शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

विश्व आदिवासी दिवस

 


विश्व आदिवासी दिवस

➖➖➖➖➖➖➖➖


आज विश्व आदिवासी दिवस

विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी ! स्वतः च्या संस्कृतीचा तोच शिल्पकार झाला . निर्सगाच्या शाळेत त्याने असंख्य संशोधने केली अन प्रतिकुलतेत अनुकुलता शोधत गेला .

आपल्या मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !

महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .

    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .

रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .

    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !

       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 

पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .

    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

*राघोजीने केला बंड*

*बागडीच्या पाण्यापाशी !*

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .

     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .

     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .

   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.

     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .

        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पंढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .



ब्रॅकेट मध्ये घेण्यासाठी👇



*दै महाभूमिचा वर्धापन दिवसही आजचाच......!!*

➖➖➖➖➖➖➖➖

आज ऑगष्ट् क्रांती दिवसही आहे ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे " चले जावो " हे रनशींग  आजच्याच दिवशी फुंकले गेले. तसाच विश्व आदिवासी दिवसह आजचं आहे . मराठवाडा अन विदर्भ या सिमावर्ती जिल्हयात अल्प कालावधितच जनमानसात लोकप्रिय ठरलेला दैनिक महाभूमिचा वर्धापन दिवसही आजच ! आदिती अर्बन परिवाराच्या माध्यमातून अर्थक्रांती बरोबरच तुकोबारायांच्या शब्दरूपी शस्त्रांची शब्दक्रांती देखील घडावी या उद्देशाने मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी दैनिक महाभुमिचा हा महायज्ञ सुरू केला . आज हे शब्द रुपी शस्त्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्मळ , निकोप  आणि निपक्षपणे लोकांच्या सेवेत  अगदी शिस्तबद्धपणे काम करत आहे . नवोदित लेखक व कवींची ओळख निर्माण करत आजच्या डिजिटल काळात वाचन संस्कृतीमध्ये क्रांति करत आहेत .

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

सिन्नरचा श्रीगोंदेश्वर महादेव

 



सिन्नरचा श्रीगोंदेश्वर महादेव

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान :-  ता . सिन्नर जि. नाशिक , नाशिक वरून ३० कि.मी ., समृद्धी महामार्गावरील  सिन्नर हेच इंटरचेंज आहे .

➖..➖➖➖➖➖➖


सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री  हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे  शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक,  जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू  , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर., खिद्रेश्वर , केदारेश्वर, हरिशचंद्रेश्वर अशी अनेक नावे आहेत . असेच एक प्राचीन मंदिर म्हणजे सिन्नरचा गोंदेश्वर  होय . त्याला गोविंदेश्वर असेही संबोधतात .

          महाभूमिमधील हे मंदिर त्याच्या शिल्परचनेवरून  प्रमुख शिव मंदिरापैकी एक समजले जाते . भूमिज स्थापत्य शैलीचे हे मंदिर यादव काळात निर्माण झाले . कोणत्याही प्रकारच्या चुना ,रेती , माती किंवा इतर गोष्टीचा उपयोग बांधकामात दिसत नाही . तासिव व अप्रतिम शिल्पीत केलेले दगड आपसात (लॉकिंग ) खाचेबद्ध करून उभारलेले असून त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्राच्या नियमाने ही वास्तु आजही भक्कमपणे पुढचे शेकडो वर्षाचे ऋतुमान सोसण्यास उभी आहे  हे पाहताच क्षणी लक्षात येते . या वास्तुसाठी लागलेले दगड हे बाजूच्याच तलावातून काढलेले दिसतात . संपूर्ण मंदिरास दगडी मजबूत तटबंदी आहे अशीच तटबंदी गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेय मंदिरास दिसून येते . या संपूर्ण मंदिर समूहास दक्षिण दिशेचे एक आणि पूर्व दिशेचे एक अशी दोन प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते मधोमध गणपतीचे शिल्प असून डाव्या बाजूला दगडी आसन तयार करण्यात आलेले आहे या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आठ खांबावर उभा असलेला नक्षीसह सुंदर असा प्रवेशद्वार बघायला मिळतो . या द्वारातूनच आयताकृती दगडी चौथर्‍यावर उभे असलेले शिवपंचायातन नजरेस पडते . मुख्य प्रवेश द्वाराच्या बाजूला तटबंदीस लागूंन दगडी इमारत आहे त्यास ओवरी म्हणतात . मंदिर परिसरात अनेक मूर्ती शिल्प तथा मंदिराचे दगडी अवशेषही दिसून येतात संपूर्ण मंदिरात खूप मोठे प्रांगण आहे पूर्व दिशेचे द्वार हे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरा च्या स्वर्ग मंडपाची आठवण करून देते या स्वर्ग मंडपास गोलाकार सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे या प्रवेशद्वारास अनेक शिल्पांनी अलंकृत केलेले आहे . पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या अगदी समोर नंदी मंडप आहे हा नंदी मंडप मुख्य शिव मंदिराच्या समोर आहे . चार खांबावर उभा असलेल्या नंदी मंडपावर नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. चारही बाजूने सूरसुंदरींचे शिल्प यावर कोरलेले आहे . मुख्य शिव मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने द्वार आहेत या द्वारा मधून आपण मुख्य मंडपात पोहोचतो त्यातल्या पूर्वेकडील द्वारावर द्वारपालाचे शिल्प अंकित केले आहे असेच शिल्प सर्वच द्वारा वर  दिसून येतात बहुतेक ठिकाणी प्रवेशद्वारावर श्रीविष्णूचे शिल्प अंकित आहेत .यावर कीर्तीमुख सुद्धा कोरलेले असून एका शिल्पामध्ये हत्तीला व्याळाने पायाखाली दाबलेले दिसते असे शिल्प मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने नजरेस पडते काही ठिकाणची शिल्प आता नष्ट झालेले आहेत . रामायण ,महाभारत  मधील प्रसंगाचे शिल्प देखील या मंदिरावर दिसून येतात . यक्ष , यक्षी,श्री गणेश , श्री विष्णू अवतार, भैरव , गंधर्व तथा सुरसुंदरीचे अनेक शिल्प मंदिरावर आहेत . मुख्य शिव मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे संपूर्ण मंदिर एका हत्ती पट्टीकेवर उभे आहे जणूकाही या हत्तीच्या समूहाने आपल्या पाठीवर या मंदिराचे ओझे तोलून धरले आहे असे दिसते . मराठवाड्यातील पितळखोरा लेणी समूहात देखील मुख्य लेणे हे भव्य दिव्य हत्तीच्या पाठीवर उभी आहे असे  असल्याचे त्या लेणीमध्ये दिसते . मुख्य सभामंडपात भार तोडूल धरलेल्या खांबावर अनेक सुंदर शिल्प आहेत ही शिल्प देखील आन्वा येथील शिव मंदिराच्या खांबावर असलेल्या शिल्पा सारखेच आहेत . खांबाच्या पायथ्याशी देवतांची शिल्पे अंकित आहेत . सभा मंडपात संपूर्ण शिल्पाचे बारीक निरीक्षण केल्यानंतर त्याकाळच्या कला संस्कृतीचे दर्शन या सभा मंडपात घडते येथे देव कोष्टके देखील आहेत . एका ठिकाणी गणेश व त्याच्या बाजूने दोन सेवेकरी असून त्याखाली कीर्तीमुख आहे . सभा मंडपात जमिनीवर कासवाचे शिल्प आहे त्याच्यासमोर अंतराळ आहे अंतराळात दोन्ही बाजूंनी आता रिकामे असलेले देवकोष्टके आहेत .  अंतराळात असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील सुंदर अशी शिल्पांची रचना करण्यात आलेली आहे . या ठिकाणी देखील द्वारपालांचा समूह दिसून येतो. या उंबरठ्यावर नृत्य व वादकांचे शिल्प आहेत  अंतराळातील छत हे नंदीमंडप  व सभामंडपा प्रमाणेच सुंदर अशा दगडी गोलाकार झुंबराने सजविले  आहे .द्वारातून पुढे आपण गाभाऱ्यात पोहोचतो गाभाऱ्यात श्री गोदेश्वराचे शिवलिंगाचे दर्शन घडते .

      या मंदिराच्या नंदी मंडप असो की सभामंडप त्याचबरोबर मुख्य गाभाऱ्याचे शिखर हे अत्यंत सुंदर अशा कला कृतीने दगडी शिल्पामध्ये कोरलेले आहे . मंदिराची खरी ओळख या मंदिराचे हे उंच शिखर आहेत गाभाऱ्यावरील नक्षीकाम हे शिखरी शिखरांचा समूह असे दिसते सर्वात वर आमलक आहे त्या वरील असलेला कळस आता तुटलेला दिसतो . मंदिराच्या उत्तर बाजूस मकरमुखातून श्री गोंदेश्वरावर झालेल्या जलाभिषेकाचे तीर्थ बाहेर येते मकर मुखावर सुंदर नक्षीकाम केलेले असून त्यावर श्रीविष्णूचे शिल्प कोरलेले असून त्यावर एक देव कोष्टक आहे .

        शिवपंचायतन स्वरूप असलेल्या सिन्नरचा श्रीगोंदेश्वर याच्या चार उपदिशेस  चौथऱ्यावरच आणखी चार मंदिरांचा समूह आहे . यामध्ये ईशान्येस सूर्य मंदिर , आग्नेय दिशेस श्रीविष्णू मंदिर ही समोरील बाजूस असून मध्ये नंदिमंडप व समोरच मुख्य शिव मंदिराचे प्रवेशद्वार ही रचना खूप सुंदर आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूस म्हणजे नैऋत्य दिशेस श्री गणेशाचे वायव्य दिशेस देवीचे मंदिर आहे . संपूर्ण मंदिर समूह व त्यावरील शिल्पकाम समजून घेण्यासाठी एक दिवसही अपूर्ण पडतो प्रस्तुत लेखांमध्ये केवळ ही वर-वरची माहिती आहे .प्रत्येक शिल्पा मागे एक भाव दडलेला आहे त्या पाठीमागे असलेले तत्वज्ञानही आहे . मंदिर परिसरातील असलेल्या वास्तू वरून असे दिसते की या ठिकाणी आणखीही छोटे-मोठे सुंदर इमारतींचे समूह असावे परंतु काळाच्या ओघात ते आता नष्ट झालेले दिसून येतात . परिसरात तुटलेले नंदी शिल्पासह इतरही अवशेष दिसून येतात . अश्या अलौकिक शिव मंदिरास आपण जरूर भेट द्यावी .


संजय खांडवे

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

 



हरिश्चंद्र पर्वतावरील - श्री हरिश्चंद्रेश्वर

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान : ता . अकोले जि . अहिल्यादेवी नगर , संगमनेर - अकोले - राजुरवरुन पुढे २७ कि.मी.

➖➖➖➖➖➖➖➖

अनेक पुराण ग्रंथामध्ये सह्याद्री मधील हरिश्चंद्र पर्वताचा उल्लेख आढळतो . मत्स्यपुराणात तर पुण्यक्षेत्र म्हणून हा पर्वत मानला गेला आहे . कळसुबाई - साल्हेर - महाबळेश्वर नंतर हरिश्चंद्रपर्वताचा महाभूमितील सर्वोच्च गिरिशिखरात क्रम लागतो . तारामती - रोहिदास व बालेकिल्ला ही या पर्वताची उंच शिखरे गगणभेदी आहेत . या पर्वतावर असलेले  हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन शिव मंदिर ही या पर्वताची ओळख आहे .निर्सगाचं अप्रतिम सौदर्य लाभलेल्या या ठिकाणास हरिश्चंद्रगड या नावाने या  नावाने ओळखले जाते . रोज हजारो पर्यटक या स्थळास भेट देतांना दिसून येतात . हरिश्चंद्रगड अभयारण्य  परिसरात येणाऱ्या या महाकाय पर्वतावर हरिश्चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी पोहचण्यासाठी सहा वाटा आहेत . राजूर या गावातून २७ कि.मी डोंगर रांगा ओलांडत घनदाट जंगलातून पाचनई या पायथ्याच्या गावात पोहचता येते .या गावात मुक्कामास देखील राहता येते . येथून चढाईस सुरुवात होते दाट जंगलातून चढाई करत कड्या कपाऱ्यातून निर्सगाचा मनमुराद आस्वाद घेत दोन अडीच तासात गड सर करता येतो . चढाई फारशी अवघड नाही पण सराव आवश्यक आहे व बहुतेक ठिकाणी काळजी घेत जावे लागते . छोटे मोठे धबधबे हे सतत स्वागतासाठी वाटेत जागोजागी हजर असतात . डोंगर माथ्यावर पोहचताच एका पराड्यात हरिश्चंद्रेश्वराच्या कळसाचे दर्शन होते .एवढा प्रचंड डोंगर चढूनही पुढे  तारामती शिखराचे महाकायरुप दर्शन देते . त्याच्या पायथ्याशी स्थानिकांच्या पर्यटकांच्या सोईसाठी छोट्या घरघुती हॉटेल आहेत . येथून मंदिराकडे चालत जात असताना प्रत्येक जण चौफेर दिसणारा निसर्ग न्याहाळतच मंदिरात जवळ येऊन पोहोचतो . सुरुवातीस कातळात कोरलेल्या काही पाण्याची टाकी निदर्शनास येतात त्याच्या समोरच निळ्याशार पाण्याने भरलेली चौरसाकृती सप्ततीर्थ पुष्कर्णी दिसते . याचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की ही पूर्वी पूर्णपणे भिंतीने बंदिस्त होती . दोन ठिकाणी उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत व तारामती शिखराच्या बाजूने 14 देव कोष्टके आहेत या देवकोष्टकामध्ये बघितल्यास मूर्ती ठेवण्यासाठी ची दगडांमधे खाच या ठिकाणी करण्यात आलेली आहे बहुतेक कोष्टकामध्ये मूर्ती आता शिल्लक नाहीत व पाठीमागेच तारामती शिखरातून उगम पावणारी मंगल गंगा वाहत येते . परिसरात छोटी उध्वस्त मंदिर समुह दिसून येतात . काताळात खोल पाण्याची टाकी खोदलेली आहेत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत . तेथून समोर गेल्यावर आपण हरिश्चंद्रेश्वराच्या गोपुरा समोर पोहचतो . पाठीमागे देखील दोन छोटी दगडी मंदिर आहे परिसरात अनेक मूर्तिशिल्पे दिसून येतात . हरिश्चद्रेश्वराचे मंदिर या खोल घळीत आहे . हजारो वर्षा पूर्वीच्या दगडी पुला खालून मंगळगंगा केदारेश्वर गुफेकडे वाहत जाते . बाहेर दोन किर्तिमुखे आहेत व देवनागरी लिपि मधील शिलालेख दिसून येतो आत देखील मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या लेणीच्या दर्शनी खांबावर शिलालेख आहे . याच खांबावर डावी कडील बाजूस देखील एक शिलालेख आहे .संपूर्ण मंदिरास पूर्वी चारही बाजूने सुरक्षात्मक योजना होती समोरून दरवाज्यातून खाली उतरल्यावर डाव्या बाजूस श्री विष्णू मंदिर व पाठीमागे जमीनीत पाण्याची टाकी व त्यावर लेणी समूह आहे . या टाक्यामधील पाणी अत्यंत थंड व पिण्यायोग्य आहे . ११ व्या १२ व्या शतकात या मंदिराचे निर्माण कलचुरी घराण्याच्या काळात झाले असावे असे जाणकारांचे मत आहे . सर्वतोवज्ञ या प्रकारात येणाऱ्या मंदिरास चारही बाजूने दरवाजे असतात . या मंदिरास समोरा -समोर दोन दरवाजे व मधे शिवलिंग आहे . इतर दोन बाजूस दगडी लाकडी दरवाज्या सारखी भासणारी  दरवाज्यांची अप्रतिम प्रतिकृती दिसून येते . मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर द्वारपालाचे शिल्प आहे . चारही बाजूने कोनाड्यात हत्ती व माहुताचे उठावदार शिल्प असूून एका ठिकाणी माहूतास सोंडेत पकडल्या सारखे दिसते . अनेक यक्ष, गंधर्व शिल्प मंदिरावर आहेत . डाव्या बाजूस एक छोटे मंदिर व त्या बाजूस सुंदर गणेशाची मूर्ती आहे पूर्वी यास दगडी मंडप होता आता केवळ नक्षीयुक्त खांब उभे आहे . गाभाऱ्याच्या मागच्या दरवाज्यासमोर सुंदर नक्षी युक्त खांब व दोन्ही बाजूस ७ फुट उंच स्वतंत्र दगडात कोरलेल्या मुर्ती असून लागुनच लेणी आहे व त्या कमानीत नंदी शिल्प आहे . या गुफे मधे राहून संत ज्ञानेश्वरांचे बंधू योगीराज वटेश्वर चांगदेव यांनी तपश्चर्या केली . येथेच त्यांनी "तत्वसार" या महाकाव्याची रचना केली . त्यांचे शिलालेखही याची साक्ष देतात . या काव्यात ते म्हणतात

 *हरिश्चंद्र नामु पर्वतु तेथ महादेओ भक्तु, सुर सिद्धगणी विख्यातु सेविजे जो, हरिश्चंद्र देवता मंगळ गंगा सरित सर्व तीर्थ पुरविता सप्तस्नान.*

मंदिरा मागे असलेल्या गुफा , पाण्याची टाकी व पुष्करणी मधील दगड या मंदिरा साठी वापरलेले आहेत . द्रविडी शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो १६ मीटर पर्यन्त उंच गालाऱ्यावरील मंदिर शिखर व त्यावर दगडी आमलक व आता स्थापीत असलेला धातु कलश आहे .

     येथून खाली वाहत जाणारी मंगळगंगेच्या सुंदर धबधब्याच्या बाजूला केदारेश्वर गुफा मंदिर आहे या केदारेश्वर गुफेला सुंदर अशा पाच सुंदर नक्षी युक्त कमानी आहे आत शिरताच भव्य असे पाच मीटर उंचीचे शिवलिंग नजरेस पडते या शिवलिंगाला चार स्तंभ दिसून येतात त्यापैकी तीन स्तंभ आता तुटलेले आहेत एका स्तंभावर जणू काहीही गुफा उभी आहे असे जाणवते प्रशस्त अशा गुफेमध्ये असलेले पाणी अत्यंत थंड असून या पाण्यात उतरल्यानंतर  पुन्हा वर येतो तेव्हा पाय सुन्न होतात . डाव्या बाजूला भिंतीवरती शिवपार्वतीचे शिल्प कोरलेले आहे . गुफे समोरून वाहत जाणारी मंगळ गंगा पुढे पाचनई गावातून जाते . या ठिकाणी पर्यटन करतांना काळजी घ्यावी स्थानिकांची मदत घ्यावी व हे करत असतांना निर्सगाच पावित्र्य जपावे .भगवान शिव कि जे आदिनाथ आहेत , आदय गुरु आहेत . कल्याणकारी तथा ज्ञान - भक्ती - वैराग्य हे सार त्यांच्यात सामावलेले आहे. मानवी जीवनास योग व अध्यात्माची प्रेरणा शरणागतवत्सल , त्रिगुणातीत, जितेंद्रिया कडून मिळत राहते त्या दयासिंधू चरणी नतमस्तक होण्यास हरिश्चंद्रगडा शिवाय दुसरी कुठे जागा असेल असे मला तरी वाटत नाही .




संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...