शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

*शरद पौर्णिमा: एक महोत्सव*

 *शरद पौर्णिमा: एक महोत्सव*



चंद्र आणि पृथ्वी या दोघांचं अतूट नातं आहे. पृथ्वीतलावर राहणारे जीव या चंद्राशी अनादी अनंत काळापासून जुळलेले आहेत. पृथ्वीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी चंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचे सौंदर्य हे चंद्रा मुळेच बहरले गेलं आणि या पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारे सौंदर्य हे तर फार मोठे विलोभनीय! हा झाला विज्ञानाचा भाग, अनादी अनंत काळा पासून जगातील जवळपास सर्वच धर्मामध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. काल गणना देखील चंद्राच्या कलेशी संबंधित आहे. डोंगर, दऱ्यात ,वाडी, वस्तीमध्ये विकसित होत जाणारे आमचं लोकजीवन हे चंद्राच्या अमावस्या आणि पौर्णिमा यावर चालत आले आहे. आपले आजे- पंणजे हे त्यांच्या जीवनातील घडलेल्या महत्त्वाच्या घटना  कालबद्ध करत असताना पौर्णिमेच्या अगोदर इतके दिवस पौर्णिमेच्या नंतर तितके दिवस अशा स्वरूपामध्ये संचित ठेवायचे. आपले बहुतेक सण आणि उत्सव हे पौर्णिमा किंवा अमवश्या या सणाशी संबंधित आपल्याला दिसतात यामध्ये राखी पौर्णिमा ,वटपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा तशीच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा येते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी ही अद्वितीय पौर्णिमा आहे. आपण साजरे करत असणारे सण हे कृषी परंपरेशी आपली नाळ जोडणारे आपल्याला दिसतात. त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा देखील आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. अश्विन शु. पौर्णिमा म्हणजे निरभ्र, निकोप, स्वच्छ ,सुंदर वातावरणात निसर्ग खुलून दिसावा असा हा क्षण ! धरती मातेने मानवाला धन धान्याच्या रूपात दिलेला प्रसाद म्हणजे घरे धन -धान्याने रूपाने भरभरून गेलेली आहे. निसर्ग आनंदी आहे आणि माणूसही आनंदी आहे. गाई -म्हशी दूध -दुपत्यांनी युक्त झालेल्या आहेत. नदी- नाले प्रचंड तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रही अगदी स्वच्छ झाले आहे. निसर्गात चोही बाजूंनी सुगंध दरवळत आहे. चांदणी रात्र ,निरभ्र आकाश सर्वकाही आल्हाददायक आहे. या आनंदी वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत , उत्सव साजरा करणारा सण म्हणजे "कोजागिरी पौर्णिमा", अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतीय परंपरेत या सणाला विशेष असे महत्त्व आहे .उद्यान, एखाद्या मोकळ्या जागी किंवा उंच ठिकाणी सर्व जण एकत्रित येऊन रात्रीचे जागरण करत हा सण साजरा केला जातो. दूध- दुपत्यांचा काळ असल्यामुळे संथ आहारावर दूध आटवत या निरभ्र चांदण्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात हे दूध आटवले जाते आणि गप्पागोष्टी, प्रबोधन, गाणी, लोकगीते ,प्रवचन ,कीर्तन या माध्यमातून ही रात्र जागवली जाते. गुजरात मध्ये गरबा उत्सवाच्या माध्यमातून जागरण करून ही पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या भारतीय धार्मिक परंपरेनुसार रात्री लक्ष्मी माता घरोघरी जाणार आणि कोण कोण जागी आहे ? याची विचारणा करणार." को जागर्ति" म्हणजेच कोण कोण जागे आहे? याची विचारणा करणे असा अर्थ होतो. मानवाच्या कृतीशीलतेची ही चाचपणी या ठिकाणी होते .अश्विन प्रतिपदे पासून ते दशमी पर्यंत स्त्री- शक्तीचे महत्त्व आपल्या सण -समारंभामधून दिसते तेच पुढे या अश्विन पौर्णिमेत सुद्धा प्रतीत होताना दिसते .येथेही स्त्रीशक्ती रूपानं लक्ष्मी मातेचे आगमन होऊन ती आपल्या प्रजाजनांची विचारणा करते.  दारात उभी राहून त्यांना दर्शन देते, दारात आलेली लक्ष्मी परत जाऊ नये म्हणून हा जागरणाचा उत्सव आपण प्राचीन कालापासून करत आलेलो आहोत. त्या दिवशी लक्ष्मीपूजनालाही महत्व असते. प्राचीन पुरानानुसार महिषासुर मर्दिनी मातेची देखील कथा याबाबतीत सांगितली जाते. महिषासुरमर्दिनीचे जागरण या दिवशी केले जाते. आपल्या पूर्वजांनी लक्ष्मीचा अर्थ केवळ धन,दौलत अशा भौतिक बाबी किंवा सुख, समृद्धी असा नसून तो आपल्या जीवनमानाशी देखील संबंधित आहे. आपण जीवन जगत असताना कोणताही मोह ,माया, द्वेष ,मत्सर आदी च्या अधीन जाऊ नये. त्यापासून मुक्त असावे चंद्रा प्रमाणे शितल आणि स्वच्छ असावे. आपण चंद्राप्रमाणेच देणाऱ्याची भूमिका आपल्या जीवनात पार पाडावी. ऋतू परिवर्तनाचा मध्य साधणारा हा सण एक बौद्धिक , कला व विकास सामाजिक विकास साधणारा आहे. आपल्या प्राचीन लोकसंस्कृतीचा अभ्यास करत या लोकसंस्कृतीच्या खुणा जर आपण शोधू शकलो तर ही कृषी परंपरा आपल्या धार्मिक परंपरे ला कशी सलग्न आहे हे स्पष्टपणे जाणवते. 16 कलेमधून जाणारा हा चंद्र देवादिदेव आधी योगी महादेवांच्या शिरावर शोभून दिसतो. प्रकाशमान असलेला चंद्र त्याच्या शीतलतेतून आमच्याही जीवनमानामध्ये शितलता निर्माण करतो .


बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

शक्ती रुपे*

 *शक्ती रुपे*


भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

    रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .

१)महालक्ष्मी


सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .


२)नंदा

ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.


३)क्षेमकरी

चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.


४) शिवदुती

ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .


५)महाचंडी

ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .


६)भ्रामरी

ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.


७)सर्वमंगला

चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .


८)रेवती

दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .


९) हरिरिध्द

ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.

अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .

सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे  एका श्लोकामधे सांगितली आहे .


प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।

तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥

पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।

साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥

नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।

उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥


वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'


माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'


व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'


व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'


सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'


सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'


गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '


नंदी वाहन असलेली 'महागौरी '


कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'


ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा

ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.

भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.



संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून



संजय खांडवे

विजयादशमी :एक प्राचीन परंपरा* 〰️〰️〰️〰️〰️

 *विजयादशमी :एक प्राचीन परंपरा*

〰️〰️〰️〰️〰️


धन्य आजि दिन ।

जाले संतांचे दर्शन।।

 जाली पापातापा तुटी।

 दैन्य गेले उठाउठी।।

 जाले समाधान।

 पायी विसावले मन।।

 तुका म्हणे आले घरा। तो चि दिवाळी दसरा।।



 संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात दिवाळी, दसरा या दोन्ही सणाचा उल्लेख येतो .यामध्ये जगद्गुरु म्हणतात संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्यतेचा असतो. सगळी पाप- ताप  नाहीसे होत असतात आणि आपल्या जीवनातील दिनवाण्या  गोष्टी  दूर होतात आणि या संतांच्या पायी मन विसावलं की त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होतं. जीव सुखावतो . त्यांचं घरी येणं म्हणजे तोच आपला दिवाळी आणि दसरा आहे. प्राचीन काळापासून दिवाळी आणि दसरा हे सर्वात मोठे सण मानले जात होते. संतांचे घरी येणे याचा संमंध जगद्गुरुंनी दिवाळी आणि दसरा या सणाची जोडला आहे. यावरून आपल्याला प्राचीन काळातील चालत आलेल्या या सणांचे महत्त्व समजते. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव हे कृषी परंपरेशी निगडित आहेत जवळपास सर्वच सण हे कृषीशी नाळ जोडलेले आपल्याला दिसतात. सण आणि उत्सव हा समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळातील एक कौटुंबिक व समाज जीवनाशी समरस असलेला भाग आहे. अश्विन प्रतिपदे पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती पूजेचा कालखंड मानला जातो. शरद ऋतूमध्ये येणारा हा शक्ती पूजेचा उत्सव म्हणजे या काळात सृष्टी अत्यंत प्रसन्न झालेली असते. वर्षाकाळ संपून गेलेला असतो शेतकऱ्याच्या शेतात समृद्धी आणि संपन्नता ही ओतप्रत भरलेली असते सर्व बाजूने आनंदच आनंद असतो हा सर्वकाळ सुखाचा असतो. शेतीचा शोध स्त्रीने लावला. तिने तिच्या निरीक्षणातून हे संशोधन घडवून आणले. नवरात्रात नऊ दिवस मातीमध्ये नऊ प्रकारचे धान पेरून एक प्रकारे त्या धानाची उगवण क्षमता तपासली जाते की काय असेच वाटते.  स्त्री व माता म्हणजे भूमाता या सृजनतेच्या प्रतीक मानल्या गेल्या. नवनिर्मितीचा हा काळ मातृ शक्तीशी जोडणे सहाजिकच आहे. कोल्हापूरची अंबाआई, तुळजापूरची भवानी आई, पुण्याची जोगेश्वरी, आंबेजोगाईची जोगाई, माहूर, वणी ही जशी आपली शक्तीपीठे आहेत तशीच प्रत्येक गावागावात जाखाई,भोनाई, जोखाई, डोंगराई, मसाई, वांजाई, सोजाई, खामजाई, रेणुकाई, काली, मातृका, यल्लमा, मरीआई ,मरदडी, तेलाई, पोलरमा, शिवाई ,तुकाई,आजुबाई अशी प्रत्येक गावोगावी देवीची दैवत आपण अनादी अनंत कालापासून पूजत आलो. या दैवतांच्या सानिध्यात राहून आपण आपले कौटुंबिक संस्कार जसे लग्न ,मुंज ,जावळे ओटी भरणे, जोगवा मागणे जणूकाही त्यांच्या उपस्थितीतच करत आहोत असे जाणवते. त्या गावची लेक बाळ एकदा का होईना बाळ जन्मल्यानंतर त्याचं मस्तक  आईच्या पुढे टेकून आणते . आईचं ओटी भरणे आणि दहीभाताच बोनं देणे ही ती माऊली कधीही विसरत नाही. या परंपरा आपल्याला हेच दर्शवितात म्हणून नवरात्र हा शक्तीच्या कृतज्ञतेचा उत्सव मानला जातो.

        आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा या नवरात्रातील दहाव्या दिवशी येणारा महत्त्वाचा सण मानला जातो.

" दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा."

       बालपण चा प्रसंग आठवतो एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही त्या काळात दसरा साजरा करण्यासाठी आमच्या आई-वडिलांसोबत आम्हीही गावाकडे सर्व एकत्रित यायचो. सर्वांनी नवीन कपडे घेतल्याचं कुतूहलही असायचं. त्यावेळेस  अगदी दुपारपासूनच घरच्या बैलगाड्या सजवण्याची लगबग सुरू होत असे. लाकडी बैलगाड्यांना गेरूच्या रंगाने रंगवून त्यावर चुन्याचे ठिपके मारून बैल जोडी अगदी पोळ्या मधल्या बैलांसारखी सजवून आम्हाला कामावरचा गडी त्या बैलगाडीत बसून शेताकडे शिलंगण खेळण्यासाठी घेऊन जायचा.गावातील पाच पन्नास गाड्या त्या वाटेने धुराळा उडवत धावत जायच्या आणि आपल्या शेतात असलेल्या आपट्याच्या झाडाची पानं तोडून सोनं म्हणून आम्ही ती लुटायचं याशिवाय शेतात असलेल्या ज्वारीची पानं आणि कंणस सोनं म्हणून घरी घेऊन यायचो. घरी आल्याबरोबर ती आपल्या दैवतापुढे ठेवून घरी ओवाळणी केली जायची व सर्वप्रथम मारुतीला हे सोन अर्पण करून सायंकाळी घरातील व शेतीच्या उपयोगी असणाऱ्या शस्त्रांचे पूजन करायचे. संपूर्ण गावभर आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांच्या आशीर्वाद साठी आम्ही फिरायचो असा हा आम्ही अनुभवलेला दसरा सण अजूनही स्मरणातून जात नाही.

       विजयादशमी या सणाला काही पौराणिक सांस्कृतिक व ऐतिहासिक सुद्धा महत्त्व आहे. विजयादशमी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जातो . धार्मिक मान्यतेनुसार अश्विन शुद्ध दशमीला याच दिवशी रामाने रावणाला हरवून विजय प्राप्त केला होता. महाभारतात पांडवांनी याच दिवशी आपला अज्ञातवास संपल्या नंतर शमीच्या झाडाच्या डोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून ती सर्व शस्त्रे स्वच्छ करून  पूजनानंतर धारण केली होती. म्हणून शमीच्या झाडांची म्हणजेच आपट्याच्या झाडांची पाने याला विजयादशमीच्या सणामध्ये विशेष महत्त्व आहे. दशमीचे दिवशी पुरुषांनी ईशान्य दिशेला जाऊन शमीच्या वृक्षाखाली अपराजिता देवीची यथाचीत पूजन करावे म्हणजे  अपराजिता आपल्याला विजयाचा आशीर्वाद देते. अशी ही एक परंपरा काही ठिकाणी बघायला मिळते की त्या शमीच्या वृक्षाची पूजन केल्यानंतर वृक्षाच्या मुळाशी असलेली ओलसर माती पूजेच्या अक्षतासह घ्यावी  व ती वाजत- गाजत घरी आणावी. असेही शमी पूजन काही ठिकाणी केले जाते. विजयादशमीला शस्त्र पूजनाला विशेष असे महत्त्व असते.आपापल्या व्यवसायाशी निगडित असलेली साहित्याची पूजन त्या काळामध्ये केले जाते. पावसाळा संपला की शरद ऋतुला प्रारंभ होत असतो म्हणून  लढवय्यांच्या अंगी  उत्साह संचारत असे. लढाईसाठी लागणारी शस्त्रे पावसाळ्याच्या काळामध्ये वापरात येत नसत म्हणून ती आता बाहेर काढून सीमाल्लोघन करण्यासाठी स्वच्छ करून सज्ज ठेवत असत.

        आपल्या भारतात हिमालयापासून अगदी कन्याकुमारीपर्यंत विजयादशमी साजरा होत आलेली आहे. एवढेच नव्हे तर नेपाळमध्येही नवरात्र व दसरा साजरा केला जातो .तामिळनाडूमध्ये नवरात्र सण हा मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. म्हैसूर मधील दसरा हा जगप्रसिद्ध आहे. चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला अशी दंतकथा या म्हैसूरच्या बाबतीत सांगितली जाते. म्हैसूर राज्याची कुलदेवता असलेली चामुंडेश्वरी ही म्हैसूर मधील चामुंडी डोंगरावर वसलेली आहे. त्या ठिकाणी तिचे भव्य मंदिर आहे.  शहराच्या नावाची रूपे अशाच पद्धतीने बदलत गेली महेश मंडळ मग महेश पूर आणि आताचे म्हैसूर असे महिषासुरमर्दिनीचे निवासस्थान म्हणून म्हैसूर शहराला मानले जाते. बेळगाव मध्ये ही दसरा साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. राजस्थान हा शक्ती व शौर्याचा उपासक असलेला प्रदेश आहे. राजस्थानमध्ये ही नवरात्राला विशेष असे महत्त्व आहे येथे 'खडग' स्थापनेची परंपरा आहे. नऊ दिवस या खडगापुढे  दीप स्थापना करून ती परंपरा जपली जाते. हा नंदादीप अखंड नवरात्रीमध्ये तेवत ठेवला जातो .या काळात व्रत व खानपनाची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी आहे. उत्तर भारतात विजया दशमी व नवरात्र या काळात रामलीलाचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेशांमध्ये 'नौरता' म्हणजेच नवरात्र 'गरभा' या भावना आविष्कारातून  हा विजयादशमी पर्यंत साजरा करण्याची परंपरा आहे . गुजरात मध्ये विशेष करून विविध प्रकारचा गरभा या काळामध्ये खेळला जातो .आंध्र प्रदेश मध्ये जवळपास महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो तीच परंपरा आपल्याला दिसते. बुंदेलखंडामध्ये याला 'सुअरा' असे म्हणतात. हिमाचल प्रदेशातील 'कल्लूचा' दसरा आहे. मनाली येथे विजयादशमीचे कार्य 'हिडंबा' देवी शिवाय पूर्ण होत नाही अशी परंपरा आहे. याच हिडिंबा देवीचा भाद्रपद शुद्ध द्वितीया मासारंभामध्ये मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पारध या गावी मोठा उत्सव होत असतो.

      तुळजापूरची तुळजाभवानी आई व कोल्हापूरची अंबाई मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून तर दशमी पर्यंत मोठ्या प्रमाणात विविध परंपरेंची रेलचेल असते नवरात्रात गोमुखाजवळ पाच घट आणले जातात . एक सभा मंडपाच्या ईशान्येला दुसरा देवी समोरील शिव मंदिराजवळ तिसरा तिसरा  त्रिशूलाचा ओवरीत आणि इतर टोळ भैरव मंदिर आणि मातंगी मंदिर याजवळ हे घट बसविले जातात. ही तुळजाभवानी मंदिराची परंपरा आहे असेच घट हे अंबाबाईच्या मंदिरातही बसवले जातात यामध्ये सोने-चांदी, रत्न अगदी सात नद्यांचे पाणी आधी टाकले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राज्याभिषेकप्रसंगी  अशाच प्रकारच्या घटांची रचना सिंहासनाजवळ केली होती. त्यामध्ये दूध, मध माणिक, मोती आदींची रेलचेल करून त्या घटाच्या काठावरती रेशमी सुशोभन केले होते. थोडक्यात घट रचनेला आपल्या भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आदि मायेची रुपे असलेली ह्या देवींना चंडी ,दुर्गा ,काली, अन्नपूर्णा, आधी रूपांमध्ये नवरात्रात पुजले जाते आणि मग दशमीला म्हणजेच विजयादशमीला याचा समारोप होतो. शौर्य आणि मातृशक्तीला कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्याला असत्याकडून -सत्याकडे, तमाकडून- तेजाकडे, अमंगला कडून- मंगलाकडे अस्थिरते कडून  स्थिरतेकडे घेऊन जाण्याचे काम करतो. प्रत्येक जण आंतरिक तळमळीतून हा विजयादशमीचा सोहळा आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर साजरा करताना दिसतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपण  येणाऱ्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा ,अनारोग्य, भ्रष्टाचार ,अन्याय, अत्याचार यावर विजय मिळवू या. मानवतेचे, एकात्मतेचे, बंधूभावाचे, समानतेचे सोने जनमानसात वाटू या. हीच आपली खरी विजयादशमी.


संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...