रविवार, २५ जुलै, २०२१

एक महापर्व : लखुजीराजे जाधवराव

 *एक महापर्व : लखुजीराजे जाधवराव*🚩

➖➖➖➖➖➖


राजा भिल्लम देवाने देवगिरीच्या अभेद्य किल्ल्याचे निर्माण केले सिंघनदेव ,कृष्णदेवराय, रामदेव राय,शंकर देव हरपाल देव ,यांच्या काळात यादवांचे साम्राज्य नर्मदा नदी पासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते यामध्ये आताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार उत्तर कर्नाटक मध्य प्रदेश चा काही भाग गुजरातचा काही भाग व महाराष्ट्राचा समावेश होतो यादव  साम्राज्याची राजधानी अत्यंत  अजिंक्य अशी होती. यादवांच्या साम्राज्यात कला ,साहित्य, संस्कृती भाषा व स्थापत्य आदी बाबींचा विकास झालेला दिसतो. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तसेच माहीम भटांनी चक्रधर स्वामींचे चरित्र सुद्धा याच कालखंडात लिहिले. वास्तु शिल्पांची उत्कृष्ट उदाहरण असलेले बरेच मंदिरे सुद्धा याच काळातील आहेत. असे सुख समृद्धीने नटलेले स्वकियांचेच वैभवशाली  राज्य या या भूमीवर होते.

  1294 मध्ये देवगिरीवर पहिली स्वारी उत्तरेकडून झाली अल्लाउद्दीन खिलजी याने तत्कालीन यादव राजे रामदेवराय यांचा पराभव केला त्याने संपन्न अशा यादव राज्यातून अमाप संपत्ती खंडणीच्या रूपाने घेऊन तो दिल्लीच्या दिशेने परतला .त्याने यादव राजांना आपले मांडलिक बनवले . शेकडो वर्षाची स्वतंत्रता एक प्रकारे बंदिस्त झाली .पुढील काळात रामदेवरायांनी परिस्थिती पाहून खंडणी देणे खंडित केले पण लगेच अल्लाउद्दीन ने 1307 ला त्याचा सेनापती मलिक काफुर याला देवगिरीवर पाठवले त्याने रामदेवरा यांना कैद करून दिल्लीस घेऊन गेला . पुढे दिल्लीच्या बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारून रामदेवराय पुन्हा आपल्या राज्यात परतले त्यानंतर त्यांचा मुलगा शंकर देव हा राजा झाला. त्यांनी अत्यंत स्वतंत्र वृत्तीने आपला राज्यकारभार चालविला सुलतानाला हे लक्षात येतात त्याने 1312 मध्ये पुन्हा हा मलिक काफुर पाठविले. या लढाईत शंकर देवाला अत्यंत अमानुषपणे ठार मारले गेले व देवगिरी दिल्लीला जोडली गेली. पुढे काफुर हा दोन वर्ष देवगिरी तच वास्तव्य करून होता. उत्तरेत अंतर्गत बंडाळ्या सुरू झाल्याने खिलजीने त्याला परत बोलावले या परिस्थितीचा चा फायदा घेत दक्षिणेतील हिंदू राजांनी सुलताना विरुद्ध एकत्र येण्यास सुरुवात केली त्याचे नेतृत्व शंकर देवाचा मेहुणा हरपालदेव यांनी केले.अत्यंत स्वतंत्र वृत्तीने वागणाऱ्या  हरपाल देवाने देवगिरी ताब्यात घेऊन सुलतानाच्या लोकांना हाकलून लावले .या धक्क्याने अल्लाउद्दीन खिलजी मरण पावला. दिल्लीची गादी मिळविण्याच्या सत्तासंघर्षात मलिक काफुर सुद्धा मारला गेला. 1313 मध्ये मुबारक खिलजी गादीवर आला त्याने 1318 मध्ये देवगिरीवर स्वारी करून हरपाल देवाला अत्यंत क्रूरपणे ठार मारले यामध्ये देवगिरीचे बलशाली असे यादव साम्राज्य लयास गेले या साम्राज्याचा अस्त होणे ही इतिहासाला कलांटी देणारी घटना होती देवगिरीच्या अजिक्य यादवांचा पराभव होणे ही सोपी गोष्ट नव्हती तो एक चिकित्सेचा स्वतंत्र भाग आहे.

 शंकर देवाचा मुलगा गोविंद देव याचे पालन पोषण हरपाल देवाने केले होते या गोविंद देवाने सुद्धा पुढे संघर्ष चालूच ठेवला त्यानेही स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरु ठेवल्या होत्या. त्यानंतर ठाकूरजी जाधवराव हे गादीवर आले हे ठाकुर जी 1440 च्या सुमारास मृत्यू पावले त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भुकन देव हे वतनावर आले. वंशपरंपरेने अचलकर्ण उर्फ अचलोजी त्यानंतर विठ्ठल उर्फ विठुजी हे मनसबदारीवर आले. हा कालखंड विजयनगरच्या साम्राज्याच्या लयास जाण्याच्या समकालीन आहे. सर्व शाह्या आपसातील सत्तासंघर्षात लढत होत्या. यात सामान्याचे हाल होत होते .विठ्ठल देवाचे पुत्र लक्ष्मण देव उर्फ लखुजी जाधव राव हे देशमुखी वतन व मनसबदारीवर आले. त्यावेळी ते निजामशाहीच्या चाकरीत होते या सत्तासंघर्षात मराठा सरदार आपल्या पराक्रमाने वंशपरंपरेने शौर्य गाजवत अस्तित्व टिकून होते तत्कालीन राजकीय परिस्थिती सुद्धा त्याच प्रकारची होती शाह्यामध्ये होणारे संघर्ष, उत्तरेकडून मोगलांच्या स्वाऱ्या यामध्ये प्रत्येक शाही आपले बळ वाढवण्यासाठी पराक्रमी मराठे सरदारांना आपल्या बाजूने करून घेत. जाधव वंशा मध्ये  पराक्रमाची परंपरा तर होतीच पण ते अत्यंत स्वाभिमान व प्रजावत्सल  होते. यादव अर्थात जाधवरावांचा इतिहास या देवगिरीशी निगडित आहे यादवांच्या काळातील स्वतंत्र व सार्वभौम असे राज्य नष्ट झाले तरी त्यांच्या वंशीयामध्ये ही प्रेरणा जागृत होतीच हे समकालीन घटनांवरून समजते. तात्कालीन परिस्थितीनुसार आपले महत्व ,अस्तित्व टिकून ठेवत व मनात स्वातंत्र्याची प्रेरणा ठेवूनच ते वागताना दिसतात. त्यांनी पराक्रम, साहस,शौर्य, बुद्धिमत्ता व मुत्सद्दीपणा यामधून एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. अजिंक्य असणारा देवगिरीचा किल्ला राजे लखुजी जाधवराव यांनी प्रत्यक्ष स्वारी करून जिंकला होता मोठ्या युक्तीने अगदी मोजक्या सरदारांसह वैरण वाहून नेणाऱ्या वेडबिगारांच्या वेशात गवतात शस्त्रे लपवून  किल्ल्यात प्रवेश मिळवला. इतिहासात प्रथमच हा अभेद्य किल्ला आपल्या युद्ध कौशल्यावर जाधव रावांनी मुर्तजा निजामशहा यांना जिंकुन दिला . ही नोंद जाधवरावांच्या मूळ बखरीत आढळते या पराक्रमाने लखुजी राजे जाधवराव यांना पंच हजारी मनसबदार बनविले 24000 सैन्या 15000 घोडदळ व 52 चावडयांच्या वतना सह त्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. सिंदखेड परगाना  त्यांना जहागिर म्हणून देण्यात आला. सोळाव्या शतकात सिंदखेड ची देशमुखी मुळे घराण्याकडे होती त्या ठिकाणी रविराज ढोणे हा हळूहळू पुंडाई करू लागला होता. त्याने मुळे घराण्याची कत्तल घडवून जबरदस्तीने सिंदखेडची देशमुखीचा उपभोग घेऊ लागला होता या कत्तली मधून यमुनाबाई ही मुळे घराण्यातील एक स्त्री आपला जीव वाचवून लखूजीराजे जाधवरावाकडे मदतीसाठी पोहचली .त्यावेळी ते पैठण परगण्यातील लासनेर येथे छावणी करुन राहत होते .यमुनाबाईच्या तक्रारीवरून आपल्या सैन्यासह ते सिंदखेडला आले व सर्व चौकशीअंती त्यांनी रात्री रवीराव ढोणे यांच्यावर हल्ला केला यात रविराव ढोणे ठार झाला. यमुनाबाई ने 1573 मध्ये सिंदखेडचे देशमुखी वतन लखुजी राजे यांच्या नावे करून दिले. यापूर्वी सिंदखेड ,परतुर , खेंडले (साखरखेर्डा), मेहकर ही जहागिरी त्यांच्याकडे होती त्या खर्चासाठी निजामाने गाडगापूर ,वैजापूर, फुलब्बी, कन्नड ,दाऊरवाडी , पैठण, सेंदुरा बाद मेहकर, लोणार,रिसवड, बामणी ,पिंपळगाव, कुरहे, मंगळूर हे महाल खर्चाकरिता लावून दिले होते.

लखुजी राजे जाधवराव यांचा 1550 ते 1600 हा निजामशाहीतील कालखंड खूप महत्त्वाचा आहे निजामांच्या अंतर्गत संघर्षात जाधव रावांचे एक स्वतंत्र अस्तित्व होते द्क्षिणी फळीतील एक मातब्बर सरदार म्हणून त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. पुढच्या काळात या अंतर्गत संघर्षात लखुजीराजे, उदाराम देशमुख हे निजामशाही विरुद्ध मोगलांकडून घडले होते.जेव्हा जहांगीर बादशहाने दक्षिण जिंकण्यासाठी कार्य हाती घेतले तेव्हा त्याच्याविरुद्ध मलिक अंबर  व निजामाच्या बाजूने राहून मालोजीराजे, लखुजीराजे ,शहाजीराजे व इतर मराठा सरदार यांनी पराक्रम गाजवून मोगलांना रोखलेले दिसते. जेव्हा जेव्हा मलिक अंबरला साहाय्य करायचे सोडले तेव्हा तेव्हा मलिक अंबरला माघार घ्यावी लागल्याचे दिसते मराठा सरदारांच्या वरचढपणा मलिक अंबर सारख्याना खपत नव्हता. मराठा सरदार मधील एक्य त्याच्या डोळ्यात खुपत असे.त्यांच्या नेतृत्वात स्वतंत्र मोहीमा सुद्धा त्यांना देत नसत .या सरदारांचे पराक्रम ही लेखन कर्ता दुजा भाव ठेऊनच करत असेल असे वाटते .

      1623 या काळात देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरण घडले. मोगलांविरुद्ध एकत्र येऊन लढण्यासाठी लखुजीराजे जाधवराव,उदाराम देशमुख ,मलिक अंबर शहजादा खुर्रमच्या बापाविरुध्दच्या बंडाला सहकार्य करण्यासदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दरबार भरला होता .या बैठकीनंतर एकच गोधळ उडाला .या बाबत सविस्तर वर्णन शिवभारतकार आठव्या  अध्यायात करताना दिसतो.


*ततः खंण्डार्गलाख्यस्य नृपस्याग्रेसरः करी ।*

*मर्दयन्नन्यसैन्यानि प्रचचाल बलाद्बली।।*


खंडागळे राजांचा बलवंत हत्ती सैन्य तुडवत निघाला होता. एखाद्या हत्तीने गर्जना केल्या कळपातील हत्तीला ती गर्जना सहन होत नाही त्याप्रमाणे त्या हत्तीची गर्जना जाधव रावांच्या दत्ताजीस सहन झाली नाही. या धामधुमीत विठुजी- संभाजी -खेळोजी खंडागळेच्या मदतीला धावले या  संघर्षात दत्ताजी मारले गेले. देवगिरी वरून निघालेले राजे लखुजी जाधव राव ते पुन्हा परत फिरले. क्रोधाने लालबुंद झालेल्या जाधवलारावांना पाहून पृथ्वी,अरण्ये, द्विपे व त्यावरील पर्वते कापू लागली. असे शिवभारत कार वर्णन करतो. या युद्धात विठुजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले मारले गेले यात उभयतांना पश्चाताप झाला त्यानंतर जाधव भोसले हाड-वैराच्या कथा रचल्या गेल्या, पण त्या निराधार वाटतात दोन प्रतिभावंत वंशामध्ये उद्भवलेले वितुष्ट प्रासंगिक स्वरूपाचे होते. याची प्रचिती 1624 च्या भातवडीच्या लढाईत लखुजीराजे जाधवराव यांच्या भूमिकेवरून लक्षात येते.

        1626 मध्ये मलिक अंबरचा मृत्यू झाला .निजामशाही वर अवकळा आली . मलिक अंबर नेहमी त्यांचा द्वेष करत असे .त्याचा या सुडाच्या धोरणाने लखुजी राजे जाधव रावांनी निजामशाही सोडली होती. यानंतर दिल्लीच्या बादशहास सोडून ते पुन्हा निजामशाही आले त्यावेळी शिवभारतकार त्यांना निजामाचा कैवारी कर्तुत्ववान बलाढ्य राजा जाधवराव असे संबोधतो. निजामाच्या पदरी असलेल्या दृष्ट सरदारांनी त्याचे कान भरले. जाधवरावांच्या दक्षिणेतील चढत्या आलेखाची भिती व द्वेष बाळगत एक प्रकारे विषचं कालवले. निजामाला सज्जनही ही दुर्जन वाटू लागले आणि हाजी हाजी करणारे दुर्जन सज्जन वाटू लागले.

    देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले अत्यंत तेजस्वी लखुजी राजे जाधव राव त्यांचे पुत्र व आमात्य यांच्यासह या दरबारात त्यांचा अपमान झाला. याचा संताप स्वाभिमानी जाधवरावांना आला आला. ते परत जात असताना निजामाचा सेनापती हमीद व इतरांनी जाधवराव मंडळींना दारापाशी घेरले. बेसावध अवस्थेत निशस्त्र व संख्येने कमी असलेल्या जाधव रावांचा संघर्ष कमी पडला .त्यांच्यावर चारही बाजूने वार झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा लखुजी राजे जाधवराव मोठ्या शर्थीने लढले. त्यांचा पुत्र अचलोजी व नातू यशवंतरावसह जाधवराव मंडळी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. याचा साक्षीदार देवगिरी होता भारतकार आठव्या अध्यायात म्हणतो


*यथा मेरोर्विपर्यासःपातो भानुमतो यथा।*

*यथा हयन्त:कृतान्तस्य दाह:पत्युरपां यथा॥*

*तथा यादवराजस्य तदा तत्र बदात्यय:।*

*सप्तनामपिलोकानामभूदल्पहितावह:।।*


जसे मेरुपर्वताचे उलथून पडणे, किंवा सूर्याचे खाली पडणे ,किंवा यमा चा अंत होणे,किंवा वरुनाचा  दाह होणे. तसा जाधवरावांचा येथील झालेला अंत सातही लोकांस अत्यंत अहितकारक झाला. 25 जुलै 1629 च्या या घटनेने महाबली शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई यांना खूप मोठा हादरा बसला. लगेच शहाजीराजांनी सुद्धा निजामशाही सोडली. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रान्तिकारी घटना होय मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत प्राणपणाने लढणारे ती माणसे होती पुढे स्वराज्य कार्यात या जाधवरावांचे मोलाचे योगदान दिसते. या मातीच्या रक्षणार्थ या  जाधवराव मंडळीची पराक्रम,स्वामिनिष्ठता व बलिदानाची श्रृखलाच  दिसते .

   लखुजीराजे जाधवरावांच्या नंतर त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई,अचलोजींच् च्या पत्नी आणि त्यांचा मुलगा संताजी उर्फ सुजन सिंह ही पुण्यात येऊन  जिजाऊंकडे वास्तव्यास होती. संताजी जाधवराव यांची कन्या काशीबाई यांचा विवाह जिजाऊंनीच शिवरायांसोबत लावून दिला होता. दक्षिणेत कनकगिरीच्या लढाई संभाजी राजे व संताजी यांना  विश्वासघात करून अफजलखानाने मारले होते .पुढे संताजी पुत्र शंभू सिंह जाधव राव हे सुद्धा अगदी सावलीसारखे शिवरायांच्या सोबत असत स्वराज्य कार्यात एकमेकांना जपण्यासाठी जाधव -भोसले वंशीयांची जोड शहाजीराजे व जिजाऊ यांनी पुढील काळात विचारपूर्वक लावून दिलेली दिसते .शंभुसिंग जाधवराव पावन खिंडीत पहिल्या प्रहरात सिद्दी मसूदशी  लढताना धारातीर्थी पडले. ही त्यांची  स्वराज्यनिष्ठताच होय . शिवपुत्र संभाजी राजे यांच्या बलिदानानंतर मोगलांना सळो कि पळो करून सोडणारे धनाजीराव जाधवराव हे शंभू सिंह जाधव राव यांचेच पुत्र होते. शिवकन्या रानुबाई या सुद्धा जाधव घराण्यातच होत्या . एवढे मोठे योगदान या मंडळीचे स्वराज्य कार्यात होते. या प्रजा वत्सल  वंशीयांचा मध्ययुगीन कालखंडातील वटवृक्ष म्हणजे लखुजीराजे जाधवराव हेच होय .


*संदर्भ*

*_राजे लखुजी जाधवराव चिकित्सक ग्रंथ प्राचार्य डॉ एस ए बाहेकर*

*_कवीद्र परमानंदकृत श्रीशिवभारत*



*संजय खांडवे*

9011971122

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

मराठयांची शौर्यभूमी :गजापूरची पावनखिंड

 *शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*

(भाग -१ )

स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग


१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप  भूमीमध्ये अफजली  संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या  संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या  दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे  कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.

या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला.  हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या  सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे  सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .

२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो  वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला  वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून  शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता. याप्रसंगी राजगडावर असलेल्या राजमाता या संपूर्ण प्रसंगाला तोंड देण्यास दक्ष झाल्या होत्या. शिवभारतात  कवी परमानंद म्हणतो_


जननी शिवराजस्य सा राजगिरीवर्तिनी।

निजनां गिरीदुर्गाणामवने ऽ वहिताभवत ॥


राजगडावर राहणारी ती शिवाजी ची माता आपल्या गडाच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली. आईसाहेब स्वराज्याचे प्रेरणास्थान आहे प्रसंगी त्यादेखील हातात तलवार घेऊन स्वराज्याच्या रक्षणार्थ दक्ष झालेल्या दिसतात .

     त्याच वेळी विजापूरकरांच्या तोफा ह्या पन्हाळ्यावर सरळ मारा करण्यास अक्षम ठरत होत्या तेव्हा इंग्रज हेन्री रिव्हिग्टनने दारु गोळा पुरविला फिलिफ गिफाड हा इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत होतां. या तोफांनी गडाचे मोठे नुकसान केले म्हणजे लढाई केवळ विजापूरकरांच्या विरोधात नव्हती तर इंग्रजही त्यांच्यासोबत होते एकाच वेळी दोन शत्रूशी महाराजांना लढावं लागत होतं. पुढे इंग्रजांचा हिशोबही महाराजांनी बाकी ठेवलेला दिसत नाही १६६१ मध्ये  इग्रजांच्या राजापूरच्या वखारीला वर हल्ला करून सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करुन त्यांना रायगडावर आणले होते .

   पावसाने आपले रौद्र रूप धारण केले . गडावरून पाण्याचे लोट वाहू लागले नदी नाले तुडूंब झाली पण वेढा अजून मजबूत झाला. महाराजांनी विचार केला की शत्रूवर सरळ हल्ला करून काहीच साध्य होणार नाही उलट यात आपली माणसे कामी येतील. या वेढयातून निसटायचंच हा बेत महाराजांनी पक्का केला.१२ जुलै १६६०च्या सकाळी गडाच्या पूर्वेकडील दरवाजा पहिल्यांदा उघडला गेला या दरवाज्यातून चार माणसे बाहेर आली ती म्हणजे गंगाधर पंत, त्र्यंबकपंत व त्यात सैनिकाच्या वेषात दोन गुप्तहेर . पांढरं निशाण घेऊन ती खाली येत होती ते पाहून सिद्धीला आनंद झाला शिवाजी राजे शरण येत आहेत हा या पांढऱ्या निशाणाचा याचा अर्थ होता." आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास राजी आहोत आमच्या जीवास काहीएक धोका नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरिता येतो"

असा निरोप पंताच्या हस्ते पाठविला तेवढ्याच वेळात सोबत आलेल्या दोन गुप्तहेर सिद्दीच्या सैन्यात मिसळून त्यांनी अशी अफवा पसरवली की शिवाजी राजे व सिद्दी जोहर यांच्यात आदिलशहा विरुद्ध संगनमत झाले आहे. सिद्धी स्वामिनिष्ठ नव्हता हे त्याच्या सैन्याला चांगलेच माहित होते या कारणाने का होईना सतत चार महिने बायको पोरांपासून दूर असलेले ते सैनिक आता लवकरच घरी जायला मिळणार या कल्पनेने गाफिल झाले.

     १२ जुलै १६६० हा दिवस गडावर खूप महत्त्वाचा होता आता वेढ्यातून कसे बाहेर पडायचे याची खलबतं सुरू झाली. छत्रपतींचं एक तत्व व होतं की ते कोणतीही मोहीम आखतांना आपल्या विश्वासू लोकांना सोबत घेऊन चर्चा करत , त्यांची मतं जाणून घेत यात ।लहान-मोठा असा भेद कदापिही नसे. त्याच दिवशी सायंकाळी गडावरील तीन मजली इमारत म्हणजे सज्जा कुटी या ठिकाणी मसलते सुरू झाली यात खुद्द छत्रपती समवेत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभू सिंह जाधव रायाजी बांदल, विठोजी काटे, शिवाजी काशीद व बांदल सरदार उपस्थित होती. कुणी सांगितलं महाराजांनी पुसाटी  बुरुजाकडून जावे. कुणी म्हणत होतं दुतोंडी बुरुजाकड्रून जावे. मग एक सूर समोर आला की महाराजांनी पालखीत बसून बाहेर पडावं व या दोन पालख्या असाव्यात एका पालखीत खरे शिवाजी व दुसऱ्या पालखीत सोंगातले शिवाजी! सोंगातले शिवाजी म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा वळाल्या त्या शिवाजी काशीदांकडे! अगदी हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शिवाजी काशिद या बैठकीस उपस्थित होते. महाराजांची आणि त्यांची ओळख अवघ्या दोन चार महिन्यापूर्वीची ! पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या  नेबापुर गावातील सामान्य न्हावी कुटुंबातील हे शिवाजी काशीद . शिवरायांच्या स्वराज्याचं वेड लागलेले शरीरयष्टीने अगदी महाराजांसारखे केशभूषा ही अगदी तशीच ! हा वीर लाखाच्या पोशिंदयासाठी एका क्षणात सर्वस्व ओवाळायला तयार झाला आपले काय होणार याची स्पष्ट जाणीव शिवाजी काशीद यांना होती शिवरायांनी प्रजे मध्ये निर्माण केलेला विश्वास एक- एक नरवीर जन्माला घालत होता त्यापैकीच एक शिवाजी काशीद. मग ठरले दोन पालख्या सजल्या व राजदिंडी मार्गे गडा बाहेर पडण्याचे ठरले. महाराजांचा अंगरखा, शेला, शिरस्त्राण व रत्नजडित तलवार सर्वात महत्त्वाचं महाराजांची आई भवानीचा प्रसाद असलेली कवड्याची माळ घालून शिंवाजी काशिद अगदी आरश्यात प्रतिबिब दिसावे असे एकमेंकांना भासू लागले .रात्री दहाच्या सुमारास पालख्या निघाल्या . वाहून नेणाऱ्या भोयांनाही माहीत नव्हत की खरे शिवाजी कोणत्या पालखीत बसलेत ! आषाढ शुद्ध पौर्णिमा, काळेकुट्ट ढग दाटून आलेले धो -धो कोसळणारा पाऊस या अंधारातून मार्ग काढत जायचे होते गुप्तहेर व वाटाडयांनी समोर अगोदर मार्ग शोधून ठेवले होते या किर्र अंधारात शत्रूला भनक न लागता निघायचे होते. वीज चमकल्यावर आपण दिसतो की काय या विचारांने त्यांच्या मनात धडकी भरायची.

      आज ज्या ठिकाणी तुरुकवाडी गाव आहे त्या गावाच्या सुमारास या दोन्ही पालखी आल्या.किर्र अंधारात झुडूपात हालचाल झाली ,शत्रूच्या हेराना सुगावा लागल्याची खात्री झाली .ती वेळ मार्गस्थ होण्याची होती पाठलाग करण्याची नव्हती.  या ठिकाणाहून पुढे मलकापूर मार्गे विशालगडावर जाणारा राजमार्ग होता.  शिवाजीराजेंनी शिवाजी काशिदांची गळाभेट घेतली व ३०० मावळे सोबत देऊन शिवाजी काशिदांची पालखी मलकापूर या नेहमीच्या सोप्या मार्गे पाठविली.त्याच ठिकाणाहून माळुंगे मार्गे मसाई पठारावरून अवघड वाटेने महाराजांची पालखी निघाली .जंगलातून जाणारा तो मार्ग होता .

   सिद्दीच्या छावणीत खबर पोहोचली शिवाजी राजे वेढ्यातून सुटले सिद्धी चौताळला त्याने आपला जावई सिद्धी मसूद याला पालखीच्या रोखाने पाठवले महाराज विशालगडावर जातील या हेतूने त्याने मलकापूर मार्गे पाठलाग सुरू केला. महाराजांचे युद्धनीती तील कौशल्य या ठिकाणी दिसून येते. नव्या दमाने तीन हजाराचा घोडदळासह ताफा घेऊन मसूद घोड्यावर निघाला त्याने शिवाजी काशिदांच्या पायी जाणाऱ्या पालखीला गाठले. हात घाईची लढाई झाली पण लढाईत स्वारस्य नव्हते, त्याला शिवाजी हवे होते. शिवाजी हाती आले म्हणून मसूद जाम खुश झाला व ही पालखी घेऊन तो छावणीत आला. आल्याबरोबर जोहरने शिवाजीराजास पहिले त्याने जसे ऐकले होते तसेच अगदी तसेच शिवाजी राजे त्याच्यासमोर होते तोच रुबाब ,तोच बाणेदारपणा, तोच थाट, मृत्यूचे यत्किंचित सुद्धा भय चेहऱ्यावर नव्हते. शिवरायांची शिनात्ख करेल अशी एकच व्यक्ती त्या ठिकाणी होती ती म्हणजे फाजल खान . आपल्या बापाच्या वधाच्या वेळी प्रत्यक्ष त्याने राजेंना बघितले होते . ओळख परेड सुरू झाली . महाराजांना तो न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या  पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्‍यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी मी शिवाजी काशीद !"

" सोंगातल शिवाजी झालं म्हणून काय झालं तो काय पडणार आहे,  तो काय पाठ दाखवणार आहे, अरे खोट्या शिवाजीची पाठ पाहू शकत नाही तर खऱ्या शिवाजीची पाठ बघण्याचा विचार तू सोड " असं म्हणताच त्याने शिवाजी काशिदांच्या छातीत तलवार खुपसली रक्ताची चिरकांडी उडाली, जखम दाबत तो ढेऱ्या खांब पकडत खाली पडला, भयानक वेदना सहन करत म्हणाला " राजे काही क्षणासाठी का होईना तुमची वस्त्र घातलेला सोंगातला शिवाजी सुद्धा पाठ दाखवणार नाही राजे "मुजरा राजे! मुजरा! वीराच्या थाटात हे बलिदान झालं .

   वेळेचा अपव्यय झालेला होता . आता सिद्धीच्या हेराच्या खबरे नुसार महाराज मसाई पठारामार्गे म्हणजे आताच्या कुंभारवाडी- खोतवाडी- आंबेवाडी- लिंगेवाडी यामार्गे गेल्याच्या बातम्या आल्या. मसूद पुन्हा त्याच वेगाने २००० घोडदळ व १००० पायदळ घेऊन निघाला. महाराजांच्या पालखीचे भोई फक्त आपली खांदेपालट करतायेत.एक थकला की दुसरा सर्व काही मॅरेथॉन पद्धतीने सुरु होत . क्षणभरही पालखी कोठे टेकली नाही स्वराज्याच्या छत्रपतीचं ओझआपल्या खांद्यावर पेलत, गुडघाभर चिखलातून, नदी नाल्यातून ,किर्रऽर्रऽर्र अंधारातून जात आहे या मार्गात दिवसासुध्दा अंधारलेले असे जंगल आजही आहे . पाऊस वाऱ्याने चौताळलेले वाघ ,जंगली श्वापदे,साप ,विंचू याचे तर भयही त्यांना नव्हते. सकाळी तांबडं फुटण्याच्या वेळेला महाराज आपल्या मावळ्यासह पांढरपाणी या गावात पोहोचले तोच पाठीमागून हेरांनी खबर आणली की सिद्दी मसूद जवळच पोहचला नव्या दमाचे सैन्य त्याच्यासोबत आहेत.

      पांढरपाणी गावापासून जवळच गजापूरची खिंड आहे त्यापुढे सहा कोसावर विशाल गड ! महाराजांच्या सोबत हिरडस मावळ प्रांतातील बांदल मंडळी आहेत त्यांना या भागाची पूरेपूर माहीती होती. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ,रायाजी बांदल , शंभुसिंग जाधव ,विठोजी काटे हे शूर सरदार आहेत.आता महाराज विशालगडी सुखरूप पोहचणे हे सर्वाच्या मनात होते .गजापूरच्या खिंडीत आल्यावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे,हिरडस मावळ प्रांतातील सिंद हे त्यांचे गाव ,चांद्रसेनिय कायस्थ प्रभू  अत्यंत शू२ व स्वामिनिष्ठ ! महाराजांना म्हणाले " आम्ही  गनिमास येथे दोन प्रहरात पर्यंत रोखून ठेवतो, प्राण असेपर्यंत गनिमास खिंड चढू देणार नाही आपण विशालगडी जावे व  तोफांच्या इशारती देऊन  कळवावे.महाराजांचे पाऊल पण पुढे सरसावत नव्हते . मसूदचे सैन्य जवळ येताना दिसले .महाराज निवडक ३०० मावळ्यासह विशालगडाकडे निघाले .बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधवासह ३०० बांदल मावळे गजापुरच्या खिंडीत थांबले दोन्ही बाजूंनी उंच डोंगर रांगा मध्ये 500 फूट खोल खिंड की जी सरळ विशाल गडाकडे जाते. गोफणी, भाले, तलवारी बाण,डोगरउतारावर दगड गोटे घेऊन बांदल मावळे झाडा झुडपात लपून बसले. नव्या दमानं सिद्दी मसूद व फाजलखान आपल्या तीन हजाराच्या फौजेसह खिंड उतरू लागला. गनीमावर सपासप मारा होऊ लागला . पहिल्या प्रहरात शत्रूचे हजारो सैन्य आपले शूर मावळ्यांनी पावन खिंडीत पाडले. लढत असताना शंभू सिंह जाधव स्वराज्यासाठी कामी आले. शंभू सिंह जाधव म्हणजे राजे लखुजी जाधव यांचे पुत्र अचलोजीं व त्यांचे  पुत्र संताजी की जे कनकगिरीच्या लढाईत संभाजीराजेसोबत अफजलखानाच्या दगाफटक्याने धारातिर्थी पडले होते .त्यांचेच पुत्र हे वीर शंभू सिंह जाधव होय ही जाधव मंडळी सुद्धा स्वराज्याच्या कार्यात अगदी सावलीसारखी महाराजांच्या सोबत आपल्या इतिहासाच्या पानापानात दिसतात.

      अक्षरशः रक्तामासाच्या सडा पडला दुसरा प्रहर लागला बाजीप्रभू मोठ्या पराक्रमाने लढत होते प्रचंड स्वामीनिष्ठता, स्वराज्यावरील प्रेम त्यांच्या पराक्रमातून दिसत होते .सहा तास झाले लढाई सुरू आहे सतत १७ -१८ तासाचा या बांदल मावळ्यांचा संघर्ष नव्या दमाच्या सिद्धीच्या सैन्यासोबत होता विशालगडा कडून येणाऱ्या आवाजाकडे सर्वांचे कान होते कारण हाआवाज आपल्या धन्याची खुशाली सांगणारा होता. क्षणाक्षणाला एक एक मावळा कामी येत होता. अंग रक्तबंबाळ झाले होते .कुणाचे हात निकामी ,कोणाचे पाय निकामी तरीसुद्धा रयतेच्या राजा साठी ही माणसं शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. बाजीप्रभूंचा आवेश तर शत्रूंना पाहूनच भयभीत करणारा होता प्रत्यक्ष यमराजालाही या नरविराने  थांबवून ठेवले . जनू यमालाही ते म्हणत आहेत ,"अरे थांब! आधी माझ्या राजाला सुखरूप पोहोचू दे  ! मग माझा प्राण घे !" विशाल गडाकडे जाणारा महाराजांचा प्रवास चार-पाच कोसाचा पण त्या ठिकाणी विशाल गडालाही वेढा घालून बसलेले आदिलशाही चाकरीतील  सूर्यराव सुर्वे व जसवंत दळवी यांनी महाराजांचा मार्ग अडवला. महाराजांसह सैन्य चालून चालून थकलेल असतांना पुन्हा नव्या दमाच्या सैन्यासोबत लढावं लागतंय. हा वेढा महाराजांना फोडावा लागला. यात पुन्हा हा वेळेचा अपव्यय झाला होता . मोठ्या शर्तीने हा वेढा फोडून महाराज धावत धावत गडावर गेले आणि त्या ठिकाणाहून पूर्वेकडे तोफांच्या इशाराती दिल्या. बाजीप्रभूंच्या कानी हे तोफांचे आवाज पडताच आपला धनी सुखरूप पोहोचला हे समजून नरवीर बाजीप्रभूंनी या पावनखिंडीत आपला देह ठेवला. त्याच्या समवेत त्यांचे बंधु फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व ३०० बांदल मावळे या ठिकाणी धारातिर्थी पडले . काय ही  स्वामीनिष्ठता म्हणावी काय हे स्वराज्यप्रेम ! 

   इतिहासात महाराजांचे युद्धतंत्र हे जगालाही वेड लावणारे आहे .जगात ही अशी एकमेव लढाई आहे की जी आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी एका खिंडीत लढली गेली व त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन ठरली .ही शेकडो वीरांची बलिदाने मराठा साम्राज्याची प्रेरणास्थानेच आहेत . या पावन शौर्यभूमीवर  नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव  व  अनामिक बांदल मावळ्यांचे  भव्य पराक्रमाचे भव्य असेच स्मारक असावे या अपेक्षेसह त्यांना कोटी कोटी प्रणाम .



(वरिल संघर्षमय इतिहास ज्या भूमीत घडला त्या भूमीत प्रत्यक्ष पदभ्रमंती करून लक्षात येते की आज तरी रस्ते पाऊल वाटा आहेत त्यावेळी काय होतं ? हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य म्हणून इतिहासकार श्री शिवरत्न शेटे सर (सोलापूर) यांच्या प्रेरणेने ही संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष शौर्य भूमीवर जाऊन सत्य इतिहास संदर्भाच्या आधारे समजून घेता येतो आपणही प्रत्येक वर्षी ११,१२ व १३जुलै या तीन दिवसात महाराज ज्या मार्गाने पन्हाळ्यावरुन विशाळगडावर गेले त्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन अनुभव घ्यावा)



संजय खांडवे

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...