मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

नाणेघाटाचा पहारेकरी"किल्ले चावंड"

 

नाणेघाटाचा पहारेकरी '"किल्ले चावंड "


हिंदवी परीवाराची कोरोना काळात योग्य ती काळजी घेत या वर्षीची हिवाळी मोहींम पार पडली .आमचे मार्गर्शक इतिहासकार डॉ शिवरत्न शेटे सरांच्या प्रेरणेतून ,दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट सर परीवाराची धुरा आपल्या खांदयावर घेणारे संभाजी भोसले,अमोल मोहीते यांच्या नियोंजन पूर्वक कृती कार्यक्रमातून  अतिक्षय उत्साहवर्धक वातावरणात जुन्नर परिसर दोन दिवसात अभ्यासपूर्णरित्या जाणून घेतला .

     मोहीमेंचा पहिला दिवस ओझर येथील बेस कैम्प वरील आदरनिय शिवरत्न शेटे सरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रगीताचे गायन करुन मोहीमेंला सुरूवात झाली .

    ओझर वरुन जुन्नरकडे आम्ही मार्गस्त झालो तेथून आपटाळे -नाणेघाट मार्गावर भव्य काताळरूपी डोंगरावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलो .औझर वरुन हा रस्ता एक ते दिड तासाचा आहे .नाणेघाट कडे जाणाऱ्या या मार्गावरून जातांना उजव्या बाजूला लोखंडी कमान दिसते .कमानीतून आत गेल्यावर १ की मी पुढे गेलो की आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.पुढे हा रस्ता चावंडवाडीला जातो .भव्यदिव्य अश्या चावंड दुर्गाचे रूप समोर उभे राहते .याची उंची १०६५ मीटर येते. आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा सूर्यही या गडाच्या पाठीमागे  झाकलेला होता.

      या गडाला महाराजांनी स्वराज्यात घेतल्यावर प्रसन्नगड असे नाव दिले .या गडाला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली .

 या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली .कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .

      आता वनविभागाने काही अंतरापर्यन्त पायऱ्या बांधलेल्या आहेत .या नळीच्या वाटेने पुढे गेल्यावर प्रवेश द्वार दिसते .या पाषाणाच्या दरवाजावर मध्यभागी गणेशमूर्ति आहे .दरवाजातून वर गेल्यावर पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आहेत वर जाताच एक छोटी तोफ आता बऱ्यापैकी तयार केलेल्या लाकडी चाकावर ठेवलेली आहे .डोंगरमाथ्यावर प्रचंड दगडाचे अवशेष नजरेस पडतात .जुने वाडे इमारती याचे जोते व त्याचे पडलेले भाग दिसतात .दाट झुडपातून डोंगर माथ्याकडे एक पाऊल वाट जाते या वाटेत झुडपात इमारतीचे  अवशेष दिसतात .ही वाट या गडावरील चावंडा देवीच्या मंदीराकडे घेऊन जाते .चर्तुभूज देवीची मूर्ती या मंदीरात आहे .दोन माणसा एवढी जागा असलेलं हे मंदीर आहे.मंदीराबाहेर दिपमालेचे अवशेष दिसतात .मंदीरापासून पूर्वेकडे गडाच्या पठारावर उतरत गेले की बरीच पाण्याची टाकी आहेत .पिण्यायोग्य पाणी एवढया उंचीवर उन्हाळ्यातही असते .गडाच्या उत्तर दिशेकडे ही पाऊलवाट चालत जात असता पुष्कर्णो बारव आहे या बारवेला कोरीव काम केलेले दिसते .बरीच शिल्पे ,खांब तुटलेली आहेत बाहेर नंदी आहे व शिव मंदीर आहे बारवेत जिवंत पाणी आहे .गडावर पाऊलवाटेवर कुठे काय आहे याचे छोटे फलक असल्याने बरीच अडचण दूर होते .याच परिसरात सप्तमातृका पाण्याचे टाके  आहे .सात प्रचंड मोठी टाके या काळ्या दगडात कोरलेले आहे .त्यात गडाव२ वर्षभर पुरेल येवढे पाणी आहे .या टाक्यात उतरण्यासाठी एका बाजूने दगडात कोरलेला पायऱ्यासह दरवाजा आहे त्यावर गणेशमूर्ति आहे एखादया वाडयात प्रवेश करावा असा हा दरवाजा आहे तो पाण्यापर्यन्त जातो .सातही टाके एकमेंकांशी जोडलेली आहे पण प्रत्येक टाकयाच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे हे विशेष .साती आसरा या पाण्याच्या ठिकाणी असतात त्या सप्तमातृका याच्याशी संमधीत असाव्यात .कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत .ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .

    गडाच्या उत्तरेकडील कातर कडेवर यादवकालिन गुफा आहेत .या गुफा सैनिक आधिवासासाठी वापरल्या जात असाव्यात .या ठिकाणाहून हजार मीटर उंचीवरुन कुकडी नदीवरील मणिकडोह जलाशय म्हणजेच शहाजीसागर जलाशयाचे निळेशार पाणी मन प्रसन्न करुन टाकते .येथून निमगिरी,हडसर ,शिवनेरी दृष्टीक्षेपात येतो .हरीशचंद्र डोंगररांगासुद्धा येथून दिसतात .पुन्हा वर सप्तमातृकाकडे चालत येऊन गडाचा नळीच्या वाटेकडे परत जातांना गडावर दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात .प्राचीन काळातील स्वच्छता गृह आजही त्या ठिकाणी बघायला मिळते .दगडात कोरलेले हे स्वच्छतागृहाचे भांडे आहे .पाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची रचनाही स्पष्ट दिसते .गडाला खालून वर येणाऱ्या शञूला रोखण्यासाठी तटबंदीची गरज नाहीच एवढी ही प्रचड कातरकडा आहेत पण वरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही धोकादायक ठिकाणी तटबंदी आहे . गडावर राहण्या खाण्यासाठी व्यवस्था नाही पण गडाखालील चावंड वाडीत व्यवस्था होते असा हा प्रसन्नदूर्ग मनाला प्रसन्न करून जातो .



संजय खांडवे

9011971122






गडाच्या पायथ्याशी


काही अंतरापर्यन्त वनविभागाने केलेल्या पायऱ्या


अवघड ठिकाणी केलेली रिलिंग



पूर्वीच्या दगडी पायऱ्या




 गणेश मूर्ती कोरलेला गडाचा  मुख्य दरवाजा


वर पोहचतास ही तोफ 
दिसते




चावंंड देवीचेे मंदिर



गडाच्या पूर्व भागात असलेले पाण्याचे टाके



पुष्कर्णी बारव व महादेवाचे मंदीर



सप्तमातृका टाके

गडाच्या उत्तर दिशेला खाली दिसणारा कुकडी नदीवरील माणिकडोह धरण
(शहाजीसागर जलाशय)



यादवकालिन गुफांचा समुह (लेण्या)


गडावर असलेले प्राचीन काळातील शौच्छालय

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

दोन हजार वर्षा पूर्वीचा प्रसिध्द व्यापारी मार्ग -नाणेघाट

 

नाणेघाट
 

जीवधन किल्ल्यावरुन 
         दिसणारा नाणेघाट


                  
           

देशाकडून कोकणात कल्याणकडे उतरणारा नाणेघाट
हजारो वर्षाच्या रहदारीने मार्गातील दगडही गुळगुळीत झाले आहेत

नाणेघाटापर्यन्त कोणतेही वाहन पोहचते


नाणेघाटातील वाटेवरील राजंण



 


नागनिकाचा लेणीमधील शिलालेख


सातवाहन राजवंशातील हीच ती नष्ट होत आलेली शिल्पे



 

लेणीबाहेरील पाण्याची टाके


पाठीमागे नानाचा अंगठा




दंतकथेतील गुणाने खोदलेला उत्तरेकडील अपुर्ण मार्ग






 इतिहास 
 चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या काळात वापरले जाणारे मार्ग-रस्ते समजून घेणे गरजेचे असते .यामुळे इतिहास समजून घेण्यास अधिक चांगली मदत होते.  आज जसे आपण दळण-वळणाच्या सोईसाठी महामार्ग बघतो अगदी तसेच महामार्ग प्राचीन काळी देखील अस्तित्वात होते .
याच उद्देशाने आमची दरवर्षी प्रमाणे हिंदवी पारिवार हिवाळी मोहींम असते ती यावर्षी नाणेघाटातून होती .
      नाणेघाट म्हणजे २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन  गेली .कला,साहित्य,व्यापार,उद्दयोग या क्षेत्रात या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली .या बंदरात येणारा माल देशावरच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी सह्याद्रीच्या महाकाय डोंगर रांगेतून वाट करुन आणने गरजेचे असल्याने नाणेघाट मधे डोंगर कोरुन हा मार्ग काढण्यात आला .या वाटेने वर आल्यावर त्या काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर जुन्नर लागते .नाणेघाट -जुन्नर -पैठण हा त्याकाळचा व्यापारी मार्ग  होता .पैठण तर सातवाहनांची राजधानीच ! त्याच भागात प्राचीन व्यापारी पेठ असलेले भोकरदनही येते .
     नाणेघाटा बाबत जुन्नर परीसरात एक दंतकथा संगितली जाते की नाना व गुणा या दोन भावांनी ही वाट डोंगर फोडून तयार केली .त्यासाठी दोन भावांनी स्वतंत्र ठिकाणी खोदकाम सुरु केले यात नानाने दक्षिणबाजूकडून व गुणाने उत्तर बाजूकडून काम सुरू केले .नानाने काम पूर्ण केले जो मार्ग आज दिसतो पण गुणा मात्र अपयशी ठरला त्याची वाट अपूर्ण राहिली .अपूर्ण वाट जीवधन किल्याच्या बाजूस दिसते.नानाची वाट पूर्ण झाली म्हणून त्याला नाणेघाट म्हणतात पण ही दंतकथा आहे याला ऐतिहासिक आधार नाही .ही दंतकथा मात्र प्राचीन काळापासून प्रचलीत आहे .
     गुणा व नाना या दोघाच्या मधे प्रचंड उंच कडा आहे त्या कड्याला नानाचा अंगठा म्हणतात .हजारो फुट खोल दरी आहे त्या कडयावरून खूप मोठा परीसर पाहता येतो पण पर्यटकांनी या ठीकाणी अत्यंत सावधनतेने वागावे अशी ही जागा आहे .
   डॉ शोभना गोखले यांच्या मते  'नना'ही कुषाणाच्या नाण्यावरील देवता होती .ही नाणी भारतात खूप प्रसिद्ध होती .पुढे या देवतेचा नना वरून नाणे असा अपभ्रंश झाला त्यावरून नाणे हा शब्द तयार झाला व ढोबळमानाने असे म्हणतायेईल की नाणे घाट ही एक पैसे देवाण घेवाणीची जागा असल्याने त्याला नाणेघाट असे नाव पडले .या घाटात उतरतांना सुरूवातीलाच एक दगडी रांजणं आहे सातवाहन काळात या वाटेने जाणाऱ्यास व व्यापाऱ्यास या राजणात कर ,जकात रुपाने नाणे टाकावे लागत असे .असे सांगतात दिवसातून दोन वेळेस हा रांजंणं चांदीच्या नाण्यानी भरून जायचा .सातकर्णो राजा व नाणेघाट मधील व्यापारासंमधी माहीती इतिहासात आढळते.ही वाट म्हणजे महाराष्ट्र व पाश्चात्य देश यांचा संबंध जोडणारी होती त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची बरीच  ओळख झाली .
     नाणेघाटात काही लेण्या खोदण्यात आल्या आहेत .याला वर्षावास असे म्हणता येईल .लयनम् असे संस्कृत मध्ये ,प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणे म्हटल्या जाते .प्रवासात  व्यापारी वर्गास मुककाम  यासाठी ही बनविली गेली असावी यात शंका नाही .पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही हौद देखील या ठीकाणी आहेत .यामध्ये दोन महत्वपूर्ण लेण्या आहेत यामधे नयनिका हीचा ब्राम्ही लिपी मधील माहीतीपूर्ण लेख भिंतीवर कोरण्यात आला आहे.सातवाहन राजवंशीय घराण्याचे नागवंशीयांशी संबंध प्रस्तापीत झालेले होते .या शिलालेखात यज्ञ व दान दिलेल्या मौल्यवान देणग्यांचे सविस्तर वर्णन आलेले। आहे.त्यांनी बौध्द धर्मास आश्रय देऊन परिसरातील बौद्ध लेणी खोदण्यास उदारपणे मदत केली .या शिलाले।खावरून नयनिका /नागनिका ही सातवाहनाचा मूळ पुरूष सिमूर /सिमूक /श्रीमुख याची सून आहे,सार्वभौम सम्राट सातकर्णोची पत्नी,महारठी त्रणकथिर यांची कन्या आणि भायल ,वेदश्री व शक्तीश्री या सातवाहन पुत्राची माता होती .नागनिकेचे वर्णन करतांना प्राचीन काळातील स्त्रीयांच्या आदर्श प्रतिमेंचे चित्र उभे केले आहे.नागनिका या नावातच नाग स्त्री ही माहीती मिळते ,ती महारथी त्रणकथिर नावाच्या महारठीची कन्या होतीं .नाग ही एक जमात होतीं .सातवहन काळात महाराठी ,महाजन ही पदे होतीं.पराक्रमी सरदारांच्या मुलीशी विवाह केली जात असत. नागनिकाचा एक वेगळा प्रभाव त्या काळात होता .तिच्या लेखावरून व शिल्पावरून हे लक्षात येते.नागनिकाशी संमधीत अनेक नाणी या परीसरात सापडली आहे .या ठिकाणच्या लेण्यात सातवाहन राजवंशांच्या मूर्ति व त्यांची नावे कोरली आहे मात्र काळानुसार आता केवळ पाय शिल्लक दिसतात .यामधे सिमूक,नागनिका,श्रीसातकर्नी,कुमार भायल,महारठी,त्रणकथिर,कुमार हुकश्री,कुमार सातवाहन यांचे अवशेष दिसतात .
      कोकणातून देशांवर येणारा हा मुख्य रस्ता म्हणजे नाणेघाट याच्या रक्षणार्थ बाजूलाच जीवधन किल्ला बांधलेला आहे .पुढे याच मार्गाच्या रक्षणार्थ हडसर ,चावंड,शिवनेरी या किल्याची निर्मिती याच काळात झाली .या मार्गाने सातवाहन राजधानी पैठण पर्यन्त व्यापारी राबता चाललेला दिसतो .


संदर्भ
नाणेघाट -श्री लहु गायकवाड
लेणी महाराष्ट्राची -डॉ दाऊत दळवी
जुन्नर परिसरातील प्रत्यक्ष भ्रमंती

संजय खांडवे
बुलढाणा












बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

अजिठा डोंगर रांगेतील कालिंकादेवी मंदीर परिसर

अलिकडील टेकडीवर भव्य दगडात पायऱ्या कोरलेल्या दिसतात जणूकाही हा हा एका मोठ्या खोलीचा पाया असावा असे दिसते
कातरलेला दगड मंदिराकडे जाताना लागतो
पठारावरुन दिसणारे कालिंका देवी मंदीर

अजिंठा डोंगररांग 


                              पठार

                              पठार

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा (मंदिर)



 वाड्यातील शिष्यांची समाधी

 
वाड्यात चारही बाजूने असलेल्या तटबंदी तील कमानी

                         दीपमाळ


कोरीव नक्षीकाम केलेला हत्ती



१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा 

➖➖➖➖➖➖
अकोला जिह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल पातुर शहरात नानासाहेबांचा प्राचीन वाडा (मंदिर )ही अंदाजे १६ व्या शतकातील प्राचीन वास्तु आहे.वीटा,दगड,चुना व माती मध्ये अप्रतिम बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराच्या पाठीमागे हा वाडा आहे .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .बायपास अंजून अपूर्ण असल्याने त्या मार्गाने सध्या जाता येत नाही .
    वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे व त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त आहे ,चार कोपऱ्यावर चार बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .
संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे.


संजय खांडवे
9011971122



गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

पातुर येथील बुद्ध लेण्या



 

 





इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन  भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा वेरुळ लेणी  म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....
 त्यात पुढे यादव काळातही यादवकालिन स्थापत्य शास्त्राचे दर्शन मंदिर निर्माणातून घडले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत.बरेच ठिकाणे दुर्लक्षित आहेत ,पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचत नाही .
    आम्ही अशाच एका विदर्भातील प्राचीन लेणीला भेट दिली .अकोला जिल्हयातील पातूर ....
बोर्डी नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात ७० च्या दशकात बोर्डी नदीच्या पात्रात सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या हजारो मुद्रा सापडल्या होत्या .एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळतात .
     शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर  उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास । येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . आम्ही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे निघालो, पुरातत्व खात्याचा  त्या ठिकाणी वॉचमन  असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसली आम्ही सरळ वर डोंगरावर निघालो पातुर शहराच्या अगदी पश्चिमेकडील हा हा भाग आहे या टेकडीवरून  संपूर्ण पातुर शहर दिसते.
     लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते .काळा पशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे  दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते .खांबाच्या वर कडा तुटलेंल्या अवस्थेतील संस्कृत लेखही दिसतो .मुख्य लेणीत पायऱ्या असून आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे .इतिहास कारांच्या मते इ स 3रे ४ थे शतक ह्या लेणीच्या निर्माणाचे असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत  पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगड किंवा त्या काळच्या  काही अडचणीने काम बंद पडले असावे  .
     प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात  कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.
 हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे .अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे त्यांचे जतन व संवर्धन व्हावे हीच अपेक्षा.

संदर्भ :
उद्ध्वस्त वास्तू समृध्द इतिहास
लेखक :विवेक चांदुरकर 
प्रत्यक्ष भ्रमंती
विवेक चांदुरकर सर (शिल्पअभ्यासक ,लेखक तथा लोकमत उपसंपादक)
डॉ शाम देवकर (इतिहासकार)
प्रा पी जी सवडतकर (इतिहास अभ्यासक)
किशोर वाघ (अनिस प्रदेशाध्यक्ष)
किशोर काकड (स्थानिक शिक्षक )


संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

यादवकालिन आन्वा ता भोकदन जि जालना येथील शिव मंदीर

 









🛕आन्वा येथील यादवकालिन शिव मंदीर🛕

➖➖➖➖➖➖➖

सर्व देवामधे श्रेष्ठ......


 मस्तकी चंद्र धारण केलेला........


सर्व लोकांचा एकच अधिपती.........


देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....


असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '

  महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आढळतात बरीच मंदिरे ही यादवकालिन आहेत .असेच एक प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम  अविष्कार असलेले मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे .जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .

     मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .

      तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे साहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .

उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो .आत गेल्यावर त्या मंडपात अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला  होतोच.

या मंदीराला ५०  गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे .ताराकृती उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण साहे .मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते .मध्यम नवतालातील यक्ष ,अप्सरा,प्राणी,पक्षी यांची शिल्पे आढळतात .उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो .दुरुस्तीचे काम सुरू दिसते पण पर्याप्त वाटत नाही .एवढा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे .त्या पाठीमागचा इ|तिहास समोर आला पाहीजे .त्या  भव्य दिव्यतेची व आपल्या पूर्वजाच्या अपार मेहणतीमधून साकारलेली जागतिक दर्जाची संस्कृती जगासमोर गेली पाहीजे या उद्देशाने आमची निर्सग-इतिहास प्रेमी टिम सतत नवनवीन ठिकाणी भटकत असते .यावेळी लोकमत बुलढाणाचे उपसंपादक तथा शिल्प अभ्यासक विवेक चांदुरकर सर ,इतिहास अभ्यासक प्रा पी जी सवडतकर सर व किशोर वाघ सर (अनिस मराठवाडा प्रदेशध्यक्ष) आमच्या सोबत होते .



संजय खांडवे

बुलढाणा

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग ३


 ।स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग ३


छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या बुधभूषण या  संस्कृत ग्रंथात दुर्ग निरूपणामध्ये  दुर्गाचे महत्व विषद करत त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे म्हणतात -

         दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी  यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.

       दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .


*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*


शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .

       राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .

       दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .

गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर  करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .

    योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा  द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.


संदर्भ

बुधभूषण




संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...