मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

नाणेघाटाचा पहारेकरी"किल्ले चावंड"

 

नाणेघाटाचा पहारेकरी '"किल्ले चावंड "


हिंदवी परीवाराची कोरोना काळात योग्य ती काळजी घेत या वर्षीची हिवाळी मोहींम पार पडली .आमचे मार्गर्शक इतिहासकार डॉ शिवरत्न शेटे सरांच्या प्रेरणेतून ,दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट सर परीवाराची धुरा आपल्या खांदयावर घेणारे संभाजी भोसले,अमोल मोहीते यांच्या नियोंजन पूर्वक कृती कार्यक्रमातून  अतिक्षय उत्साहवर्धक वातावरणात जुन्नर परिसर दोन दिवसात अभ्यासपूर्णरित्या जाणून घेतला .

     मोहीमेंचा पहिला दिवस ओझर येथील बेस कैम्प वरील आदरनिय शिवरत्न शेटे सरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रगीताचे गायन करुन मोहीमेंला सुरूवात झाली .

    ओझर वरुन जुन्नरकडे आम्ही मार्गस्त झालो तेथून आपटाळे -नाणेघाट मार्गावर भव्य काताळरूपी डोंगरावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलो .औझर वरुन हा रस्ता एक ते दिड तासाचा आहे .नाणेघाट कडे जाणाऱ्या या मार्गावरून जातांना उजव्या बाजूला लोखंडी कमान दिसते .कमानीतून आत गेल्यावर १ की मी पुढे गेलो की आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.पुढे हा रस्ता चावंडवाडीला जातो .भव्यदिव्य अश्या चावंड दुर्गाचे रूप समोर उभे राहते .याची उंची १०६५ मीटर येते. आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा सूर्यही या गडाच्या पाठीमागे  झाकलेला होता.

      या गडाला महाराजांनी स्वराज्यात घेतल्यावर प्रसन्नगड असे नाव दिले .या गडाला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली .

 या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली .कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .

      आता वनविभागाने काही अंतरापर्यन्त पायऱ्या बांधलेल्या आहेत .या नळीच्या वाटेने पुढे गेल्यावर प्रवेश द्वार दिसते .या पाषाणाच्या दरवाजावर मध्यभागी गणेशमूर्ति आहे .दरवाजातून वर गेल्यावर पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आहेत वर जाताच एक छोटी तोफ आता बऱ्यापैकी तयार केलेल्या लाकडी चाकावर ठेवलेली आहे .डोंगरमाथ्यावर प्रचंड दगडाचे अवशेष नजरेस पडतात .जुने वाडे इमारती याचे जोते व त्याचे पडलेले भाग दिसतात .दाट झुडपातून डोंगर माथ्याकडे एक पाऊल वाट जाते या वाटेत झुडपात इमारतीचे  अवशेष दिसतात .ही वाट या गडावरील चावंडा देवीच्या मंदीराकडे घेऊन जाते .चर्तुभूज देवीची मूर्ती या मंदीरात आहे .दोन माणसा एवढी जागा असलेलं हे मंदीर आहे.मंदीराबाहेर दिपमालेचे अवशेष दिसतात .मंदीरापासून पूर्वेकडे गडाच्या पठारावर उतरत गेले की बरीच पाण्याची टाकी आहेत .पिण्यायोग्य पाणी एवढया उंचीवर उन्हाळ्यातही असते .गडाच्या उत्तर दिशेकडे ही पाऊलवाट चालत जात असता पुष्कर्णो बारव आहे या बारवेला कोरीव काम केलेले दिसते .बरीच शिल्पे ,खांब तुटलेली आहेत बाहेर नंदी आहे व शिव मंदीर आहे बारवेत जिवंत पाणी आहे .गडावर पाऊलवाटेवर कुठे काय आहे याचे छोटे फलक असल्याने बरीच अडचण दूर होते .याच परिसरात सप्तमातृका पाण्याचे टाके  आहे .सात प्रचंड मोठी टाके या काळ्या दगडात कोरलेले आहे .त्यात गडाव२ वर्षभर पुरेल येवढे पाणी आहे .या टाक्यात उतरण्यासाठी एका बाजूने दगडात कोरलेला पायऱ्यासह दरवाजा आहे त्यावर गणेशमूर्ति आहे एखादया वाडयात प्रवेश करावा असा हा दरवाजा आहे तो पाण्यापर्यन्त जातो .सातही टाके एकमेंकांशी जोडलेली आहे पण प्रत्येक टाकयाच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे हे विशेष .साती आसरा या पाण्याच्या ठिकाणी असतात त्या सप्तमातृका याच्याशी संमधीत असाव्यात .कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत .ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .

    गडाच्या उत्तरेकडील कातर कडेवर यादवकालिन गुफा आहेत .या गुफा सैनिक आधिवासासाठी वापरल्या जात असाव्यात .या ठिकाणाहून हजार मीटर उंचीवरुन कुकडी नदीवरील मणिकडोह जलाशय म्हणजेच शहाजीसागर जलाशयाचे निळेशार पाणी मन प्रसन्न करुन टाकते .येथून निमगिरी,हडसर ,शिवनेरी दृष्टीक्षेपात येतो .हरीशचंद्र डोंगररांगासुद्धा येथून दिसतात .पुन्हा वर सप्तमातृकाकडे चालत येऊन गडाचा नळीच्या वाटेकडे परत जातांना गडावर दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात .प्राचीन काळातील स्वच्छता गृह आजही त्या ठिकाणी बघायला मिळते .दगडात कोरलेले हे स्वच्छतागृहाचे भांडे आहे .पाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची रचनाही स्पष्ट दिसते .गडाला खालून वर येणाऱ्या शञूला रोखण्यासाठी तटबंदीची गरज नाहीच एवढी ही प्रचड कातरकडा आहेत पण वरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही धोकादायक ठिकाणी तटबंदी आहे . गडावर राहण्या खाण्यासाठी व्यवस्था नाही पण गडाखालील चावंड वाडीत व्यवस्था होते असा हा प्रसन्नदूर्ग मनाला प्रसन्न करून जातो .



संजय खांडवे

9011971122






गडाच्या पायथ्याशी


काही अंतरापर्यन्त वनविभागाने केलेल्या पायऱ्या


अवघड ठिकाणी केलेली रिलिंग



पूर्वीच्या दगडी पायऱ्या




 गणेश मूर्ती कोरलेला गडाचा  मुख्य दरवाजा


वर पोहचतास ही तोफ 
दिसते




चावंंड देवीचेे मंदिर



गडाच्या पूर्व भागात असलेले पाण्याचे टाके



पुष्कर्णी बारव व महादेवाचे मंदीर



सप्तमातृका टाके

गडाच्या उत्तर दिशेला खाली दिसणारा कुकडी नदीवरील माणिकडोह धरण
(शहाजीसागर जलाशय)



यादवकालिन गुफांचा समुह (लेण्या)


गडावर असलेले प्राचीन काळातील शौच्छालय

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

दोन हजार वर्षा पूर्वीचा प्रसिध्द व्यापारी मार्ग -नाणेघाट

 

नाणेघाट
 

जीवधन किल्ल्यावरुन 
         दिसणारा नाणेघाट


                  
           

देशाकडून कोकणात कल्याणकडे उतरणारा नाणेघाट
हजारो वर्षाच्या रहदारीने मार्गातील दगडही गुळगुळीत झाले आहेत

नाणेघाटापर्यन्त कोणतेही वाहन पोहचते


नाणेघाटातील वाटेवरील राजंण



 


नागनिकाचा लेणीमधील शिलालेख


सातवाहन राजवंशातील हीच ती नष्ट होत आलेली शिल्पे



 

लेणीबाहेरील पाण्याची टाके


पाठीमागे नानाचा अंगठा




दंतकथेतील गुणाने खोदलेला उत्तरेकडील अपुर्ण मार्ग






 इतिहास 
 चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या काळात वापरले जाणारे मार्ग-रस्ते समजून घेणे गरजेचे असते .यामुळे इतिहास समजून घेण्यास अधिक चांगली मदत होते.  आज जसे आपण दळण-वळणाच्या सोईसाठी महामार्ग बघतो अगदी तसेच महामार्ग प्राचीन काळी देखील अस्तित्वात होते .
याच उद्देशाने आमची दरवर्षी प्रमाणे हिंदवी पारिवार हिवाळी मोहींम असते ती यावर्षी नाणेघाटातून होती .
      नाणेघाट म्हणजे २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन  गेली .कला,साहित्य,व्यापार,उद्दयोग या क्षेत्रात या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली .या बंदरात येणारा माल देशावरच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी सह्याद्रीच्या महाकाय डोंगर रांगेतून वाट करुन आणने गरजेचे असल्याने नाणेघाट मधे डोंगर कोरुन हा मार्ग काढण्यात आला .या वाटेने वर आल्यावर त्या काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर जुन्नर लागते .नाणेघाट -जुन्नर -पैठण हा त्याकाळचा व्यापारी मार्ग  होता .पैठण तर सातवाहनांची राजधानीच ! त्याच भागात प्राचीन व्यापारी पेठ असलेले भोकरदनही येते .
     नाणेघाटा बाबत जुन्नर परीसरात एक दंतकथा संगितली जाते की नाना व गुणा या दोन भावांनी ही वाट डोंगर फोडून तयार केली .त्यासाठी दोन भावांनी स्वतंत्र ठिकाणी खोदकाम सुरु केले यात नानाने दक्षिणबाजूकडून व गुणाने उत्तर बाजूकडून काम सुरू केले .नानाने काम पूर्ण केले जो मार्ग आज दिसतो पण गुणा मात्र अपयशी ठरला त्याची वाट अपूर्ण राहिली .अपूर्ण वाट जीवधन किल्याच्या बाजूस दिसते.नानाची वाट पूर्ण झाली म्हणून त्याला नाणेघाट म्हणतात पण ही दंतकथा आहे याला ऐतिहासिक आधार नाही .ही दंतकथा मात्र प्राचीन काळापासून प्रचलीत आहे .
     गुणा व नाना या दोघाच्या मधे प्रचंड उंच कडा आहे त्या कड्याला नानाचा अंगठा म्हणतात .हजारो फुट खोल दरी आहे त्या कडयावरून खूप मोठा परीसर पाहता येतो पण पर्यटकांनी या ठीकाणी अत्यंत सावधनतेने वागावे अशी ही जागा आहे .
   डॉ शोभना गोखले यांच्या मते  'नना'ही कुषाणाच्या नाण्यावरील देवता होती .ही नाणी भारतात खूप प्रसिद्ध होती .पुढे या देवतेचा नना वरून नाणे असा अपभ्रंश झाला त्यावरून नाणे हा शब्द तयार झाला व ढोबळमानाने असे म्हणतायेईल की नाणे घाट ही एक पैसे देवाण घेवाणीची जागा असल्याने त्याला नाणेघाट असे नाव पडले .या घाटात उतरतांना सुरूवातीलाच एक दगडी रांजणं आहे सातवाहन काळात या वाटेने जाणाऱ्यास व व्यापाऱ्यास या राजणात कर ,जकात रुपाने नाणे टाकावे लागत असे .असे सांगतात दिवसातून दोन वेळेस हा रांजंणं चांदीच्या नाण्यानी भरून जायचा .सातकर्णो राजा व नाणेघाट मधील व्यापारासंमधी माहीती इतिहासात आढळते.ही वाट म्हणजे महाराष्ट्र व पाश्चात्य देश यांचा संबंध जोडणारी होती त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची बरीच  ओळख झाली .
     नाणेघाटात काही लेण्या खोदण्यात आल्या आहेत .याला वर्षावास असे म्हणता येईल .लयनम् असे संस्कृत मध्ये ,प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणे म्हटल्या जाते .प्रवासात  व्यापारी वर्गास मुककाम  यासाठी ही बनविली गेली असावी यात शंका नाही .पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही हौद देखील या ठीकाणी आहेत .यामध्ये दोन महत्वपूर्ण लेण्या आहेत यामधे नयनिका हीचा ब्राम्ही लिपी मधील माहीतीपूर्ण लेख भिंतीवर कोरण्यात आला आहे.सातवाहन राजवंशीय घराण्याचे नागवंशीयांशी संबंध प्रस्तापीत झालेले होते .या शिलालेखात यज्ञ व दान दिलेल्या मौल्यवान देणग्यांचे सविस्तर वर्णन आलेले। आहे.त्यांनी बौध्द धर्मास आश्रय देऊन परिसरातील बौद्ध लेणी खोदण्यास उदारपणे मदत केली .या शिलाले।खावरून नयनिका /नागनिका ही सातवाहनाचा मूळ पुरूष सिमूर /सिमूक /श्रीमुख याची सून आहे,सार्वभौम सम्राट सातकर्णोची पत्नी,महारठी त्रणकथिर यांची कन्या आणि भायल ,वेदश्री व शक्तीश्री या सातवाहन पुत्राची माता होती .नागनिकेचे वर्णन करतांना प्राचीन काळातील स्त्रीयांच्या आदर्श प्रतिमेंचे चित्र उभे केले आहे.नागनिका या नावातच नाग स्त्री ही माहीती मिळते ,ती महारथी त्रणकथिर नावाच्या महारठीची कन्या होतीं .नाग ही एक जमात होतीं .सातवहन काळात महाराठी ,महाजन ही पदे होतीं.पराक्रमी सरदारांच्या मुलीशी विवाह केली जात असत. नागनिकाचा एक वेगळा प्रभाव त्या काळात होता .तिच्या लेखावरून व शिल्पावरून हे लक्षात येते.नागनिकाशी संमधीत अनेक नाणी या परीसरात सापडली आहे .या ठिकाणच्या लेण्यात सातवाहन राजवंशांच्या मूर्ति व त्यांची नावे कोरली आहे मात्र काळानुसार आता केवळ पाय शिल्लक दिसतात .यामधे सिमूक,नागनिका,श्रीसातकर्नी,कुमार भायल,महारठी,त्रणकथिर,कुमार हुकश्री,कुमार सातवाहन यांचे अवशेष दिसतात .
      कोकणातून देशांवर येणारा हा मुख्य रस्ता म्हणजे नाणेघाट याच्या रक्षणार्थ बाजूलाच जीवधन किल्ला बांधलेला आहे .पुढे याच मार्गाच्या रक्षणार्थ हडसर ,चावंड,शिवनेरी या किल्याची निर्मिती याच काळात झाली .या मार्गाने सातवाहन राजधानी पैठण पर्यन्त व्यापारी राबता चाललेला दिसतो .


संदर्भ
नाणेघाट -श्री लहु गायकवाड
लेणी महाराष्ट्राची -डॉ दाऊत दळवी
जुन्नर परिसरातील प्रत्यक्ष भ्रमंती

संजय खांडवे
बुलढाणा












प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...