सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

*महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

 *महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

      आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्रबोधनाची अखंड परंपरा लाभलेली आहे. महात्मा फुले यांच्या रूपाने महाराष्ट्रभरात एक नवक्रांती निर्माण झाली आणि एक विचारशील क्रांती पुरुष म्हणून त्यांचे साहित्य ,विचार व कार्य पुढील काळात  मार्गदर्शक ठरले .1890 मध्ये महात्मा फुले दिवंगत झाले आणि या प्रबोधनकारी चळवळीला शाहू महाराजांच्या रूपाने पुन्हा एकदा एक नवीन नेतृत्व मिळालं. राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे जाणून शाहू महाराजांनी बहुजन समाजास ''गती" व "मती " देण्याचे कार्य केले . त्याच काळात शाहू महाराजांच्या सोबत सत्यशोधक चळवळीचे लोकप्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनीही काम केले .

      17 सप्टेबर 1885 ला पनेवल कुलाबा येथे जन्मलेले प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमधील एक निडर ,चिकित्सक ,प्रखर प्रवक्ते,साहित्यिक ,लेखक,इतिहासकार तथा संपादक होते .त्यांनी आपल्या परखड व कठोर भाषेत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न अत्यतं प्रभावीपणे नुसते  मांडलेच नाही तर प्रत्यक्ष ते सोडविण्यासाठी  निर्णायक भूमीकाही घेतल्या .त्यांनी लिहलेल्या क्रांतीकारी साहीत्यात महात्मा फुले यांचा आदर्श जाणवतो .लोकहीतवादी आगरकरांचीही प्रेरणा दिसते .महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल  त्यांनी  ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते की ज्या मधे प्रबोधनकारांनी काम केले नसेल़.

        त्या काळात बालविवाह, विधवा केशवपन, देवळा मधील पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यता , हुंडाबळी याविरूध्द सदैव जागृत राहत लढा दिला.माझी जीवनगाथा या समग्र आत्मचरित्रपर वाड़मयात या विषयीचे अनेक प्रसंग त्यांनी लिहले आहे .त्यांचे वाड़मय वाचत असताना आपण जी "ठाकरे शैली" म्हणतो  ती खऱ्या अर्थाने जाणवते .जणू काही प्रबोधनकार स्वतः आपल्या समोर बोलत असल्याचा भास हे वाड़मय वाचतांना प्रत्येक वाचकाला नककीच होतो .हिंदू ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे त्यांच्यामधील तोच बाणा आणि तोच परखडपणा आमच्या पीढीने बाळासाहेबांमधे पाहिला  हे प्रबोधनकारांच्या साहित्यामधीत शैलीवरून कळते . त्यांचे  साहित्य हे महाराष्ट्रातील तळागाळातीत लोकांच्या जीवनशैलीतील एक भागच होता . आपल्या प्रभावशाली इतिहासा बरोबरच त्यांनी सामाजिक समस्याची उकलही आपल्या साहित्यातून करण्याचे अनमोल काम केले .कोदंण्डाचा टणत्कार,दगलबाज शिवाजी,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,खरा ब्राम्हण,भिक्षुकशाहीचे बंड,हिंदू धर्माचे दिव्य ,ग्रामण्याचा इतिहास ही त्यांची काही गाजलेली साहित्य होय . माझी जीवनगाथा हे त्यांचे खंडमय आत्मचरित्र होय.याशिवाय  उठ मराठा उठ , श्री गाडगेबाबा, संस्कृतीचा संग्राम, काळाचा काळ, शेतकऱ्यांचे स्वराज्य, कुमारीकांचे शाप, रंगो बापूजी,वत्कृत्वशास्त्र व कला, समर्थ रामदास, पंडिता रमाबाई असे विविध साहित्याची विषय त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळले आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैचारिक चळवळ उभी केली. 

          प्रबोधनकार नेहमी म्हणायचे की "मी राजकारणी नसून समाजकारणी आहे. मी पुस्तकी सुधारक नव्हे, सुधारणाग्रणीची  पुस्तके वाचून किंवा व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूच्या सुधारणा वादाकडे वळलेला नाही. माझे बालपण व तारुण्य मुळात अशा काळात गेले की त्यावेळी पांढर पेशा समाजात संताप जनक रुढी बोकाळलेल्या होत्या." प्रबोधनकारांनी त्या काळात ओळखले होते की शहरी संस्कृतीत चार दोन लोक शिकून समाजामधे जागृती करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू शकतो पण माझ्या तळागाळात अनिष्ठ रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांचे काय ? शहरी भागापेक्षा त्यांचा टक्काही फार मोठा होता .अभयाने लिहणारे व बोलणारे सत्वशील इतिहास भक्त म्हणून ख्याती असलेले प्रबोधनकार ठाकरे हे यामुळेच लोकप्रबोधनकार ठरतात .  

          माझी जीवनगाथा मधे ते लिहतात "ठाकरे " मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे.तेथे आजही ठाकरे घराणे असावी , पालकर ठाकरेंशी नावापुरता संबंध आला त्यापुढे नाही ."धोडपकर" असेही त्यांचे जादा आडनाव आहे. पण त्यांचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आड वळणाला फारसे कधी गेले नाही नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला बरेच दिवस या धोडपकरांनी त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावरचा दाना- वैरण संपला आणि त्यांनी दिलेल्या निकरीचा लढयात  ते कामी आले. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत.त्यांचे आजोबा भिकोबा धोडपकरांनी हेच आडनाव पुढं आमरण चालविले. ठाण्यावरून त्यांच्या आजोबा यांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहान घर बांधले आणि धोडपकरांचे ते "पनवेल कर "बनले. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले तरी त्यांच्या वडिलांनी मात्र शाळेत त्यांचे नाव घालताना " ठाकरे" आडनावाची पुनर्घटना केली आणि ती आजवर चालत आली आहे याच " ठाकरे " नावाची छाप आजही महाराष्ट्रावर दिसते .

        दशावतारी दारिद्रय अनुभवलेल्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच वलय दिसते .बावीस वेळा आषाढी -कार्तिकेची वारी करणारे त्यांचे आजोबा प्रचंड स्वाभिमानी ,अभयी,विज्ञाननिष्ठ होते त्यांचे अनेक प्रंसंग जीवनगाथेत आहेत. प्लेगच्या देवीचा प्रसंग प्रत्येक वाचकाने वाचावा असाच आहे.

       प्रबोधनकारांचा या पुढील ज़ीवन प्रसंग अधिकच संघर्षमय आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणाऱ्या प्रबोधनकारांवर राजर्षी शाहू महाराजांनी पुत्रवत प्रेम केले .त्याना हे कार्य करत असतांना त्रासही झाला .पुण्यात तर त्यांच्या द्यरासमोर अनेकदा मेलेले गाढवेही टाकली गेली .जीवंतपणी स्वतः प्रेतयात्राही त्यांनी पाहिली पण,घाबरतील ,डगमगतील ते "ठाकरे " कसले!

        

"समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात 

    कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "

        या भूमीच्या दशेच्या काळात दिशा देण्याचे काम  विचारांशी  प्रामाणिक असलेल्या निर्भिड  लोकप्रबोधनकारांनी केले .प्रत्येक तरूणांनी त्यांचे साहित्य अभ्यासावे  येवढचं त्यांच्या जयंती निमित्ताने.............!


लोकप्रबोधनकारास विनम्र अभिवादन


संजय खांडवे

9011971122

शनिवार, १८ जून, २०२२

विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर

 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर


नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास

















भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर  शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर  निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !

         विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.  विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी  या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस  शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून  मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.

         नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी.  समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.

    समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्‍याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्‍यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य  नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते.  मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .

     महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे  सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .

      एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !

आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .



➖➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा 

9011971122

➖➖➖➖➖

बुधवार, १ जून, २०२२

अहिल्याबाई होळकर

 *लोककल्याणकारी मातोश्री अहिल्यादेवी*


२२०० वर्षापूर्वी नर्मदातटापासून दक्षिणमार्गावर सातवाहनांचे अत्यंत प्रगत व आर्थिक संपन्न असलेले राज्य होते याची साक्ष आपणास आजही या प्रदेशातील प्राचीन वास्तु पाहिल्यावर लक्षात येते .त्याकाळात शैलगृहे,लेण्या व पहारेकरी म्हणून गडकोट व मार्ग,पाणवठे हया वास्तु आजही अवशेष रूपाने कमी अधिक आपले अस्तीत्व टिकवून उभी आहेत. हया सातवाहनांची महत्वाची स्त्री नागनिका हीचा नाणेघाटातील  शिलालेख  आजही उपलब्ध आहे .त्या काळातील गौतमीपुत्र सातकर्णी,वसिष्ठापुत्र पुलुमावी,यज्ञश्री सातकर्णी या कर्तबगार महिलांचे राज्यव्यवस्थेतील व समाजजीवनावर असलेले प्रभूत्व लक्षात येते .हजारो वर्षानंतर पुन्हा असेच म्हणावे लागेंल की होळकर साम्राज्यास देवी अहिल्या च्या रूपाने याच भागात एक आदर्श राज्यकर्ती या रूपाने म्हणून जनमानसात एकरूप झाल्या. त्यांच्या काळातही भव्य दिव्य अशा मंदिराचे निर्माण तथा जीर्णोद्धाराचे कार्य झाले. संपूर्ण भारतभर विहिरी, पाणवठे,बारव, धर्मशाळा, तलाव,मार्ग आदी समाजपयोगी वास्तूचे निर्माण केले गेले. त्यांच्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक व राजकीय कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे .*''मी जे काही करणार आहे ते राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठीच असेल ."* या वाक्यातून त्यांच्या  लोककल्याणकारी कार्याची  प्रचीती येते. सामाजिक बंधने असतानासुद्धा अहिल्यादेवींच्या सर्वगुणसंपन्नते विषयी तसेच त्यांचे शौर्य, धाडस, बुद्धिमत्ता, प्रशासन ,मुत्सद्दीपणा,  निर्भीडपणा, ज्ञानलालसा,  औदार्य, सामान्य आचरण, स्वाभिमान, जिद्द ,अचूक न्यायदान ,प्रजाहितदक्ष ता, निर्सगवात्सल,भूतदया,सावधानता,निर्णयक्षमता या गुणांचे विवेचन होणे तेवढेच आवश्यक वाटते.

      *होळकर वंशींयांचा आधारवड मल्हाराव होळकर*

पुणे शहरापासून जवळच नीरा नदीचा एक ओहळ  त्या ठिकाणी असलेले हे .'होळ 'गाव आणि या गावात राहणारी होळकर. मल्हाररावांचे पितृछत्र  लहानपणीच हरवले. त्यांच्या वाट्याच्या जमीनीवरही भाऊ बंधकीची नजर त्यांना त्रासदायक झाली .त्यांची आई मल्हाररावांना घेऊन  भाऊ भोजराज बारगळ यांच्याकडे घेऊन आल्या. त्यांचे मामा हे तळवडे गावचे अधिकारी होते. त्यांना मामांचा आधार मिळाला. पुढे आपली मुलगी गौतमी यांच्याशीच त्यांनी मल्हाररावांचा विवाह लावून दिला. आपल्या गुणांच्या जोरावर स्व पराक्रम मल्हाररावांनी गाजवले. आपल्या मामासोबत त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली .मोहिमेतील पराक्रमामुळे व मावळ प्रांतातील विजयामुळे पेशव्यांनी त्यांना मावळ प्रांताची जबाबदारी दिली. मराठा साम्राज्याचा होळकर घराणे एक मोठे आधारस्तंभ बनले. त्यांची कर्तबगारी, पराक्रम, मुत्सद्दीपणा यामुळे त्यांना बरेच दचकून राहत असत. उत्तर भारतात मल्हाररावांचे सैन्य 30 कोसावर असतानाच "मल्हार आया ! मल्हार आया ! "अशी भययुक्त घोषणाच शत्रू देत सुटायचा . एवढा त्यांचा दरारा होता. आपला पुत्र खंडेराव यांच्यासाठी माणकोजी शिंदे यांची कन्या त्यांनी निवडली. त्यांच्या पहिल्याच भेटीत अहिल्येला ओळखले. हा  भविष्याचा वेध घेणारा पारखीपणा मल्हाररावांच्या व्यक्तीमत्वात होता .होळकर साम्राज्याची तारणहार म्हणून पुढच्या काळात त्या पुढे आल्या. मल्हारराव अत्यंत प्रेमळ, आई गौतमी आणि मल्हारराव यांनी पुत्रवत प्रेम  अहिल्येवर केले त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ही त्यांनी मोठी मेहनत घेतली .सून  म्हणून ते कधीच अहिल्येसोबत वागत नसत. लढाईच्या निमित्ताने मल्हाराव बहुतेक बाहेर असत. त्यावेळी त्यांच्या सूचनेप्रमाणे अहिल्यादेवींनी राज्य चालविले त्यांनी पाठवलेल्या पत्रांच्या आदेशानुसार त्या कार्य करत .बऱ्याच वेळा त्या त्यांच्या सोबत युद्धातही जात असत .आपल्या पराक्रमी सासऱ्याचा अवमान होईल असे कृत्य आपल्याकडून कधीही घडू नये याची त्यांनी कटाक्षाने दक्षता घेतलेली दिसते. मल्हाररावांचे जेवढे प्रेम आपल्या प्रजेवर होते तेवढेच त्या देखील आपल्या प्रजेला जपत असत. भारतीय संस्कृतीचे आदर्श उदाहरण म्हणजे मल्हाररावांचे कुटुंब होते. पेशव्याकडे मल्हाररावांना मोठा मान होता त्यांनी आपल्या भाऊ बंदास पुढे इंदूरला आणले व आपला प्रचंड दबदबा निर्माण केला. १७६६ मध्ये प्राण सोडला.


*आदर्श लोक माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी*

जी माणसे सत्याची साथ देतात दुर्बल, असाह्य लोकांच्या बाजूने उभे राहतात त्यांचा इतिहास लिहिला जातो. अहिल्यादेवी च्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासूनच संघर्षांची मालिका होती. त्यांना अनंत संकटांना तोंड द्यावे लागले. एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात जात असताना ,कुटुंबा सोबतच आपण एका राज्याचे महत्वाचे घटक,एका कर्तबगार पुरूषाची सून तथा भविष्य आहोत याची जाणीव त्यांना होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ 8-9 वर्षांचे होते *आदर्श पत्नी, आदर्श सून ,आदर्श राजमाता* असा त्यांचा पुढचा प्रवास लोकाभिमुख आदर्श राज्यकर्ते असण्याची साक्ष देतो. रणांगणावर पराक्रम गाजविणारे खंडोजी हे आदर्श माता गौतमी कर्तबगार पराक्रमी मल्हाररावांच्या छत्रछायेत वाढले. रणभूमीवर त्यांनी पराक्रम गाजविले पण इतिहासाने त्यांचे पान पुढच्या काळात तुमच्या आमच्या सत्यशोधनासाठीच  सोडून दिले की काय  असे वाटते. सुरजमल जाट यासोबत लढतांना खंडोजीरावास वीरमरण आले .वयाच्या 29व्या वर्षीच अहिल्यादेवींना वैधव्य आले .त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या आप्तांचे असंख्य मृत्यू पाहिले, पण त्या स्थितप्रज्ञ राहिल्या. कधीही त्यांनी आपल्या दुःखाचे भांडवल केले नाही. उलट त्या हे घाव सोसत अधिकच कणखर बनत गेल्या. ज्या काळात विधवा स्त्रीचे दर्शनही अपशकुन मानले जायचे त्या काळात त्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. खंडोजी पाठोपाठ सती जाण्याच्या अहिल्येला  मल्हाररावांनी रोखले. *"होळकरांचे मावळा साम्राज्य आपल्या प्रयत्नाने मोठे झाले आहे. जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करायचे आहे. हे आपणच म्हणाले होते" "अहिल्या "!* आपल्याला या राज्यासाठी या प्रजेच्या हितासाठी थांबावेच लागेल. तेव्हा त्यांनी सती न जाण्याचा निश्चय केला आणि शुभ्र वस्त्र धारण करून होळकर साम्राज्याची दोर आपल्या हातात घेतली.   1766 मध्ये मल्हारराव त्यांना सोडून गेले .अहिल्यादेवीना मालेराव नावाचे एकमेव पुत्र होते .21 वर्षी त्यांना सरदारकी मिळाली   1767 मध्ये मालेरावही गेले त्या पाठोपाठ जावाई यशवंतराव फणसे सुद्धा कॉलरने गेले .मुलगी मुक्ता देखील सती गेल्या, एवढा प्रचंड दुःख या लोक मातेने सहन केले केवळ प्रजेसाठी अन प्रजेच्या कल्याणासाठी आपण खंबीर राहणे ही काळाची गरज आहे . ही मल्हाररावांची शिकवण त्यांच्या सोबत होती.

      आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी लावले . प्रशासनात त्या अगदी चाणाक्ष व प्रसंगी कठोरही असत .एकदा त्यांचे पती खंडेराव यांनी सरकारी खर्चाची रक्कम व्यक्तिगत खर्चासाठी काढली. त्यावेळी त्यांनी खतावणी पाहून त्यांना लेखी जवाब मागितला होता. सोबत 25 मोहराच्या दंडही केला होता.प्रत्यक्ष नातं सुद्धा त्यांनी राज्यहिताच्या आड येऊ दिले नाही .कित्येक वेळी त्यांनी मल्हाररावांना सुद्धा सूचीत केल्याच्या घटना आहेत .  खंडणीदाराच्या प्रगतीमध्ये आपल्या राज्याची प्रगती आहे. याची जाण त्यांना होती त्या कधीही खंडणीदारांना विनाकारण त्रास देत नसत. त्यामुळे कोणी टाळाटाळही करत नसे. पण असे आढळल्यास त्या प्रसंगी पत्र पाठवून ताकीदही देत असत. खरगोन गावातील तापी दास व बनारसीदास हे दोन सावकार होते. दोघेही निपुत्रिक होते. त्या दोघांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने निर्णय घेतला आता आपल्याकडे असलेले दोन लाख रुपये राज्याच्या रक्षणार्थ अहील्यादेवीस द्यावे ,पण अहिल्यादेवींनी ते पैसे नाकारले हा पैसा तुम्ही दान- धर्मात व लोकांच्या समाज उपयोगा मध्ये खर्ची घाला. असे सांगितले याचा अर्थ आपल्या राज्याचा कोष विधायक मार्गानेच वाढवला गेला पाहिजे हे त्यांचे धोरण होते.

   आपल्या राज्यात शांतता कशी नांदेल यावर त्यांचा भर अधिक असे युद्ध आदी गोष्टी त्यांनी होईल तोपर्यंत टाळलेले दिसतात. अवास्तव सैन्य वागविणे व अगदी दुर्लक्षही करणे याचा समतोल त्यांनी साधला.लष्कराचा त्यांवर प्रचंड विश्वास होता .आपल्या मायेचे छत्र त्या धरून होत्या . महिलांना शिक्षित करून त्यांची स्वतंत्र फौज उभारणाऱ्या त्या काळातील  पहिल्याच राज्यकर्त्या म्हणावे लागेल. परंपरेला चिकटून राहून त्यांनी कधीच काम केले नाही. संभाव्य धोक्याची कल्पनाही त्यांना लगेच येत असे. वसई घेण्याचा डाव इंग्रजांचा होता हा धोका त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पेशव्यांना संदेश दिला व आम्ही मदत करायला तयार आहोत असे सांगितले. समस्त संस्थांनीकांनी एकत्र येऊन आपण इंग्रजांशी लढले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या .*"इंग्रजांचा वार म्हणजे अस्वलांच्या गुदगुल्या, व्याघ्रदि श्वापदे व युक्तीप्रयुक्तीने मारतील ; परंतु अस्वलाचे मारणे फार कठीण आहे .सुरत धरून मारले तरच मरेल. नाही तर अस्वलाचा चपेटीत कुणी सापडले तर गुदगुल्या करूनच त्यास अस्वल मारील",*

 पण या सूचनेकडे कोणी लक्ष दिले नाही याचे परिणाम पुढे दोनशे वर्ष या देशाने भोगले.

       युद्धनीती मधील एक निर्भीडपणा चा प्रसंग सांगता येईल पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर होळकर गादीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गंगोबातात्या ने देखील अहिल्यादेवींची साथ सोडून पेशव्यास जाऊन मिळाला.  राघोबा पेशवा पुण्यातून सैनिक घेऊन होळकराचा राज्यावर निघाला होता. ही माहिती सदैव तत्पर असलेल्या होळकर साम्राज्याच्या गुप्तहेर खात्याने दिली . खंबीरपणे संकटास तोंड देण्यास उभे राहून तुकोजी होळकरनां पत्र लिहिले *"पिंडाला कावळा शिवला".* शिंदे, पवार ,गायकवाड या मराठा सरदारांना पत्र पाठवले *"जेवत असाल तर हात धुण्यास महेश्वरी या"* होळकरांच्या लोककल्याणकारी मातोश्रीच्या मदतीस ही मंडळी सदैव तत्पर असत .

   राघोबा पेशव्यास त्यांनी पत्र लिहिले *"आमच्या पूर्वजांनी लाचार होऊन हे राज्य मिळविले नाही .आपल्या रक्ताचे पाणी करून त्यांनी हे उभं केलंय. मला अबला असह्य समजण्याची चूक करू नका .आमच्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहिले तर आमची तलवार चालेल. आम्ही हरलो तर एका स्त्रीच्या शौर्याचा इतिहास  लिहिल्या जाईल; पण आपण हरलात तर एका स्त्रीने हरविले असा इतिहास लिहिला जाईल. आपण तोंड दाखविण्याच्या योग्यतेचे राहणार नाही."*

 आपल्या राज्या शेजारील राज्यांची सुद्धा त्यांचे संबंध सलोख्याचे होते दिवाळी, भाऊबीजीला त्यांना बहिण म्हणून भेटही पाठवत असत.

     समाजातील अनिष्ट रूढी वर त्यांनी कृतीतून प्रहार केले. *जी परंपरा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते ती परंपरा आम्हाला मान्य आहे. प्रकाशाकडून अंधाराकडे नेणाऱ्या परंपरेस त्यांनी अंधश्रद्धा म्हटले .*  स्वतःची मुलगी मुक्ता ही राजकन्या होती त्यांचा त आंतरजातीय विवाह  लावून दिला . भिल्ल रामोशी लोक त्या काळी लूटमार करत त्यांचा बंदोबस्त करणाऱ्यास जावई करण्याची घोषणा त्यांनी केली होती. यशवंतराव फणसे यांनी ती पार पाडली त्यांचा बंदोबस्त केला त्यावेळी भिल्ल रामोशी यांना पगारी सेवेत त्यांनी घेतले. त्या काळात या जमातीच्या विकासाठी  प्रगतीसाठी भरीव आर्थिंक तरतूद करुन त्यांना सन्मानपूर्वक समाजाच्या प्रवाहात आणले. *हुंडाबंदी, बालविवाह बंदी, सती जाणे बंदी ,केशवपन वर बंदी , पडदा पद्धतीवर बंदी विधवा विवाहास प्रोत्साहन, मुले दत्तक घेण्यास मान्यता*, आदी समाज सुधारणा घडवून त्यांनी अलगदपणे या समाजातून बाजूला काढल्या.

     दान धर्माच्या बाबतीत त्यांचे कार्य अलौकिकच मानावे लागेल. *या हाताने दिलेले दान त्या हाताला सुद्धा त्यांनी समजू नये अशी त्यांची निर्मळ भावना होती.* त्यांनी केलेल्या दानाचा वाजागाजा सुद्धा कधी त्यांनी केलेला दिसत नाही.  गौतमी बाई यांच्या खाजगी जहागिरी पुढे त्यांनी अहील्यादेवीस दिली . यामधून म्हणजे आपल्या खाजगी निधीमधून त्यांनी ही समाज उपयोगी धार्मिक दानधर्माचे काम केले. कोट्यावधी रुपयाच्या केलेल्या खर्चाची माहिती सुद्धा आकडा रूपाने इतिहासाला माहीत नाही; पण कार्य मात्र संपूर्ण भारतभर झालेले दिसते.  सर्व रयतेकडे त्या समदृष्टीने बघत. यामध्ये गरीब-श्रीमंत कृषक मजूर किंवा संकुचित धर्मभावना देखील त्यांनी ठेवले नाही आपल्या राज्यात मंदिर ,मशीद  व दर्गा आदींसाठी सुद्धा त्यांनी द्रव्य खर्च केलेले दिसते.

यासाठी देणगी स्वरूपाचा भार त्यांनी कधीच रयते वरती टाकलेला दिसत नाही.

      *काशी,सोमनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, नाशिक, गया, जगन्नाथपुरी ,अमरकंटक, आनंद कानंन,वेरूळ, मथुरा ,रावेर ,रामेश्वर, द्वारका, निळकंठ महादेव, कोल्हापूर, अलमपुर, जेजुरी, पैठण, गंगोत्री ,केदारनाथ ,भैरव, अन्नपूर्ण ,महेश्वर* या संपूर्ण भारतभर असलेल्या ठिकाणी त्यांनी मंदिर जीर्णोद्धार तसेच नवनिर्माण कार्य केले . पशुपक्षी प्राणी तसेच मानवी कल्याणार्थ त्यांनी बारवविहिरी, कुंड, घाट, धर्मशाळा, मार्ग, तलाव ,अन्नछत्रे या गोष्टींसाठी सुद्धा खर्च केला. या कार्यामागचा उद्देश त्यांचा खूप मोठा होता या माध्यमातून मोठा रोजगार लोकांना निर्माण झाला . कलाकुसरी करणाऱ्या हातांना त्यांची कला दाखवून काम मिळाले. पर्यटनास चालना मिळाली .त्या त्या परिसरातील उद्योग व्यवसाय वाढले. पर्यायाने राज्याचे उत्पन्न वाढले ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  देशाच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत प्रवास करताना लोकांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक ऐक्य टिकण्यास मोठी मदत झाली .संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. त्यांचा उद्देश नवनिर्माणाचा होता जीर्ण तुटलेल्या शिळा त्यांना नवनिर्माण करण्यास खुणवत होत्या. तोडून मोडून नवनिर्मिती त्यांना मान्य नव्हती,या साठी होणारा खर्च खाजगी कोषातून हा एक आदर्शच होता .

       नर्मदा नदीच्या तीरावर त्यांनी महेश्वर हे भव्यदिव्य नगर वसविले. व्यापारपेठ निर्माण केली. सोनार, कुंभार, विणकर वसविले. महेश्वरी येथील वस्त्रे आजही प्रसिद्ध आहेत. कुटीर उद्योगाला चालना मिळाली. मंदिरे, घाट तयार केली. जंगलतोडीला विरोध करून वृक्षलागवडीस प्रेरणा दिली. महिलांसाठी शिक्षण खुले केले.आरोग्य क्षेत्रातही भरीव काम माहेश्वरी नगरीत झाले . आजही महेश्वर ला गेल्यावर वैभव आपणास दिसते . *पुण्याचे पुण्य द्वार म्हणजे महेश्वर* असे पेशवे म्हणत. पेशव्यांनीही *मातोश्री अहिल्यादेवी* या आदराने त्यांना सन्मान दिलेला दिसतो. अनेक समकालीन कवींनी अहिल्यादेवींची आपल्या काव्यात स्तुती केलेली आहे. कवी मोरोपंत आपल्या आर्या या काव्य प्रकारात म्हणतात 

*श्री भक्ता अहिल्ये वरा धरा भूषा*

हरिपंत कवी

*देवी अहिल्या शुद्धमती तू सर्वांची माता ।*


*ईश्वर आला तुझे स्वरूपे होऊनी आता ।*

 कवी अनंत फंदी सुद्धा अहिल्यादेवीची आपल्या साहित्यातून गुणगौरव गाताना दिसतात. एवढंच सांगावसं वाटतं आजही या *गंगाजल निर्मल* तेजस्विनी लोकमातेचा इतिहास जाणून घेण्यासाठी साहित्य अपुरी आहेत,हे त्यांची माहीती मिळवतांना लक्षात आले . हा इतिहास समोर आला पाहिजेत आजही मातोश्रींचे होळकर साम्राज्य या जिर्णोध्दारीत वास्तू तुमच्या संशोधनात्मक लेखन इकडे आस लावून आहेत. 



*संजय खांडवे,बुलढाणा*

9011971122

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

पितळखोरा लेणी

 *पितळखोरे लेणी- महाराष्ट्रातील प्राचीन अविष्कार*


लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली .हा कालखंड इस पूर्व ४९१ ते ४५९ हा आहे म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षा अगोदर ह्या शैलगृहाच्या निर्मितीस सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो. नागार्जुन , सीतामढी येथे सुद्धा इस. पूर्व 252 ते 200 या कालखंडात लेण्या खोदल्या गेल्या. सुदामा, विश्वमित्र, कर्णकौपर, लोमेश ऋषी या लेण्या आहेत यापैकी सुदामा ही प्राचीन आहे त्याला न्युग्रोध गुंफा म्हणतात.

           यानंतर इ स पूर्व दुसऱ्या शतकात नर्मदा पार करून   महाराष्ट्रात पितळखोरा या ठिकाणी पहीला प्रयोग झाला .अनेक दिवसापासून या लेणीबद्दल प्रचंड आतुरता होती की ही लेणी करावी .लेणी बघणे व समजून घेणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत .त्यामुळे या आपल्या प्राचीन वारश्याला समजून घेण्यासाठी कुणीतरी जाणकारच लागेल यात शंकाच नाही .नवी मुंबई येथील सूरज रतन जगताप या लेणी अभ्यासकांशी माझा संपर्क झाला .विशेष म्हणजे "पितळखोरा "हा त्यांचा मुख्य अभ्यासाचा विषय होता .गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे या लेणीवर सवर्धनासह काम सुरु आहे .त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभरातून या आपल्या प्राचीन वारश्यावर प्रेम करणारे अभ्यासकासह एकत्र आलो व गौताळा अभयराण्यातील पितळखोरा या ठिकाणी एकत्र येऊन दिवसभर जगताप सराच्या सोबत राहून लेणी समजून घेतली .महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पण आजही दुर्लक्षितच असलेली दिसते .पुरातत्व खात्याचे काम आता बऱ्यापैकी दिसते पण पर्यटनाच्या बाबतीत आजही ही महत्वाची लेणी मागेंच आहे .आमची टिम त्या लेणी परिसरात पोहचताच आगे मोहळ उठल्याची आवई आम्हाला कळाली पण अभ्यासकांच्या अनुभवावर आम्ही पुढे निघालो परत येणारे दोन हौशी पर्यटक भेटले आणि ती आवईच ठरली .या लेणीचा उल्लेख टॉलमीच्या मेट्रीला या ग्रंथात आढळतो.महामयुर या बौद्ध ग्रंथातही 'पितलांग्य' असा उल्लेख आढळतो .सोपारा,कल्याण ,भरूकच्छ यासारख्या देशार्तगत बंदराला जोडणाऱ्या पैठण व तेर या व्यापारी मार्गावर आहे .उज्जैन वरून पूर्वी याच मार्गाने प्रतिष्ठाणशी संपर्क होता व पुढच्या काळात तो अजिठा ,घटत्कोच या मार्गाने वाढला व दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा घटली व पितळखोऱ्याचा विकास कमी होऊन अजिंठा अधिक विकसित होत गेले याचे दुसरे कारण पितळखोऱ्याचा दगड असावा असेही दिसते .याच भागात सातवाहन कालिन भोकरदन (भोगवर्धन)हे शहरही व्यापारी दृष्टया फार प्रगत होते .नुकतेच सम्राटअशोक कालिन भोन येथील प्रगत अश्या शहराचे संशोधन सुरू आहे ते सुध्दा या स्थानापासून जास्त दूर नाही .

    पितळखोरा लेणी ही हीनयान लेणी आहे.या लेणीच्या समकालिन अंजिंठयातील ९ व १० क्रमाकाची लेणी आहे .ही लेणी सुद्धा अजिंठयासारखीच नालाकृती आहे .अरुणा नदीच्या उगम प्रवाहावर याचे निर्माण झाले .सध्या पुरातत्व विभागाने कन्नडच्या बाजूने घाटमाथ्यावरून पायरी मार्ग तयार केला आहे जुना मार्ग आजही चाळीसगाव कडून पाटणदेवी मार्गाने अभयरण्यातून वाट आहे पण येण्यासाठी दोन तीन तास पायी यावे लागते .

    पायरी मार्गाने खाली उतरताच अरुणा नदीची खोल दरी दिसते व उजव्या बाजूला नऊ लेण्याचा समूह दिसतो व समोरच्या बाजूस चार लेण्या खाली उतरल्यावर पूर्ण नजरेस पडतात .

      जेम्स विलसन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५३ मधे इथे पहीले पाऊल ठेवले .या ठिकाणी कुणीही जात येत नव्हते.याठिकाणच्या चैत्यगृहा समोरील सपूर्ण भाग कोसळून हे चैत्य गृह संपूर्ण झाकलेले होते.हेन्री कझेन्स हा इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला त्याने सुद्धा हा ढिगारा पाहीला .जेम्स बर्जर्स यांनी येथील शिलालेखाचा अर्थ शोधला . झ्ग्रंजांनी या लेणीचे मोजमाप सुध्दा केले आहे .सूरज जगताप सरांनी त्या काळचे सर्व फोटोग्राफ मिळवून ते सोबत आणले होते .म गो दिक्षित हे इतिहास संशोधक १९४१ साली येथे आले होते.त्यांनी येथील चार लेण्याचा शोध लावला.त्यांनी सुध्दा या लेणीवर संशोधन केले आहे .१९५३ साली पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून सरक्षित केले .१९५७ -५८ मधे या ठिकाणचा मोठा ढिग काढण्यात आला .या ढिगाऱ्याखाली प्राचीन परंपरेचा उलगडा करणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तु ,शिल्पे सापडली याचा सचीत्र उलगडा अभ्यासकांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जे शिल्प होते त्या ठिकाणी आम्हाला घेऊन  केला .

      आता पर्यन्त आम्ही जेवढया लेण्या पाहील्या तेवढया लेण्यात पाण्याची व्यवस्था ही पानपोढी च्या माध्यमातून केलेली दिसते म्हणजे दगडात कोरुन मोठ मोठे हौद तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवणे .पण या ठिकाणी तशी रचना दिसली नाही याचे कारण तेथील प्रस्तराचा पोत होय हा प्रस्तर एकसंघ असणे आवश्यक असतो .त्यातून पाणी न झिरपणे ,ठिसूळ नसणे गरजेंचे असते पण या ठिकाणी मात्र येथील प्रस्तर एकसंघ नसल्याने व खडक बेसॉल्ट असल्याने मात्र या लेणीचे पुढील काळात खूप नुकसान झाले .

     पाण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन म्हणता येईल असा पाण्याचा बंधारा या ठिकाणी २२०० वर्षापूर्वी  ठिकाणी बांधण्यात आला आजही त्याचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अरुणा नदीचा मुख्य प्रवाह लेणीच्या वरच्या बाजूस अडविण्यात आला व त्या ठिकाणी 22 लाख लिटर पाणी थांबवता येईल अशी बांधणी करण्यात आली आजही नदीतील पात्रात दगडांमध्ये एका सरळ रेषेत लाकडी थांब उभे करण्यासाठी दगड गोल ओंडक्याच्या आकाराचा कोरलेला आहे त्याला सहाय्यक म्हणून दोन्ही बाजूला छोटे छोटे  खाची केलेली आहेत. या मुख्य लाकडांच्या आधाराने दगड व मातीचे लेपन करून हा बंधारा बांधला गेला असावा असे दिसते. पानपोढी ऐवजी या बंधाऱ्याचे पाणी या लेणी समूहात राहणारे बौद्ध भिक्खू वापरत असत.

खाली उतरतात उजव्या बाजूला आपल्याला विहार नजरेस पडते. विहार म्हणजे त्याकाळी बौद्ध भिक्खू साठी ही निवासाची व ध्यानधारणेसाठी ची जागा होती. आजही आपल्याला त्या ठिकाणी लाकडी रिप बसवण्यासाठी ची दगडात कोरलेली खोबणी दिसतात या माध्यमातून त्याकाळी लाकडी कंपार्टमेंट करून ही निवासस्थाने तयार केलेली दिसतात. खोल दरीच्या बाजूने ही आजच्या काळात ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला पॅरापिट करतो अगदी तशीच रचना दरीच्या बाजूने केली असल्याचे जाणवते. त्याकाळी ही लाकडी रचना आपल्याला आता दिसत असलेल्या दगडातील कोरीव कामावरून सहज लक्षात येते.

      हिनयान पंथीय बौद्ध भिक्खू उपासक चैत्यगृह मध्ये आपली प्रार्थना ध्यानधारणा करण्याचे काम करत असत पुढच्या भागात विहाराच्या समोरच एक सुंदर भव्य असे   गजपृष्ठाकार आकाराचे चैत्यगृह नजरेस पडते. आत गेल्यानंतर या चैत्यगृहात स्तुप आहे . प्रस्तर एकसंघ नसल्याने हा स्तूप सध्या अर्धवट दिसतो .छत्रावली,यष्टी,हर्मिका हा भाग दिसत नाही .यापूर्वी यावर दगडी बांधकाम करून पूर्ण केल्याचे जाणवते ज्यावेळी चैत्यगृहात पडझड झाली त्यावेळेस या बौद्ध स्तूपाचे नुकसान झाले असावे. भाचे येथील चैत्यगृहात  असलेला स्तुप हा जवळपास समकालिन असावा असे अभ्यासकाचे मत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिव अवशेषांवर गया, सारनाथ ,नालंदा, या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्यात आले होती . त्यांनी वापरलेल्या वस्तूवर ही स्तूप बांधले जाऊ लागले त्यांना परिभाषिक स्तुप असे म्हणतात. पितळखोरा येथील चैत्यगृहात त्याचे पावित्र्य जपत सर्वांनी बुद्ध वंदना पार पडली . एकूण 37 खांबावर उभा असलेला हा चैत्यगृह आहे सध्या बरीच खांब पडलेली आहे. कृत्रिम रित्या दगडाचा वापर करून खांबाची ची निर्मिती निजामाच्या त्यांनी दिलेल्या मदतीतून त्या काळात केली गेली असे संशोधकांनी सांगितले या विषयावर संशोधनही सुरू आहे. मिथिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दगडी भिंती व खांब अत्यंत गुळगुळीत केलेले दिसतात. या चैत्यगृहाचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की हिनयान चैत्यगृहात नंतरच्या काळात बुद्ध चित्रांची निर्मिती केली गेली अजिंठा मध्ये ज्या पद्धतीची चित्रशैली आहे अगदी तशीच परंतु त्यापूर्वीची अशी ही चित्रशैली दिसते अजिंठ्यातील चित्रशैलीत जातक कथांचा चित्रांचा समूह दिसतो परंतु या ठिकाणी मात्र केवळ बुद्धांच्या चित्रांचा समूह आहे यामध्ये कमल पुष्पात उभे असलेले तथागत बुद्ध त्याच पद्धतीने ध्यानस्थ असलेले बुद्ध तसेच डोळे उघडे असलेले बुद्ध या चित्र समूहात दिसतात.प्रत्येक बुद्धचित्राच्या मागे प्रभामंडळ काढलेले आहे . काजळी वापरून लिहिलेला लेख आजही येथे बघायला मिळतो. चैत्यगृहात गजपृष्टा कार आकाराच्या स्तूपाच्या वरील भागात लाकडी कमानीचा वापर केलेला दिसतो या लेणीत दगडावर विशिष्ठ प्रकारच्या चुना - मातीचा-इतर घटकाचा लेप लावून त्यावर चित्रकाम केलेले दिसते. आज तेथील लाकडी काम गळून पडलेली आहे ज्या ठिकाणी हे काम होते तो भाग आता बिना लेप लावलेला व चित्र काम न केलेला आहे. याच चैत्या तील दहाव्या व अकराव्या खांबावर दोन ब्राम्ही लिपि मधील शिलालेख आहेत . षटकोनी आकारात तासलेल्या या खांबावर अत्तर बनविणाऱ्या  मितदेवाचे दान आहे दुसऱ्या खांबावर संघकाचे दान आहे हे दोघेही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथील आहेत. या दोन्ही खांबावरील चित्र कामाचा लेप गळून पडल्यामुळे हा शिलालेख उघडा पडला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करता आले. लेणीच्या अभ्यासकांच्या मते या चैत्यगृहातील चित्राखाली अजूनही असे शिलालेख असू शकतात. ज्याच्या दानातून ज्या लेणीच्या ज्या भागाची निर्मिती व्हायची त्या भागावर बहुतेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला  शिलालेख आढळतो. असे शिलालेख इतिहास समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडतात.दोन्ही बाजूने दोन ,दोन ढेरपोटया यक्षाने पायरी तोलून धरण्याचे शिल्प आहे .आजही त्या यक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव जीवंत वाटतात .'यक्ष ' हा बौध्द-हिंदू-जैन या सर्व धर्माच्या विवेचनात आढळतो .त्याला या तीनही धर्मात महत्वाचे स्थान आहे . याच ठिकाणी डोक्यावर भार घेत दोन्ही हाताने तो भार पकडलेला फेटाधारी यक्षाचे पूर्ण शिल्प उत्खलनात सापडले आहे .''संकरीन यक्ष " असे त्याचे नाव असून त्याचा उल्लेख महामयुरी या ग्रथात येतो .आज हे अप्रतीम शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय सरक्षण केद्रात ठेवण्यात आले आहे .

     चैत्यगृहातून बाहेर पडताच.सोंड  तुटलेला नऊ हत्ती दिसतात.हा एका विहाराचा भाग आहे वरील प्रस्तर या हत्तीशिल्पावर कोसळले व ही शिल्पे तुटली .नऊ हत्तीच्या समोर पूर्णाकृती नऊ माहुतांची शिल्पे होती त्यांच्या पायाचे अवशेष आजही दिसतात .हत्ती सुद्धा पूर्णणे अलंकृत आहेत .तुटलेल्या माहुतांचे शीर,धड व हत्तीचे सोंडीचे अवाढव्य अवशेष दरीच्या काठावर आजही पडून आहेत .पाठीमागे असलेले विहार या हत्तीच्या रथावर आरूढ आहे अश्या प्रकारचे हे भव्यदिव्य विहाराची ही वास्तु होती. या विहारात वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक दरवाजा पायऱ्यासह कोरलेला आहे .या ठिकाणी पूर्वी लाकडी द्वार होते हे तेथील कोरीव कामावरून दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे या द्वारावर सहा फुट उंच असे हातात भाला घेतलेले द्वारपाल आहेत .यापैकी एका द्वारपालाचे शिल्प अलीकडच्या काळात  तोडल्याचे दिसते .बर्जेस,फग्र्युसन,पर्सी बाऊन या पाश्चात्य जाणकाराच्या मते ग्रीक,इजिप्त ,इराण आदी शिल्प शैलीचा प्रभाव काही अंशी प्राचीन लेणी समूहात जाणवतो याची प्रचीती या द्वारपालाच्या पोषाखावरुन येते .याशिवाय विहारातील बहुतेक द्वारावर पंख असतेले घोडे,हत्ती आदि प्राण्याचे शिल्पे आहेत .उतुंग भरारी घेणारे आवेशपूर्ण शिल्पे ही ग्रीक,रोम,इराणी वास्तुकलेची छाप जाणवते .या भागातून ग्रीक व रोमशी सातवाहन काळात नाणेघाट _कल्याण या मार्गाने सागरी व्यापार चालतच होता .

     या द्वाराच्या डाव्या बाजूला पंचफणी नागाचे शिल्प आहे.या शिल्पाचा उठावदार पणा आता दिसत नाही या नागाच्या पाचही मुखातून आजही पाणी येते .खडकाच्या प्रस्तरात मुरलेले पाणी एकत्रीत करून भूमीगत पध्दतीने या नागफणी पर्यन्त आणले गेले आहे .कोरीव काम करून पाण्याची नहर भूमीगत आहे .जागोजागी छोटे मॅन होल ठेवून त्यात घडीव दगड बसविला गेला आहे जेणे करुन त्यामधे साचलेला गाळ काढता येईल .पूर्वी पूर्णतः दबावाने हे पाणी येत असावे .कारंज्याच्या रूपाने ते नागफणीतून बाहेर पडत होते .मुख्यद्वारावर असल्याने विहारात जाण्या अगोदर स्वच्छतेसाठी असावे .इस पूर्व दुसऱ्या शतकातील जलव्यवस्थापण आजही लाकडी बंधारा व या भूमीगत पाणी रचनेतून दिसून येते .याच द्वाराच्या वर एक आयताकृती रिक्त चौकट दिसते म्हणजे त्यामधील घडीव दगडी  पैनल हा खाली  ढिगाराखाली सापडला होता आज या पैनल वरील शिल्प छत्रपती शिवाजी महाराज म्युझीअम मुंबई येथे बघायला मिळते .या शिल्पात दोन्ही बाजूने ह्त्ती व मधे स्त्रीचे शिल्प आहे.अभ्यासक या शिल्पास महामायादेवी संबोधतात काही या शिल्पास गजलक्ष्मी म्हणतात .अशी शिल्पे जुन्नर परिसरात अनेक भागात आढळतात .डाव्या बाजूला असलेल्या चार लेण्यामधे विहार कोरलेली आहे .वर्षानुवर्ष हा एकसंघ नसलेला प्रस्तर सतत ढासळत राहील्याने अरुणा नदीच्या दरीत मोठमोठया दगडांचा खच पडलाय ,नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने सततच्या माऱ्याने त्यावरील कोरीव काम नाहीसे झालय .एके काळी सुवर्णकाळ ठरलेला हा आपला वारसा आजही आपली वाट पाहतोय .सूरज जगताप सरांसारखी माणसे शेकडो किलोमिटर अंतरावरून येवून येथील अजूनही न उलगडलेल्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेत या प्राचीन ठेव्याची माहीती लोकांना करुन देत आहेत .असे हजारो वर्षापूर्वीचे आपल्।या पूर्वजांचे असंख्य ठेवे आपल्या परिसरात आहेत त्याचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे .हा वारसा आपल्याला सदैव प्रेरणाच देत राहील.



संदर्भ

-लेणी महाराष्ट्राची _डॉ दाऊद दळवी

-लेणी अभ्यासक सूरज जगताप (मुंबई)यांच्या सोबत प्रत्यक्ष अभ्यास दौरा



संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...