मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*

 *नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*



 प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे संत गाडगेबाबांचे चरित्र 1952 ला त्यांनी लिहिले. अतिशय प्रभावी मांडणी प्रबोधनकारांनी केली संत गाडगेबाबांच्या असामान्य कार्याचे विवेचन अतिशय मार्मिकपणे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना जिवंत करून मांडलेल्या आहेत. लोकश्रद्धेला वळण लावणाऱ्या महापुरुषांचे जीवन चरित्र पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरते याची जाणीव प्रबोधनकारांना होती.  आपल्या प्रबोधनात्मक व परखड शैलीत संत गाडगेबाबा पुढील हजारो वर्षासाठी चरित्र रूपाने व शब्द रूपाने जिवंत केले . त्यांच्या आवाजातील मुंबई येथील त्यांचे शेवटचे कीर्तन तर नवीन आचार विचार धर्म शिकवते. परखड आवाजातील कीर्तन मेंदूत प्रचंड वैचारिक मंथन निर्माण करणारे ठरते.

     "नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा, महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढेही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवेल असेही वाटत नाही "असे प्रबोधनकार बाबांचे चरित्र लेखन करताना आपल्या मनोगतात लिहितात .अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव या गावी सखुबाई आणि झिंगराजी यांच्या पोटी डेबूजींचा जन्म झाला. झिंगराजी हे शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचे नातू होते.

   सुख वस्तुने अगदी सर्वकाही संपन्न होते. गुरे- ढोरे ,शेती आदि सर्व काही चांगलं सुरू होतं, पण अनेक अडाणी ,रुढी परंपरेने नेहमीच्या द्याव्या लागणाऱ्या कोंबडे- बकरे, दारूच्या नवसाने त्या काळात कहर केला होता .वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झाली पाहिजे अशी रीतच होती .यातच झिंगराजींना दारूचे व्यसन लागलं यामुळे सखुबाई आणि छोट्या डेबुजी शिवाय झिंगराजी कडे शेवटी काहीच उरलं नव्हतं. "आता माझ्या डेबुजीचा सांभाळ कर, तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडेल, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवांच्या नादी लावू देऊ नकोस." इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला होता. डेबुजी लहान असले तरी पुढील काळात त्यांच्या मनावर याचा प्रचंड परिणाम झाला असावा. चंद्रभान मामाने बहीण सखुबाई सह डेबुजी चा सांभाळ केला. मामाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. याच व्यवस्थेत वावरत असताना सावकाराच्या कर्जापोटी चंद्रभान मामाचा ही बळी गेला. घर खर्चाला आळा घालत कष्ट करून सर्वकाही सुरू असताना शेतावर ताबा घेण्यासाठी आलेल्या तिडके सावकाराला डेबुजींनी मोठ्या हिमतीने पळून लावले होते. मातीत कष्ट करून घाम गाळून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ही डेबुजी जाणून होते. स्वाभिमानानं अन मेहनतीने काम करून सुखाचा घास खावा. ताठ मानेने जगावे, पण सावकारी पाशं, त्यातच अनिष्ट रूढी- परंपरेत, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला हा समाज मुक्तपणे श्वास आणि घासही घेऊ शकत नव्हता. डेबुजी हे जवळून पाहत होते पण करणार काय लहान असल्याने कोणी ऐकतही नव्हतं .त्यापुढे त्यांनी स्वीकारलेला मार्ग हा लोकोत्तर महापुरुषाकडे नेणारा ठरतो .गोवारी -भजन पार्टी पासून दगडांच्या चिपळांची टाळ करून भजन कीर्तनातून अभंगातून प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली.


तुका म्हणे सुख घेतले गोपाळी।

 नाचती कांबळी करुनि ध्वजा.।।

 करूनिया टिरी आपुलिया मांदळ।

 वाजविती टाळ दगडाचे।।

     खरे अन्नदान काय असते हे गोवारी -भजन पार्टीतून डेबुजीने दाखवून दिले." गड्याहो आपण तर सारेच जेवतो" पण ज्यांना कधी खायला सुद्धा भेटत नाही अशा उपेक्षितांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने कृतीतून अन्नदानास सुरुवात केली. असे अन्नदानाचे उत्सव दापुला डेबुजींनी अनेक केले. डेबुजींच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. "बुडती हे जन न देखावे डोळा" हा तुकोबारायांचा विचार डेबुजींच्याही मनात होताच. त्यांना मुलगा आणि मुलीही झाल्या परंतु त्यांनी कधीही कोंबडे -बकरे कापून प्रसंग साजरा केला नाही. मुलगा मुदगल याच्यात डेबुजींचा मोठा जीव होता. सहा महिन्याचा असताना तो अचानक गेला त्यावेळी त्यांच्या भाऊबंदांनी कोंबडे- बकरे न कापल्याने  असे अरिष्ट ओढावले असे ते म्हणू लागले ,पण स्थिर चित्त आणि असामान्य ध्येयाकडे धावणारे हे लोकोत्तर महापुरुष होते. 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे तीन वाजता मातोश्री सखुबाईचे हळुवारपणे दर्शन घेऊन कुंताबाई ह्या मुलगी आलोका व कलावतीला कुशीत घेऊन झोपलेले असताना भल्या पहाटे या क्रांतिकारी प्रयाणाचा प्रसंग घडला.

        तहानलेल्यांना पाणी पाजणारा, भुकेलेल्यांना अन्न देणारा, नग्न असणाऱ्यांना वस्त्र देणारा परमेश्वर त्यांनी सांगितला. संत विचारांचा व वारकरी परंपरांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. संत कबीर ,संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे दाखले ते आपल्या कीर्तनातून सतत देत असत . या संतांसमोर मी कोणत्या झाडाची पत्ती! असे ते  म्हणत असत. प्रेम ,सहानुभूती ,करुणा, भूतदया हा त्यांच्या विचारांचा पाया होता. अविद्येचे अनर्थ त्यांनी त्यांच्या जीवन संघर्षातून जाणले होते, म्हणून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा दिवा तुमच्या घरात प्रकाशमान ठेवा असे ते कीर्तनातून आवर्जून लोकांना सांगत असत. प्रसंगी घरातील ताट विका अंगावरील कपडयावर कमी खर्च करा पण लेकराले शिकवा.  हा त्यांचा कळवळा असे.

      माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत  गाडगेबाबा! देव शोधता- शोधता देव होणाऱ्या तुकोबारायाच्या अभंगाचे दाखले त्यांच्या कीर्तनातून ते सतत देत.


देह असूनिया देव।

 वृथा फिरतो निर्दैव।।

 देव आहे अंतर्यामी ।व्यर्थ हिंडे तिर्थग्रामी।।

    बाबा दरवर्षी पंढरपूरला जात असत नाशिक आळंदी देहू अशा अनेक तीर्थस्थळावर त्यांनी भेटी दिल्या पण ते मंदिरात कधी दर्शनासाठी क्वचितच गेले असतील. तीर्थस्थळावरील परिसर स्वच्छ करून ते जनसेवा करत असत. त्या ठिकाणी घाट, धर्मशाळा, आश्रमशाळा, छात्रालय ,सदावर्त आदि लोकसेवा जोपासणारी लोककल्याणकारी स्थळे निष्काम कर्मयोगाने राष्ट्रकल्याणार्थ उभी केली. तीर्थक्षेत्री आलेल्या श्रद्धाळूंचा बुद्धिभेद त्यांनी कधी केला नाही. बाबांना पंढरपुरी आल्यानंतर कुणी विचारले "बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे नि घाटाकडे बोट दाखवत बाबा म्हणत," हा समोर जागता ,बोलता, नाचता विठ्ठल असताना देवळात जायचे कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं ?जिकडे नजर टाकावी तिकडे तो अपरापार भरलेला आहेच!."

       बाबा कीर्तना अगोदर त्या गावची स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करायचे. सोप्या प्रचलित ओघवत्या भाषेत, जनमानसात रुजलेल्या शब्दात, त्यांच्याच बोलीभाषेत बाबांचे किर्तन असायचे. शाब्दिक चर्चेत ते कधीच अडकायचे नाही. तुकोबारायांनी जशी लोकभाषेतून अभंग रचना केली ,रसाळ दृष्टांत दिले तशीच वाणी बाबांचे असायची .जीवनात नेहमी घडणाऱ्या घटनांचे ते दाखले देत. कीर्तनस्थळी असलेल्या जेवणावळीत ते कधीच दिसले नाही ,उलट बाजूला जाऊन आपल्याजवळ असलेली अर्धी कोरी भाकर खाऊन ते लगेच कीर्तनाला हजर होत असत. कीर्तनाचा विकरा त्यांना तुकोबारायाप्रमाणेच मान्य नव्हता.


जेथ किर्तन करावे।

 तेथ अन्न न सेवावे।।

 बुक्का लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।


हा त्यांचा नियम ते आवर्जून पाळायचे.


तुका म्हणे द्रव्य देती।

 घेती दोन्ही नरका जाती।।

     हा शोषणाचा बाजार त्यांनी कधीच तोडला होता. या शृंखला तोडणे गरजेचे होते. कोणत्याही शाळेत न गेलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते. नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू आजच्या काळात अधिक समजून घेणे फार आवश्यक आहे. माणुसकीची पूजा करून देव शोधा ......!!!!आता असे लोकोत्तर कर्मयोगी युगपुरुष होणे नाही......!!!



संजय खांडवे बुलढाणा 90 11 97 11 22

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

हिवऱ्याच्या अनंतनाथास

 *हिवऱ्याच्या अनंतनाथास उदंड आयुष्य लाभो!!!!!!!*

♾️♾️♾️♾️♾️♾️🌷


#जे जे जेथे पावे । ते ते तेथे सर्मपावे सेवे ॥


#तुका म्हणे


नित्यानंद सेवा केद्राच्या माध्यमातून तुम्ही करत असलेली सेवा शद्वात बसणे शक्य नाही .


#फोडीले भंडार धन्याचा हा माल ।

#मी तो हमाल भार वाही।


या भावनेतून आपण हे काम करत आहात . आजच्या चमकेगीरीच्या काळात कोणताही लाभ ,मोह न ठेवता  कृतीशील समाजसेवेचा आदर्श आपण घातलात !

आम्ही आमच्या जवळ जे आहे ते देऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्याजवळ जे आहे- नाही ते भरभरून देता हा आमचा करंटेपणाच !

आम्ही आमचा वाढविला  तो पसारा अनं तुमच्या जवळ जो आहे तो पिसारा हे मात्र नककीच ! आपल्या कार्यास अनंत शुभेच्छा !

आम्ही मणभर नाही परंतु कणभराचे भागीदार नककीच असू !

तुमचा वाढदिवस आमच्या साठी शुभेच्छा देणारा पण त्या निरागस निराधारांसाठी मात्र आयुष्यात प्रकाश देणारा  !  दाखविणारा सूर्यचं जणू !

जो कधी मावळणार नाही तो अनंत ..........

सदैव चैतन्य ज्याच्यात खेळत राहते असा सचेतन......

गणिताच्या व्याख्येत  अमर्याद,अमाप.......

कोणत्याही मापात टाका,

#एक आदर्श शिक्षक

#वक्ता

#लेखक

#कवी

#निवेदक

#मित्र

#ज्याच्या ज्या नात्यात असेल त्या नात्यातही !

अगदी परिपूर्ण बसणारे आमचे मित्र ,

अगदी पहिल्या भेटीपासून ज्यांना आम्ही प्रेमाने "महाराज" म्हणतो. पण तुम्ही कधी "संधी साधू" मात्र वाटला नाही.......!!!! . तुम्ही उपेक्षितांना संधी देणारे आम्हाला दिसले. आपल्या मराठी भाषेलाच नव्हे तर इंग्रजीलाही अलंकार चढवणारे तुम्ही थोर सुवर्णकारही आहात. तुमच्या सहवासात हे आम्हाला पदोपदी जाणवत राहायचं . यात कुशल सुवर्णकाराच्या हातातून निर्माण झालेला हस्ताक्षर ही तितकंच माणिक मोत्यासारखं सुंदर .........!! हेवा वाटायचा आम्हाला !!!अश्या अष्टपैलू समाजशील, अनाथांचा नात असलेल्या असामान्य काम करणाऱ्या व्यक्तीमत्वास उदंड़ आयुष्य असायलाच हवे!!!

      अनंतनाथा .......!!!!

आम्ही आमचे घरटे कधीचेच विणले, त्या घरटयात आमच्या पिलांना आम्ही रोज त्यांच्या चोचीत दाणे भरवतोय, त्यांना आम्ही सर्व काही देतोय पण तू दुसऱ्याच्या अनाथ असाहय असलेल्या पिलांना आजच्या खुज्या युगात घरटी बांधून त्यांना दाणी भरवण्या सोबत उडणेही शिकवतोय,  हे  असामान्य काम सामान्य करूच शकत नाही ! आपल्या कार्यास आपल्या वाढदिवसा सह अनंत शुभेच्छा!बापमाणूस अनंता !



♾️🙏🏻 संजय खांडवे, बुलढाणा

शिवनेरी

 *शिवनेरी* 



*स्थान*- शिवनेरी ता. जुन्नर जि. पुणे , उंची 3500 फूट

*मार्ग*- पुणे पासून १०० कि.मी., पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव पासून 18 कि.मी., छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगर- बेल्हे- आळेफाटा मार्गे 208 कि.मी.


'"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग "असे रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले आहे. अनेक प्राचीन ग्रंथातही किल्ल्याचे महत्व विषद केले गेले आहे. एक किल्ला हजारो सैन्याचे काम करत असे,  एक बुरुज म्हणजे एक मोठी फलटणच असे, त्याचा अभेद्यपणा हा त्या राज्याच्या शक्तीचा भाग असे. सातवाहन काळापासून किल्ले-दुर्ग यांची निर्मिती सुरू झाली. त्यापैकीच एक शिवनेरी हा गिरीदुर्ग सातवाहन काळात  महत्त्वाचे केंद्र होता. समुद्रमार्गे ग्रीक ,रोमन, इजिप्त यांचा व्यापार भारताशी होत असताना जुन्नर -पैठण- भोकरदन- तेर आदी शहरांना जोडणाऱ्या मार्गातील महत्त्वाचे केंद्र जुन्नर होते. कोकणातून कल्याण ,सोपारा अशा पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून देशावर येण्यासाठी नाणेघाट या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. नाणेघाटातून वर आल्यानंतर जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी या पहारेकरी किल्ल्यासोबतच आकाराने मोठा व तेवढाच अभेद्य ,चढाईस कठीण तथा सर्व सुख सोयीने युक्त असा शिवनेरी किल्ला होता.  हा किल्ला शिवनेर या खोऱ्यात येतो. महाकाय प्रचंड असा जमिनीवरून जहाजासारखा दिसणारा व आकाशातून महादेवाच्या पिंडीसारखा आकार असलेला या शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिणेला मीना नदीवर वडज धरण आहे. किल्ल्याच्या उत्तरेला अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री दिसतो. पूर्व बाजूस मानमोडी लेणी समूह आहे व पश्चिमेस तुळजा लेणी समूह आहे. शिवनेरीच्या कातळात सुद्धा अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर झाला म्हणून शिवप्रेमींच्या हृदयात या किल्ल्याचे विशेष स्थान आहे .


यत: शिवगिरेर्मून्र्धि जात:स पुरुषोत्तम:।

तत: प्रसिद्धा लोकsस्य शिव इत्याभिधाsभवत।।

 

 समकालीन शिवभारत या ग्रंथामध्ये वरील श्लोक आला आहे. यामध्ये शिवनेरी गिरीदुर्गावर शिव या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला या किल्ल्याच्या नावावरून जनमानसात शिव हे नाव प्रसिद्धीस पावले.  रोज हजारो शिवप्रेमी या शिवजन्म स्थळावर नतमस्तक होतात. 

          जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून (चौकातून) किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बरेच वरपर्यंत मोठ्या वाहनाने वाहनतळापर्यंत पोहोचता येते. इथूनच आपण पहिल्या क्रमांकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो याच वाटेने आपल्याला सात दरवाजे लागतात. थोड्या दगडी पायऱ्या चढून झाल्यावर महादरवाजा लागतो. असाच परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा ,पीर दरवाजा, शिवाबाई दरवाजा, फाटक दरवाजा, कुलापकर दरवाजा पार करत पुढे जात असताना किल्ल्याला असलेल्या भक्कम ततबंदीचे दर्शन होत जाते. यादव, शिलाहार ,बहामनी, मोगल काळात या किल्ल्यावर बांधकामे होत गेली .जवळ येईपर्यंत दरवाजे दिसत नाहीत पण प्रत्येक दरवाजे हे परस्परांच्या टापूत आहेत असे दिसतात. प्रवेशद्वारावर गणेशपट्टीचे दर्शन होते. समोरच कातळ कपारीतील शिवाई देवीचे मंदिर आहे .मूळ गाभारा प्राचीन आहे. मंदिराचे इतर बांधकाम बांधकाम पेशवेकालीन दिसते. कुलापकर दरवाजा ओलांडल्यानंतर उजव्या बाजूस खोल दरी आहे व त्या कपारीत पानपुढे आहेत त्यांना गंगा -यमुना असे म्हणतात. गडावर पाण्याची व्यवस्था मुबलक आहे असंख्य पाण्याची टाकी व तलावही आहेत. विशेष म्हणजे दुष्काळातही या टाक्यात पाणी राहते. याच पानवठयाच्या टाक्यातून व तलावातून काढलेला दगड बहुदा गडावरील इमारती बांधकामासाठी वापरला जात असे. विविध सत्ताधीशांच्या काळात परिस्थितीनुसार बुरुज, तटबंदी व इमारतीचे बांधकाम केले गेले तिथेच आपल्याला अंबरखाण्याची मोठी इमारत दिसते .यात धान्य ठेवले जात असे .मलिक अहमदच्या काळात अंबरखाण्याचे काम झाले. थोडे चालत गेल्यावर उजव्या बाजूस वर टेकड्यावर शिवकुंज इमारत दिसते ती आधुनिक काळातील आहे. येथे जिजाऊ व बाल शिवबा यांची धातूची मूर्ती आहे. समोरच कमानीची मशिद आहे. या मशिदीवर वरच्या बाजूस फारशी भाषेत दोन शिलालेख कोरलेले दिसतात .त्याखालीच पानपोढी आहे. ही अर्धी उघडी व अर्धी बंदिस्त आहे . ही प्राचीन काळातील आहे. याच पानपुढीच्या बाजूने खाली जुन्नर शहरात उतरणारा साखळीचा मार्ग आहे. ही वाट कातळ कडेतून जाते व अवघड आहे या वाटेतूनच बौद्ध लेण्यांमध्ये पोहोचता येते. मशीदच्या पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. या ठिकाणी हमाम खाना आहे .भूमिगत पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था यात दिसते. इस्लामी राजवटीत हे बांधकाम झाल्याची प्रचिती येते. असा हमामखाना म्हणजे स्नानगृह बऱ्हाणपूरच्या ताप्ती नदीच्या बाजूला असलेल्या महालात आजही चांगल्या अवस्थेत आहे. शिवनेरीवर अवशेषच दिसतात .समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेली दुमजली इमारत आहे. खालच्या खोलीत पाळणा ठेवलेला आहे. याच खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वर जाण्यास पायऱ्या आहेत. येथून पुढे समोरच्या टोकावर बदामी तलाव आहे. बदामी तलावाच्या मध्ये दगडी खांब आहे. खापरी पाईपचे अवशेषही या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी त्या काळामध्ये कारंजाची व्यवस्था केलेली असावी असे दिसते .समोरच्या टोकावर इमारतीच्या अवशेषही आहेत तेथे कारागृह होते व त्या कारागृहाच्या समोरचा भाग हा कडेलोट म्हणून ओळखला जातो. तेथून गुन्हेगारांचा कडेलोट केल्या जायचा. 

         किल्ल्याचा एकंदरीत इतिहास पाहता हा किल्ला स्वराज्यात कधीच नव्हता. बहामणी, निजामशाही, मुघलशाही  या मध्ये हा किल्ला झुलत राहिला. शहाजीराजांच्या जहागिरीत हा किल्ला होता. 1630 ते 1636 हा कालावधी शहाजीराजांच्या जीवनातील एक अत्यंत धामधुमीचा कालावधी होता. स्वातंत्र्याची आस या मातीला लावून देणारे शहाजीराजे यानी  त्याकाळात या शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते. या किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराज याची कन्या जयंती हिचा विवाह शहाजीपुत्र संभाजींशी झाला होता .तो याच शिवनेरी किल्ल्यावर झाला अशी नोंद आहे. यामुळेच जिजाऊ देखील शिवजन्माच्या वेळी सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावरच शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था केली होती. 1636 नंतर निजामशाहीवर वचक बसवण्यासाठी शहाजहानने हा किल्ला  आपल्या ताब्यात घेतला होता. १६५७ व १६७८ अशी दोन वेळा या किल्ल्याला स्वराज्यात घेण्याची मोहीम आखली गेली परंतु ती अयशस्वी राहिली .पुढे पेशव्यांच्या वीरेश्वर चितळे या सरदाराने शिवनेरी किल्ला घेण्यात मोठी कामगिरी बजावली होती.  परंतु २० मे १८१८ रोजी पुन्हा इंग्रजांनी तो आपल्या ताब्यात घेतला .हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत रमणीय आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक लेणी समूह आहेत . रमणीय असा माळशेज घाटही येथून जवळच आहे. एकट्या शिवनेरीच्या डोंगरातच 78 लेणी आहेत शिवाय अनेक पाण्याची टाकी देखील आहेत या लेण्यांमध्ये शिलालेख सुद्धा आढळतात आत मध्ये चैत्यगृह सुद्धा आहेत त्या ठिकाणी पोहोचणे मात्र अत्यंत अवघड आहे. दोन अष्टविनायक याच परिसरात येतात. ओझर, लेण्यांद्री व जुन्नर या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आहे. निसर्ग सौंदर्य  मनमोहक आहे त्यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी व इतिहास प्रेमींना सतत खुणवत असतो.




संजय खांडवे बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...