*शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*
(भाग -१ )
स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग
१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप भूमीमध्ये अफजली संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.
या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला. हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .
२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता. याप्रसंगी राजगडावर असलेल्या राजमाता या संपूर्ण प्रसंगाला तोंड देण्यास दक्ष झाल्या होत्या. शिवभारतात कवी परमानंद म्हणतो_
जननी शिवराजस्य सा राजगिरीवर्तिनी।
निजनां गिरीदुर्गाणामवने ऽ वहिताभवत ॥
राजगडावर राहणारी ती शिवाजी ची माता आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली. आईसाहेब स्वराज्याचे प्रेरणास्थान आहे प्रसंगी त्यादेखील हातात तलवार घेऊन स्वराज्याच्या रक्षणार्थ दक्ष झालेल्या दिसतात .
त्याच वेळी विजापूरकरांच्या तोफा ह्या पन्हाळ्यावर सरळ मारा करण्यास अक्षम ठरत होत्या तेव्हा इंग्रज हेन्री रिव्हिग्टनने दारु गोळा पुरविला फिलिफ गिफाड हा इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत होतां. या तोफांनी गडाचे मोठे नुकसान केले म्हणजे लढाई केवळ विजापूरकरांच्या विरोधात नव्हती तर इंग्रजही त्यांच्यासोबत होते एकाच वेळी दोन शत्रूशी महाराजांना लढावं लागत होतं. पुढे इंग्रजांचा हिशोबही महाराजांनी बाकी ठेवलेला दिसत नाही १६६१ मध्ये इग्रजांच्या राजापूरच्या वखारीला वर हल्ला करून सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करुन त्यांना रायगडावर आणले होते .
पावसाने आपले रौद्र रूप धारण केले . गडावरून पाण्याचे लोट वाहू लागले नदी नाले तुडूंब झाली पण वेढा अजून मजबूत झाला. महाराजांनी विचार केला की शत्रूवर सरळ हल्ला करून काहीच साध्य होणार नाही उलट यात आपली माणसे कामी येतील. या वेढयातून निसटायचंच हा बेत महाराजांनी पक्का केला.१२ जुलै १६६०च्या सकाळी गडाच्या पूर्वेकडील दरवाजा पहिल्यांदा उघडला गेला या दरवाज्यातून चार माणसे बाहेर आली ती म्हणजे गंगाधर पंत, त्र्यंबकपंत व त्यात सैनिकाच्या वेषात दोन गुप्तहेर . पांढरं निशाण घेऊन ती खाली येत होती ते पाहून सिद्धीला आनंद झाला शिवाजी राजे शरण येत आहेत हा या पांढऱ्या निशाणाचा याचा अर्थ होता." आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास राजी आहोत आमच्या जीवास काहीएक धोका नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरिता येतो"
असा निरोप पंताच्या हस्ते पाठविला तेवढ्याच वेळात सोबत आलेल्या दोन गुप्तहेर सिद्दीच्या सैन्यात मिसळून त्यांनी अशी अफवा पसरवली की शिवाजी राजे व सिद्दी जोहर यांच्यात आदिलशहा विरुद्ध संगनमत झाले आहे. सिद्धी स्वामिनिष्ठ नव्हता हे त्याच्या सैन्याला चांगलेच माहित होते या कारणाने का होईना सतत चार महिने बायको पोरांपासून दूर असलेले ते सैनिक आता लवकरच घरी जायला मिळणार या कल्पनेने गाफिल झाले.
१२ जुलै १६६० हा दिवस गडावर खूप महत्त्वाचा होता आता वेढ्यातून कसे बाहेर पडायचे याची खलबतं सुरू झाली. छत्रपतींचं एक तत्व व होतं की ते कोणतीही मोहीम आखतांना आपल्या विश्वासू लोकांना सोबत घेऊन चर्चा करत , त्यांची मतं जाणून घेत यात ।लहान-मोठा असा भेद कदापिही नसे. त्याच दिवशी सायंकाळी गडावरील तीन मजली इमारत म्हणजे सज्जा कुटी या ठिकाणी मसलते सुरू झाली यात खुद्द छत्रपती समवेत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभू सिंह जाधव रायाजी बांदल, विठोजी काटे, शिवाजी काशीद व बांदल सरदार उपस्थित होती. कुणी सांगितलं महाराजांनी पुसाटी बुरुजाकडून जावे. कुणी म्हणत होतं दुतोंडी बुरुजाकड्रून जावे. मग एक सूर समोर आला की महाराजांनी पालखीत बसून बाहेर पडावं व या दोन पालख्या असाव्यात एका पालखीत खरे शिवाजी व दुसऱ्या पालखीत सोंगातले शिवाजी! सोंगातले शिवाजी म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा वळाल्या त्या शिवाजी काशीदांकडे! अगदी हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शिवाजी काशिद या बैठकीस उपस्थित होते. महाराजांची आणि त्यांची ओळख अवघ्या दोन चार महिन्यापूर्वीची ! पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापुर गावातील सामान्य न्हावी कुटुंबातील हे शिवाजी काशीद . शिवरायांच्या स्वराज्याचं वेड लागलेले शरीरयष्टीने अगदी महाराजांसारखे केशभूषा ही अगदी तशीच ! हा वीर लाखाच्या पोशिंदयासाठी एका क्षणात सर्वस्व ओवाळायला तयार झाला आपले काय होणार याची स्पष्ट जाणीव शिवाजी काशीद यांना होती शिवरायांनी प्रजे मध्ये निर्माण केलेला विश्वास एक- एक नरवीर जन्माला घालत होता त्यापैकीच एक शिवाजी काशीद. मग ठरले दोन पालख्या सजल्या व राजदिंडी मार्गे गडा बाहेर पडण्याचे ठरले. महाराजांचा अंगरखा, शेला, शिरस्त्राण व रत्नजडित तलवार सर्वात महत्त्वाचं महाराजांची आई भवानीचा प्रसाद असलेली कवड्याची माळ घालून शिंवाजी काशिद अगदी आरश्यात प्रतिबिब दिसावे असे एकमेंकांना भासू लागले .रात्री दहाच्या सुमारास पालख्या निघाल्या . वाहून नेणाऱ्या भोयांनाही माहीत नव्हत की खरे शिवाजी कोणत्या पालखीत बसलेत ! आषाढ शुद्ध पौर्णिमा, काळेकुट्ट ढग दाटून आलेले धो -धो कोसळणारा पाऊस या अंधारातून मार्ग काढत जायचे होते गुप्तहेर व वाटाडयांनी समोर अगोदर मार्ग शोधून ठेवले होते या किर्र अंधारात शत्रूला भनक न लागता निघायचे होते. वीज चमकल्यावर आपण दिसतो की काय या विचारांने त्यांच्या मनात धडकी भरायची.
आज ज्या ठिकाणी तुरुकवाडी गाव आहे त्या गावाच्या सुमारास या दोन्ही पालखी आल्या.किर्र अंधारात झुडूपात हालचाल झाली ,शत्रूच्या हेराना सुगावा लागल्याची खात्री झाली .ती वेळ मार्गस्थ होण्याची होती पाठलाग करण्याची नव्हती. या ठिकाणाहून पुढे मलकापूर मार्गे विशालगडावर जाणारा राजमार्ग होता. शिवाजीराजेंनी शिवाजी काशिदांची गळाभेट घेतली व ३०० मावळे सोबत देऊन शिवाजी काशिदांची पालखी मलकापूर या नेहमीच्या सोप्या मार्गे पाठविली.त्याच ठिकाणाहून माळुंगे मार्गे मसाई पठारावरून अवघड वाटेने महाराजांची पालखी निघाली .जंगलातून जाणारा तो मार्ग होता .
सिद्दीच्या छावणीत खबर पोहोचली शिवाजी राजे वेढ्यातून सुटले सिद्धी चौताळला त्याने आपला जावई सिद्धी मसूद याला पालखीच्या रोखाने पाठवले महाराज विशालगडावर जातील या हेतूने त्याने मलकापूर मार्गे पाठलाग सुरू केला. महाराजांचे युद्धनीती तील कौशल्य या ठिकाणी दिसून येते. नव्या दमाने तीन हजाराचा घोडदळासह ताफा घेऊन मसूद घोड्यावर निघाला त्याने शिवाजी काशिदांच्या पायी जाणाऱ्या पालखीला गाठले. हात घाईची लढाई झाली पण लढाईत स्वारस्य नव्हते, त्याला शिवाजी हवे होते. शिवाजी हाती आले म्हणून मसूद जाम खुश झाला व ही पालखी घेऊन तो छावणीत आला. आल्याबरोबर जोहरने शिवाजीराजास पहिले त्याने जसे ऐकले होते तसेच अगदी तसेच शिवाजी राजे त्याच्यासमोर होते तोच रुबाब ,तोच बाणेदारपणा, तोच थाट, मृत्यूचे यत्किंचित सुद्धा भय चेहऱ्यावर नव्हते. शिवरायांची शिनात्ख करेल अशी एकच व्यक्ती त्या ठिकाणी होती ती म्हणजे फाजल खान . आपल्या बापाच्या वधाच्या वेळी प्रत्यक्ष त्याने राजेंना बघितले होते . ओळख परेड सुरू झाली . महाराजांना तो न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी मी शिवाजी काशीद !"
" सोंगातल शिवाजी झालं म्हणून काय झालं तो काय पडणार आहे, तो काय पाठ दाखवणार आहे, अरे खोट्या शिवाजीची पाठ पाहू शकत नाही तर खऱ्या शिवाजीची पाठ बघण्याचा विचार तू सोड " असं म्हणताच त्याने शिवाजी काशिदांच्या छातीत तलवार खुपसली रक्ताची चिरकांडी उडाली, जखम दाबत तो ढेऱ्या खांब पकडत खाली पडला, भयानक वेदना सहन करत म्हणाला " राजे काही क्षणासाठी का होईना तुमची वस्त्र घातलेला सोंगातला शिवाजी सुद्धा पाठ दाखवणार नाही राजे "मुजरा राजे! मुजरा! वीराच्या थाटात हे बलिदान झालं .
वेळेचा अपव्यय झालेला होता . आता सिद्धीच्या हेराच्या खबरे नुसार महाराज मसाई पठारामार्गे म्हणजे आताच्या कुंभारवाडी- खोतवाडी- आंबेवाडी- लिंगेवाडी यामार्गे गेल्याच्या बातम्या आल्या. मसूद पुन्हा त्याच वेगाने २००० घोडदळ व १००० पायदळ घेऊन निघाला. महाराजांच्या पालखीचे भोई फक्त आपली खांदेपालट करतायेत.एक थकला की दुसरा सर्व काही मॅरेथॉन पद्धतीने सुरु होत . क्षणभरही पालखी कोठे टेकली नाही स्वराज्याच्या छत्रपतीचं ओझआपल्या खांद्यावर पेलत, गुडघाभर चिखलातून, नदी नाल्यातून ,किर्रऽर्रऽर्र अंधारातून जात आहे या मार्गात दिवसासुध्दा अंधारलेले असे जंगल आजही आहे . पाऊस वाऱ्याने चौताळलेले वाघ ,जंगली श्वापदे,साप ,विंचू याचे तर भयही त्यांना नव्हते. सकाळी तांबडं फुटण्याच्या वेळेला महाराज आपल्या मावळ्यासह पांढरपाणी या गावात पोहोचले तोच पाठीमागून हेरांनी खबर आणली की सिद्दी मसूद जवळच पोहचला नव्या दमाचे सैन्य त्याच्यासोबत आहेत.
पांढरपाणी गावापासून जवळच गजापूरची खिंड आहे त्यापुढे सहा कोसावर विशाल गड ! महाराजांच्या सोबत हिरडस मावळ प्रांतातील बांदल मंडळी आहेत त्यांना या भागाची पूरेपूर माहीती होती. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ,रायाजी बांदल , शंभुसिंग जाधव ,विठोजी काटे हे शूर सरदार आहेत.आता महाराज विशालगडी सुखरूप पोहचणे हे सर्वाच्या मनात होते .गजापूरच्या खिंडीत आल्यावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे,हिरडस मावळ प्रांतातील सिंद हे त्यांचे गाव ,चांद्रसेनिय कायस्थ प्रभू अत्यंत शू२ व स्वामिनिष्ठ ! महाराजांना म्हणाले " आम्ही गनिमास येथे दोन प्रहरात पर्यंत रोखून ठेवतो, प्राण असेपर्यंत गनिमास खिंड चढू देणार नाही आपण विशालगडी जावे व तोफांच्या इशारती देऊन कळवावे.महाराजांचे पाऊल पण पुढे सरसावत नव्हते . मसूदचे सैन्य जवळ येताना दिसले .महाराज निवडक ३०० मावळ्यासह विशालगडाकडे निघाले .बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधवासह ३०० बांदल मावळे गजापुरच्या खिंडीत थांबले दोन्ही बाजूंनी उंच डोंगर रांगा मध्ये 500 फूट खोल खिंड की जी सरळ विशाल गडाकडे जाते. गोफणी, भाले, तलवारी बाण,डोगरउतारावर दगड गोटे घेऊन बांदल मावळे झाडा झुडपात लपून बसले. नव्या दमानं सिद्दी मसूद व फाजलखान आपल्या तीन हजाराच्या फौजेसह खिंड उतरू लागला. गनीमावर सपासप मारा होऊ लागला . पहिल्या प्रहरात शत्रूचे हजारो सैन्य आपले शूर मावळ्यांनी पावन खिंडीत पाडले. लढत असताना शंभू सिंह जाधव स्वराज्यासाठी कामी आले. शंभू सिंह जाधव म्हणजे राजे लखुजी जाधव यांचे पुत्र अचलोजीं व त्यांचे पुत्र संताजी की जे कनकगिरीच्या लढाईत संभाजीराजेसोबत अफजलखानाच्या दगाफटक्याने धारातिर्थी पडले होते .त्यांचेच पुत्र हे वीर शंभू सिंह जाधव होय ही जाधव मंडळी सुद्धा स्वराज्याच्या कार्यात अगदी सावलीसारखी महाराजांच्या सोबत आपल्या इतिहासाच्या पानापानात दिसतात.
अक्षरशः रक्तामासाच्या सडा पडला दुसरा प्रहर लागला बाजीप्रभू मोठ्या पराक्रमाने लढत होते प्रचंड स्वामीनिष्ठता, स्वराज्यावरील प्रेम त्यांच्या पराक्रमातून दिसत होते .सहा तास झाले लढाई सुरू आहे सतत १७ -१८ तासाचा या बांदल मावळ्यांचा संघर्ष नव्या दमाच्या सिद्धीच्या सैन्यासोबत होता विशालगडा कडून येणाऱ्या आवाजाकडे सर्वांचे कान होते कारण हाआवाज आपल्या धन्याची खुशाली सांगणारा होता. क्षणाक्षणाला एक एक मावळा कामी येत होता. अंग रक्तबंबाळ झाले होते .कुणाचे हात निकामी ,कोणाचे पाय निकामी तरीसुद्धा रयतेच्या राजा साठी ही माणसं शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. बाजीप्रभूंचा आवेश तर शत्रूंना पाहूनच भयभीत करणारा होता प्रत्यक्ष यमराजालाही या नरविराने थांबवून ठेवले . जनू यमालाही ते म्हणत आहेत ,"अरे थांब! आधी माझ्या राजाला सुखरूप पोहोचू दे ! मग माझा प्राण घे !" विशाल गडाकडे जाणारा महाराजांचा प्रवास चार-पाच कोसाचा पण त्या ठिकाणी विशाल गडालाही वेढा घालून बसलेले आदिलशाही चाकरीतील सूर्यराव सुर्वे व जसवंत दळवी यांनी महाराजांचा मार्ग अडवला. महाराजांसह सैन्य चालून चालून थकलेल असतांना पुन्हा नव्या दमाच्या सैन्यासोबत लढावं लागतंय. हा वेढा महाराजांना फोडावा लागला. यात पुन्हा हा वेळेचा अपव्यय झाला होता . मोठ्या शर्तीने हा वेढा फोडून महाराज धावत धावत गडावर गेले आणि त्या ठिकाणाहून पूर्वेकडे तोफांच्या इशाराती दिल्या. बाजीप्रभूंच्या कानी हे तोफांचे आवाज पडताच आपला धनी सुखरूप पोहोचला हे समजून नरवीर बाजीप्रभूंनी या पावनखिंडीत आपला देह ठेवला. त्याच्या समवेत त्यांचे बंधु फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व ३०० बांदल मावळे या ठिकाणी धारातिर्थी पडले . काय ही स्वामीनिष्ठता म्हणावी काय हे स्वराज्यप्रेम !
इतिहासात महाराजांचे युद्धतंत्र हे जगालाही वेड लावणारे आहे .जगात ही अशी एकमेव लढाई आहे की जी आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी एका खिंडीत लढली गेली व त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन ठरली .ही शेकडो वीरांची बलिदाने मराठा साम्राज्याची प्रेरणास्थानेच आहेत . या पावन शौर्यभूमीवर नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व अनामिक बांदल मावळ्यांचे भव्य पराक्रमाचे भव्य असेच स्मारक असावे या अपेक्षेसह त्यांना कोटी कोटी प्रणाम .
(वरिल संघर्षमय इतिहास ज्या भूमीत घडला त्या भूमीत प्रत्यक्ष पदभ्रमंती करून लक्षात येते की आज तरी रस्ते पाऊल वाटा आहेत त्यावेळी काय होतं ? हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य म्हणून इतिहासकार श्री शिवरत्न शेटे सर (सोलापूर) यांच्या प्रेरणेने ही संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष शौर्य भूमीवर जाऊन सत्य इतिहास संदर्भाच्या आधारे समजून घेता येतो आपणही प्रत्येक वर्षी ११,१२ व १३जुलै या तीन दिवसात महाराज ज्या मार्गाने पन्हाळ्यावरुन विशाळगडावर गेले त्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन अनुभव घ्यावा)
संजय खांडवे
9011971122