पातुर येथील नानासाहेबांचा वाडा
➖➖➖➖➖➖
स्थान : ता पातुर जि अकोला , अकोल्यापासून ३३ कि .मी , खामगावपासून ६९ कि .मी .
➖➖➖➖➖➖➖
पाणिनीच्या अष्टाधायी नुसार वास्तु हा ' वस' या धातू पासून आला आहे . वसन्ति यत्र मानवा: अश्या अर्थाने देखिल वास्तु हा शब्द वापरला जातो . अगदी झोपडी पासून सदन , भवन, वाडा , हवेली,महल, प्रासाद , राजमहल ही मानवी अधिवासाच्या वास्तु आहेत . यामध्ये महल हा अरबी शब्द आहे . हवेली हा फार्शी मधून आलेला शद्ब आहे या दोन्हीचा अर्थ मंदिर , वाडा अथवा सुशोभित , सुरक्षेसह सर्व सुख सोईने युक्त अशी त्या स्थानिक परिसरातील महत्वाच्या कुंटुंबाचा वंश परंपरेनुसार चालत असलेला अधिवास असतो . ग्रीक व रोमन संस्कृतीत मधे उघडा चौक ठेवून प्रासाद व चारही बाजूने इमारतीची रचना ठेवण्याची पद्धत होती हवा खेळती राहणे व सुरक्षा हा त्या मागचा उद्देश राहत असे .
नैसगिक गुहा ,वर्षावास, मानव निर्मित शैलगृहे , लेणी , गड दुर्ग, मंदिरे या क्रमाने मानवी अधिवासाचा प्रवास स्थानिक परिस्थिती नुसार राहीलेला दिसून येतो . मध्ययुगीन कालखंडात हवेली , महल, वाडा या सारख्या वास्तु मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या त्या काळच्या सामाजिक , राजकीय परिस्थिती नुसार राजे , अमात्य, 'सरदार , जहागीरदार , मामलेदार आदि महत्वाचा लोकांनी याचे निर्माण केले . एखादा सरदार मोहीमेवर जातांना घरातील कुटुबियांच्या सुरक्षेसाठी वाडा , गढी यासारख्या मजबुत तटबंदी , बुरूज व दरवाज्यासह सज्ज असलेल्या वाडयात वास्तव्य करत असत . वेळ प्रसंगी त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग देखील अनेक वाड्या मधून काढलेले असत . घडीव दगड , विटा , जुना, माती तथा सागवानी लाकडांचा कलात्मक पद्धतीने वापर करून वाडे बनविले जात असत . महाराष्ट्रातील सर्वच भागात असे वाडे आजही बघायला मिळतात .राजस्थान , मध्यप्रदेश , गुजरात मध्ये राजघराण्यांचे मोठे सुसज्ज तथा शिल्पकलेचा अप्रतीम संगमातून महल तथा राजवाडे आजही चांगल्या स्थितीत आहेत . इंदौरचा होळकरांचा वाडा त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्रातही चांदवड येथील भव्यदिव्य वास्तु मन प्रसन्न करते.येवल्यामधील दगडी वाडे , सासवड तथा पुणे परिसरात ही अश्या सुंदर वास्तु आहेत . पैठण , परभणी, जालना , पंढरपूर , सोलापूर, सातारा, सांगली या भागातही भ्रमंती करतांना अश्या अनेक वास्तु आहेत बहतेक वाड्यामधे वंशपरंपरेने वास्तव्य देखील सुरु आहे . व्यक्ती अथवा घराण्याच्या नावाने वाड्यांची ओळख दिली जाते .
अशीच एक सुंदर वास्तु आकाराने जरी मोठ मोठ्या वाड्या पेक्षा लहान असली तरी वास्तुशास्त्राचे सुंदर रूप वऱ्हाड प्रांतात बघायला मिळाले .पातुर येथील प्राचीन लेणी समूहाला भेट देण्यासाठी गेलो असता बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे असे पातुर शहर की ज्याला सुवर्णनगरीदेखील म्हणतात .याच पातुरला नानासाहेबांचे पातुर असेही ओळखतात . लेणीच्या समोरच उंच टेकडीवर रेणुका आईचे ठाणे आहे . या ठिकाणी आईचा मोठा उत्सव असतो . त्याच्याच पाठीमागे नानासाहेबांचा प्राचीन वाडा आहे . वास्तुकलेचा हा अप्रतीम नमुना आहे .वीटा,दगड,चुना व माती मध्ये बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराजवळून हा वाडा प्रतिकृती रुपाने अगदी सुंदर दिसतो .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .
वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे मजबूत लाकडात हे बनविले गेले आहे .त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त असून , त्या बंदिस्त तरबंदी वर ऐसपैस जागा आहे व त्या खाली सुंदर विटांचे छत कमानी सह आहे . वर जाण्या साठी पायऱ्या आहेत .चार कोपऱ्यावर चार मजबूत बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .नानासाहेब हे पातुर येथील श्रद्धास्थान (संत विभूती)मानले जातात त्यांची समाधी म्हणजे हा मंदीर स्वरूपाचा वाडा आहे त्याला स्थानिक लोक नानासाहेबाचे मंदीर किंवा नानासाहेबांचा वाडा असेही म्हणतात . स्थानिकाच्या माहीतीनुसार या ठिकाणी मोठी यात्रा भरायची ती यात्रा एक महीना चालायची बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .ही मुर्ती शिल्प कलेच अप्रतीम उदाहरण आहे .
संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना अवश्य बघावा असा हा वाडा आहे. अश्या वास्तुंचे जतन व संवर्धन झाले पाहीजे .
संजय खांडवे



