शनिवार, १८ जून, २०२२

विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर

 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर


नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास

















भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर  शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर  निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !

         विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.  विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी  या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस  शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून  मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.

         नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी.  समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.

    समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्‍याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्‍यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य  नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते.  मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .

     महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे  सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .

      एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !

आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .



➖➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा 

9011971122

➖➖➖➖➖

बुधवार, १ जून, २०२२

अहिल्याबाई होळकर

 *लोककल्याणकारी मातोश्री अहिल्यादेवी*


२२०० वर्षापूर्वी नर्मदातटापासून दक्षिणमार्गावर सातवाहनांचे अत्यंत प्रगत व आर्थिक संपन्न असलेले राज्य होते याची साक्ष आपणास आजही या प्रदेशातील प्राचीन वास्तु पाहिल्यावर लक्षात येते .त्याकाळात शैलगृहे,लेण्या व पहारेकरी म्हणून गडकोट व मार्ग,पाणवठे हया वास्तु आजही अवशेष रूपाने कमी अधिक आपले अस्तीत्व टिकवून उभी आहेत. हया सातवाहनांची महत्वाची स्त्री नागनिका हीचा नाणेघाटातील  शिलालेख  आजही उपलब्ध आहे .त्या काळातील गौतमीपुत्र सातकर्णी,वसिष्ठापुत्र पुलुमावी,यज्ञश्री सातकर्णी या कर्तबगार महिलांचे राज्यव्यवस्थेतील व समाजजीवनावर असलेले प्रभूत्व लक्षात येते .हजारो वर्षानंतर पुन्हा असेच म्हणावे लागेंल की होळकर साम्राज्यास देवी अहिल्या च्या रूपाने याच भागात एक आदर्श राज्यकर्ती या रूपाने म्हणून जनमानसात एकरूप झाल्या. त्यांच्या काळातही भव्य दिव्य अशा मंदिराचे निर्माण तथा जीर्णोद्धाराचे कार्य झाले. संपूर्ण भारतभर विहिरी, पाणवठे,बारव, धर्मशाळा, तलाव,मार्ग आदी समाजपयोगी वास्तूचे निर्माण केले गेले. त्यांच्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक व राजकीय कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे .*''मी जे काही करणार आहे ते राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठीच असेल ."* या वाक्यातून त्यांच्या  लोककल्याणकारी कार्याची  प्रचीती येते. सामाजिक बंधने असतानासुद्धा अहिल्यादेवींच्या सर्वगुणसंपन्नते विषयी तसेच त्यांचे शौर्य, धाडस, बुद्धिमत्ता, प्रशासन ,मुत्सद्दीपणा,  निर्भीडपणा, ज्ञानलालसा,  औदार्य, सामान्य आचरण, स्वाभिमान, जिद्द ,अचूक न्यायदान ,प्रजाहितदक्ष ता, निर्सगवात्सल,भूतदया,सावधानता,निर्णयक्षमता या गुणांचे विवेचन होणे तेवढेच आवश्यक वाटते.

      *होळकर वंशींयांचा आधारवड मल्हाराव होळकर*

पुणे शहरापासून जवळच नीरा नदीचा एक ओहळ  त्या ठिकाणी असलेले हे .'होळ 'गाव आणि या गावात राहणारी होळकर. मल्हाररावांचे पितृछत्र  लहानपणीच हरवले. त्यांच्या वाट्याच्या जमीनीवरही भाऊ बंधकीची नजर त्यांना त्रासदायक झाली .त्यांची आई मल्हाररावांना घेऊन  भाऊ भोजराज बारगळ यांच्याकडे घेऊन आल्या. त्यांचे मामा हे तळवडे गावचे अधिकारी होते. त्यांना मामांचा आधार मिळाला. पुढे आपली मुलगी गौतमी यांच्याशीच त्यांनी मल्हाररावांचा विवाह लावून दिला. आपल्या गुणांच्या जोरावर स्व पराक्रम मल्हाररावांनी गाजवले. आपल्या मामासोबत त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली .मोहिमेतील पराक्रमामुळे व मावळ प्रांतातील विजयामुळे पेशव्यांनी त्यांना मावळ प्रांताची जबाबदारी दिली. मराठा साम्राज्याचा होळकर घराणे एक मोठे आधारस्तंभ बनले. त्यांची कर्तबगारी, पराक्रम, मुत्सद्दीपणा यामुळे त्यांना बरेच दचकून राहत असत. उत्तर भारतात मल्हाररावांचे सैन्य 30 कोसावर असतानाच "मल्हार आया ! मल्हार आया ! "अशी भययुक्त घोषणाच शत्रू देत सुटायचा . एवढा त्यांचा दरारा होता. आपला पुत्र खंडेराव यांच्यासाठी माणकोजी शिंदे यांची कन्या त्यांनी निवडली. त्यांच्या पहिल्याच भेटीत अहिल्येला ओळखले. हा  भविष्याचा वेध घेणारा पारखीपणा मल्हाररावांच्या व्यक्तीमत्वात होता .होळकर साम्राज्याची तारणहार म्हणून पुढच्या काळात त्या पुढे आल्या. मल्हारराव अत्यंत प्रेमळ, आई गौतमी आणि मल्हारराव यांनी पुत्रवत प्रेम  अहिल्येवर केले त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ही त्यांनी मोठी मेहनत घेतली .सून  म्हणून ते कधीच अहिल्येसोबत वागत नसत. लढाईच्या निमित्ताने मल्हाराव बहुतेक बाहेर असत. त्यावेळी त्यांच्या सूचनेप्रमाणे अहिल्यादेवींनी राज्य चालविले त्यांनी पाठवलेल्या पत्रांच्या आदेशानुसार त्या कार्य करत .बऱ्याच वेळा त्या त्यांच्या सोबत युद्धातही जात असत .आपल्या पराक्रमी सासऱ्याचा अवमान होईल असे कृत्य आपल्याकडून कधीही घडू नये याची त्यांनी कटाक्षाने दक्षता घेतलेली दिसते. मल्हाररावांचे जेवढे प्रेम आपल्या प्रजेवर होते तेवढेच त्या देखील आपल्या प्रजेला जपत असत. भारतीय संस्कृतीचे आदर्श उदाहरण म्हणजे मल्हाररावांचे कुटुंब होते. पेशव्याकडे मल्हाररावांना मोठा मान होता त्यांनी आपल्या भाऊ बंदास पुढे इंदूरला आणले व आपला प्रचंड दबदबा निर्माण केला. १७६६ मध्ये प्राण सोडला.


*आदर्श लोक माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी*

जी माणसे सत्याची साथ देतात दुर्बल, असाह्य लोकांच्या बाजूने उभे राहतात त्यांचा इतिहास लिहिला जातो. अहिल्यादेवी च्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासूनच संघर्षांची मालिका होती. त्यांना अनंत संकटांना तोंड द्यावे लागले. एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात जात असताना ,कुटुंबा सोबतच आपण एका राज्याचे महत्वाचे घटक,एका कर्तबगार पुरूषाची सून तथा भविष्य आहोत याची जाणीव त्यांना होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ 8-9 वर्षांचे होते *आदर्श पत्नी, आदर्श सून ,आदर्श राजमाता* असा त्यांचा पुढचा प्रवास लोकाभिमुख आदर्श राज्यकर्ते असण्याची साक्ष देतो. रणांगणावर पराक्रम गाजविणारे खंडोजी हे आदर्श माता गौतमी कर्तबगार पराक्रमी मल्हाररावांच्या छत्रछायेत वाढले. रणभूमीवर त्यांनी पराक्रम गाजविले पण इतिहासाने त्यांचे पान पुढच्या काळात तुमच्या आमच्या सत्यशोधनासाठीच  सोडून दिले की काय  असे वाटते. सुरजमल जाट यासोबत लढतांना खंडोजीरावास वीरमरण आले .वयाच्या 29व्या वर्षीच अहिल्यादेवींना वैधव्य आले .त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या आप्तांचे असंख्य मृत्यू पाहिले, पण त्या स्थितप्रज्ञ राहिल्या. कधीही त्यांनी आपल्या दुःखाचे भांडवल केले नाही. उलट त्या हे घाव सोसत अधिकच कणखर बनत गेल्या. ज्या काळात विधवा स्त्रीचे दर्शनही अपशकुन मानले जायचे त्या काळात त्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. खंडोजी पाठोपाठ सती जाण्याच्या अहिल्येला  मल्हाररावांनी रोखले. *"होळकरांचे मावळा साम्राज्य आपल्या प्रयत्नाने मोठे झाले आहे. जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करायचे आहे. हे आपणच म्हणाले होते" "अहिल्या "!* आपल्याला या राज्यासाठी या प्रजेच्या हितासाठी थांबावेच लागेल. तेव्हा त्यांनी सती न जाण्याचा निश्चय केला आणि शुभ्र वस्त्र धारण करून होळकर साम्राज्याची दोर आपल्या हातात घेतली.   1766 मध्ये मल्हारराव त्यांना सोडून गेले .अहिल्यादेवीना मालेराव नावाचे एकमेव पुत्र होते .21 वर्षी त्यांना सरदारकी मिळाली   1767 मध्ये मालेरावही गेले त्या पाठोपाठ जावाई यशवंतराव फणसे सुद्धा कॉलरने गेले .मुलगी मुक्ता देखील सती गेल्या, एवढा प्रचंड दुःख या लोक मातेने सहन केले केवळ प्रजेसाठी अन प्रजेच्या कल्याणासाठी आपण खंबीर राहणे ही काळाची गरज आहे . ही मल्हाररावांची शिकवण त्यांच्या सोबत होती.

      आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी लावले . प्रशासनात त्या अगदी चाणाक्ष व प्रसंगी कठोरही असत .एकदा त्यांचे पती खंडेराव यांनी सरकारी खर्चाची रक्कम व्यक्तिगत खर्चासाठी काढली. त्यावेळी त्यांनी खतावणी पाहून त्यांना लेखी जवाब मागितला होता. सोबत 25 मोहराच्या दंडही केला होता.प्रत्यक्ष नातं सुद्धा त्यांनी राज्यहिताच्या आड येऊ दिले नाही .कित्येक वेळी त्यांनी मल्हाररावांना सुद्धा सूचीत केल्याच्या घटना आहेत .  खंडणीदाराच्या प्रगतीमध्ये आपल्या राज्याची प्रगती आहे. याची जाण त्यांना होती त्या कधीही खंडणीदारांना विनाकारण त्रास देत नसत. त्यामुळे कोणी टाळाटाळही करत नसे. पण असे आढळल्यास त्या प्रसंगी पत्र पाठवून ताकीदही देत असत. खरगोन गावातील तापी दास व बनारसीदास हे दोन सावकार होते. दोघेही निपुत्रिक होते. त्या दोघांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने निर्णय घेतला आता आपल्याकडे असलेले दोन लाख रुपये राज्याच्या रक्षणार्थ अहील्यादेवीस द्यावे ,पण अहिल्यादेवींनी ते पैसे नाकारले हा पैसा तुम्ही दान- धर्मात व लोकांच्या समाज उपयोगा मध्ये खर्ची घाला. असे सांगितले याचा अर्थ आपल्या राज्याचा कोष विधायक मार्गानेच वाढवला गेला पाहिजे हे त्यांचे धोरण होते.

   आपल्या राज्यात शांतता कशी नांदेल यावर त्यांचा भर अधिक असे युद्ध आदी गोष्टी त्यांनी होईल तोपर्यंत टाळलेले दिसतात. अवास्तव सैन्य वागविणे व अगदी दुर्लक्षही करणे याचा समतोल त्यांनी साधला.लष्कराचा त्यांवर प्रचंड विश्वास होता .आपल्या मायेचे छत्र त्या धरून होत्या . महिलांना शिक्षित करून त्यांची स्वतंत्र फौज उभारणाऱ्या त्या काळातील  पहिल्याच राज्यकर्त्या म्हणावे लागेल. परंपरेला चिकटून राहून त्यांनी कधीच काम केले नाही. संभाव्य धोक्याची कल्पनाही त्यांना लगेच येत असे. वसई घेण्याचा डाव इंग्रजांचा होता हा धोका त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पेशव्यांना संदेश दिला व आम्ही मदत करायला तयार आहोत असे सांगितले. समस्त संस्थांनीकांनी एकत्र येऊन आपण इंग्रजांशी लढले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या .*"इंग्रजांचा वार म्हणजे अस्वलांच्या गुदगुल्या, व्याघ्रदि श्वापदे व युक्तीप्रयुक्तीने मारतील ; परंतु अस्वलाचे मारणे फार कठीण आहे .सुरत धरून मारले तरच मरेल. नाही तर अस्वलाचा चपेटीत कुणी सापडले तर गुदगुल्या करूनच त्यास अस्वल मारील",*

 पण या सूचनेकडे कोणी लक्ष दिले नाही याचे परिणाम पुढे दोनशे वर्ष या देशाने भोगले.

       युद्धनीती मधील एक निर्भीडपणा चा प्रसंग सांगता येईल पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर होळकर गादीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गंगोबातात्या ने देखील अहिल्यादेवींची साथ सोडून पेशव्यास जाऊन मिळाला.  राघोबा पेशवा पुण्यातून सैनिक घेऊन होळकराचा राज्यावर निघाला होता. ही माहिती सदैव तत्पर असलेल्या होळकर साम्राज्याच्या गुप्तहेर खात्याने दिली . खंबीरपणे संकटास तोंड देण्यास उभे राहून तुकोजी होळकरनां पत्र लिहिले *"पिंडाला कावळा शिवला".* शिंदे, पवार ,गायकवाड या मराठा सरदारांना पत्र पाठवले *"जेवत असाल तर हात धुण्यास महेश्वरी या"* होळकरांच्या लोककल्याणकारी मातोश्रीच्या मदतीस ही मंडळी सदैव तत्पर असत .

   राघोबा पेशव्यास त्यांनी पत्र लिहिले *"आमच्या पूर्वजांनी लाचार होऊन हे राज्य मिळविले नाही .आपल्या रक्ताचे पाणी करून त्यांनी हे उभं केलंय. मला अबला असह्य समजण्याची चूक करू नका .आमच्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहिले तर आमची तलवार चालेल. आम्ही हरलो तर एका स्त्रीच्या शौर्याचा इतिहास  लिहिल्या जाईल; पण आपण हरलात तर एका स्त्रीने हरविले असा इतिहास लिहिला जाईल. आपण तोंड दाखविण्याच्या योग्यतेचे राहणार नाही."*

 आपल्या राज्या शेजारील राज्यांची सुद्धा त्यांचे संबंध सलोख्याचे होते दिवाळी, भाऊबीजीला त्यांना बहिण म्हणून भेटही पाठवत असत.

     समाजातील अनिष्ट रूढी वर त्यांनी कृतीतून प्रहार केले. *जी परंपरा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते ती परंपरा आम्हाला मान्य आहे. प्रकाशाकडून अंधाराकडे नेणाऱ्या परंपरेस त्यांनी अंधश्रद्धा म्हटले .*  स्वतःची मुलगी मुक्ता ही राजकन्या होती त्यांचा त आंतरजातीय विवाह  लावून दिला . भिल्ल रामोशी लोक त्या काळी लूटमार करत त्यांचा बंदोबस्त करणाऱ्यास जावई करण्याची घोषणा त्यांनी केली होती. यशवंतराव फणसे यांनी ती पार पाडली त्यांचा बंदोबस्त केला त्यावेळी भिल्ल रामोशी यांना पगारी सेवेत त्यांनी घेतले. त्या काळात या जमातीच्या विकासाठी  प्रगतीसाठी भरीव आर्थिंक तरतूद करुन त्यांना सन्मानपूर्वक समाजाच्या प्रवाहात आणले. *हुंडाबंदी, बालविवाह बंदी, सती जाणे बंदी ,केशवपन वर बंदी , पडदा पद्धतीवर बंदी विधवा विवाहास प्रोत्साहन, मुले दत्तक घेण्यास मान्यता*, आदी समाज सुधारणा घडवून त्यांनी अलगदपणे या समाजातून बाजूला काढल्या.

     दान धर्माच्या बाबतीत त्यांचे कार्य अलौकिकच मानावे लागेल. *या हाताने दिलेले दान त्या हाताला सुद्धा त्यांनी समजू नये अशी त्यांची निर्मळ भावना होती.* त्यांनी केलेल्या दानाचा वाजागाजा सुद्धा कधी त्यांनी केलेला दिसत नाही.  गौतमी बाई यांच्या खाजगी जहागिरी पुढे त्यांनी अहील्यादेवीस दिली . यामधून म्हणजे आपल्या खाजगी निधीमधून त्यांनी ही समाज उपयोगी धार्मिक दानधर्माचे काम केले. कोट्यावधी रुपयाच्या केलेल्या खर्चाची माहिती सुद्धा आकडा रूपाने इतिहासाला माहीत नाही; पण कार्य मात्र संपूर्ण भारतभर झालेले दिसते.  सर्व रयतेकडे त्या समदृष्टीने बघत. यामध्ये गरीब-श्रीमंत कृषक मजूर किंवा संकुचित धर्मभावना देखील त्यांनी ठेवले नाही आपल्या राज्यात मंदिर ,मशीद  व दर्गा आदींसाठी सुद्धा त्यांनी द्रव्य खर्च केलेले दिसते.

यासाठी देणगी स्वरूपाचा भार त्यांनी कधीच रयते वरती टाकलेला दिसत नाही.

      *काशी,सोमनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, नाशिक, गया, जगन्नाथपुरी ,अमरकंटक, आनंद कानंन,वेरूळ, मथुरा ,रावेर ,रामेश्वर, द्वारका, निळकंठ महादेव, कोल्हापूर, अलमपुर, जेजुरी, पैठण, गंगोत्री ,केदारनाथ ,भैरव, अन्नपूर्ण ,महेश्वर* या संपूर्ण भारतभर असलेल्या ठिकाणी त्यांनी मंदिर जीर्णोद्धार तसेच नवनिर्माण कार्य केले . पशुपक्षी प्राणी तसेच मानवी कल्याणार्थ त्यांनी बारवविहिरी, कुंड, घाट, धर्मशाळा, मार्ग, तलाव ,अन्नछत्रे या गोष्टींसाठी सुद्धा खर्च केला. या कार्यामागचा उद्देश त्यांचा खूप मोठा होता या माध्यमातून मोठा रोजगार लोकांना निर्माण झाला . कलाकुसरी करणाऱ्या हातांना त्यांची कला दाखवून काम मिळाले. पर्यटनास चालना मिळाली .त्या त्या परिसरातील उद्योग व्यवसाय वाढले. पर्यायाने राज्याचे उत्पन्न वाढले ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  देशाच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत प्रवास करताना लोकांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक ऐक्य टिकण्यास मोठी मदत झाली .संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. त्यांचा उद्देश नवनिर्माणाचा होता जीर्ण तुटलेल्या शिळा त्यांना नवनिर्माण करण्यास खुणवत होत्या. तोडून मोडून नवनिर्मिती त्यांना मान्य नव्हती,या साठी होणारा खर्च खाजगी कोषातून हा एक आदर्शच होता .

       नर्मदा नदीच्या तीरावर त्यांनी महेश्वर हे भव्यदिव्य नगर वसविले. व्यापारपेठ निर्माण केली. सोनार, कुंभार, विणकर वसविले. महेश्वरी येथील वस्त्रे आजही प्रसिद्ध आहेत. कुटीर उद्योगाला चालना मिळाली. मंदिरे, घाट तयार केली. जंगलतोडीला विरोध करून वृक्षलागवडीस प्रेरणा दिली. महिलांसाठी शिक्षण खुले केले.आरोग्य क्षेत्रातही भरीव काम माहेश्वरी नगरीत झाले . आजही महेश्वर ला गेल्यावर वैभव आपणास दिसते . *पुण्याचे पुण्य द्वार म्हणजे महेश्वर* असे पेशवे म्हणत. पेशव्यांनीही *मातोश्री अहिल्यादेवी* या आदराने त्यांना सन्मान दिलेला दिसतो. अनेक समकालीन कवींनी अहिल्यादेवींची आपल्या काव्यात स्तुती केलेली आहे. कवी मोरोपंत आपल्या आर्या या काव्य प्रकारात म्हणतात 

*श्री भक्ता अहिल्ये वरा धरा भूषा*

हरिपंत कवी

*देवी अहिल्या शुद्धमती तू सर्वांची माता ।*


*ईश्वर आला तुझे स्वरूपे होऊनी आता ।*

 कवी अनंत फंदी सुद्धा अहिल्यादेवीची आपल्या साहित्यातून गुणगौरव गाताना दिसतात. एवढंच सांगावसं वाटतं आजही या *गंगाजल निर्मल* तेजस्विनी लोकमातेचा इतिहास जाणून घेण्यासाठी साहित्य अपुरी आहेत,हे त्यांची माहीती मिळवतांना लक्षात आले . हा इतिहास समोर आला पाहिजेत आजही मातोश्रींचे होळकर साम्राज्य या जिर्णोध्दारीत वास्तू तुमच्या संशोधनात्मक लेखन इकडे आस लावून आहेत. 



*संजय खांडवे,बुलढाणा*

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...