*लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*
जशी आपली प्राचीन सिंधू संस्कृती आहे तश्याच अनेक संस्कृती आपल्या पृथ्वीतलावर नांदून गेल्या. त्यांना 'सभ्यता' असेही म्हणतात. सभ्य लोकांनी निर्माण केलेली संस्कृती म्हणजे 'सभ्यता'. हजारो वर्षानंतरही आज जगाला प्राचीन संस्कृती विषयी विलक्षण आकर्षण आहे. याचे कारण त्यांच्या लोकजीवनातील परंपरेतून निर्माण झालेले आदर्श, आजही आपल्या जीवनाशी जुळून पहिले तर ते सरसच ठरतात. जगातील जवळपास संस्कृतीच्या मुळाशी माता आहे. जसे व्हिनस, इश्तार , मिनर्व्हा, आदि स्त्रीरूपदेवता इतर संस्कृतीत आढळतात. तशाच आपल्या मोहेंजो-दडो -हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहरातील उत्खलनात मातृदेवतांची प्रतीके सापडली आहेत .पूर्वी समूहाने राहत असताना स्त्री त्या समूहाची प्रमुख असे .पुढे गण व्यवस्था अस्तित्वात आल्या व ती गणाची प्रमुख झाली. सृजनशीलता स्त्रीच्या अंगी होती. ती नवनिर्मितीची प्रेरणा होती .तिच्यामध्ये असलेल्या विशेष कार्याने ती मातृदेवतेच्या स्थानावर पोहोचली. निरीक्षणातूनच तिने शेतीचा शोध लावला. जन माणसांच्या नेणीवेत असलेली 'निऋती ' ही शेतीचा शोध लावणारी पहिली स्त्री ठरली.
आपल्या प्राचीन संस्कृतीची नाळ कृषी परंपरेची अगदी घट्ट बांधलेली आहे .भाद्रपद अमावश्येच्या दुसऱ्याच दिवसापासून सणसमारंभाची रेलचेल दिसते .प्रदिर्घ वर्षाकाल संपल्यानंतर भूमाता धन, धान्य आणि सौंदर्याने भरून जाते. अश्विन शु. पासून नवरात्र उत्सवास म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजनास सुरुवात होते .अश्विन शु. पौर्णिमेला लक्ष्मीच्या आगमनानिमित्त जागरणातून "को जागर्ति" म्हणजे कोण जागे आहे अशी विचारणा करून आपल्या लेकरांच्या कृतीशीलतेची चाचपणी मातृदेवता करत असल्याची जाणीव होते. धन ,धान्य, समृद्धीचा व विचार ,आचार सदाचारांचा व परंपरेचा कोजागिरी हा मेळावा आपल्या कृषी परंपरेचा भाग ठरतो.
महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा डॉ सरोजिनी बाबर यांनी 1990 ला संपादित केलेला दसरा दिवाळी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आरसाच ठरतो. आपल्या वाडवडिलांनी चालवत आणलेल्या प्रथा, परंपरेचे पुण्यस्मरणच या निमित्ताने होते. दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा सण आहे. इ. स. पूर्व पासून याचे पुरावे आढळतात. हीच समिक्षा या ग्रंथाच्या संपादनातून संपादकांनी केली आहे. दिवाळीला इ.स. 1 ते इ. स. 400 या काळात "यक्षरात्री" म्हटले जायचे. वात्सायनाच्या "कामसूत्र" या ग्रंथात हे नाव वापरल्याचे आढळते. आज पासून 1700 वर्षांपूर्वी "दिपप्रतिपदुत्सव" असे कनोजच्या राजाने आपल्या नागानंद या नाटकात म्हटलेले आढळते .कश्मीरमध्ये इ. स.800 च्या काळात नीलमन पुरानात "दिपमाला "असे संबोधले गेले. इ.स.949 मध्ये सोमदेव सूरीने लिहिलेल्या "यशस्तिलक" या ग्रंथात दिवाळीची वर्णने येतात. संत नामदेव ,संत ज्ञानेश्वराच्या समकालीन असलेल्या महानुभाव साहित्यातील "लीळाचरित्रात" तेलंग स्नान व ओवाळणीचा सोहळा वृत्तांत येतो. अबुल फजलच्या "एने अकबरी" मध्ये दिपावलीचे वर्णने आढळतात .अकबरही त्याच्या संपूर्ण महालात दीवे लावायचा .दौलत खांण्या समोर 40 फुट उंच स्तंभ रोवला जायचा व 16 दोरखंड लावून त्या स्तंभावर विशालदीप लावला जात असे. जैन धर्मातही चार दिवस दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. भगवान महावीरांच्या मोक्षानंतर या उत्सवास सुरुवात झाली. 2500 वर्षांपूर्वी अमावश्येच्या दिवशी त्यांचे निर्माण झाले होते .आता ज्ञानाचा दीप निघून गेले आहेत म्हणून आपण मातीचे दीवे पेटवून प्रकाश प्रज्वलित केला पाहिजे म्हणून ही परंपरा जपली जात आहे. प्रभू रामचंद्रांचे 14 वर्षे वनवासातून आगमन होणे या क्षणालाही या उत्सवाची दीपोत्सवाच्या रूपाने जोडले जाते.
अश्विन महिन्यातील 12 वा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसालाच वद्य द्वादशी असे म्हणतात .गाई, म्हशी, शेळ्या ,मेंढ्या ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती. "गाई, म्हशींनी भरला वाडा, बळीच राज्य '! अशी म्हणायची प्राचीन प्रथा आहे. वसुबारस हा कामेधेनूची पूजा करण्याचा दिवस आहे. कामेधेनू ही मनाची इच्छा पूर्ण करणारी असते. कामे धेनूचा समुद्रमंथनाचा संदर्भ कालिका पुरवण्यात येतो. दिवसभर उपवास करून कृषक संस्कृतीत गाई- वासरा विषयीचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.
अश्विन महिन्यातील 13वा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. वैद्यकशास्त्रात पूजनीय असलेल्या धन्वंतरी देवतेचा जन्म अश्विन शुद्ध त्रयोदशीला झाला अशी मान्यता आहे. समुद्रमंथनातून अमृत कलश याच देवतेने वर आणला होता असे पुराणात सांगितले जाते. दक्षिण दिशेला दिप लावून दीपदान करण्याची प्रथा या दिवशी आहे. यातून दक्षिण दिशेचे महत्त्व विषद होते .जैन धर्मात या सणास 'ध्यान तेरस' असेही म्हणतात. भगवान महावीर हे निर्वाणाच्या आधी योगनिद्रेत गेले म्हणून असे म्हटले जाते. नरकचतुर्दशीला सुद्धा दिवाळीच्या सणात विशेष महत्त्व आहे. नरकासुराची कथा आपण ऐकत आलो आहोत नरक राजा आणि इंद्र यांचे वैर होते.पण श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याची कथा पुरानात आहे. नरक राजाचे नाव या दिवशी या सणाला दिले गेले. रोगराई ,दुर्गंधी दूर व्हावी म्हणून घर स्वच्छ व पवित्र केले जाते न चुकता साफसफाई ,रंगरंगोटी नंतर तैलमर्दन व अभ्यंगस्नान अपरिहार्य असते. शरद काळामध्ये थंडीची चाहूल लागलेली असते आणि वातावरणामध्ये बदल झालेला असतो. आरोग्य विषयक बाबींशी संबंधित या गोष्टी जीवन सुखी आणि समृद्ध करणाऱ्या असतात. राजस्थानात हा दिवसाला "रूपचौदस" म्हणतात.अश्विन अमावश्येला येणारा लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो कृषी परंपरेतील हा दिवस धान्य लक्ष्मीपूजनाचा मानला जातो नवीन घरात आलेल्या धान्याच्या राशीचे फळांचे पूजन या दिवशी केले जाते .धन हे धान्य नंतर आले. आजही आपण नववधूला घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने येत आहे असे मानतो .त्या नववधूच्या हातात धान्य घेऊनच घरात प्रवेश करतो. अगोदर देवाला नैवेद्य (शेतात पिकवलेल्या धान्यापासून) मगच कृषी संस्कृतीतील लोक भोजन करतात यामधून आपले आपल्या परंपरेची असलेले नाते किती दृढ आहे हे समजते. खरं तर लक्ष्मीचा संमंध पृथ्वीशी आहे. ती भूमाता आहे. कर्दमातून कमळ फुलतो व या कमळात लक्ष्मीचे वास्तव्य आहे म्हणून या भूमातेची पूजा म्हणजे कृषी आराधनाच आहे. पुरानांनी आठ लक्ष्मी सांगितल्या आहेत. धान्यलक्ष्मी ,धनलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी व राजलक्ष्मी या सर्व क्षेत्री मातृशक्तीच आहे जैन व बौद्ध साहित्यातही लक्ष्मीचा उल्लेख येतो पितळखोरा लेणी मधील गजलक्ष्मीचे पॅनल आजही मुंबईच्या संग्रहालयात आहे. लोणावळ्यातून उंबरखिंडीत उतरताना आम्हाला अनेक ठिकाणी गजलक्ष्मीची शिल्पे बघायला मिळाली होती. गजलक्ष्मी मध्ये दोन्हीही बाजूला गज म्हणजे हत्ती आपल्या सोंडेतून भूमीवर पाण्याचा वर्षाव करत आहे. हे सुफलतेचे प्रतीक आहे आज आपण नवीन चित्रांमध्ये गजांच्या सोंडेतून धनाचा वर्षाव होताना बघतो. आता सोन्या चांदीचे मूर्ती तथा शिक्के आपल्याला दिसतात. गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, कुललक्ष्मी यामधून मातृशक्तीचा सन्मान होताना दिसतो.
कार्तिक महिन्यातील प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस, सम्राट बळीराजाच्या गौरवाचा दिवस." इडा पिडा टळो बळीच राज्य येओ" हे मौखिक परंपरेतून आपण ऐकत आलो आहोत विशेष करून ओवाळणी करत असताना स्त्रियांनी हा कानमंत्र पुढे पुढच्या पिढीला देत राहण्याचं काम केलं. पुरानकथांमध्ये बळीराजाची कथा सांगितली जाते. वामनाने कपटाने बळीला पातळात घातल्याची कथा आहे. प्राचीविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांच्या बळीवंश या ग्रंथामध्ये बळीराजाची समीक्षा करण्यात करून बळीराजाला न्याय दिला आहे. महात्मा फुले यांनी देखील बळीराजाला कुलस्वामी संबोधिले आहे .हजारो वर्ष ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे .असा दानशूर ,जिवलग, आमचा लाडका, बळीराजा. तसेच महान तत्ववेता, संविभागी स्वतः सर्वज्ञ, समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना एकमेकांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी सम्राट बळीराजा. निर्मितीगर्भ कृषीला जपणारा, शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक सकारात्मक क्रियाशील समाज रचना घडवून आणणारा समाज शिल्पकार, कारस्थान कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरे जाणारा उन्नत महामानव, पराभवातही पराभूत न होणारा ,शांतताचित्त तत्त्ववेत्ता इतका जिवलग की सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका हा बळीराजा उदार व उदात्त होता.
जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात
*बळी सर्वस्वे उदार।* *जेणे उभारीला कर।*
बळीराजा हा सर्व अंगाने उदार असा आहे. दान देण्यासाठी त्याने आपला हात वर केला आहे. पण वामनाने 'कहार' करून बळीराजाला पाताळात घालण्याचं काम केलं आहे .
*करूनी काहार।*
*तो पातळी घातला।।* समतावादी संस्कृतीचा महानायक कार्तिक प्रतिपदेला म्हणजेच बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा राजा बळीराजा प्रजेला भेटायला येतो. अशी उदात्त भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळताना "इडा पिडा टळो बळीच राज्य येओ". असे पुटपुटते त्याच दिवशी वामनाने कपटाने बळीराजाला पातळात घातले आणि आपला बळीराजा आपल्याला पुन्हा भेटायला येतो तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .याच दिवशी प्रजा आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करून बळीपूजन करत असते आणि आपल्या दानशूर संविभागी न्यायप्रिय अशा राज्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असते.
कार्तिक वद्य द्वितियेस भाऊबीज साजरी होते .त्याला यम द्वितीय असेही म्हणतात. हा दीपावलीचा शेवटचा दिवस यमाने आपल्या बहिणीच्या म्हणजे यमीच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेतली. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे. पूर्वीच्या काळी दळण-वळण अभावी जवळची माणसं भेटणं अवघड व्हायचं त्यासाठी या सणास विशेष असे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या सणाच्या दिवशी गाईच्या शेणाचे दहा गोळे करून अंगणात ठेवत असत. त्यावर पळसाची डहाळी टोचून ते वाळल्यावर छतावर फेकून दिले जाई. त्याला मेढे असे म्हणत. भाऊबीजेला भाऊ घरी आला की त्या गोळ्यावर तापविलेल्या पाण्याने त्याला अभ्यंगस्नान बहीण घालत असे. लहानपणी भाऊरायांसाठीची जात्यावरची गाणी आपण आई ,आजी, आत्या यांच्या तोंडून रामप्रहरी जात्यावर ऐकली आता मात्र हा लोकसंस्कृतीचा अविष्कार लोप पावत चालला आहे . जैनांमध्ये देखील महावीरांचे भाऊ नंदीवर्धन व बहीण सुदर्शनाची भाऊबीजची आठवण सांगितली जाते.
सणांची नाळ ही लोकसंस्कृतीशी आपल्याला जुळलेली दिसते .विशेष करून कृषीसंस्कृतीशी ती अगदी जवळचं नातं सांगत असते. प्रत्येक भागा नुसार प्रथा व परंपरा या वेगवेगळ्या असतात आपल्या परंपरेत अनेक धार्मिक मिथके देखील सांगितली आहेत. पुराना मधूनही अनेक मिथके आलेली आहे. ही मिथकं आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात. कथा, दंतकथा, जातक कथा व मिथकं हे आपल्याला काहीतरी सांगून जातात. ती खोटी निश्चितच नसतात त्यातून सत्यता शोधावी लागते. या मिथकांच्या साह्याने आपण सत्यशोधन करू शकतो .यालाच मिथकशास्त्र असेही म्हणतात. या आणि आपल्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्या परंपरेच्या माध्यमातून त्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून आपण आपल्या संस्कृती सवर्धन व जतन करण्यासाठी साठी काम करू शकतो ही काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण आधुनिकतेच्या काळात आपल्या मूळ प्रथा -परंपरेमध्ये सतत सर- मिसळ करून भेसळ देत राहू अशी भीती वाटते.
संजय खांडवे
9011971122