रविवार, ३१ मे, २०२०

प्रतिकुलतेमधून मार्ग शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही ....


प्रतिकुलतेमधून मार्ग शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही .......

शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीने असंख्य बदल पाहीले,शोषित -शोषकांचा खेळ पाहिला,न्याय -अन्यायाच्या गोष्टी अनुभवल्या,परकियांची आक्रमणे अनुभवली .याच मातीने परिवर्तनाची नांदी ठरणाऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणाऱ्या क्रांतीनेही जन्म घेतला ,सह्याद्रीच्या साक्षीने पेटून उठलेल्याची बलीदाने बघितली .बाराव्या शतकापासून आपल्या बुद्धीचा कस लावत सत्याचा शोध घेत समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांचे जीवनमान उंचवणारे कार्य करत संत नामदेव,संत ज्ञानेश्व२,संत एकनाथ,चक्रधर स्वामी ,संत गोरोबा,संत चोखोबा,संत सावता,संत जनाबाई ,संत तुकाराम आदि वारकरी संताची अध्यात्मीक बळ देणारी सामान्याची मन,मस्तक,मनगट मजबुत कराणारे महान कार्य बघितले .कित्येक ज्ञात,अज्ञातांनी ह्या मातीसाठी देह झिजविला .
              ज्ञान,विज्ञान,साहस,शौर्य,प्रेरणा,आदर्श ही या मातीच्या कणा-कणात आहे.प्रतिकुलतेतही मार्ग काढण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे ,सतत सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या विचारांचा वारसदार आपला महाराष्ट्र अाहे .शेकडो वर्षाच्या गुलामगिरी नंतर रयतेचा रांजा दुर्गदुर्गेश्वर रायगडी सिहासनाधिश्वर झाले ही गोष्ट काही सामान्य नव्हती त्या पाठीमागे तीन पिढयाचे अथक परिश्रम ,संघर्ष,नियोजन व त्याग आदी गोष्टी येतात आणि हेच सातत्य त्या सुवर्णक्षणास कारण ठरते .
               आज संपूर्ण जगाला एका भयावह कोविड 19 अश्या संकटाने घेरले अाहे त्याचे कारण अतिसूक्ष्म असा विषाणू आहे पण त्याची होणारी साखळी मात्र विघातक आहे व आपला देशही त्याला अपवाद नाही ,आज एकाच वेळी या साखळीचा वेढा पडलाय . रयत त्रस्त झाली आहे भविष्याचे चिंता मनात येत आहे,आत्मविश्वासाच्या बुरुजांना तडा जात आहे .आर्थिक संकटाचे काळे ढगही दिसायला लागले आहे, एकाच वेळी संकटाची श्रृखलाच येताना दिसत अाहे पण अखंड सांवधानता ठेवत नियोजन पूर्ण काम आपली सरकारं करतांना दिसत आहे याला तुमची आमच्या सारख्या संविधानात्मक मूल्ये जपणारी माणसं तन-मन-धनासह साथ लॉकडाऊनचे नियम पाळून देत आहे.मागच्या अनेक पिढयाच्या हयातीतही एवढी  कठीण परिक्षा पाहीलेल्याचा सांगोपांगही चर्चाही नाही .सोन्यासारख्या माणसांचा जीव महत्वाचा हा उद्देश पुढे ठेवून आपण लढत अाहोत.लॉकडाऊन,कोरनटाईन या सारख्या तहाची ,संधीची योजना आखून आपली पोलिस यंत्रणा,आरोग्य यंत्रनेमधील पोलिस अधिकारी,शिपाई,डॉक्टर्स,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स आपआपल्या कार्यक्षेत्रात एका  निष्णात योध्याप्रमाणे घराबाहेर निघून लढत अाहेत.ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेची बुरूजे कशी पुन्हा उभारायची हा आत्मविश्वास याच मातीत आहे हा इतिहासाचा वारसाच आम्हाला लाभलाय .
             आता आहे त्या ठिकाणाहून आपण करत असलेल्या व्यवसाय ,नोकरीतून थोडसं अधिकच काम करून राष्ट्रनिर्माणाच महान कार्य एक कोविड योद्धा म्हणून येणाऱ्या काळात तुम्हा आम्हाला करायचे आहे.राष्ट्रप्रथम ही संकल्पणा सार्थ ठरवायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे.  "आमचं कर्म शिवराय " ह्या ब्रीदानुसार "शिव जागर मंच "ह्या माध्यमातून शिवविचारांचा प्रचार प्रसार करत कार्य करत राहणारे शिवविचारी सदस्याचा आमचा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचा मंच आहे.सामाजिक,सांस्कृतिक,क्रिडा,कला,साहित्य,शिक्षण,आरोग्य आदि क्षेत्रासाठी काम या माध्यमातून अाम्ही खारिचा वाटा उचलून अामचं कर्म शिवराय ह्या हेतूने करत आहोत , अश्या असंख्य सेवाभावी लोक व संस्था या संक़टकाळी पुढ येतांना दिसत आहे .हीच आपल्या मातीत असलेली सकारात्मकता आहे.
      अाज आपल्या आर्थिक ,शैक्षणिक,व्यावसायिक,कृषी, लघुउदयोग या बाबीवर दुरोगामी परिणाम टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे . ही आपल्याशी संमधीत क्षेत्र आहे यात आपला थेट सहभागही नोदविता येतो .
लॉकडाऊनच्या काळातही आपण आहे त्या जागेवरुन आपल योगदान देऊ शकतो .हया बाबी प्रसिद्वी शिवाय करण्याचं काम मंच करत आहे.
खारीचा वाटा महत्वाचा !
     प्रतिकुलतेमधूनही मार्ग कसा काढायचा हे महत्वाचे ,हे कामही आपण साखळी पद्धतीने करुन कृषी उदयोग जसे भाजीपाला ,फळे,धान्य आदी
लघु उदयोग जसे दुध,अंडी,कुकुटपालन,मत्सउदयोग,मसाले आदि
कारागिर /कौशल्यावर आधारीत  जसे वर्कशॉप,मोटार मैकेनिक,इलेक्ट्रीशीयन,प्लबर आदी
या व्यावसायिकांना सर्व नियम पाळून शिथिलतेच्या काळापासून उभ करण्याच महत्वाचं काम करावे लागेल. मंचच्या संपर्कातून ते करण्याच काम आम्ही करतच आहोत .लक्षात आलेल्यांचा कृषी मालाचे वितरणही सुरक्षा ठेवून करण्याच काम करतोय .गरज आपल्या संपर्काची आहे . एकमेकांच्या संवादातून आपल्याला प्रश्न सोडवत स्वयंपूर्णतेकडे जाणेही राष्ट्राच्या हितार्थ ठरेल.
         "बुट पॉलिश ते तेल मालिश " या व्यावसायिकतेकडे कोणतीही लाज न बाळगता वळावे लागणारच आहे .अंगीभूत कौशल्यावर आधारींत व्यवसाय उभारणीला येणाऱ्या काळात संधी मिळू शकते ,आमच्या शिव जागर मंचाशी जुळलेले कुलमखेड येथील सुनिल कानडजे हे एक चांगले उदा आहे .प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्या व्यवसायातील दर्जेदार कौशल्य आत्मसात करुन जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा अंगीकारुन अगदी शुन्यातून आपला व्यवसाय उभा करणारे ठरले .इडली-डोसा व्यवसायातून त्या त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे .
        कोविड १९ या संकटावर तर आपण निश्चितच मात करणार आहोत ! या संकटानंतर उगवणारी पहाट ही नवीन असणार आंहे .आपले कौशल्य ,जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा समोर ठेवून आपण नव्या दमाने पुढ जाऊ या ! यात शिव जागर मंच निश्चितच आपली मदत करेल. अशी माणसं या मंचानं उभी केलीय !
शेवटी येणाऱ्या काळात एक तुकोबांचा अभंग  लक्षात घ्या
ढाल तलवारे गुंतीले हे कर । म्हणे मी झुंजार कैसे झुंजु ?॥
बैसविले मला येणे अश्वावरी। धावू पळू तरी आता कैसा ?॥
कितीही प्रतिकुल परिस्थिती जरी असली तरीही तिला काडीइतकेही महत्व न देता कर्त्यव्य पार पाडणारी माणसे महान होतात .
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव जागर मंच बुलढाणा
    
     
.

माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहीले तर आमचीही तलवार चालेल . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर


आदर्श ,तत्वशिल ,लोकाभिमुख राज्यकर्त्या

 
गौतमीबाई व मल्हाररावासारखे सासू सासरे नव्हे तर माता -पिताची माया देणारी महान व्यक्तीमत्व होळकर कुलप्रभेला लाभली .रयतेच्या सुख दुःखात रममाण होणारी ही माणसे शेवटपर्यन्त झटत राहीली. अहील्यादेवीनी आपल्या उभ्या अायुष्यात असंख्य संकटांना सामोरे जावे लागले .१७५४ मध्ये पती सूरजमल जाटासोबत लढाईत मारल्या गेले .पती सोबत त्याच्या नऊ पत्नी सती जात असतांना सती जाण्यासाठी अहिल्यादेवींचेही मळवट भरल्या गेले पण पित्यासमान माया ओतणाऱ्या मल्हाररावांनी रयतेसाठी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून थांबविले .पति बरोबर सती न जाता त्या काळातील व्यवस्थेला या रणरागिनीने लाथाडले व रयतेच्या कल्याणार्थ हातात तलवार घेतली .
       डोळ्यादेखत नऊ सवती सती गेल्या .मालेराव अवघ्या २२ व्या वर्षी मृत्यु पावले त्यांच्या पती सती गेल्या . नातसुना देखील त्यांच्या समक्ष सती गेल्या .जावाई यशवंतराव फणसेही कॉलराने गेले , मुलगी मुक्ता व तिच्या दोन सवतीही सती गेल्या येवढे दुःख या लोकमातेने पचवले .रयतेच्या सुखात मातेला सुख मिळतं असे हा मराठयांच्या इतिहासातील वारसा राजमातेने अगदी सक्षमपणे चालविला .
    शिल्प,कला,साहित्य या क्षेत्रातील काम त्या काळात भरभराटीस आणले.धर्मशाळा,अन्नछत्रे,विहीरी,तळे,कुंडे,रस्ते व धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार ही लोककल्याणकारी कामें या काळात पूर्णत्वास आणली शिंवरायांचे स्वराज्याकार्य पुढे चालु ठेवले . राज्यकारभारात धैर्य ,बुध्दीमता,चाणाक्षपणा व निर्भिडतेने अहिल्यादेवींनी वचक निर्माण केला .ज्या महलात त्या राहत त्या ठीकाणी कोणतीही सजावट नाही बडेजावपणा नाही ,थाट माट नांही ,राजमहल वाटावा असा खर्च त्यांनी कधीच केला नाही अगदी साधेपणाने प्रखरबाणा ठेवत त्यांनी राज्य चालविले .त्या स्वतःला रयतेची सेवा करणाऱ्या ईश्वराच्या सेवक समजत असत .
    त्यांनी आपल्या पूर्वजांच्या वारश्याचा त्यांच्या विचारांचा जाणिवपूर्वक व अखंड सावधानतेने सांभाळ केला याची प्रचीती त्यांच्या एका पत्रावरून येते ,त्यांचे राज्य घेण्यासाठी सैन्य घेऊन निघालेल्या रघुनाथपंतास त्या लिहतात ," आमच्या पूर्वजांनी कुणाची खुशमस्करी करुन हे राज्य कमाविले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे मी एक अबला असहाय्य स्त्री आहे अशा भ्रमात कुणीही राहू नये .मी खांदयावर भाले घेंऊन समोर उभी राहीली तर,सगळे मनसूबे जागच्या जागी विरतील ,माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करुन पाहिले तर आमचीही तलवार चालेल.आपण माझे राज्य हिरवून घेण्याचे कपट रचून आलात ,आमच्याकडील फितुरास गाठले ,मला दुबळी समजलात की खुळी ? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा दृष्ट हेतू .आता आपली गाठ रणांगनातच पडेल .मी हरले तर किर्ती करून जाईल ,पण आपण स्त्रियाकडून हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही .अहिल्याबाईना तिच्या राज्या सह गट्ट करता येईल या भ्रमात न रहावे,त्यातच आपले हीत अाहे."
         अशी युद्धनिती वापरून व पाहिल्यांदाच महीलांच्या हातात शस्त्र देवून त्यांचे सैन्यदल तयार करुन रघुनाथपंतास उत्तर दिले. लोकमाता,राजमाता,रयतवत्सल पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !



                 संजय खांडवे
                9011971122

गुरुवार, २८ मे, २०२०

इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली


        
                 

अश्या प्रकारे १०० कुंड्या आहेत
                  यातून पाण्याचा आवाज स्पष्ट येतो




 
  
                              
                                 नकाशा
                                लिफ्ट




मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बऱ्हाणपूर हे शहर अत्यंत महत्वाचे होते या काळात या शहरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या अगदी मुघल बादशहा अकबर,जहागिर,शहाजहान या भागात बराच काळ होते औरंगजेब तर बरेच वर्ष या भागात राहीला.मराठयांचा इतिहासही या भागाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही .एका दिवसाचा परतीचा दौरा म्हणून नेहमी प्रमाणे अचानक महाशिवरात्र सुटी म्हणून आशीरगडाच्या भेटीसाठी म्हणून आदल्या रात्री आमचे सुरेश देवकर सर,गजानन राऊत,सर व सुशिल पनाड सरांचे नियोजन झाले . सकाळी ७ वाजता निघून १० वाजता बुलढाण्यावरुन बऱ्हानपूर पोहचलो तेथे सुरेश देवकर सरांचे मित्र बऱ्हानपूर मधील प्रसिद्ध वकिल अँड कलिम खान साहेब अामची वाटच पाहत होते त्यांच्याकडूनच सर्व शहराची माहीती आम्हाला दिवसभरात झाली मोहीम अाशीरगडाची होती पण दिवसभरात बऱ्हानपूरचा काना कोपरा फिरलो वकील साहेबांच्या आदर तिथ्यासह सर्व ऐतिहासिक माहीती मिळाली पर्यटनातून ज्या ठिकाणी जाताही आले नसते ती ठिकाणे त्यांनी दाखविली त्यावर प्रत्येक वास्तु नुसार सचित्र आपण माझ्या ब्लॉग वर पाहत आहातच !
      आपण आता पाहू या कुण्डी भंडारा / खुनी भंडारा विषयी ..।
बऱ्हानपूर हे शहर त्या काळचे महत्वाचे व्यापारी केद्र होते .सुरत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा मानला जायचा .बरा२,जोधपूर,आग्रा,हैद्राबाद,औरंगाबाद ही महत्वाची शहरे व्यापारी दृष्टया बऱ्हानपूरशी जोडली गेली होती या बहुतेक महामार्गावर दुतर्फा झाडे जागोजागी विहीरी खोदलेल्या दिसतात .बऱ्हानपूर -सूरत बंदरातून टर्की,पोलंड,मास्को या देशात मलमलचा व्यापार चालत असे .जहागिर बादशहाच्या काळात बऱ्हाणपूर येथे टॉमस रो या इंग्रज व्यापाऱ्याला कपड्याच्या कारखाण्याची परवानगी देण्यात आली होती .
    अश्या शहरात व्यापार व प्रशासनच्या दृष्टीकोनातून ताप्ती नदीच्या काठावर शाही महल सारख्या अनेक इमारतीचे निर्माण झालेल दिसते .
कोणत्याही मोठया शहराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाण्याची व्यवस्था ही पाण्याची व्यवस्था जागतीक स्तरावर विचार करायला लावणारी आहे .
     मुगल शासक अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी असलेले अब्दुल रहीम खान खाना याने जहागिर बादशहाच्या काळात १६ १५ मध्ये या शहरासाठी अदभूत अश्या योजनेच्या माध्यमातून " कुण्डी भंडारा " निर्माण केले .

रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून
पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।
                                  ४०० वर्षापूर्वी या भव्य दिव्य योजनेच्या निर्माण कर्त्याचे वरील काव्य आहे.पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या या कुंडी विशिष्ट अंतरावर ठेवत या कुंडीतून विहीरी प्रमाणे पाणी काढण्याची सोय केली हे पाणी शेती ,बाग,महल,सामान्य लोकासाठी उपलब्ध झाले .तयार करण्यात आलेल्या कुंडीत उतरुन साफसफाई करता येते .मागील काळात या योजने कडे दुर्लक्ष होते त्यात घाण व इतर बऱ्याच समस्या होत्या पण आता प्रशासनाने याची साफसफाई करून पर्यटनासाठी खुले केले आहे त्यातून परीसरातील गावाला पाणी पुरवठा होत आहे .पाणी अतिक्षय गोड व थंड आहे प्रशासनाने ८० फुट खोल नहर मध्ये उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली अाहे.
       कुण्डीत पाणी एका मुख्य हॉल सारख्या भागात जमा होते त्याचा धो धो आवाज अगदी स्पष्टपणे येतो. वायु दाबाच्या प्रणालीवर ही योजना आजही सुरू आहे .पूर्वी बऱ्हापूरात हे पाणी पोहचत होते पण आता काही भागात हे पाणी जाते कारण मधे बऱ्याच विहीरी व बोअर यामुळे याला फटका बसलेला दिसतो .
    सोबत या पाण्याच्या योजनेचा नकाशा दिला आहे की कशा पद्धतीने हे पाणी शहराच्या विविध भागात जायचे .यामध्ये सूखा भंडारा,मूल भंडारा,चिलाहरण भंडारा,कुंडी भंडारा हे भाग आहेत .याच कुंण्डी भंडाराला खूनी भंडारा सुद्धा म्हटलं जात याचं कारण पूर्वी त्या कुण्डीत खून झाले होते म्हणून स्थानिक त्याला खूनी भंडारा म्हणू लागले.
   अशी विस्मयकारी स्थळ प्रत्यक्ष पाहींली की एक वेगळी उर्जा शरीरात संचारते व मन पुढच्या मोहीमेकडे वळते .
    पुढच्या भागात आपण माहीती पाहू या अगबराच्याही अगोदरच्या काळात बांधल्या गेलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या प्रसिध्द शाही जामा मज्जीत विषयी..............


                       संजय खांडवे 
                        9011971122


रविवार, २४ मे, २०२०

हरीशचंद्रगड,साणंददरी निर्सर्गाचा एक महाअविष्कार



साधंण दरी सहयाद्रीतील एक निर्सगाचा महाअविष्कार !


भंडारदरा धरणाला वळसा घालत जात असतांना ढगात हरवलेले कळसूबाई


साम्रद येथून दिसणारा खुटा म्हणजे थम व त्या बाजूला दिसणारा रतनगड
साम्रद या ठीकाणी हिंदवी परिवाराचा दाखल झालेला ताफा व त्यामागे दिसणारा रतनगड व खुटा

त्या भागातील स्थानिक लोकांची पारंपारीक मालवाहतुक व्यवस्था








आशिया खंडातील क्रमांक २ ची ही साधंण दरी आहे,क्रमांक १ ची दरी ही नेपाळमध्ये आहे या दरीची लांबी २ कि मी आहे व रुंदी १० ते १२ फुट आहे काही ठिकाणी फारच अरुंद आहे,खोली ५०० ते ७०० फुटपर्यन्त आहे, अनेक लोक इथे ट्रेकींग साठी येतात हा कळसूबाई -हरिशचंद्रगड अभयराण्याचा भाग आहे .

आदरनिय आमदार दरवर्षी न चुकता आमच्यासोबत या मोहीमेत असतात,साधण दरीतून वर आल्यावर आमच्या मागच्या मावळयांची वाट पाहत आमदार बच्चू कडू साहेब व आम्ही निवांत अभराण्यात गप्पा मारतांना .


सायकाळी संपूर्ण भंडारदरा धरणाला फेरा मारुन येतांना सायंकाळचे दृष्य .


 

मोहीमेचा नकाशा

मोहीमेतील आमचे सहकारी प्रा सवडतकर सर,किशोर पवार सर ,रामदास काकडे सर

शनिवार, २३ मे, २०२०

शहाजहानने आपल्या लाडकी पत्नी मुमताजचे शव मृत्युनतर काही काळ याच ठिकाणी ठेवले

आऊखाना

बऱ्हानपूर शहरात ताप्ती नदीच्या काठावर शहराबाहेर आल्यावर ही ऐतिहासिक वांस्तु दिसते चारही बाजूने शेती आहे थोडा कच्चा रस्ता पार केला की संपूर्ण जवळपास आठ दहा एकर परिसराला बंदिस्त करणारी मजबूत तटबंदी आजही शाबूत आहे 
या वास्तुचे ऐतिहासिक महत्व असे सांगतात की शहाजहानची पत्नी मुमताजचे निधन याच परिसरात असतांना झाले ,त्यावेळेस मुमताजसाठी तयार होणारा महल पूर्ण झाला नव्हता ,तेव्हा ही वास्तु मुमताजचे शव ठेवण्यासाठी तयार करण्यात आली हाच तो आऊखाना 
इमारतीच्या चारही बाजूने पाण्याची रचना करुन इमारतीला असणाऱ्या तळघराच्या मध्यभागी त्यांना ठेवण्यात आले होते व नंतर ताजमहल पूर्ण झाल्यावर त्यांना आग्रा येथे नेण्यात आले .
   स्थानिक असे सांगतात खर तर ताजमहल येथेच बनणा२ होता पण शहाजहानच्या भूविशारदांनी पुढील काळात ताप्ती आपला प्रवाह बदलेल व महल नष्ट होईल म्हणूण तो आगरा येथे बनविण्यात आला.
    आऊ खाण्यासमोर एक महलही बघायला मिळतो ,या वास्तुची रचना ताजमहलाच्या आकाराचीच आहे .
    या ठिकाणी येणारे पाणी हे संतत चालू असायचे त्या काळात जमीनीखालून ४० फुट खोलातून नहर तयार केल्या गेल्या ,सपूर्ण बऱ्हानपूरला याच माध्य माने पाणी पुरविले जायचे .ही पाणी योजना "खूणी भंडारा" या नावाने ओळखतात ही नहर आपण सचित्र व शास्त्रीय दृष्टया कशी चालायची हे पुढील पोष्ट मध्ये बघूया !

जय जिजाऊ
             आऊखाण्याची तटबंदीची प्रशस्त भिंत
                            दुसरी बाजू
                     तटबंदीची आतील प्रशस्त जागा
             ताजमहल सारखा दिसणारा आऊखाना

            आऊखाण्यातील आतील भाग
    चारही बाजूने पाणी घेऊन जाणारा खोलगट भाग

                 पाण्यासाठीचे मोठे हौद

गुरुवार, १४ मे, २०२०

सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ ,शास्त्रकोविद स्वराज्यरक्षक शंभूराजे

सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ,शास्त्रकोविद स्वराज्यरक्षक शंभूराजे.....

      शेकडो वर्षापासून गुलामीत खितपत पडलेल्या या मातीत भोसले कुळवंशीयांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहीले ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी  तीन पिढया झटल्या तेव्हाकुठे आई जिजाऊंच्या प्रेरणेने ,शहाजीराजांच्या संकल्पणेने ,शिवरायांच्या धाडस,बुद्धीचातुर्य,विश्वास,अखंडसावधानतेच्या जोरावर स्वराज्य उभं राहीलं. ही काही सामान्य गोष्ट नव्हती !
 पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छंत्रपतींनी हे स्वराज्य आपल्या खांदयावर पेलून ठेवत स्वराज विस्तार केला.इतिहाचार्य वा सी बेद्रे यांचे शंभूचरित्रावरील संशोधन व लेखन हे शंभूचरित्राला योग्य दिशा देण्याच महान कार्यच आहे .इतिहासाचार्य कमल गोखलेही व इतिहाचार्य जयसिंगराव पवार सरही तेवढेच महत्वाचे !
‌"शहाजी महाराजांच्या महत्वकांक्षेतून सूचित झालेल्या व शिंवाजी महाराजांनी साकार केलेल्या हिंदवी स्वराज्याचा संभाजीराजे यांनी हिरेरीने सांभाळ केला".   

या एका वाक्यात मी खरे स्वराज्य रक्षक अनुभवले .
‌     अगदी बालपणा पासून आपल्या शंभुबाळाने असंख्य वादळे अनुभवली ,कुणाच्या वाटयाला येऊ नये येवढं दुःख एकटया शंभूराजांनी तुमच्या अामच्या कल्याणार्थ सोसले. कळतही नव्हतं त्या वयात मातृछत्र हरवलं , पुढं विदवत्ता व शौर्य हा दागिना धारण केलेल्या शंभूराजांनी ते पार करत अगदी आग्राभेटीचा थरार अन त्यानंतरचा स्वराज्यासाठी घडलेला अाग्रा ते राजगड प्रवासही आपल्या मृत्युच्या बातमीसह अनुभवला . पुढे त्यांनी गाजविलेला पराक्रम हा शद्वात बसवून सांगणेही शक्य नाही . पण अनेकांच्या लेखण्या शभूराजांचं विद्वत्ता व शौर्य लिहण्यास धजावल्याचं नाही उलट कथा,नाटकामधून वेगळेच चित्र रंगविले गेले पण सत्य जास्त काळ लपवून ठेवता येत नसत कारण असत्याला बुड नसतं ते कुठही लवंडतेच ! इतिहास हा साधनावर लिहला जातो ,संदर्भावर तपासला जातो तुमच्या आमच्यासारखी माणसं हया साधनांना,साहित्याना,संदर्भाना आपल्या बुध्दीपटलावर घासतात मगचं स्वीकारतात ,म्हणून हे शक्य झालं .
‌         शंभूराजांनी एकही लढाई हरली नाही आपल्या तलवारीच्या पात्यावर स्वराज्य पेलले,मोगल ,इंग्रज,पोर्तुगीज ,सिध्दी यांना सळो की पळो करून सोडले होते ही शौर्याची,पराक्रमाची व धाडसाची एक बाजू खूप महत्वाची आहे यात अर्कज्ञ शहाजीराजे,मॉसाहेब व छत्रपती शिवरायांच्या कार्याचा वारसा त्यांना खूप काही देवून जातो  या पराक्रमावर संदर्भ घेंत खूप काही लिंहणं अजूनही बाकी आहे असं मला वाटतं .
‌        ज्या वयात तुम्ही आम्ही घरातले बाळ होतो त्या वयात शंभूराजांनी संस्कृत भांषेवर प्रभूत्व मिळवून " बुधभूषण " या संस्कृत ग्रंथाची निर्मिती म्हणजे शेकडो वर्षानंतर या मातीमधली प्रतिभा उजळण्याचे साहित्य क्षेत्रातील महान कार्य होते अगदी प्रत्येक भारतीय कुटुंबाने हा ग्रथ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा मन -मस्तिष्का पर्यन्त पोहचवावा असाच आहे. भोजपूरी भाषेतील नखशीख,नाईकाभेद,सातसतक या सारख्या महान ग्रंथांची निर्मिती ह्या साहित्यवीराने केली .
‌जगातील बहुतांश भाषेचे ज्ञान शंभूराजेंना होते .संस्कृत इतकिच हींदी भाषेचे ज्ञानही त्यांना होते .केशव पुरोहीत यांनी "राजाराम चरितम" या ग्रंथात शंभूराजांना सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ व शास्त्रकोविद असे म्हटले आहे .
‌      शंभूराजांचा बुधभूषण हा ग्रंथ अनुवादक डॉ प्रभाकर ताक़वाले सर यांचा अथक परिश्रमातून व संपादक अँड शैलजा मोळक व जिजाई प्रकाशन यांच्या माध्यमातून हातात आला . शंभूराजांच्या संस्कृत श्लो काचा अर्थ व अन्वयार्थ वाचकापर्यन्त पोहचला.हे एक ऐतिहासिक कार्यच म्हणावे लागेल. या साठी मराठा सेवा संघाचें संस्थापक शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर साहेबांची  अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे या ग्रंथामधून शंभू राजाचे विविध क्षेत्रात असलेले अगाध ज्ञान लक्ष वेधणारे आहे . 
‌पहिल्या अध्यायात आलेला ४ था श्लोकात शंभूराजे म्हणतात
‌अज्ञान कृष्णसर्पेण दंशिता भुवि मानवा :।
‌तेषा जीवन हेत्वर्थम नौमि जांड़गुलिकं गुरुम ।।
‌ अर्थ : या पृथ्वीवरी माणसे अज्ञानाच्या कृष्णसर्पने डसली गेली आहेत ,त्यांना जीवंत ठेवण्यासाठी गुरू नावाच्या विषवैदयकाची हेतुपुरस्पर निवड केली आहे त्यास मी नमन करतो यामधून अथांग ज्ञानसागररूपी छत्रपती ज्ञानार्जनाचे मोल लक्षात अाणून देतात.प्रस्तुत ग्रंथात संभाजीराजे विविध विषयावर भाष्य करतांना दिसतात ,यावर स्वतंत्रपणे लिहणे आवश्यक वाटते.एकटा बुधभूषण मधील भाष्य बघितले की शंभूराजे म्हणजे प्रकांडपंडीत विदवत्तेचे महामेरु आहेत हे लक्षात येते .
‌यामध्ये
‌राजनीति वरील भाष्य
‌देव देवतांना पूर्वजांना वंदन
‌स्वकुलावर काव्य
‌राज्यांची अंगे
‌राजाचे सहाय्यक
‌अमात्य
‌राजपुत्र  शिक्षण व त्याचे कर्त्यव्य
‌दुर्ग संपत्ती,दुर्ग प्रकार
‌दुर्ग रचना,धान्य कोठारे
‌दुर्गाध्यक्ष
‌राजाची कर्त्यव्य
‌राजाचे दोष
‌राजावरील संकटे
‌राजाचे आक्रमण
‌प्रकिर्ण ज्ञान
‌पशु,पक्षी,वनस्पती विषयी ज्ञान
‌आदी बाबीवर शंभूराजांनी भाष्य केले आहे हे प्रत्येक शिवशंभूप्रेमीनी नककीच अभ्यासावे .
‌ अर्थात  सकलशस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांनी अगाध ज्ञानाची निर्मिती केली अाहे .तीचा सखोल अभ्यास होऊन समोर येणे गरजेचे अाहे
‌आज एकत्रितपणे शंभूराजांचे साहित्य कुठे उपलब्ध नाही .यावर विचार होउन त्याची माडणी होणे गरजेचे आहें 
‌आज बुध्दीरूपी दागिना परिधान केलेल्या बुधभूषणकार छत्रपतीची जयंती 
‌जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
‌जय जिजाऊ
‌जय शिवराय
‌जय शंभूराजे

‌                                    संजय खांडवे
‌                                    9011971122
‌        

"

शनिवार, २१ मार्च, २०२०

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची माझी जीवनगाथा :अल्प परिचय




प्रबोधन कार केशव सिताराम ठाकरे  म्हणजे महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते असेच म्हणता येईल त्यांनी  ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे
    प्रबोधनकारांचे चरित्र खूप प्रेरणादायी वाटते सुरूवातीस प्रबोधनकाराबद्दल केवळ ऐकूण होतो पण त्यांचे साहित्य वाचत असतांना प्रबोधनकार म्हणजे एक विद्यापिठच वाटू लागले .प्रबोधनकार म्हणजेच शिवसेना प्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील या ठाकरे घराण्याने महाराष्ट्राला बरच काही दिलय !
     याच उत्सुकतेतून प्रबोधनकांरांचे समग्र वाड़मय भाग एक हाती घेतला व वाचायला सुरुवात केली यामध्ये एकूण २१ प्रकरणे आहेता विभागवार तपशीलासह मांडणी आहे .कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभलेली आहे त्यांत त्यांनी "समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि होते जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात
    कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "
या पुस्तकातून असंख्य गोष्टीचा उलगडा होताना दिसतो आज प्रबोधनकार के सी ठाकरे यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे प्रेरणादायी जीवनगाथा जरुर वाचावी...........

तुर्ताच एवढेच ........
प्रबोधनकारास मानाचा मुजरा


       
     

शुक्रवार, २० मार्च, २०२०

जंजाळा किल्ल्यावरील त्या शिल्पाचा गोंडवाना राज्याशी जुळलेला काय इतिहास असेल ? एक भ्रंमंती मधील प्रश्न

 जंजाळगडाचा वेताळगडाकडे जाणारा दरवाजा
 गडावरील मुख्य इमारती वरील हत्तीवर सिह स्वार असलेले शिल्प
 महादरवाज्याकडे दरीतून जाताना
 महादरवाज्याकडे जातांना
   गडावरील दक्षिण बाजूस असलेला तलाव
 गडाच्या मध्यभागी असलेला राणी महलचा भाग
  हत्तीवर सिंह स्वार असलेले शिल्प
 सय्यदपीर बाबा दर्गा जवळ लेखअसलेले शिल्प

 सय्यदपीर बाबा दर्गा जवळ असलेला तलाव
                         गडाचा मध्य भाग
                       गडावर भ्रंमती करतांना


             दक्षिणेकडील गडाचा दरवाजा
सायंकाळी गडउतार होताना
गोंडवाना राज्याचे चिन्ह या प्रकारचे आहे





जंजाळा किल्ला /वैशागड /तलतम गड

वेताळगड -रुद्रेश्वरलेणी हा प्रवास करत दुपारी ३ वाजता वेताळवाडी गावात आलो व सोयगावकडे निघालो वाटेत एका ठिकाणी बऱ्याच प्राचीन समाध्या दिसल्या .त्या कुणाच्या असतील हया हेतूने जाणुन घ्यावे म्हणून आम्ही चौकशीसाठी थांबलो  ,त्या ठीकाणी स्थानिकानी काही माहीती समाधानकारक दिली नाही पण तुम्ही जंजाळा किल्ला आता जाऊ शकता असे सांगितले म्हणून आम्ही निघालो.
           हळदा -अंभई -विरगाव -जंजाळा गाव असा दिड तासाचा प्रवास करत जजाळा गावांत पोहचलो .गावातून किल्ला सहज दिसतो त्या गावातून पाहताना किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील वाटत नाही कारण इतर तीन बाजूला हा गिरीदुर्ग आहे गावात पुरेसे पाणी सोबत घेऊन शेतामधून वाट काढत ,अगदी गाडी खाली बऱ्याच ठिकाणी घासत आम्ही किल्ल्याच्या जवळपास पोहचलो ,शेतात काम करणारी माणस आमच्याकड कुतुहलाने बघत होती ,या किल्याकडे कुणीही भटकत नसावं हा आमचा अंदाज खरा ठरणार याची यात्री आम्हाला दक्षिण बाजूचे प्रवेश द्वार पाहून झाली .प्रचंड तटबंदी मधून हा दरवाजा आहे पण दरवाज्याचे अवशेष मात्र दिसत नाही .या ठिकाणावरून पुढे गेले की गडाचा पूर्ण भाग दिसायला लागतो गडाच्या पूर्व व पश्चिम बाजूस खोल दऱ्या दिसतात ,पश्चिमेकडील बाजू चढण्यास फार कठीण आहे ,गडाची ही एक भक्कम बाजू आहे या बाजूने शत्रु चालून येणे अशक्यच ! पूर्वबाजूस वेताळगड पूर्ण दिसतो ,अगदी त्या गडावरील बहुतेक हालचाली सहज समजत असाव्यात असे वाटते .संपूर्ण गडाला मजबुत अशी तटबंदी असावी ,कारण काही ठीकाणचे अवशेष सोडले तर तटबदी आजही शाबुत आहे . 
      दक्षिण बाजूला सुरुवातीलाच एक तलाव आहे मार्च मध्येही या तलावात बरेच पाणी होते त्या भागातील व जंगलातील प्राणी या ठिकाणी पाण्यासाठी येतात . तलावाच्या काठापासूनच दाट झाडीत जुन्या इमारतीचेच अवशेष दिसतात .गडावर पूर्वी फार मोठी वस्ती असावी असे यावरुन दिसते .आम्हाला पूर्वबाजूस म्हणजे वेताळवाडी किल्याच्या बाजूला दाट झाडीत गडाचा प्रचंड असा दरवाजा दिसला ,आम्ही तटबंदीमधून रस्ता काढत दरीत उतरलो व पाऊलवाटेचा आसरा घेत दरवाज्या पर्यन्त पोहचलो .दोन्ही बांजूने प्रंचंड बुरुज व आत गेल्यावर उत्तरेकड उघडणारी दरवाज्याची कमान दिसली ,दोन्ही बाजूने इमारती ,त्याखाली गुप्त असलेली मोठी खोली होती आत काय असेल याची खात्री नाही कारण जगली भाग आणि आजूबाजूला कुणीही गडावर वावरणारे किवा स्थानिकही नाही ,कोरिवकाम केलेले दगड खाली पडलेले ,त्यामधून झाडे वर आलेली,दरवाजा सुद्धा झाडाझुडपानी बंदीस्त होता  आम्ही पुढे निघालो ,व बालेकिल्यासारखा दोन मोठया बुरुजावर पडक्या इमारती होत्या ,त्या बुरुजाच्या अवतीभोवतीसुद्धा काही बांधकामाचे अवशेष तेथे होते .
  गडावरील त्या बांलेकिल्ल्याच्या बुरुजावर एक शिल्प होते यात सिहाने आपल्या पंजामध्ये हत्तीला पकडलय  ! (हत्तीवर सिंह स्वार) याविषयी पुढे आम्ही जी माहीती घेतली की या प्रकारचे शिल्प हे प्राचीन गोंडवाना राज्याचे राज्य चिन्ह आहे . आमच्या सोबत मोहीमेत असणारे आमचे मित्र राजेश साळवे सरानी हे खात्रीपूर्वक सांगितले .गोडराजाचे मध्यभारतात मोठे साम्राज्य होते .या गडाच्या इतिहासाबाबतीत आम्हाला असलेल्या माहीती नुसार १५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते या किल्ल्यावरुन दुरवरचा भाग न्याहळता येतो विस्ताराने मोठा असलेल्या या किल्ल्याला जरंडीगावाच्या बाजूने ,सोयगावच्या बाजूने ,वेताळगडाच्या बाजूने व जंजाळा गावाच्या बाजूने दरवाजे आहेत फारशी भाषेतील  तीन अोळीचे शिलालेख ही आढळतात .स्थानिकाच्या माहीतीनुसार ५२ बुरुज या किल्याला आहे.एक चोर दरवाजा ,राणी महल,पडक्या सहा खोल्याचा वाडा  ,सय्यद कबीर पीर दर्गा, तीन पाण्याचे तलाव या ठिकाणी आहे. आम्ही त्या पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत होता . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसली .थोड चालत गेल्यावर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम असलेले ते प्रार्थनास्थळ असावे समोरच गडावरील दुसरा तलाव आहे .
   सूर्य मावळंतीला आला होता अंधार पडू नये म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे गडउतार होण्यास निघालो वाटेत गडावरील सय्यदपीर बाबाचा दर्गा लागला तेथेच फारशी भाषेतील शिलालेख आहे . बाजूलाच खोल खोदलेला पाण्याचा गडावरील तिसरा तलाव आहे .अंधार पडत चालला होता तेथून आम्हाला वाकाटक काळातींल ,पाचव्या शतकातील घटत्कोच ही बौध्द लेणी खुणवत होती ,जजाळा गावापासुन अर्धा तास पायी अंतरावर होती पण अंधारा मुळे पुढच्या मोहीमेतील एक भाग म्हणून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..............


क्रमशः

संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...