शहीद झालेल्या ४०० मावळ्यांच्या बालिदानाचा इतिहास डाँ.शिवरत्न शेटे यांच्या ओघवत्या आणि वीर रसाने भरलेल्या व्याख्यानाने मोहीमेची सांगता होते.४०० मावळ्याच्या बलीदानाचा इतिहास ऐकून सर्व मावळे त्या स्थळावर नतमस्तक होऊन त्या स्थळाची पावन माती आपल्या कपाळाला लावून जड अंतकरणाने पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या इराद्याने आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात.
   यावर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेत खंड पडल्यामुळे सर्व मावळे अस्वस्थ झाले आहे.त्यामुळे ही महामारी लवकर संपून हिवाळी मोहीमेकडे सर्व आतुरतेने बघत आहेत.
*वीर शिवा काशिद ,बाजीप्रभू ,फुलाजीप्रभू देशपांडे ,हिरडस मावळचे बांदल बंधू आणि अनामिक ४०० मावळ्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!*

  धन्यवाद !
पी.जी.सवडदकर 
शिवकुंज ,शिवाजी नगर ,चिखली 
ता.चिखली जि.बुलडाणा
मो.नं.9822194166

बुधवार, २४ जून, २०२०

जालना स्वारी नंतर महाराजांनी या गडावर केले होते दिर्घकाळ वास्तव्य

पट्टगड /विश्रामगड



नाशिक -नगर सिमेलगत नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात .

 खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते व गडावर चढाई करतांना आत्ता कृत्रीम रस्ता तयार केला गेला आहे .त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून नाव नोंदणी केली जाते .या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) गडाची चढाई करतांना गडाची नकाशासह माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहेत .भककम नैर्सगिक तटबंदी सोडता ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी मजबुत तटबंदीचे अवशेष आढळतात .वाटेत या गडावर असंख्य गुहा कोरलेल्या अाहे,त्यात पाण्याचे टाके सुद्धा आहेत तसा ह्या गडाचे बांधकाम शेकडो वर्षापूर्वीचे {१२व्या -१३ व्या शतकातील}असावे असे दिसते .अलीकडच्या काळात ग्रामस्थानी पट्टादेवीचे मंदिर बाधलेले वाटेत दिसते गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात . एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते यात आता आतमध्ये शिवचरित्रावरील असंख्य प्रसंग शिल्पामध्ये साकारलेले दिसतात .बाहेर शिवरायांचे सुंदर स्मारक आहे .बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो येतांना वाटेत त्र्यंबक दरवाजाही लागतो .अंबरखान्याच्या मागच्या बाजूस उंचावर बालेकिल्ला असावा असे अवशेष् आहे .या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .

अंबरखाण्याच्या मागच्या बाजूने चालत गेले की दगडात कोरलेली पाण्याची भव्य टाकी दिसते हे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते








‌समोर पठारावरून सोनटेकडीकडे जातांना पाण्याचे १२ टाके दिसतात शुद्ध पाण्याने भरलेले हे टाके आहेत यापैकी काही टाके लिक  असल्याने त्यात पाणी दिसत नाही .या टाक्यातील निघालेल्या दगडापासून गडाचे बांधकाम होत असे .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C अाकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे .




                     हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी राजगडावरील काही दिवस सोडले तर इतर दिवस त्यांची रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड सुरु होती त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते ,शिवरायांनी जालना शहरावर स्वारी केली व यास्वारीनंतर रायगडाकडे परतत असतांना रनमस्तखान त्यांचा पाठलाग करत आला होता.सोबत बर्हिजी नाईक होते त्यांना या भागाची बरीच माहीती होती.रनमस्तखानाला चुकवत ते महाराजांना सुरक्षीत पट्टगडावर घेऊन आले .महाराजांनी १७ दिवस या किल्ल्यावर आराम केला .जातांनी या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले .शिवरायांच्या वास्तव्याने अन पदस्पर्शने पावन झालेला हा गड भ्रंमंती करत असतांना प्रत्येक शिवप्रेमीना या गडाचा काना अन कोपरा एक प्रेरणा देवून जातो .
     पेशव्यानी सुध्दा या गडाचा उपयोग थंड हवेचे ठिकाण म्हणून केला.अश्या या किल्ल्यास एकदा तरी भेट दयावी .





      संजय खांडवे
      9011971122

‌       


शुक्रवार, ५ जून, २०२०

शिवराज्यभिषेक, उत्सव रयतेच्या स्वातंत्र्याचा !


शिवराज्यभिषेक ,उत्सव रयतेच्या स्वातंत्र्याचा !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिवजन्मापुर्वी सुमारे ४०० वर्षापासून आपल्या भारतीय भूमीवर परकीयांच्या आक्रमणानी कहर केला होता.त्रस्त रयत जुलमी शासकांच्या अाघाताने मेटाकुटीस आली होती .एखादया अनामिक आशेवर ही रयत कसतरी जगत होती .या काळात महाराष्ट्रात संत परंपरा आपली भागवती पताका डोक्यावर घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांच्यात नैतिक बळ देण्याचं काम करत होते . संत नामदेव -ज्ञानदेव -चोखोबा -गोरोबा -सावता -तुकोबा ही संत श्रृखला आपलं काम करत होती .या काळात समाजात झालेला भेदाभेद ,स्वार्थी प्रवृती परकीयांना पोषक ठरली एके काळी ज्या भारतवर्षातून सोन्याचा धूर निघायचा तिथली रयत भयाने ग्रस्त झालेली,अन्यायात रक्ताळलेली, मायमाऊलीच्या आर्त किंकाळीने शेकडो वर्षापासून स्वातंत्र्याची वाट आसवलेल्या डोळ्यानी बघत होती .एक दिवस ती पहाट नककीच उगवेल या भाबडया आशेवर ही रयत जगत होती .
   जदूरायाचे जावाई शहाजीराजे भोसले ,राजे लखुजी जाधव हयानी त्या काळात आपल्या मनात स्वातंत्र्य,स्वाभिमान जागृत ठेवत तशी आस रयतेच्या मनात निर्माण करायला सुरूवात केली होती ,युद्धाचा प्रसंग नसे तेव्हा ही मंडळी रयतेच्या सुख -दुःखात रममान होत असत .जाधवरावांनी सिंदखेडचा कायापालट केला रयतवत्सलतेचे विचार बालपणीच जिजामातेनी अनुभवले. यशापयाशाच्या चर्चां,राजकिय डावपेच,न्यायनिवाडे,लढाईचे नियोजन,प्रशासन ह्या बाबी अगदी जवळून पाहिल्या . वैभवाचा परमोच्च शिखर त्या काळात वऱ्हाड परिसरात वाटू लागला. लखूजीराजे जाधवांनी विजयाच्या प्रेरीका असलेल्या जिजाऊंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह लावून दिला .
शिवरायांच्या समक्ष त्यांनी कवी परमानंद कृत " शिंवभारत " या ग्रंथात या विवाहाचा उल्लेख येतो .शहाजीराजांच्या व जिजाऊंच्याअनेक गुणांचे वर्णन या ग्रंथात आले आहे .


" *जिजू: जागर्ति जगजीतले ।* "
शहाजीराजांच्या पत्नी जिजू या पृथ्वीतलावर जागृत आहे .ही जागृती स्वराज्य प्रेरीकेच्या रूपाने महाबली शहाजी राजे यांच्या संकल्पणेला अधिक बळ देण्याचे काम करत होती .यातूनच स्वाभिमानाने जगायला शिवविणाऱ्या स्वराज्याची पायाभरणी होत होती .संपूर्ण दक्षिणभारतात शहाजीराजेनी दरारा निर्माण केला होता .१६२९ ते १६ ३६ या काळातच शहाजीराजे यांची घोडदौडच सांगते की स्वराज्याचं वेड त्यांनी रयतेला कस लावून दिलय .
*शाह: आहिजहानस्य येदलिस्य च सेनया ।*
*अयुध्यत समास्तिस्त्र सहस्त्रकरविक्रम ॥*
सूर्याला जसे हजारो किरणे असतात तसे हजारो बाहू असलेले शहाजी यांनी शहाजहान व अदिलशहा यांच्यासोबत तीन वर्ष युध्द केले असे  कवी परमानंद लिहतो .

शिवजन्माची शिवनेरीवरील रम्य पहाट याच स्वराज्याच्या स्वातंत्र्य उत्सवाची नांदी होती.शिवशंभूसारखे वंशंवर्धक पुत्र ही माता स्वराज्यासाठी घडवत होती शिवनेरीवर शंभू -जयंतिचा विवाहाने पुढे वाटचाल सुरु झाली .
शिवरायांचे बालपण हे महाराष्ट्रातील धामधुमीच्या काळात शहाजीराजे सह बंगळुरुमध्ये गेले त्या ठिकाणी निष्नात अध्यापकांची व्यवस्था शहाजीराजे यांनी केली .युद्धकला,राजकारण,डावपेच,युद्धतंत्र,प्रशासन आदिसह विविध भाषा व लिपि मध्ये शिवबा पारंगत झाले खुद्द शहाजीराजे हे संस्कृत विषयाचे गाढे पंडीत होते. 


*आख्याति लिखितुं यावदाचार्यो ।*
*तावद द्वितियपेश्ये विलिख्य तमदर्शयेत ॥*
        कवी परमानंद आपल्या ग्रंथात सांगतो शिवरायांना पहीला वर्ण शिकविला तोपर्यत (त्याअगोदरच ) ते दुसरा वर्णही लिहून दांखवत असत येवढी विदवत्ता बालपणीच शिवरायामध्ये होती .
   वयाच्या ११ व्या वर्षी शिवराय' सनय ' झाले म्हणजे एका राजा होण्यासाठी जी पात्रता लागते ते सर्व गुण अवघ्या बालवयात त्यांनी धारण केले . राजा बनन्याची पूर्ण क्षमता असलेले पूर्ण संस्कार उभयतांनी त्यांच्यावर केले .प्रत्यक्ष युद्धतंत्र,राज्यकारभार,प्रजापालन,कृतज्ञता व नैतीकता हे संस्कार घरातच झाले . व पुण्यात वयाच्या १२ व्या वर्षी अमात्य,धनदौलत,सैन्यासह दाखल झाले . शहाजी राजे यांनी दिलेला भगवा ध्वज व स्वराज्याचा अर्थ सांगणारी राजमुद्रा ही ह्याच शिवराज्यभिषेकाची एका रयतेच्या स्वातंत्र्याचीच पहाट होणार असल्याचीच नांदी होती . हा आत्मविश्वास शहाजीराजे आणि जिजाऊ यांना होता .सोन्याचा नांगर चालवून उध्वस्त केलेली शापीत जागा पुण्यभूमी केली . रयतेच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न तरळू लागले .पुण्यात स्वराज्याची' साक्ष देणारा लाल महाल उभा राहीला . भूमी कसणारी हातं अधिक जोमाने कामाला लागली व बळकट झाली व प्रसंगी स्वराज्यासाठी हाती शस्र घेण्यास सज्ज होऊ लागली .मन -मस्तक -मनगट मजबूत होण्याचे काम सुरू झाले . सहयाद्रीच्या साक्षीने बारा बलुत्याना एकवटून गट -तटाचे वाद तंटे मिटवून ,जे आले त्यांच्या सह जे आले नाही त्यांच्याविना या स्वराजकार्यास सुरूवात झाली .शिवरायांनी तोरण्यावर स्वराज्याचे तोरण बांधून हया गिरिदुर्गाच्या साक्षीने भगवा ध्वज फडकू लागला .
  शिवरायांचे धाडस,शौर्य,बुंध्दीचातुर्य या जोरावर अनेक किल्ले स्वराज्यात जोडल्या गेले .हे संपूर्ण राज्य रयतेचे आहे या भावनेने हे स्वराज्य उभे केले विश्वासानं माणसं जवळ आली प्रसंगी प्राण देण्यासही मागे हटली नाही .लाख मेंले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे ही भावना कृतीतून निर्माण झाली .स्वराज्याच्या रक्षणार्थ राजांनी गड किल्ले निर्माण केले . त्या गडाची निमिर्ती कार्य त्यांचे  दिलेली नावे ही सार्वभौमत्व लोककल्याणकारी कार्याचीच साक्ष देतात . १६५६ मध्ये अरजोजी यादवाच्या वास्तुस्थापत्य कलेतून बांधलेला प्रतापगड १६५९ साली आलेले अफजलखानाच स्वराज्यावरील संकट परतावून लांवतो हे शिवरायांचे पुर्वानुमान कौशल्य कीती अगाध होते हे सांगून जाते .गड कोठे व का बांधावा हे तंत्र लक्षात येते .१० नोव्हे १६५९ ला अफजलखान संपतो,जीवाजी महाला,संभाजी कावजी व अन्य मावळ्याच्या पराक्रमाने व शिवरायांच्या युध्दतंत्राने शिवप्रताप घडतो येवढयामोठया विजयाचा कोणताही जल्लोश न करता शिवराय ११ नोव्हे ला लगेच पन्हाळगडाच्या मोहीमेवर निघतात व सातारा मार्गे जात अवध्या १८ दिवसात पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकवितात ही एका श्रेष्ट प्रजाहीतदक्षतेसाठी सदैव झटत असलेल्या छत्रपतीची घोडदौड होती .
शिवराय १८३०६ दिवस जगले त्यांचे बालपणीचे दिवस सोडले तर इतर दिवस केवळ अन केवळ रयतेच्या कल्याणार्थ झटतच राहीले .


  सिध्दी जोहर स्वराज्यावर चालून आला  त्या वेळेस शिवराय मिरजेच्या वेढयावर होते ते तेथून सुरक्षित राजगड,रायगड किंवा प्रतापगडावरही जाऊ शकत होले पण आपण स्वतःपन्हाळ् गडावर जाऊन स्वत्तःला वेढयात अडकवून घेतले सिध्दी स्वराज्यात न घुसता पन्हाळ्याकडे वळला रयतेला होणारा त्रास त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून थांबविला .शिवा काशिदांसारखी,विठोजी काटे,शंभूसिह जाधव,बाजीप्रभू देशपांडे ,जवळपास ३०० बांदल देशमुख मंडळी लाखाचा पोशिंदा जगविण्यासाठी कामी आली .
   याच वेळी शाहीस्तेखानाच संकट लाखाचं सैन्य घेऊन चालून येत होत ,फिरंगोजी नरसाळे चाकण धैर्याने राखत होते त्या वेळी राजगडावर राहणाऱ्या  शिवाजी राजांच्या आई  जिजाबाई ह्या हातात तलवार घेऊन सज्ज झाल्या होत्या हे खालिल श्लोकात परमानंद सांगतात .


*जननि शिंवराजस्य सा राजगिरी वर्धनी ।*
*जिजानां गिरीदुर्गनामवने वहिता भवत् ॥*

अशी ही महान माणसे लोकल्याणार्थ सिद्ध झाली होती . शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग अन्याय अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी स्वाभिमान निर्माण करणारा आहे .पुढे महाराजांनी पुरंदरवरील संकटही मोठया धैर्याने ,चाणक्षतेने व अखंड सावधानता बाळगत परतवून लावले .
या स्वराज्याच्या कामात मुरारबाजी ,तानाजी मालुसरे सह अगणित ज्ञात अज्ञात मावळ्याचे बलिदान दुर्गदुगैश्वर रायगडाची उंची आभाळाच्याही वर टेकवून गेली .
   आई जिजाऊंच्या आज्ञेने शिवरायांनी राज्यभिषेकाची योजना आखली . भोसले कुळवंशीयांचे अथक पारिश्रम ,मावळ्याचे बलीदान यावर उभे राहिलेले राज्य ,६ जून ला क्षत्रियकुलवंत सिहासनाधिश्वर छत्रपती शिवरायांच्या रूपाने एका ऐतिहासिक पर्वास सुरूवात झाली .
३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ होऊन स्वतंत्र राज्यकारभारास सुरूवात झाली .  स्वंतत्र कालगणना शिवराज्यभिषेक शक सुरू करून शिंवराय शककर्ते झाले .समस्त मानवजातीचा उद्धार होईल अशी दिर्घकालिन धोरण व रचनाकरणार नितीवंत राजा रयतेला मिळाला .स्वतंत्र शद्बकोषाची निर्मिती,शिवराईची निर्मिती,स्वतंत्र शेतसारा धोरण,कृषी,पर्यावरण,जलव्यवस्थापण,न्यायव्यवस्था,व्यापार,आरमार,लष्कर,महसूल आदि लाेककल्याणकारी बाबी ह्या अधिक धोरणात्मक पद्धतीने छत्रपतीच्या आदेशाने अधिक प्रभावी राबविल्या जाणार हा आनद स्वराज्याचा प्रत्येक माणसाच्या मनात होता . प्रशासनात न्याय दंड आदी बाबीमध्ये अधिक सरलता निर्माण करणारा हा सोहळा होता .देशभरातून ,विदेशातून हया सोंहळ्यास हजारो महत्वाच्या व्यक्ती छत्रपतीच्या राज्यभिषेकास हजर होत्या .मराठा साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचा ,रयतेच्या आनंदोत्सवाचाच हा सोहळा होता .आई जिजाऊंच्या डोळ्यातील एक एक आनंदाश्रु त्याची साक्ष देत होता .रायगडावर राज्यभिषेकापूर्वीची ती रात्र अगदी रोशनाईने दुर्गेश्वरास झळाळून टाकणारी होती .गडावर येणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं या स्वराज्यासाठी खूप मोठ योगदान होत .हजारो मावळ्याच्या बलीदानाने शेकडो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढणारा हा सुवर्ण क्षणत हत्ती ,घोडे,पालख्या,नजराने,रोशनाईने अजूनच उजळून आला असेल.
         क्षत्रियकुलवतंस महाराजाधिराज सिहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज या सुवर्णदिनी अभिक्षिक्त राजे म्हणून ३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ झाले शिवरायांना सार्वभौम राजे म्हणून विश्वात अधिकृत मान्यता मिळाली अदिलशाही,निजामशाही,मोगलशाहीच्या तख्ताला या मराठयाचा इतिहासातील  सुवर्णक्षणाने हादरा दिला .या क्षणानंतर सामाजिक,राजकीय,सांस्कृतीक क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन स्वराज्याची महती सपूर्ण विश्वात पोहचणार होती . याची प्रचिती शिवरायांच्या दक्षिण दिग्वीजय मोहीमेवरुन येते. 
म्हणून ही गोष्ट काही सामान्य राहीली नव्हती शिवराज्याभिषेक एक अलौकीकअजरामर घटना ठरली.
   *माता -मातृभूमी -माणसे* या त्रिसूत्रीवर आधारलेल स्वराज्य अन्याया विरूद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देंत राहते .

जय जिजाऊ
जय शिवराय
                                         *संजय खांडवे*
                                       *बुलढाणा*
                                             *9011971122*


प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...