सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

ब्रम्हगिरीचा उपदुर्ग - दुर्गभंडार

 



ब्रम्हगिरीचा उपदुर्ग - दुर्गभंडार


(भाग - २ )


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक


उंचीः ४२४८ फुट


नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


दुर्गवैभवाच्या दृष्टीने महाराष्ट्र संपन्न आहे . भारतातील एकूण किल्ल्या पैकी जवळपास १ /३ किल्ले केवळ महाराष्ट्रात आहेत . दुर्ग निर्माणाचा कालखंड हा हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे . महाराष्ट्रात असे अनेक किल्ले येतात की ज्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे . त्याच्या निर्माण शैली वरून त्याचा कालखंड लक्षात येतो . ब्रम्हगिरी देखील असाच एक पुराण काळापासून धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा जपत रोपी लाव्हा खडकावर उभा असलेला एक अभेदय किल्ला आहे . नैसगिक हजारो फुट खोल कातळ कडेची तटबंदी व भव्यता हे ब्रम्हगिरीचं प्रमुख वैशिष्ट आहे . त्याचा एक उपदुर्ग असलेला अत्यंत अवघड व चित्तथरारक अनुभव देणारा दुर्गभंडार हा ब्रम्हगिरीच्या उत्तरेकडील टोकावर निमुळता होत जातांना दिसतो . राजगड आपण पाहिला तर त्याचा भव्यतेनुसार तो चार भागात विभागलेला दिसतो असाच ब्रम्हगिरी वरील दुर्गभंडार आहे . तो त्र्यंबकगडाचा उपदुर्ग आहे .

        " ज्यांना दुर्गाचे सरक्षण आहे त्यांना उच्छेद होत नाही . असे दिसून येते कारण दुर्गाची प्राप्ती झाली आहे म्हणजे स्वतः च्या प्रदेशाचे सरक्षण व शत्रूचा प्रतिकार करता येतो जो राजा निर्सग निर्मित हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा दुर्ग बांधून घेतो तो इतरावर मात करतो " असे इ. पूर्व ४ थ्या शतकात कौटिल्य लिहतो . दुर्गभंडाराची रचना अत्यंत अवघड आहे . निर्सगदत्त अभेदयता त्यामधे आहे याची रचना कोणत्या राजाने केली हे निश्चित सांगता येणार नाही मात्र देवगिरीचे यादव , बहामणी , निजाम व मोगलासह स्वराज्यातही हा किल्ला होता व पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला .

             पवित्र ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेऊन पाठीमागे दिसणारा ब्रम्हगिरी प्रत्येकास आर्कर्षित करतो त्यामुळे ब्रम्हगिरीवर नेहमी पर्यटकांची गर्दी असते . त्र्यबकेश्वर शहरातून जाणारा मार्ग पर्यटक वापरतात कारण हा पायरी मार्ग असल्याने चढाई करण्यास फारसा अवघड नाही .गडाच्या कातळास लागून अत्यंत गर्द झाडी आहे यामधून रस्ता काताळात कोरलेल्या पायऱ्या कडे जातो . वाटेत पर्यटकासाठी अनेक स्टॉल आहेत . उजव्या बाजूला एक दगडी इमारत लागते ही धर्मशाळा होती . यासारख्या जुन्या इमारती वाटेत लागतात .त्याच्या जवळच एक दगडी बारव आहे .विशेष म्हणजे या बारवेचे बांधकाम शैली खूप सुंदर असून तळापर्यन्त उतरण्यास पायऱ्या आहेत . पुढे प्रंचड मोठ्या एक संघ असलेल्या काळया खडकात कोरलेला पायरी मार्ग सुरु होतो . ८० ० पेक्षा अधिक असलेला हा मार्ग जीण्या प्रमाणे वळणे घेत वर घेऊन जातो . मधे लोखंडी रिलिंग असल्याने ये -जा करण्यासाठी स्वंतत्र  एकरी मार्ग तयार केला आहे. वाटेत दोन दरवाजे लागतात . अखंड कोरीव असल्याने कुठेही बांधकाम नाही व आत दोन्ही बाजूने कोरलेल्या देवड्या आहेत . वाटेत काही गुफा लागतात वीर हनुमंताची सुंदर मुर्ती तथा ऋषी - मुनींचे शिल्प कोरलेले आढळतात . येथे महत्वाची काळजी घ्यावी लागते ती माकडापासून दूर राहण्याची त्यांना खाण्यास दिल्याने ते मागावरच असतात काही वेळा चावायला ही मागे पुढे बघत नाही . 

             हा मार्ग पार केल्यावर आपण थोड पठारावर येतो  .गडाची ही कातळकडा इतर कडा पेक्षा कमी उंचीची आहे . येथून समोर अंजनेरी पर्वत दिसतो . थोड़ी चढाई केली की मोठ्या पठारावर येतो . एका बाजुला सुंदर त्र्यबकेश्वराच्या मंदिरासह शहराचे व दुसऱ्या बाजूला हर्षगड आपल्या नजरेस येतो . या पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते .पश्चीमेकडून पठारावरून खाली एक रस्ता गोदावरी नदीच्या उगमाकडे जातो . पृथ्वी , आप , तेज , वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत . यामधे जल हे सर्वोत्तम मानले जाते व यामधे गंगाजल हे श्रेष्ठ व पवित्र मानले जाते ही गंगा गौतम ऋषीने पृथ्वीलोकी आणली होती अशी मान्यता आहे . गोदावरी ही दक्षिण गंगा मानली जाते . उत्तरेकडे जाण्याऱ्या पाय वाटेने आपण जटा मंदिराकडे जातो . या मंदिरा जवळ पाण्याचे टाकी आहेत . दगडी मंदिरात शिवाच्या जटा खडकात दिसतात . भगवान शिवाने येथे जटा आदळल्याचे शिव पुराणात आहे . धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र जागा मानली जाते . या मंदिराच्या पाठीमागून एक पाऊलवाट १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दुर्गभांडाराच्या पायऱ्या लागतात . या वांटेने जातांना दाट धुके असल्यास काळजी घ्यावी कारण डाव्या बाजूस हजारो फुट खोल दरी आहे . हवा सुद्धा प्रचंड वेगाने वाहते .दुर्गभांडाराचा खरा चित्तथरारक अनुभव या खोल चरी सारख्या कोरलेल्या पायऱ्या पासून सुरु होतो . या ठिकाणी देखील सरक्षक देवता वीर हनुमंताची मूर्ती काताळात कोरलेली आहे .दोन तीन फुट रुंद व जवळपास १०० फुट खोलात हा मार्ग पुढे वळण घेवून छोटया दरवाज्यातून नैर्सगिक दगडी पुलावर जातो . प्राचीन स्थापत्य शैलीचा हा अप्रतीम नमुना व त्यापेक्षाही निर्सगाच एक वेगळं रुप या जागेवरून बघायला मिळते . दोन्ही बाजूने हजारो फुट खोल दरी व अत्यंत अरुंद पायवाट हा थरार अनुभवतांना खूप काळजी घ्यावी लागते . दाट धुके व प्रचंड वेगाने वाहणारा वारा येथे सावध करतो . काही ठिकाणी तर अत्यंत अरुंद वाट आहे . हा निर्सगाचा दगडी पुल ओलांडून पुन्हा एक छोटा कोरलेता दरवाजा लागतो व पुन्हा तशीच घळीत कोरलेला पायरी मार्ग दुर्गभंडारावर घेऊन जातो . वरील पठार अगदी लहान आहे . पिण्यायोग्य पाण्याची दोन टाकी यावर आहेत . पाच-दहा मिनिटात यावर फिरुन होते . या ठिकाणावरुन निर्सगाच अप्रतीम सौदर्य अनुभवता येते सहयाद्री ची भव्यता येथे आल्यावरच कळते .थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काताळातील पायऱ्या शेवटच्या टोकावर घेऊन जातात . खडकात कोरलेता एक छोटा बुरुज या ठिकाणी आहे . चिलखती बुरुजासारखा हा आहे . या बुरुजावरून अगदी ३६० अंशात सर्व भागावर अगदी दुर पर्यन्त शत्रूवर नजर ठेवता येते . जटा मंदिरापासून सुरु होणारा हा प्रवास या बुरुजावर संपतो या मार्गात झालेली छोटीशी चुक देखील आपलं अस्तीत्व क्षणात संपवू शकते .हुल्लडबाजी ,अतीसाहस व सेल्फी आदि गोष्टीवर संयम ठेवण्याची क्षमता अंगात असेल तरच या दुर्गभंडारा कडे यावे असे वाटते .



संजय खांडवे

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

गोदावरीचे उगमस्थान- ब्रम्हगिरी* (भाग - १ )

 *




गोदावरीचे उगमस्थान- ब्रम्हगिरी*

(भाग - १ )

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक

उंचीः ४२४८ फुट

नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हे महत्वाचा किल्ले येतात . त्र्यंबकेश्वराच्या पश्चिमेस दिसणारा महाकाय पर्वत म्हणजे ब्रम्हगिरी होय . याला त्र्यंबकगड असेही म्हणतात . उत्तरेस दिसणारा भंडारदुर्ग हा त्याचाच उपदुर्ग आहे . त्र्यंबकेश्वर हे ज्योर्तिलिंग असून या ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन होते . पुराणामध्ये विविध पौराणिक कथेत याचा उल्लेख येतो ब्रम्हगिरी पर्वताचेही  दक्षिण गंगेच्या उगमासह पुरानकथेनुसार वेगळे महत्व आहे . येथून उगम होणारी दक्षिण गंगा गोदावरीचे सातवाहन काळातील " गाथा सप्तशती " मध्ये उल्लेख आढळतो .ब्रम्हगिरी पर्वताची खडतर २० कि.मी ची परिक्रमा शिवभक्त आजही मनोभावे करतात याला देखील धार्मिक महत्व आहे . तेथे दुर्ग वसविले गेल्याने ऐतिहासिक महत्व देखील तेवढेच आहे .

               ब्रम्हगिरीवर पोहचण्यासाठी मुख्य दोन मार्ग वापरले जातात . त्यापैकी एक त्र्यंबकेश्वर शहरातून जाणारा पायरी मार्ग की ज्याचा वापर नियमित होतो व दुसरा मार्ग  दक्षिणे कडून किल्ल्याला वळसा घालून हत्ती मेट कडून घळीतून असलेला हत्ती दरवाजा मार्ग होय हा मार्ग सहसा वापरात नाही .अत्यंत अवघड असा हा मार्ग आहे . या ठिकाणास हत्ती मेट असे नाव प्रचलीत आहे आणि मेट म्हणजे पूर्वीच्या काळची चौकी असायची . या मेटेच्या प्रमुखास मेटकरी म्हणत . खडकवासला (पुणे ) येथील प्रा नंदकिशोर मते यांनी सिंहगडावर PHD केली .त्यांनी सिहगडास सात मेंटे होती असे सांगितले त्यापैकी आमरीचे म्हणजे अमृतेश्वराचे मेट येथील खंडोजी नाईक कोळी या मेटकऱ्यास विश्वासात घेऊनच तानाजी मालुसरे लढले होते . त्याच तानाजी कड्याच्या खाली हे मेट येते . गडावर येण्यासाठी ज्या वाटा असायच्या तेथे हे मेट असत . गडाची चौकी पहारे म्हणजे आताच्या काळातील चेक पोष्ट सारखे ते काम करायचे .तसेच हे हत्ती मेट असावे . या परिसरात असे अनेक मेट आहेत .हिंदवी परिवामुळे मोहिमेतून या मार्गाने ब्रम्हगिरी अभ्यासता आला .

                     महाकाय हत्ती सारखा पुढे आलेला बेसाल्ट खडकाच्या कड्या खालून पाय वाटेने पुढे जात दाट झाली मध्ये मंदिराचा भगवा ध्वज नजरेस पडतो . जवळ गेल्यावर त्या ठिकाणी रेणुका मातेचे मंदिर दिसते .त्या परिसरात अनेक वीरगळ व सतीशिळांचा समूह आहे . तेथून वर चढणारी दाट झाडी मधून जाणारी पायवाट आहे ही पायवाट घळीकडे वळन घेत चढाई वाढवत जाते . महाकाय पर्वताची झिज होऊन मोठ मोठे दगड या घळीत पडलेले दिसतात . दरड कोसळत असल्याने ही या भागातील आताची मोठी समस्या बनली आहे . महत्वाच म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरनेच हे उगमस्थान आहे.त्याच घळीतून हा प्रवास आहे .अर्ध्या तासाची चढाई झाल्यावर  घळीत प्रचंड मोठे दगड कोसळलेले दिसतात . तुरळक हौसी व जानकार भ्रमंती करणारे अन जंगली प्राणी व लाल माकडं याशिवाय इकडे कुणी सहसा भटकत नाही . हत्ती दरवाजा पूर्णपणे दगड मातीत गाडला गेलेला असल्याने बाजुने पंधरा वीस फुटाची लोखंडी शिडीला धरून वर पोहचता येते. डाव्या बाजूला उंच कपारीवर चिलखती तटबंदी सारखा भाग आहे पुढं एक छोटी गुहा व छोटे शिवमंदीर आहे येथून या मार्गाने येणाऱ्या शत्रूवर सहज मारा करता येतो . त्यासाठी सैनिकाच्या निवाऱ्या साठी येथील छोट्या गुहेची रचना आहे . येथे जातांना काळजी घ्यावी लागते कारण खाली खोल दरीचा भाग आहे . परत येऊन चढाई करण्यासाठी लवकर मार्गच सापडत नाही . मोठे मोठे दगड असल्याने रस्ता सुचत नाही . हिंदवी परिवाराच्या पायलट ट्रेकीग मुळे मात्र अशी साहसी मोहिम सहज शक्य होण्यास मदत होते .

                या भूलभुलैय्याच्या मार्गात थोड वर आले की या काळया दगडात कोरलेला दरवाजा नजरेस येतो विशेष म्हणजे कोणतेही बांधकाम न करता हा अखंड एकाच दगडात आहे .यात भले मोठे दगड फसलेले आहेत व अर्धा दरवाजा गाळात गाडला गेला आहे . या तासीव व कमानीच्या दरवाज्यावर सुंदर नक्षी काम आहे दोन्ही बाजूने दोन सिंहाची शिल्पे मध्यभागी लटकलेली घंटा कोरलेली असून त्या खाली गणेश शिल्प आहे . याच नळीच्या मार्गात भितीवर वीर हनुमानाची मोठी मूर्ती कोरलेली आहे .ही मुर्ती देखील अर्धी गाळात आहे . हा किल्ल्याचा भाग अत्यंत दुर्लक्षीत असून संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे . या दरवाज्याचं मुख वळण घेतल्यानं पूर्व दिशेस येते व समोर पुन्हा प्रचंड मोठे ब्रम्हगिरीचे नजर न पोहचणारे शिखर दिसते . या समोरील बाजूस पुन्हा चिलखती व प्रचंड मजबूत तटबंदी आहे ज्या ठिकाणी कुणी सहसा जात नाही तसा जाणारा मार्गही सापडत नाही .हत्ती दरवाज्यातून या दुसऱ्या दरवाज्या पर्यन्त शत्रू प्रचंड संघर्ष करून पोहचलाच तर तो वरील तटबंदीवरील सैन्याच्या टप्प्यात येतो अन इथेच थांबतो .अशी ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असलेली ही प्राचीन गड स्थापत्य शैली या नाशिक परिसरातील किल्ल्यावर विशेष आढळते .

         दरवाज्यातून जाण्यास मार्ग नसल्याने या दरवाज्याच्या वरील कपारीने पायवाट आहे . ही पायवाट उंच गवतातून व दाट झाडीमधून गोदावरी नदीच्या उगम स्थानाकडे जाते . ब्रम्हगिरीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे या गडास जवळ पास सर्वच बाजूस नैर्सगीक कातरकडा आहे आणि हा शेकडो फुट प्रचंड खोल असून खाली दाट जंगल आहे . या बाजूची पायवाट काही ठिकाणी अगदी कड्याच्या अगदी जवळून जाते मधे काही झुडपे व झाडांची जाळी असल्याने धोका कमी होतो . वाटेत दोन ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहे . वरील महाकाय पर्वतामधील पाणी खाली झिरपत असल्याने हे जीवंत वाहते पाणी पिण्यायोग्य असते . या पाण्याची चव अत्यंत गोड वाटते . येवढी चढाई केल्यावर आम्ही आमच्या सोबत असलेले पाणी झाडांना टाकून निर्सगाने गार व चवीला गोड बनविलेल्या पाण्याने बाटल्या भरून घेतल्या व पुढे निघालो .

         ब्रम्हगिरीच्या कडयावरून पाऊल वाटेने जातांना उजव्या बाजूस ब्रम्हगिरीचे भव्य डोंगर दिसतो . पुढे आल्यावर श्रीचक्रधर स्वामी मंदिर व त्याच्या समोर दक्षिण गंगा गोदावरीचे उगमस्थान आहे . दगडी मंडपात एका लहान कुंडातून हा उगम होतो . पुढे गेल्यावर एक दगडी कमान असलेले दगडी बांधकामातील बारव आहे . त्याच्या समोरच ब्रम्हगिरी मंदिर आहे त्यामध्ये एक लहान कुंड असून गोमुखातून पाणी त्या कुंडात पडते व या गोमुखाच्या वर  गंगा गोदावरी मुर्ती आहे . मंदिराच्या पाठीमागे प्रचंड खोल कातळकडा आहे येथून हरीहर व भास्करगड दिसतो .

            देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात हा गड होता . त्र्यंबकेश्वरमुळे १२ व्या शतकात या भागास धार्मिक महत्वही तेवढेच होते . पुढे बहामनी व नंतर निजामशाही मधे असतांना १६३६ च्या काळात शहाजी राजे यांनी याच भागातून राज्य कारभाराचा स्वंतंत्र अंमल करून या महाभूमिस स्वातंत्र्याचे वेड लावले होते .



संजय खांडवे

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड*

 * 


*दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड*


स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली - पाली १३८कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना - पाली मार्गे १३०कि .मी . उंची -२०३० फुट


दुर्गदुर्गेश्वर रायगड हे एकमेव असे तीर्थ आहे की त्या ठिकाणी नतमस्तक झाल्यावर आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटते . हे आपल्या स्वातंत्र्य अन स्वाभिमानाचे ते क्रांतिकेंद्रच आहे . महाभूमितील अठरा परगड जाती धर्माच्या लोकांची वज्रमूठ बांधून ' हिंदवी स्वराज्य ' येथेच साकारले .स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगड़ाशी बहुतेक बाबी मध्ये साम्य असलेला गड म्हणजे सुधागड होय . हा गड पाहतांना रायगडाची झलक जाणवते . महाराजांनी सुद्धा काही अंशी राजधानी साठी या गडाचा विचार केला होता . नयाने युक्त असलेल्या छत्रपती शिवरायांना अभेद्य राजधानी कुठे व कशी असावी याचे ज्ञान होते म्हणून दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे निर्माण करविले .

           पाली गावाच्या पूर्वेस असलेल्या सरसगडाच्या पायथ्यापासून एक रस्ता सुधागडाकडे जातो . या गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत पहिला पाश्चापूर - ठाकूरवाडीतून व दुसरा धोंडसे गावातून महादरवाज्या पर्यन्त घेवून जाणारा मार्ग आहे . आम्ही हिंदवी परिवाराच्या मोहिमेत या दोन्ही मार्गाचा वापर केला . धोंडसे गावात वाहने उभी करून अत्यंत दाट झाडी मधून हा मार्ग जातो .नदीचा पुल ओलांडल्यावर असाव्यस्त पडलेले मोठ -मोठे धोंडे व त्या दाट झाडीतून जाणारी वाट ही भुलभुलैय्या ठरू शकते त्यामुळे स्थानिकांच्या सहकार्याविना धाडस करणे योग्य नाही.सुधागडाच्या जवळ दोन हजार वर्षापूर्वीच्या ठाणाळे, खडसांबळे बौद्ध लेणी आहेत यावरून या गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते. या वाटेने गडाच्या भव्य पठारावर पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात .

          या वाटेत पुढे आपल्या परंपरेत प्रसिद्ध असलेल्या सरक्षक देवतेचा मारोती पार लागतो . थोड़े पुढे वर चढाई करत गेल्यावर तानाजी टाके लागते काळ्या पाषणात हे भूयारात कोरलेले दोन टाके असून पिण्यायोग्य पाणी यात असते. बाजूला तलवार व ढाल हातात घेतलेला वीर योध्याची दगडी शिल्प कोरलेले आहे . गडावरील वास्तुचे तासीव दगड खाली या वाटेत पडलेले दिसतात . चौकी पहारे साठी उभारलेली एक उध्वस्त वास्तू पाहून पुढे गेले की पुन्हा काही पाण्याची टाकी आहेत .या पुढे मार्ग काढत गेल्यावर आपल्याला भली मोठी तटबंदी सारखा भाग दिसतो . जवळ गेल्यावर दोन बुरुजांच्या मधे असलेला गोमुखी महादरवाजा दिसतो . दोन क्षरभ चिन्ह व त्यावरील नक्षीकाम व आतील वळण घेणारा मार्ग रायगडाच्या महाद्वाराची आठवण करून देतांना थोडावेळ आपण रायगडी पोहचल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. गडाखालील वाटेवर अचूक मारा करणाऱ्या बुरुजाचा फेरा मारून पायरी वाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूस  भोराई देवीचे मंदिर आहे . या गडाचे पुर्वीचे नाव भोरपगड हे या मातृदेवते वरूनच पडले . स्वराज्यात आल्यावर याचे नाव महाराजांनी सुधागड ठेवले . या ठिकाणी गडावर मुक्काम झाल्यास थांबता येते . प्राचीन मोठी घंटा व लाकडी वाघाची मूर्ती येथे आहे . भोर संस्थानाची ही कुलदेवता होती . बाहेर दगडी दिपमाल आहे . समोरच अनेक सती शीळा व विरगळ येथे आहे . बाजूलाच अनेक नक्षीकामासह असलेल्या दगडी समाधींचा समूह आहे. 

             पुढे चालत गेल्यावर गडवरील भव्य पठारावर अनेक इमारतीचे अवशेष दिसतात . थोड्या पराड्या सारख्या भागात दाट झाडी आहे व उजव्या बाजूला पायवाटेने खाली उतरल्यावर एक पाण्याचे पिण्यायोग्य पाणी असलेले टाके आहे . लांब अशी तटबंदी या ठिकाणी नजरेस पड़ते . तटबंदीत L आकारात एकच व्यक्ती जाईल अशी अंधारलेली बुरुजातून गेलेली वाट आहे काळजी घेत गेल्यावर यातून आपण भव्य तटबंदीच्या खाली येतो येथून पूर्वी गड उतार होता येत असे पुढे हा मार्ग दाट जंगलात जातो आता मात्र कुणी इकडे जात नाही . हा याचा चोरदिंडी दरवाजा आहे . असाच रायगडास साम्य असलेला वाघ दरवाजा आहे .

            येथून पुन्हा वर आल्यावर उजव्या बाजूस पंत सचिवाचा वाडा आहे .पेशवेकाळात बांधला गेलेला हा चौरसाकृती मजबुत वाडयात प्राचीन दगडी उखळ व जाती आहेत . आजही हा वाडा चांगल्या स्थितीत आहे . छत्रपती राजाराम महाराजानी शंकराजी नारायण यांना पंतसचीव ही पदवी देऊन सन्मान दिला होता . भोर संस्थानाची मुहर्तमेढ येथेच रोवली गेली . इंग्रजानंतर काही काळ हा गड भोर संस्थानाच्या देखरेखीत होता .

               थोडे वर पुन्हा आपणास भव्य पठार दिसते या ठिकाणी सुद्धा अनेक इमारतीचे अवशेष आहे पूर्व बाजूस खाली छोटी पायवाट आहे या  वाटेत पुढे दोन मोठी पाण्याची टाकी आहे . पठारावर एक तलाव दिसून येतो पुढे सारख्या आकाराच्या चार इमारती आहेत ही धान्यकोठार आहेत .या गडास रायगडा प्रमाणे बहुतेक बाजूने नैसगिक तरबंदी लाभली आहे . दुसरे एक विलक्षण साम्य म्हणजे टकमक टोक अगदी रायगडा प्रमाणे टोकदार व उंच व खाली प्रचंड खोल दरी व दाट झाडी मधील जंगली भाग अशीच ही केवळ रायगडची भव्यता सोडली तर निर्सगाची जुळी रचनाच म्हणावी लागेल . करवंदाच्या जाळीतील मुबलक रानमेवा व त्यातून दरवळणारा फुलांचा सुगंध तेथून मनमोहक दिसणारा तैल - बैलाची डोंगर शिळा व छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीतून पाय निघतच नाही पण संध्याकाळ होत चालल्याने घाई करावीच लागते म्हणून पाश्चापूर दरवाज्याकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळलो . गडाच्या पश्चीमेस सिद्धेश्वर महादेवाचे मंदीर उजव्या बाजूस आहे . या मंदिरा बाहेर दगडी गणेश शिल्प व नंदी आहे . बाजूलाच पाण्याने भरलेला कमल तलाव आहे . परिसरात दगडी पाण्याची टाकी देखील आहेत .

                पाश्चापूर मार्गाने खाली उतरतांना पूर्व व पश्चीम बाजूस दोन चिलखती बुरुज आहे. या बुरुजात जाण्यास एक मार्गी पायऱ्या असून पुढील भागात पूर्ण वाकून जावे लागते . बुरुजाची ही दुहेरी सरक्षण यंत्रणा या मार्गाची प्राचीन सुरक्षा व्यवस्था किती अभेद्य होती हे दर्शविते . दगडी पायऱ्या वरील शत्रू  येथून सहज माऱ्यात घेता येतो. पूर्वी येथे द्वार असावे ते आता कोसळलेले आहे . या मार्गाने खाली उतरतांना लोखंडी पायऱ्या व रिलिंग वनविभागाने लावल्या आहे . चढ - उतर करतांना काळजी घ्यावी लागते कारण दोन्ही बाजूने खोल दऱ्या व घनदाट जंगल आहे . दिड दोन तासात आपण ठाकूरवाडीत पोहचतो . या ठिकाणी पायथ्याशी असलेल्या पाश्चापूर गावात औरंगजेबचा बंडखोर पुत्र अकबराची छावणी होती त्यावेळी तो स्वराज्यात शरण आला होता .छत्रपती संभाजीराजे व त्याची भेट याच गावात झाली होती .छ छत्रपती संभाजी महाराज यांचेही वास्तव्य या गडावर होते . याच परिसरात परळीचा माळ आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी  व त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले होते आज त्या ठिकाणी बाळाजी आवजी चिटणिसांची समाधी देखील आहे. हा परिसर प्राचीन काळापासून इतिहातील अनेक घरामोडी चा साक्षीदार आहे म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा वाटतो .



संजय खांडवे

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

पालीच्या बल्लाळेश्वराजवळील - सरसगड*


 ,*पालीच्या बल्लाळेश्वराजवळील - सरसगड*


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली ११ ८ कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना मार्गे ११० कि .मी .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

        महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर मंदिराच्या पूर्वेस अगदी लागून प्रचंड महाकाय दिसणारा पर्वत मला अनेक वेळा खुणवत होता. हा गड आहे हे बऱ्याच पर्यटकांना कळतही नाही दुर्ग भ्रमंतीच वेड लागल्यावर याची चढाई करण्याची संधी हिंदवी परिवाराचा सदस्य म्हणून मिळाली . पाली या ठिकाणी भक्त निवासात थांबण्याची चांगली सुविधा आहे.सकाळीच उठून जवळच 3 किं मी अंतरावर असलेल्या उन्हवरे या गरम पाण्याच्या झऱ्यात अंघोळ करून पालीच्या गणेशाचे दर्शन करून मार्गस्त होता येते . मंदीराच्या बाजूने पूर्व दिशेने गावा बाहेर जाणा-या रस्त्याने आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत पोहचतो . तेथून पायवाटेचा मार्ग छोटया बाण खुणांनी दर्शविलेला आहे. गडाच्या माहीतीचा फलकही येथे दिसतो . झाडी -झुडपा मधून चढणीची वेडी वाकडी पाऊल वाट दहा पंधरा मिनिटाच्या चढाईने आपल्याला गडाचे दर्शन घडविते . काळ्या पाषाणातील महाकाय सरसगड अधिकच लक्ष वेधून घेतो . झाडा - झुडपातून जाणारी घसरंडीची पायवाट जशी जशी आपल्याला उंचावर घेऊन जाते तसे तसे पाली शहराचे सुंदर दर्शन होत जाते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .पूर्वी येणारे - जाणारे व चौकी पहारेकऱ्यांसाठी अशी टाकी गडाच्या चौफेर असत . चालत राहिल्यावर चढाई अधिक तीव्र होत जाते . पुढे दगडात कोरलेल्या खाचे असलेल्या पायऱ्या लागतात . ही चढाई सावधतेने करत जावे लागते . खाली खोलगट भाग असल्याने काही ठिकाणी एकमेकांना सरक्षण देत वर चढत जावे लागते . आपण पहील्या कातर पाषाणा जवळ पोहचल्यावर त्या ठिकाणी एक गुहा दिसते . चौकोनी असलेली ही गुहा आत निमुळती होत जाते व पुढे यात एक छोटी खोली आहे सैन्याच्या आश्रयासाठी ही व्यवस्था होती . येथूनच दोन भव्य पाषाणातून वर जाणाऱ्या घळीतून पायरी मार्ग आहे . खालून चालत आलेल्या साठी अगदी दमछाक करणाऱ्या हया ९६ पायऱ्या आहेत . याची उंची दोन फुटाची आहे . वर जातांना येथे मोठा थरारक अनुभव येतो ,शरीराचा तोल पुढे ठेवतच वर चढावे लागते . पुढे आपल्याला दिसतो दोन बुरुजामधे एकाच पाषाणात कोरलेला दिंडी दरवाजा हजारो वर्षापासून शाबुत असलेली ही वास्तु एक अदभूत वास्तुशास्त्राचे वैभव आहे . आत प्रवेश केल्याबरोबर सैनिकासाठी काताळात कोरलेल्या ऐसपैस देवड्या आहेत . उजवीकडे वळण घेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याने आपण बुरुजावर पोहचतो तेथून खाली घळीतीत  पायऱ्याचे दृष्य कॅमेऱ्यात टिपल्या शिवाय कुणीही पुढ जात नाही येथून वर चढल्यावर बाले किल्ल्याचा भव्य कातळ कडा दिसतो याला गोल फेरा मारता येतो व यावर बालेकिल्ला आहे . तरबंदी मजबूत आहे पण फिरतांना काळजी घ्यावीच लागते .याच्या कुशीत काताळात पाण्याची असंख्य टाकी कोरलेली आहेत . उत्तरेकडे चालत जातांना या काताळात भव्य व विर्स्तीर्ण गुहा आहेत . याचा उपयोग निवास , भांडार , दारूगोळा आदि साठी होत असे . अशी मान्यता आहे की या गुहेत पांडवांनी वास्तव्य केले आहे. कोरीव शैलगृहावरून हा गड अत्यंत प्राचीन आहे . प्राचीन काळी देशावर व्यापार चालायचा बंदरावरून जाणारा माल या भागातून जात असे तेव्हा पासून चौकी पहारा आदि साठी हा गड महत्वाचा होता .निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणाकडे आल्यावर सुधागड , घनगड , कोरीगड सोबतच सरसगडही घेतला होता . नारो मुकुंद यांनी हा गड स्वराज्यात घेतला होता .त्यांच्या कडे या गडाची सबनिशी होती . पेशवाई नंतर हा गड भोर संस्थानाकडे गेला .१८१८ नंतर इंग्रजांचा ताब्यात होता .

          गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहे दक्षिणेकडून दिंडी दरवाज्यातून येणारा मार्ग व दुसरा उत्तरे कडून महादरवाज्यातून येणारा दुसरा मार्ग होय होय . या दरवाज्याच्या वर एक उध्वस्त इमारतीचा पाया व त्याच्या समोर एक बुरुज आहे . या इमारतीच्या बाजूनेच बालेकिल्ल्यावर जाण्यास मार्ग आहे . चढाई करतांना थोड़ा अवघड मार्ग असल्याने शिस्तीने व काळजी घेत जावे लागते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .बालेकिल्ल्यावर पोहचताच इमारतीचे अवशेष दिसतात उंच गवता मधून पायवाटेन पुढं आपणास पीर दिसतो . या बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे . या ठिकाणी प्राचीन मंदिराच्या खांबाचे व इतर अवशेष दिसतात .सतीशीळा देखील आहेत . हे मंदिर बांधीव तलावात आहे या तलावातील पाणी आटत नाही एवढ्या उंचावरही पाण्याची सुविधा हे सरसगडचे मुख्य वैशिष्ट्येच म्हणावे लागेल या तलावात कमळाची फुले देखील आहेत .व बालेकिल्ल्या वरून सुधागड , कोरीगड, माणिकगड कर्णाळा व इंद्रायणी नदीचा उगमस्थान जवळील नागफणी टेकडी येथून दृष्टीस पडते . अंबा नदीचे विस्तीर्ण खोरे व वळण घेत येणारा प्रवाह मनमोहक दिसतो .

           सरसगड हा अवघड चढाईचा आहे . पाली गावातून निघतांना पाणी सोबत ठेवावे . अवघड ठिकाणी फोटो व सेल्फीचा मोह टाळावा . गडउतार होतांना उत्तरेकडील महादरवाज्याने खाली आलो लॉकडाऊन मधे हा मार्ग कुणी वापरला नसल्याने गवत वाढलेले होते . हिंदवी परिवाराच्या मोहिमेत गवत काढत खाली उतरलो वाटेत गवतात सापही दिसले त्यामुळे काळजी घ्यावीचं लागते . बहुतेक ठिकाणी दोरखंड वापरून उतरावे लागले या मार्गाने उतरतांना माहीती घेवूनच उतरावे पुढे जंगलातून एका डांबरी रस्त्याला लागून रामअळीतून पाली गावात पोहचता येते .



संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...