इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा वेरुळ लेणी म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....
त्यात पुढे यादव काळातही यादवकालिन स्थापत्य शास्त्राचे दर्शन मंदिर निर्माणातून घडले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत.बरेच ठिकाणे दुर्लक्षित आहेत ,पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचत नाही .
आम्ही अशाच एका विदर्भातील प्राचीन लेणीला भेट दिली .अकोला जिल्हयातील पातूर ....
बोर्डी नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात ७० च्या दशकात बोर्डी नदीच्या पात्रात सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या हजारो मुद्रा सापडल्या होत्या .एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळतात .
शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास । येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . आम्ही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे निघालो, पुरातत्व खात्याचा त्या ठिकाणी वॉचमन असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसली आम्ही सरळ वर डोंगरावर निघालो पातुर शहराच्या अगदी पश्चिमेकडील हा हा भाग आहे या टेकडीवरून संपूर्ण पातुर शहर दिसते.
लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते .काळा पशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते .खांबाच्या वर कडा तुटलेंल्या अवस्थेतील संस्कृत लेखही दिसतो .मुख्य लेणीत पायऱ्या असून आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे .इतिहास कारांच्या मते इ स 3रे ४ थे शतक ह्या लेणीच्या निर्माणाचे असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगड किंवा त्या काळच्या काही अडचणीने काम बंद पडले असावे .
प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.
हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे .अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे त्यांचे जतन व संवर्धन व्हावे हीच अपेक्षा.
संदर्भ :
उद्ध्वस्त वास्तू समृध्द इतिहास
लेखक :विवेक चांदुरकर
प्रत्यक्ष भ्रमंती
विवेक चांदुरकर सर (शिल्पअभ्यासक ,लेखक तथा लोकमत उपसंपादक)
डॉ शाम देवकर (इतिहासकार)
प्रा पी जी सवडतकर (इतिहास अभ्यासक)
किशोर वाघ (अनिस प्रदेशाध्यक्ष)
किशोर काकड (स्थानिक शिक्षक )
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122






अतिशय छान माहिती सर
उत्तर द्याहटवा