*रतनवाडीचा अमृतेश्वर*
भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.
बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी, अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.
*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*
*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*
शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो. राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात.
नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.
सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे. भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे. गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते. सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.
यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका, देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत. मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच 20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.
जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.
संजय खांडवे
९०११९७११२२